चेतन फडणीस, चंद्रकांत पांढरीपांडे, जयश्री जोशी , जया गाडगे
चेतन फडणीस
कुमारी-माता
टापराचा अस्थाई
असा एक आडोसा
डोक्यावर तीन महिने
सन सत्राशे साठचा
मिणमिणता दिवा...
आकाशात ते
अजून पावसाळी ढग
गजबज खाली
घामाचा तो
कोंडलेला वास
ती उकड
ती दमघोटू हवा...
अष्टभूजा-षोडशःभूजा
माझ्या इतर
सख्या
कार्तिकेय-गणेश
स्वतः हे..!
असताना सोबत
तरी बैचेनी
जगतजननीच्या ही मनात...
माझी आयुधं
ती अस्त्र-शस्त्र
तो सिंह
आणि मीही
बाहुली
त्या मूर्तीकाराची...
त्याचा तो स्पर्श
मला आकार देताना
ते नशेडी डोळे
मलाच टिपताना
शेजारी तो अर्धा
भरलेला मधुघट
अर्धी मीही
पान चघळत बोलताना
ती उडणारे शिंतोडे
तो माझ्यावर
जाणून?
बिडीचा सोडलेला झुबका...
मला नेसवतो तो
परिधान
सारे आभरणे-सोपस्कार
ते नितंबावर डुळणारे कुंतल
कानात कुण्डल
कपाळावर
ते कुंकू लाल...
महिषासुराने
हे काय वर मागितले ब्रह्म्यापाशी
हाय!
लोक म्हणतात
"माता"
तरी माझी
पुराणातली नोंद
कुमारीकाच...
संकल्प-विस्मृती
भरकटत गेले
हाय आयुष्य हे
सरळ वाटेवरती...
सकाळ ते सायंकाळ
पुन्हा सकाळ
उजेड दारावरती...
उघडले दार
एकदाही नाही
मी मंदमती...
मंदगती रांगत
केला प्रवास
केली माती...
नवे पर्व
नवा संकल्प
अक्षता हाती...
म्हणा...
मम आत्मनः परमेश्वर-आज्ञारुप-सकलशास्त्र श्रुति-स्मृति
पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम.....
मॄत्युदेवी
कॄष्णांगी कॄष्णवर्णी
कॄष्णपक्षातली लालीमा
साऊली सावचिता
सावळी भंगीमा...
भयदारक भयातीता
भयहारिणी अंतिमा
अदॄश्य अस्पॄश्य
अपरिहार तमा..
विभत्स विद्रुप
विदुषी सकलोत्तमा
शांतही शालीनही
शाश्वत अणिमा....
माजलेली मवाळ
मातॄत्वाची प्रतिमा
निःपुत्रिका नि:शस्त्रधारिणी
निराकार अमा-पौर्णिमा...
सुंदरोत्तमोत्तर सुशीला
सरण्युकुमार प्रियतमा
नार नखरेली
नतमस्तक जो जन्मा....
''मी जीवंत आहे अजून''
लोभ क्रोध अहंकार
डोक्यावरच्या केसांसोबत
कधीच रिटायर झाले होते,
पेंशन वर
गालांवरच्या सुरकुत्या आणि
स्वाभिमान तेवढा
अजून जगत आहे,
महिन्याभराचे माझे औषधं,
पहिल्या पंधरवड्यात
घरच्यांसाठी
एक दोनदा कुठलातरी गोड खाऊ,
आणि पत्नीसाठी
एक तेवढी डॅरीमिल्क,
तिच्या जाण्यानंतरही अजून
मागवून घेतो, निदान तिने तरी
बोलायला नकोत,
माझी स्मरणशक्ति बोथट झालीये ते,
आणि श्रावणसरी सारखी
नातीने डोकावता खिडकीतून,
ती विरघळलेलीच डॅरीमिल्क
ठेवतो तिच्या हातावर....
एकटा उत्तरगतीच्या
रस्त्यावरती वाटचाल करताना,
कधी चष्मा सुटतो हातातून
आणि काच तडकतो, दिसत नाही
तडकण्याचे इतर निशाण
कधी पाण्याने भरलेला ग्लास
झोपमोड करतो सा-यांची,
तसाच निसटतो आणि पडतो जमिनीवर
जराही आवाज न करता
स्वाभिमानही कितीदा,
तरी वर्षातून एकदा
उभा राहतो कागदाचा एक तुकडा घेऊन
अधिका-या समोर,
ज्यावर प्रमाणित केलेले असते,
''मी जीवंत आहे अजून''....
एक कविता...
घाईत कसेबसे दोन लोटे पाणी
अंगावर टाकून,
ओलं अंग टॉवेलने पुसून,
तोच टॉवेल कमरेला बांधून,
बाथरूम स्लिपर्स
पायातच अजून
आणि सूर्यास पाठ करून
अर्घ्य देताना,
तांब्यातून पाझरते
एक कविता...
व्यवस्थित घडी केलेल्या
कपड्यांच्या ढीगा मधून,
खेचून काढलेल्या इस्त्रीच्या
शर्टासोबत,
उलगडत जाते
एक कविता...
हातघड्याळ, रूमाल,
दुपारच्या जेवणाचा डबा
आणि उंबरठ्यावरती,
बरच काही अजून
देऊन जाते
एक कविता....
ठसाठस भरलेल्या
बस-ट्रेनच्या डब्यात,
एखाद्याच्या खांद्यावर
हळूच एक डुलकी
घेऊन जाते
एक कविता....
सकाळ ते संध्याकाळ,
संध्याकाळ ते
पुन्हा सकाळच्या मध्ये
ह्या सा-या क्षणिक
दुनियेत,
स्वतःसाठी चिरंजिवित्व
लिहवून जाते
एक कविता...
---------------------चेतन फडणीस
चंद्रकांत पांढरीपांडे
अक्षरलेणी
ओठात भिजले मौन
नजरेत तुझ्या कविता
तंव देहबोलीचा गंध
सांगतो युगाची गाथा.
घोटाळे पायातळी वाट
मनात हसरा पक्षी
वाऱ्याच्या रेशीम स्पर्शे
रोमांची तनुव नक्षी .
डोळ्यांत लाजरी भूक
ओठाशी लाख बहाणे
मैफिलीत नखऱ्यांच्या
का उगाच गावे तराणे!
जिवणीत लपविशी हास्य
ती चाल तुझी जीवघेणी
मी उगाच कोरीत बसलो,
कवितांची अक्षरलेणी
अंकुर
मन पाऊस पाऊस
देह भाव धुंद
उमलत्या कोंभांना
मातीचा गंध
मन होई रान रान
डुले हिरवाई मंद
पर्ण फुलांच्या गीतात
मातीचा छंद
मन निर्झर निर्झर
झुळझुळे अंतरंग
हृदयी जोपासला
मातीचा रंग
मन वणवा वणवा
पोळे आत पाचोळा
पानगळीच्या वेदनेला
मातीचा लळा
मन आभाळ आभाळ
अंतरंगी पहाट
शब्द झाले अंकुरता
मातीचे भाट.
प्रतारणा
मी कविता लिहिली
पण मलाच कळली नाही!
त्यात वावरणारा माणूस
मला कुठेच भेटला नाही.
मला न कळलेला माणूस
बाहेर पदोपदी भेटतो
रोजच्या भेटीतूनही तो
तसाच अनोळखी राहतो.
मी माझी कविता
पुन: पुन्हा वाचली
शब्दात गोवलेल्या माणसाची
प्रतिमाच खोटी भासली.
खऱ्या माणसाच्या शोधात
सलगी कवितेशी केली
त्या अनोळखी माणसाची
कवितेला ओळख करूनदिली.
मला कळले तेव्हा
फाऽर फाऽऽर उशीर झाला होता
शब्दांच्या रेशमी वस्त्रात
तिनेच त्याला लपवला होता.
---------------------- चंद्रकांत पांढरीपांडे
जयश्री जोशी
व्यथा
नजर नेहमी बाहेरच बघते
आत कधीच वळत नाही
आपण म्हणजे कोण आहोत
नेमकं हे च कळत नाही
म्हणूनच आपला अर्जुन होतो
आत बाहेर गोंधळ माजतो
अन् रोज गीता वाचून सुद्धा
विषाद वोग टळत नाही.
वास्तव
आयुष्याच्या सायंकाळी
नजर जराशी मागे वळते
चुकल्या साठी, हुकल्या साठी
आतल्या आतच काही जळते
या जळण्याला, हळहळण्याला
आता काही अर्थच नसतो
कारण, जेव्हां पावलं थकून जातात
तेव्हांच खरी वाट कळते.
कधी तरी
कधी तरी तर आपण करावी
आपल्याशीच गट्टी
कधी तरी तर आपणच द्यावी
आपल्यालाच सुट्टी
कधी म्हणावे स्वत; स्वत:ला,
जा, पळ, कर की मजा,
मार उड्या, अन् घाल गोंधळ
वयास कर की वजा,
गळून खाली पडलेली ती
खा की चिच खट्टी
कधी तरी तर आपण करावी
आपल्याशीच गट्टी..
सोडून द्याव्या चिंता बिंता
आपणच व्हावे संता- बंता,
मस्त खळाळून हसत रहावे
उगा कशाला ह्व्यात खंता??
सूर ही येईल जुळून तेव्हां
गवसेल पुन्हां निज पट्टी
कधी तरी तर आपण करावी
आपल्याशीच गट्टी...
झोपाळा
माझ्या अंगणातला झोपाळा,
आठवण करून देतो मला
माझ्या अस्तित्वाची,
माझं जीवन ही असंच
हेलकावे खाणारं,
क्षणांत हसणारं, क्षणांत रडणारं,
जमिनीला पाय टेकतात
न टेकतात तो च
आकाशा कडे झेपावणारं,
ना धड खाली, ना धड वर,
असं अधांतरीच राहणारं,
आणि असं अधांतरी
असून देखील,
धरणी आणि आकाश यांना,
माझं माझं म्हणणारं..
-------------------- जयश्री जोशी
जया गाडगे
अवर्षण
बरसणाऱ्या मेघांची ती
वाट पाहे चातकापरी
जा गं ! जा गं ! जा गं ! सरी
आधी 'तिचे' मडके भरी ।।
पाण्याच्या त्या टैंकरपाठी
मैलोमैली धावत सुटली
रांग शेकडो कळशांची
पाहूनी हतबल झाली ।
तहानेने व्याकुळलेली
पोरं वाट पाहे घरी
जा गं ! जा गं ! जा गं ! सरी
आधी 'तिचे' मडके भरी ।।
कर्जबाजारी पोशिंदा
जाई सोडूनी हे जग
फाटका तिचा संसार
कुठंवरी धरी तग ।
भुई सारी भेगाळली
थेंब जळाचा ना उरी
जा गं ! जा गं ! जा गं ! सरी
आधी 'तिचे' मडके भरी ।।
स्वेद आटले तनुचे
नयनी नीर निमाले
एक ध्यास पर्जन्याचा
श्वास पंथाला लागले ।
हात जोडते मी देवा
यंदा तिकडे कृपा करी
जा गं ! जा गं ! जा गं ! सरी
आधी 'तिचे' मडके भरी ।।
मी आणि मी
मी केले म्हणूनी इतुके झाले
माझ्या आधारे व्योम देखिले
व्यर्थ भाष्य हे करु नको
कोळशात कोहिनूर गवसला
स्वतेजाने झळकला विसरु नको
अंबूद वर्षवी जल भूवरी
रत्नाकरासी येते भरती
पाहूनी हिरवीगार धरणी
मेघांनी का म्हणावे
ही केवळ माझी करणी
सारेच विराजीता उच्च पदी
शिखरपद तुज खचित न मिळते
जीवो जीवस्य जीवनम् ही उक्ती
सानामुळेच थोराची महती
ही तर त्या परमेशाची युक्ती
सारी माया इथेच ठेवून
एकटाच पालखीत बसता
मीपणाचे ओझे वाढवू नको
पिळून दुसऱ्या देह जड झाला
वाक्बाण ऐकूनी जाऊ नको.
आस
लौकिकार्थी अंताआधी
अस्मितेस एकदा
जगायचं आहे,
अखेरचं का होईना
रंध्रात चैतन्य
भरायचं आहे.
रिमझिमणाऱ्या श्रावणी
ओलं चिंब
भिजायचं आहे
हिरव्यागार वाटिकी
मोगऱ्यासारखं
फुलायचं आहे
संगीताच्या हिंदोळी
भान हरून
झुलायचं आहे,
अवनीचं सौंदर्य
डोळे भरुन
टिपायचं आहे
स्वप्नाच्या आसमंती
पाखरांसंगती
उडायचं आहे,
खळखळणाऱ्या नदीसम
मुक्त प्रवाही
वहायचं आहे
विषयवस्त्र झुगारून
कुडीस बंधमुक्त
करायचं आहे,
अंतरीशी हितगूज
मग्न एकांती
साधायचं आहे
तृप्तीच्या वरमालेने
मृत्युला वेदी
वरायचं आहे,
चंदनाच्या पालखी
मानिनी म्हणून
मिरवायचं आहे.
सवंगडी
ज्ञात आहे, ते
निष्प्राण कलेवर
वेदनेपार गेलेले
तरीही पाहून पेटताना
गलबलते पोटात.....
छायेलाही स्वतःच्या
भिऊन आक्रंदणारा
मूक होऊन
सामील झालाय
काष्ठांच्या गोटात.....
किंचितशा चटक्याने
थैमान घालणारा
तप्त चितेवर
पहुडला पिऊन
शब्द एका घोटात.....
मैत्रीचे बंध
हळुवार हाती
गुंफणारा
वियोगाचा काटा
टोचून गेला बोटात.....
बालपणीचा सवंगडी
निघून गेला एकटा
आठवणींची
दैनंदिनी
ठेवून रेशमी कोटात.....
----------------------जया गाडगे
जयाताईच्या कविता निरीक्षण आणि अनुभवातून केलेल्या चिंतनाची अभिव्यक्ती आहे.अवर्षण कविता खास आवडली.
ReplyDeleteअलकनंदाताई, माझ्या कविता ब्लाॅगवर लावल्याबद्धल मनापासून धन्यवाद ! "मायमावशीच्या" रचनाकारांना एक हक्काचा साहित्यिक मंच देऊन, त्यांच्या लिखाणास, प्रोत्साहनाचे खतपाणी घालण्याची तुमची कळकळ स्तुतीपर आहे. तुमच्या या अथक प्रयत्नांसाठी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन व अनेक शुभेच्छा !
Deleteधन्यवाद श्रीधर जी !
Delete