अरूण शिरढोणकर
(३ सेप्टेंबर १९४१ - १४ नोव्हेंबर २०१७)
छत्रीबाजार, ग्वाल्हेर येथील प्रसिद्ध शिरढोणकर कुटुंबात जन्मलेले अरूण शिरढोणकर कुटुंब वत्सल गृहस्थ म्हणून ओळखले जात होते, पण स्वतःच्या आयुष्यात, आजूबाजूच्या परिसरात आणि एकूणच समाजात माणसासोबत घडणाऱ्या कटू घटनांचा प्रतिसाद त्यांच्या कवितेत दिसून येतो. उत्तर भारतात मराठी भाषेत पत्रकारितेचा पाया रोवणारे रघुनाथ विष्णुपंत शिरढोणकर ह्यांचे पुत्र अरूण यांना साहित्याचा वारसा वडिलांकडून मिळाला आणि त्यांनी तो योग्य प्रकारे जपला. मराठी आणि हिन्दी दोन्हीं भाषेत त्यांनी समान प्रभुत्त्व मिळविले होते.
अरूण शिरढोणकर आस्तिक होते. सकाळी लवकर स्नान वगैरे आटपून ते साग्रसंगीत पूजा करायचे, पण आयुष्याच्या शेवटल्या टप्प्या पर्यंत त्यांना अनेक भीषण प्रसंगातून जावे लागले आणि मनात दाटलेली कटूता मग कवितेत व्यक्त झाली. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे लहानपण मध्यप्रदेशातील गावांमध्ये गेले आणि अरूण शिरढोणकर यांना सामान्य माणसाचं जगणं जवळून बघण्याची संधी अनायास मिळाली. ह्या संधीचे त्यांनी सोने केले. मोठं कुटुंब असल्याने आर्थिक सुबत्ता नव्हती, पण शिक्षणाची ओढ मात्र आत्यन्तिक होती. लहान गावात ते शक्य नव्हतं म्हणून आई वडिलांकडून ग्वाल्हेरला जाण्याची परवानगी घेतली. राह्यला घर होतं पण वडिलांवर इतर भार पडू नये म्हणून साडीच्या दुकानात मदतनिसापासून ते खाजगी शाळेत शिक्षकाच्या नोकरीपर्यंत मिळेल ते काम केले आणि इतिहास व मराठी ह्या दोन विषयात स्नातकोत्तर (एम ए) पदवी मिळवली. साहित्य, इतिहास आणि पत्रकारितेची प्रचंड तळमळ असलेल्या वडिलांचे ते अस्सल चिरंजीव होते.साहित्याचे संस्कार त्यांच्या मनावर झाले होते तर पत्रकारिता रक्तातच होती.
अरूण शिरढोणकर यांनी वडिलांच्या निधनानंतर १९७१ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त दोन महत्त्वाची कामे सुरू केली. त्यातील पहिले म्हणजे वडिलांची आद्याक्षरे घेऊन त्यांनी तुटपुंज्या आर्थिक बळावर मराठीत ‘रवी’ साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. अल्पावधीतच या साप्ताहिकाची मध्यप्रदेशातच नव्हे तर देशभरात जिथे जिथे मराठी भाषिक होते तिथे तिथे यशस्वीपणे दखल घेतली गेली.पण दुर्दैवाने तब्बल चार वर्षानंतर आर्थिक अडचणींमुळे ‘रवी’ साप्ताहिकाचे प्रकाशन बंद करावे लागले. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आणखी एक अत्यंत महत्त्वाचे काम केले. सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना देखील ,अत्यंत जोमाने,अरूण दादा दरवर्षी जुलै महिन्यात एक कार्यक्रम करत राहिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून *गो.नि.दांडेकर, पु. ना .ओक* वगैरे जुन्या पिढीतील वक्त्यांपासून ते आधुनिक काळातील *अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, मंगला खाडिलकर* सारख्या मराठी जगतातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांना ऐकण्याची संधी ग्वाल्हेरकरांना मिळाली.
जवळपास ४० वर्षे वडिलांच्या स्मृती स्वतःच्या बळावर जिवंत ठेवणं सोपं नव्हतं, पण अरूण शिरढोणकर यांनी पुत्रधर्माचे पालन ह्या पद्धतीने कसोशीने केले. इतकेच नाही तर २००८ मध्ये वडिलांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक मोठा कार्यक्रम केला आणि स्मरणिकाही प्रकाशित केली.आता ते स्वत:ही वयोमानानुसार थकायला लागले होते. जेंव्हा त्यांना वाटायला लागले की ही मशाल आपण यापुढे हाताळू शकणार नाही तेव्हा त्यांनी २००९ साली ती भोपाळवासी त्यांचे धाकटे बंधू डॉ.विजय शिरढोणकर यांच्याकडे सुपूर्द केली.
अरूण शिरढोणकर यांनी आपली संस्कृती नवीन पिढीला माहित असावी ह्या दृष्टीने मधल्या काही काळात अनेक वर्ष दिवाळीत किल्ला आणि भातुकली स्पर्धा आयोजित केली. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा मुलांसाठी "हितचिंतक विद्या मंदीर" सुरु केले आणि तिथे मुलांना निःशुल्क शिकवले. विशेष म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमांना समाजाकडून भरघोस प्रतिसाद मिळाला व अनेक जणांनी कुठल्याही आर्थिक किंवा इतर काही फायद्याची अपेक्षा न करता आपली सहभागिता नोंदवली.
अरूण शिरढोणकर यांचे संपूर्ण आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. संघर्ष आणि आर्थिक अडचणींसह ते जगले, परंतु त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक होता. कोणतेही काम लहान न समजणे आणि नेहमी व्यस्त राहणे हे त्यांचे जीवनमूल्य होते. लहान-मोठ्या सर्वांमध्ये लोकप्रिय असलेला सदैव हसरा चेहरा ही त्यांची खास ओळख होती.साधी,सरळ आणि नियमित दिनचर्या हे त्यांचे जीवन सूत्र होते .सांसारिक गोंधळातही ते सर्जनशील कार्यात मग्न होते. वयपरत्वे प्रकृती थोडी ढासळली होती पण ते मानसिकदृष्ट्या निरोगी, सजग आणि सक्रिय होते.
अरूण शिरढोणकर यांनी त्यांच्या निधनाच्या १५ दिवस आधी ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध शरद व्याख्यानमालेत झालेल्या प्रांतिक मराठी कवीसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. ‘पुरुषोत्तम राव’, ‘सोम्या-गोम्या’ इत्यादी त्यांच्या गाजलेल्या कविता होत्या, पण स्वत:ला मांडण्याची आधुनिक कला त्यांच्याकडे नव्हती आणि त्यामुळे एकूण साहित्यविश्वात ते काहीसे उपेक्षित राहिले. गाठीशी पैसा नाही शिवाय कोणाकडून मदत घ्यायची नाही हा स्वाभिमान असल्याने त्यांचा एकही संग्रह प्रसिद्ध होऊ शकला नाही.
अरूण शिरढोणकर यांच्या निधनानंतर सन २०२० मध्ये त्यांच्या मुलाने "अरूणोदय" नावाने एक छोटेखानी ई - संग्रह काढला. त्या संग्रहाची लिंक येथे देत आहे. शक्य झाल्यास त्याही कविता वाचाव्यात.
https://www.flipsnack.com/arunoday/arunoday.html
माझी माय
मी तळपलो
मी मावळलो
मी हुरळलो
मी पोळलो
मायबोलीसाठी
मी जगलो
मी खचलो
मी खरचटलो
माझ्या भाषेसाठी
तळहातात माझ्या
माझे दुखरे डोळे
मी नाकारली चाकरी
मी बंडखोर ठरलो
मी माझ्या मुठीत आवळली
एक वात थरथरणारी
मी मलाच बांधून घेतलं
मायबोलीच्या पोतडीत
मी मलाच गुरफटून घेतलं
माझ्या आईच्या गोधडीत
आता कुठली माझी दिशा
जिथे तिथे क्षितिजाची रेषा
मी जाईन तिथेच जाचतील मला
ठरलेली चौकट वर्तुळं नि खाचे
कधी घट्ट कधी सैल कंगोऱ्यांचे काचे
देवदूतांनो !
थांबा थोडे
लवकरच पूर्ण करेन मी
अर्ध्यावर राहिले ते हिशेब सगळे
मला भरवसा या तटावर
पुन्हा उमटतील माझे पाय
वाट बघत असेल माझी माय.
वंदू तुज गणराया
आम्ही तुलाच वंदू गणराया
तुलाच आणि तुलाच
सगळी दारं ठोठावून झाल्यावर
उरतं कोण ? तूच
आम्ही तुलाच वंदू गजानना
शेवटी आम्हाला तुझाच आधार
तुझाच भरवसा
तू कसाही वाग
सुखकर्ता दु:खहर्ता
आम्ही तुझीच आरती गाऊ
अथर्वशीर्षाची पारायणं करू
स्वतःला विघ्नहर्ता म्हणतोस
आणि तूच विघ्नं आणतो
तुला दिसत का नाही
गुंता झालाय आमच्या जगण्याचा
नको करू उजळणी
त्याची तुझ्यासमोर ?
काहीही झालं तरी
आम्ही तुझ्याच शरणी
तुझाच भरवसा आम्हाला
तू कसाही वाग
आम्ही तुलाच वंदू गणराया
आम्हाला कळू दिलंच नाही
तू कधी उसवून टाकली
लक्तरं आमच्या आयुष्याची
आता आम्ही ढेपाळलो आहोंत
आम्ही किती ओरडलो तडफडलो
पण तू समजूनच
घेत नाहीस आमची घुसमट
आम्ही करतोय बेरीज
आमच्या जगण्याची
कनवाळूपणे पुन्हा पुन्हा करतोय
वजाबाकी स्वप्नांची
आणि या वजाबाकीत
बाकीच उरत राहते
जगण्याच्या ओशट इच्छांची
तू आमच्या
पुढ्यात ठेवलेल्या वास्तवाने
आम्हाला किती खरखरीत
करून टाकलेय तू
तूच तर पायंडा घातला होता
जन्मदात्यांना सर्वस्व मानण्याचा
तूच सांगितलं आम्हाला
आईवडिलांना प्रदक्षिणा घातली
म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा होते
पण प्रत्यक्षात मात्र तू
भिकेला लावतोस त्यांना
जी मुलं आई-वडिलांना
देव मानतात
त्यांची सेवा करतात
आणि जे असं करत नाही
त्यांच्या कानात भिकबाळी असते
आणि गळ्यातही मिरवतात
ते एखादा दागिना
तू आपला लहरीपणा
नेहमी दाखवतोच नं
आपल्या मनासारखं वागतोच नं
बैस आपल्या ढेरपोटेपणाचं
कौतुक मिरवत
कोणी कितीही उपाशी असेल
तुला त्याचं काय
अर्धपोटी खपाटी उपाशी पोरं
दिसतच नाही तुला
भक्तांना आमिष दाखवून
एकवीस मोदकांचा नैवेद्य
करायला लावतोस तू
घालून घे सगळेच मोदक
तुझ्या घशात
आणि खाऊ घाल
तुझ्या त्या उंदरालाही
कधी आपल्या आसनावरून उठ
देवळाबाहेर येऊन बघ
कशी तुटून पडतात
उष्ट्या पत्रावळींवर कच्चीबच्ची
आमच्या जन्मापासूनच
तू आमच्याशी वैर साधलं आहे
आता आमची भूकही
करपून टाकली आहेस तू
आता रस्त्यावर चालताना
आमचा भुसाच भुसा
उडताना दिसतोय
पण अजूनही
आम्ही अदमास घेतोय
एकमेकांच्या पोटाचा
एकमेकांच्या पोटापाण्याचा
आणि अदमास घेतोय
आमच्या सर्वांच्या आंत असलेल्या
तुझ्यावरील श्रद्धेचा
तुझ्या भरवशाचा
तुझ्या हातातलं
खेळणं करून ठेवलं आहेस
तू आम्हाला
तुझं कळसूत्री बाहुलं
बनून बसलो आहोंत आम्ही
तुझ्या आईच्या पातिव्रत्याच्या
गाथा सांगताना विसरल्या जातात
या जगातल्या अनेक गांधारी
त्यांना तू गाद्या गिरद्यांवर
लोळण्याचे भाग्य देतोस
आणि दुसरीकडे
त्यांना तरटाची अवदसा आठवते
ती तुझ्यामुळेच
आम्हाला माहित आहे
तुझ्यात सुधारणा होणार नाही
तुझा सोंगट्या फिरवण्याचा
हा खेळ असाच
चालू राहील
तरीही आम्ही तुलाच वंदू गणराया
तुलाच आणि तुलाच
आधी ही तुलाच शेवटीही तुलाच.
पाठीलाही असतो चेहरा
माझ्याकडे तोंड करून
मारे कौतुकानं माझी कविता
ऐकताना वाचताना
किती सुरेख किती सुंदर
दिसून राहिला आहात
तुम्ही सर्व लोक
पण असं अमोरा समोर
एकमेकांकडे तोंड करून
बसलेल्यांहूनही
अतिशय सुंदर वाटतात मला
माझ्याकडे पाठ करून
बसलेली माणसं
माझ्याकडे पाठ फिरवून
निघून गेलेली माणसं
मनातलं सगळंच काही
बोलत नसतात माणसाचे चेहरे
पण खूप काही सांगून जाते
माणसाची पाठ
चेहरे बघा आता कसे
पोस्टमार्टम केल्यासारखे
औपचारिक झाले आहेत
आपली पाठ मात्र
अनादी काळापासून
जशी आहे तशीच आहे
आपल्या चेहऱ्यासारखे
उंचवटे खाच-खळगे नसतात
आपल्या पाठीवर
किती सपाट
किती तुकतुकीत
किती ओकीबोकी
तरीही किती बोलकी
असते पाठ
पाठीने किती उदारपणे
दिलेली असते
आपल्या चेहऱ्याच्या नकळत
तिच्यात खंजीर खुपसण्याची मुभा
कसा मल्टीपर्पज
उपयोग करता येतो
माणसाला आपल्या पाठीचा
आयुष्य गजबजतं तेंव्हा
आयुष्य गहिवरतं तेंव्हा
आयुष्याला आपण तोरणं
लावतो तेंव्हा
असंख्य हात असतात कौतुकाचे
आपल्या पाठीवर
आयुष्यावर जप्ती येते
तेंव्हा तेच हात उगारले जातात पाठीवर
चेहरे पकडण्याचा चांगुलपणा
पाठीनेच रुजवलेला असतो आपल्यात
नाटकाचा पडदा वर गेल्यावर
एखादी नटी आपल्याकडे
जेंव्हा पाठ करून उभी असते
तेंव्हा तिचा चेहरा बघण्याची
कमालीची घाई झालेली
असते आपल्याला
ते तिच्या पाठीमुळेच
रेल्वेच्या डब्यात
पाठमोरे बसलेले दिसतात
जख्ख म्हातारे आजी-आजोबा
कित्येक पावसाळ्यात भिजूनही
किती कोरडी राहिलेली असते
त्यांची पाठ
घोडा घोडा खेळताना
चौफेर उधळण्याची
ताकद मिळते मुलाला
बापाच्या उघडाबंब पाठीवर लदून
जिच्या छातीत दूध नसतं
अशा तरुणीच्या पाठीत
आपल्या कच्च्या बच्च्यांना
पेलण्याची ताकद असते
पाठ म्हणजे
कवच असतो आयुष्याचा
पाठ नसेल तर
आपल्याला कळणार नाही
किती बेमालूमपणे
जपलेला असतो
पाठीने आपला कणा
आयुष्याच्या शेवटाला
आई अंथरुणाला खिळलेली होती
तेंव्हा तिची उघडी पाठ
मी बघितली
माझ्या पाठीवर बसलेल्या
चाबकांचे वळ दिसले होते
मला माझ्या आईच्या पाठीवर
पाठ निब्बर नसते कधीही
तिच्याकडे दाखवली जाणारी
बोटं तिच्यातही खुपतात
तिला दुखावतात
पाठीलाही जखमा होतात
आपण समजतो तेवढी
दगडाची नसते पाठ.
पोळीवाली बाई
काडी काडी जोडून
काडी काडी गोळा करून
आईवडिलांनी उभा केलेला संसार
तेच घर असायचे एकेकाळी
लहान निमुळत्या घरांना
आमची आई म्हणायची नाकपुडी
आम्ही जन्मलो
वाढलो पोसलो
खेळलो बागडलो
लहानाचे मोठे झालो
त्याच काडी-काडी गोळा करून
उभ्या केलेल्या खोपट्यात
आजच्या घसघशीत ऐपतीच्या
आणि पॅकेजच्या काळात
आमच्या त्या खोपट्याला
नवं नाव मिळालं आहे
भव्य दिव्य वास्तु !
अशाच एका
भव्य दिव्य वास्तूच्या वास्तुशांतीसाठी
मी गेलो होतो
त्या तरुण जोडप्यानं
भरभरून त्यांची नवीन बांधलेली
वास्तू दाखवली
सगळे दाखवून झाल्यावर
आम्ही स्वयंपाकघरात
नव्हे, किचन मध्ये येतो
भरपूर उजेड
एसी चिमणीचे मॉड्यूलर किचन
मी वा वा म्हणणार
इतक्यात त्या जोडप्याने
मला विचारले
काका तुमच्या ओळखीची
एखादी पोळीवाली बाई आहे का
प्रश्न ऐकून मला ठसका लागला
अंधाऱ्या स्वयंपाकघरात धुराड्यापाशी
चुलीवर भाकरी भाजणारी
आठवली आमची आई
आमच्या खळगीसाठी
भगभगत्या चुलीसमोर बसलेली
आठवली आमची आई
आमच्या खोपट्यात
अंधारं स्वयंपाकघर होतं
त्या खोपटात
एक देवघरही होतं
सोळं नेसून उघड्या अंगाने
वडील जेव्हा देवघरात पूजेला बसायचे
त्याच वेळेस धाबळ नेसून
अंधाऱ्या स्वयंपाकघरात
नैवेद्याचं ताट वाढणारी
आठवली मला आमची आई
देवघरावर आईची
जेवढी श्रद्धा होती
स्वयंपाकघरावरही
तेवढीच श्रद्धा ठेवणारी
आठवली आमची आई
पोळीवालीच्या प्रश्नावर
मी गप्प होतो
त्या तरूणीने मला विचारले
कुठे हरवलात काका
कुठे नाही
तुझ्या प्रश्नावर
मला एक जुनी पोळीवाली बाई आठवली होती.
अभिनंदन पत्र
मला तुमचं अभिनंदन करायचंय
तुमचं, तुमचं आणि तुमचं सुद्धा
माझ्या विरुद्धचे
तुमचे कट कारस्थानं
यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत
म्हणून मला तुमचं अभिनंदन करायचंय
तुमचं, तुमचं आणि तुमचं सुद्धा
माझ्यासाठी जिच्या डोळ्यांना
भरून येण्याची घाई असते
अशी माझी बायको
मला देव मानणारी माझी मुलं
माझ्यात वडील बघणारी माझी सून
आणि साखरही फिकी वाटेल
असे गोड नातू
या सर्वांसह
मी सुखात होतो
आणि माझं हेच सुख
तुम्हाला खुपलं
तुम्ही हुकूम केला
ठेव आपली राहुटी गहाण
घरात सोयीच्या वस्तू आण
मी कंप्यूटर आणला
लॅपटॉप आणला
टीव्ही फ्रिज आणला
वॉशिंग मशीन आणली
कार आणली
मी तुमचं सगळं सगळं ऐकलं
तुम्ही पुन्हा हुकुम केला
आता गळा दाबून खल्लास कर
आपल्या घराचं घरपण
मी तेही केलं
मी माऊसच्या आहारी गेलो
माऊस मला दाखवू लागला
वारा पाणी
अंधार उजेड
गोंगाट शांतता
खिडकी, चिमणी आणि अंगण
वेळेचे बुद्धिबळ
नेहमी तुम्हीच जिंकला आहांत
मी तुमचं प्यादं आहे
की मी तुमचा गुलाम आहे
हे माझ्या ध्यानीमनीही नाही
तुम्ही सांगितलं तेथे
मी सही केली
पूर्वी अंगठा लावायचो तशी
तुम्ही मला गंडवलं
तरी मी तुम्हाला सलाम केला
पूर्वी नाही का
तुम्ही सनसनाटी
आणि बलात्काराच्या बातम्या
खपवण्याचा चंग बांधला होता
मला आता त्या बातम्यांची
सवय जडली आहे
माझ्या घशाखाली घास उतरत नाही
बलात्काराची बातमी
वाचल्याशिवाय
आता मला पाणीही पिववत नाही
साबणाच्या जाहिरातीसाठी
आंघोळी करणाऱ्या मुली बघितल्या शिवाय
तुम्हीच तर माझ्या घरी येऊन
समज देऊन गेला होता
की आपली भाषा आपली संस्कृती
आपण जपली पाहिजे
तुम्हीच तर आयोजित केल्या
वासना चाळवणाऱ्या स्पर्धा
आणि तुम्हीच तर तयार केलेत
असले अंगविक्षेप बघून
आनंदाने टाळ्या पिटणारे
रक्षक प्रेक्षक
तुम्हीच मला शिकवलं
आपल्या मूळ पुरुषाला विसरून
मंचावरून कशी गावी
आपणच आपली थोरवी
तुम्हीच मला शिकवलं
कसा लावावा
रोज नवा चेहरा
सगळं कसं तुमच्या मनासारखं होतंय
पुढेही असंच सगळं
तुमच्या मनासारखं होईल.
उद्या सकाळी उठल्यावर
आरशासमोर उभा राहून
मी माझे केस विंचरेन
तेव्हा मी मलाच ओळखणार नाही
मी माझी ओळख विसरावी
नेमकं हेच तर तुम्हाला हवं होतं
तुमची कटकारस्थानं यशस्वी झालीत
म्हणून मला तुमचं, तुमचं आणि तुमचं
अभिनंदन करायचं आहे.
घाबरट कुठला
सोम्या गोम्या राम्या
दगडू धोंडू
तुझं नाव काहीही असो
तुझ्या घरी नाहीये
पोटाची खळगी भरायला पोळी
अन् नाहीये
तुझ्या कच्च्याबच्च्यांसाठी दूध भात
तुझी बायको, तुझी मुलं
आणि तुझ्या अंगावर
एका लंगोटी शिवाय
वस्त्राच्या नावाने काहीही नाहीये
आणि तुला भीती वाटते आहे
जी आहे जशी आहे
असून नसलेली अशी ही
तुझी लंगोटीही
कोणी पळवून न घेऊन जावो
तुला भीती वाटतेय
तुझ्या लंगोटीची
तुझं नाव काहीही असू दे!
तुझ्याकडे कोणाचेही
लक्ष नाहीये
सगळे लागलेत
आपापली बढाई मारण्यात
आपले नगारे वाजविण्यात
आणि मशगूल आहेत
क्रिकेटचा खेळ बघण्यात
साहेब गुंतले आहेत
कॉम्प्युटरच्या गुपितात
अन्यायाच्या गोष्टी
कोणीही ऐकत नाहीये
न्यायाच्या गोंगाटात
काही बसले आहेत
गर्दी करून संतांच्या प्रवचनात
काही निघाले आहेत
आपल्या ऐश्वर्याला घेऊन
नॅनो मारुती वाहनात
आणि उरलेले गरोदर
असल्यासारखे ढेरपोटे
मग्न आहेत
पावभाजी, मसालाचाट खाण्यात
कोणाला माहित नाही
तू कुठल्या गल्लीबोळात राहतो
की तुझ्या घराच्या
भिंतीवर लिहिलंय
एका तिळात
सात जणांनी भूक भागविल्याचं
लिहिलंय
पाणी मागितलं
तर दूध मिळाल्याचं
आणि लिहिलंय
संभवामी युगे युगे!!
सोम्या गोम्या राम्या
दगडू धोंडू
मला एक प्रश्न सारखा बोचकारतोय
की तुझ्या शेजारी तुझ्या वस्तीत
तू जिथे काम करतो तेथे
सगळेच नग्न व्यवहार
करत असताना
सगळेच नग्न वावरत असताना
तुझं नाव काहीही असू दे
पण
तुलाच आपल्या लंगोटीची
एवढी भीती कां ?
खास म्हणून तुम्हाला सांगतो
तुम्हाला
खूप जगावसं वाटतं पुरुषोत्तमराव
तुमच्या मुलीनं इंजिनीयर बनावं
मुलाने डॉक्टर व्हावे
असं वाटतंय तुम्हाला
होईल सगळं होईल
सगळं तुमच्या मनासारखं होईल
मुलगी इंजिनीयर होऊन परदेशात जाईल
मुलगा डॉक्टर बनून मोठ्या जागेवर पोचेल
अन् तुम्हा दोघांना खूप आयुष्य मिळेल
पण
तुम्ही आपलेच आहात पुरुषोत्तम राव
म्हणून खास म्हणून सांगतो
आता जगला वाचला
ज्याची सगळी स्वप्नं पुरी झालीत
असा कोणी असेल तर तोच असेल
जो रस्त्यांवर जखमी पडलेल्या मुलांना
इस्पितळात घेऊन जाणार नाही
तुम्हाला
खूप जगावसं वाटतंय न पुरुषोत्तमराव
म्हाताऱ्या आईपाशी
बसायचा कंटाळा करा
सिग्नलपाशी भीक मागणाऱ्या
दुःखांचा विचार करू नका
आपल्या पोळीवर तूप वाढून घेताना
मुलांचे मार्क वाढवून घेण्यासाठी
लाच देण्याचा पुरुषार्थ दाखवा
खरं सांगतो पुरुषोत्तमराव
तुम्हाला मनसोक्त आयुष्य लाभेल
तुम्ही कुठल्या गल्लीबोळात राहता
याला महत्त्व नाहीये
महत्त्व आहे ते याला
की तुमच्या घरात इतिहासाची एखादी भिंत
अजून जीवन्त तर नाहीये ?
अशी एखादी भिंत
तुमच्या घरात असेल पुरुषोत्तमराव
तर त्या भिंतीकडे पाठ फिरवा
पाडून टाका त्या भिंतीला
खरडून खरडून पुसून काढा
इतिहास त्या भिंतीवरचा
तुमचे सगळे ताण सैल होतील
मग बघा
तुम्हाला नुसतं तुमचं
तुमचंच आयुष्य दिसेल
तुमच्या टीव्हीवर
पोहत येतात का पुरुषोत्तमराव
आफ्रिका खंडातली खपाटी पोटाची पोरं
किंवा तुमचा टीव्ही
कधी ओलावला आहे का
जगात जागोजागी सांडणाऱ्या रक्ताने
आणि तुम्ही बघितली आहे का
तुमच्या टीव्हीत
आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी
जिच्या छातीत दूध नसतं
आणि नसलेलं दूध
लपवण्यासाठी जिच्यापाशी पदरही नसतो
अशी एखादी आई
असं असेल तर
नसती कटकट कशाला बाळगता
कां उगीच डोक्याला
त्रास करुन घेता
लगेच चॅनल बदला
आणि
आंघोळी करणाऱ्या मुलींच्या
जाहिराती बघा
तुमचा सगळा शीण निघून जाईल
तुम्ही हमखास शतायुषी व्हाल
पुरुषोत्तमराव
तुमच्या खोलीत
तुमचे तीर्थरूप
तुमच्या मातोश्री
तुमचे सासरे
तुमच्या सासुबाई
किंवा तुमचे वाडवडील
किंवा लोकमान्य टिळक
किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर
वगैरे वगैरेंची चित्रं लागली असतील
तर ती चित्रं काढून
अडगळीत टाका
त्याजागी जल्लादाचं
एक चित्र आणून लावा
तुमच्या जगण्याला चव येईल
पुरुषोत्तमराव
तुम्हाला खूप जगावसं वाटतंय नं
पुरुषोत्तमराव
तुम्ही आपलेच आहांत
म्हणून खास म्हणून
तुम्हाला हे सांगितलं
हे सुचवलं
तुम्ही नक्कीच खूप सुखी व्हाल
पुरुषोत्तमराव !
अपेक्षा
आमच्या दुखऱ्या अंगाचं दुखणं
कायमचं जेव्हा थांबेल
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !
आम्ही सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव
कुठलीही गफलत खपणार नाही बघ
तू शंभराहून जास्त जग !
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !
तुझे पोरं म्हणतात ,
मुलांमध्ये मूल होऊन वावरलास तू
आणि वाटू लागलं
जगणं म्हणजे
खरोखर सगळं झटकून
माणसाने पुन्हा मुल बनावं
कुणाच्या तरी कडेवर बसून
सगळं आयुष्य बघावं !
मुलांसारखे आपल्यालाही भाबडे डोळे असावे
सगळं काही समजून - उमजून
आपणही काही काळ भोळे व्हावे
आयुष्याच्या गुंत्याचं हे टोक आम्हाला ही वळू दे
तुझा खांदा आम्हालाही मिळू दे !!
कुणास ठाऊक , काय उरेल पुढे
काय घडवतील आठवणींचे तुकडे
कोण गेले , कोण राहिले ,
कदाचित शक्य होणार नाही हेही धड मोजणे
प्रत्येकाचा वेगवेगळा खेळ असतो
अद्र्श्याच्या हातात , आपण नुसते बाहुले असतो
पाणी बदलतं , कावडीही बदलतात
पण धूळ खात पडलेल्या , प्रत्येकाच्या चोपड्या
जशाच्या तशाच राहतात ,
तुझ्या खेळाने , ब्रह्मदेवालाही भुरळू दे
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!
तुम्ही म्हणाल , पुरे झालं आटपा आता
पण कुणाच्या सांगण्याने
सोपं नसतं असं भराभरा आटोपून घेणं
आपण किती मैलाचे दगड चाललो
याचे पुस्तक सुद्धा ,
एखादी खूण ठेवूनच मिटता येते
आमची अशीच खूण ,
तुला भरभरून फळू दे
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!
आम्ही सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव
कुठलीही गफलत खपणार नाही बघ
तू शंभराहून जास्त जग !
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!!!
अरूण शिरढोणकर यांच्या काही कविता हिन्दीतही आहेत.
शब्दकोश
एक शाम उसने कहा
मुझे शब्दकोश दोगे क्या ?
अनगिनत नि:शब्द ज़ख्म है मेरे पास
तुम्हें चाहिए क्या ?
मेरे इस जवाब पर
देखती रही थी तुम
मुझे देर तक
फिर उस शाम शब्दकोश
वापस करने आई
तो तुमने पूछा था
कहां छोड़ आते हो इतने शब्द ?
तुम्हारे इस शब्दकोश में तो
सिर्फ अर्थ है
शब्द कहाँ गये
समय ने अपने तरीके से
सब मिटा दिया था
मेरे अस्तित्व की सारी निशानियाँ
मिट चली थी
फिर भी
उसकी बातों का जवाब
देने के लिए मैंने कहा
चाहे कुछ भी हो
हमें जीना पड़ता है
और इसी जीने - मरने के युद्ध में
हमें शब्द मिल जाते हैं !
दरख्तों की जड़ें
बचपन से लेकर आजतक
दरख्तों और उनकी जड़ों को
देखता आया हूँ मैं
अब कई सवाल पूछना है
मुझे जड़ों से
दरख्त जब आसमाँ
छू लेते हैं
उस ऊँचाई पर पहुंच जाते हैं
कि हमे नाज़ हो
वहाँ तक दरख्तों को पहुंचाने के लिए
कितनी गहराई तक
छिपाए रखती हैं
जड़ें अपने आपको
दरख़्त जब लहलहाने लगते हैं
हरे भरे पत्तों से
बूढ़ी होती जड़ों की दुखती रगें
क्या उन्हें याद आती हैं
जब फूल और कलियां खिलती है
तो क्या उनकी खुशबू
एक मुस्कान लाती है जड़ों पर
एक सवाल और पूछना है
मुझे जड़ों से
कि कब तक बर्दाश्त करना है
उन्हें ये सिलसिला
दरख्तों को ऊँचाई देने के लिए।
गुलामी
"बच्चों हम दो सौ साल तक अंग्रेजों के गुलाम थे'
बताया था
सर ने कक्षा में
पर उसे कुछ समझ नहीं आया
घर पहुँचकर कांधे से
बस्ता उतारते हुए
उसने बहन से पूछा
दीदी ये गुलामी क्या होती है
गुलामी मतलब क्या ?
उसके हाथ से बस्ता लेते हुए
बहन बोली
तुम पढ़ पाओ
इसलिए बाबूजी ने मेरी पढ़ाई छुड़वायी
मेरा स्कूल छुड़वाया
इसे ही गुलामी कहते हैं !
बेटी पढ़ाओ -बेटी पढ़ाओ
सरकार ऐसा कितनी भी बार कह ले
तब भी
पैसे की जरूरत तो होती है
और हमारे पास वही नहीं है
धीरे-धीरे बहुत कुछ समझ जाओगे
अभी के लिये इतना जान लो
कि धन का अभाव भी गुलामी होती है !
संकलन : अलकनंदा साने