मराठी कविता य,र,ल,व,श,स,ह,क्ष

 यादवराव गावळे, रवीन्द्र भालेराव, रश्मी  लोणकर, रंजना मराठे,राधिका इंगळे,रेखा मिरजकर,विनायक भावसार, विवेक सावरीकर 'मृदुल',वैशाली पिंगळे,शांता लागू,सुधीर बापट, सुषमा अवधूत, सुषमा ठाकूर, संध्या टिकेकर, स्मृति आंबेगावकर, श्रीधर जहागीरदार, श्रीनिवास कुटुंबळे, श्रेयस गोखले 'सारंग शिवार्चक'


*******************************************************************************

  यादवराव गावळे



रानामधील काजवा

बहू दिसाचा अंधार
किती सोसावा रातवा
नवा उजेड मागतो
रानामधील काजवा ||धृ.||

जन्माआधीच कोंडला
क्रूर काळोख पिंजरा,
छिन्न छाटल्या पंखांनी
कशा तोडू ह्या जंजिरा?
ढगाआड निजलेल्या
ढोंगी सूर्याला जागवा,
नवा उजेड मागतो
रानामधील काजवा ||१||

लिंगोबा कुणी धाडली
अशी अघोरी अवेळ,
चहूबाजू सुरू झाली
माणसांची पानगळ;
सांग सांग जंगोमाते
मांडू कोणता जोगवा,
नवा उजेड मागतो
रानामधील काजवा ||२||

माझ्या आदिम बंधू रे
थोडं रगत झिजवा,
करा मशाल लेखणी
आणि पेटवा वणवा!
तवा येईल शरण
गगनातला चांदवा,
मग सुखानं निजेल
रानामधील काजवा ||३||

माडिया पिल्लो

गायी चालल्या रानात
वाजे घुंगरू गळ्यात
फुलं तोडत चालल्या
पिल्लो मागून डौलात ।।धृ.।।

        
रानफुलांचा गजरा
पिल्लो माळल्या केसांत
वास लुटती वासरे
त्यांच्या मागून चालत

फुलं केसांत फुलं कानात
फुलं वेणीत फुलं मनात
फुलं बोटांत ओठांस स्पर्श
गायी चालल्या रानात ।।१।।

तीरकमठा हाता
लाठीकाठी खांद्यावर
लुसलुसा रानचारा
 गायी चरी सैरभैर

संगे बगळा संगे कावळा
पशुपक्ष्यांचा हा गोतावळा
संगे 'मावळा'  'माडिया पिल्लो'
गायी चालल्या रानात ।।२।।
          
(*माडिया = गडचिरोली व छत्तीसगड मधील एक आदिवासी जमात. *पिल्लो/पिल्लोर = मुली)

उजेडाचे काय झाले?


दूरवर रानामध्ये कळकाच्या बनामध्ये
अंधाराचा ढोल वाजे, वेदनांची वेणू नादे ||धृ.||

अंधाराच्या आडोशाला काजव्यांची पाठशाळा
दीन देह हा म्हणूनी टाळतो दिनकराला
रात रूते जणू काटे दिवसही नको वाटे
दूरवर रानामध्ये कळकाच्या बनामध्ये ||१||

मोहफुले हातावर ताडनिरा माथ्यावर
वितभर धर्म चाले कोयत्याच्या पात्यावर
सारे धर्म-पंथ थिटे जेव्हा पोटी भूक दाटे
दूरवर रानामध्ये कळकाच्या बनामध्ये ||२||

कुठे आहे तुझे गाव? हरवली तुझी वाट
कसा शोधू अंधारात? नाही दिवा नाही वात
किती किती तप गेले; उजेडाचे काय झाले?
दूरवर रानामध्ये कळकाच्या बनामध्ये ||३||

चिन्ना

(चिन्ना मट्टामी या मुलाला नक्षलवादी समजून पोलिसांनी ठार मारलं... पण खरं तर तो निरागस होता आणि ते सिद्ध करण्यासाठी त्याच्या आईने न्यायालयात लढा दिला. तिच्या मनोवस्थेचे हे गीत)

कसा माह्या गगनातला
निखळला तारा
डोळ्यातील आसवांचा
हरपला सहारा ।। धृ. ।।

रंग येगळा समजून
खुडले कोवळे पान
असे अवेळी भंगले
माह्ये साखर सपान
कशी देऊ लेकराले
मातीचा निवारा ।। १ ।।

गिरान लागलं तरी
सूर्व्य डागाळत नाही
जगाचा वाहून मैला
गंगा डहूरत नाही
देवाघरचं फूल मांगते
न्यायाचा देव्हारा ।। २ ।।               

-----------------------  यादवराव गावळे


रवीन्द्र  भालेराव


कट्यार काळजात घुसली

विद्या-कला, सुर-सुरा, ताल व लयी मधले अंतर
जसे मांडले पुरूषोत्तमाने, कधी न दिसले नंतर

संस्कारांनी नटली उमा, झरीना प्रेम  दिवाणी
चान्द उस्मान हे आळशी  चेले, मुका म्हणतो विजयी गाणी

मकरंदाचा छंद मिलिंदा, सुरत पियाची विसरत नाही
तेजोनिधी लोहगोल हा, नियमित येण्या विसरत नाही

काही हळवे सणसणणारे, तर काही सुर मवाळ
कट्यारीने घुसून जनाची हृदये केली घायाळ

गुरू शिष्यांची सुरेल जोडी, व राजकवि वाचाळ
धुंदी सुरांची उतरत नाही, झाली जरी सकाळ

 दिवाणा


ह्रदयात आठवणींनी केला ठिकाणा आहे
म्हणतात लोक मजला की मी दिवाणा आहे

लोकांस काय सांगू स्मरतो सदा का त्यांना
अहो त्या स्मृतींनी मजला केला शहाणा आहे 

सांगू कसा कुणाला रडगाणे जीवनाचे
एकट्यास ऐकण्याचा घडला तराणा आहे

भेटूनी लोकांवाटे मन मोकळे करावे
पण पळ काढण्याचा त्यांनी केला बहाणा आहे
 
हे भोग जीवनाचे भोगायचे एकाकी
भोगांचा आज माझा झाला घराणा आहे

सुटतील वैरी कैसी कोडीही जीवनाची
रवीच्या जिवाचा त्यांनी केला उखाणा आहे



अंतर्मुख

मनामध्ये ज्या आहेत दडल्या कुठे तरी कोपऱ्यात
लपून बसल्या ज्या आहेत अडनिड चोरकप्यात
खोलवर रूतलेल्या, साठलेल्या साऱ्या कटु आठवणी
कधी-कधी बाहेर येण्या बंद दाराला का ठोठावतात

वाटू लागते सांगून द्यावी, झालेली कधी उपेक्षा
कशा   प्रकारे भंगल्या आहेत, माझ्या काही अपेक्षा
विश्वासघातांची, प्रताडनांची, अपमानांची माझी कहाणी
गुदमरून टाकते जेव्हा एकाकी ही भोगतो शिक्षा

कधी वाटते करावे घट्ट स्वैराचारी माय मना
उघडून द्यावे सताड, बंद असलेल्या हृदयपटांना
सर्वांसमोर गावी, ऐकवावी आपली दर्दभरी कहाणी
लगाम सैल करून जिभेची सांगावी व्यथा सर्वजना

पण हे असे धारिष्ट्य  मन कधीही करत नाही
कपाट जास्तच  घट्ट होते, ते उघडले जात नाही
कारण रूतले खूप खोल घाव जे का हे निशाणी 
काय सांगू इतरांना ते, बघवले पण जात नाही

स्वतः ऐवजी इतरा बघण्या वेळ असे का हो कुणाला
व्यथा दुजाची ऐकून घ्याया वेळच नसे हो कुणाला
माझी नाही सगळयांची, एकच असते ही कहाणी
व्यथित करणे योग्य नव्हे सांगुनी व्यथा कुणाला

उघडावया बंद कपाट, मन माझे धजत नाही
व्यथा ऐकूनी दगडी हृदया, पाझर काही फुटत नाही
हास्याच्या पात्र ठरणार मी, स्थिति होईल केविलवाणी
व्यथा घरट्यात घालण्या शिवाय मार्ग दुसरा उरत नाही

म्हणून मनाचे कपाट अजून घट्ट बंद करतो मी
व्यथेस माझ्या पुनश्च , तशीच तेथे ठेवतो मी
जपत राहतो सलणाऱ्या रूतणाऱ्या कटु आठवणी
अन उसने हास्य मुखी आणुनि प्रसन्न बरा हा दिसतो मी.

----------------------------------------------रवीन्द्र  भालेराव

रश्मी  लोणकर


पुस्तक 

निराशा वाटे मनाला
साद कोणी घालेल का माझ्या मनाला
वाट पाहे उंबरठ्या वरी मी
पाहिल का कोणी मला वळूनी
जवळ  आहे माझ्या सर्व विषयाचे ज्ञान
लक्ष ना वेधले मानवाचे अजून ॥

कधी  जेंव्हा बंडोबा मला हाताळत असे
गोड-गोड गोष्टीत रमून जात असे
वाचताच जाई गोड झोपी 
मी पहुडलो मात्र त्याच्याच उशाशी ॥

कुणाला कसे कळत नाही
का कळत असून ही लक्ष वेधत नाही
सजून राहे मी माजघराच्या कपाटात
धुळीनं  माखून आहे नाही कुणाच्या ध्यानात ॥

एके काळी  मी सोनेरी कंगोऱ्यात  होतो
का कळेना मी एकटा कसा राहिलो
रूसलो तरी कुणाला काय त्याचे
दूर-दर्शनशी  नाते आहे सर्वाचे
दूर-दर्शनचा जन्म माझ्याच पासूनी
कंम्पूटरची महती ही माझ्याच मुलाशी ॥

रागाने तिडीक माझ्या डोक्यात जाते
विज्ञानांच्या यंत्राशी मला नाते तोडायचेच आहे
मानवाचे प्रेम मला मिळवायचेच आहे॥                         

  सहवास 

आजी आजोबा शेजारी नात येऊनी बसते
दोघांचे ही मन आनंदूनी जाते 
आजीला वाटे बोलेल छकुली शाळेच्या गोष्टी
आजोबांना वाटे  सांगेल छोट्या गुजगोष्टी
शांत-शांत  सारे काही कुणी बोलेना
मोबाईलवरच्या बोटांचे खेळ कधी संपेना

मित्र मैत्रीणीचे संभाषण तासो न तास चाले 
मोबाईलचे प्रेम कमी नाही झाले
खेळ  मोबाईलचे असे गमतीचे
भान रहात नाही मात्र कोणत्याही गोष्टीचे

आजीला हवा सहवास नातीचा
नातीच्या बोलण्यात मिळतो आनंद सुखाचा
आजोबांना हवा सुख संवाद नातीचा
खरा उद्देश्य असतो  प्रगतीचा ज्ञानाचा

नातवंड म्हणजे दुधावरची साय असते
आजीला नुसते प्रेमाचे बोल हवे असते
चष्माच्या चौकटीत आजोबांना ही प्रेमच हवे असते

नातवंडाना एक सांगणे  आहे 
मोबाईलचा  वापर जरूर करावा
आपला सहवास थोडा तरी कुटुंबाला  द्यावा                         

  जीवन लहरी   

रूसवा आहे जीवनाशी
कितिक काळा नंतर भेटलासी 
जीवन आहे कधी सुखाचे सागर
कधी आहे कठीण डोंगर 
कधी आहे रखरखीत वाळवंट
कधी तुषार बिन्दुसारखे निर्मळ 

बालपण आहे अमृताची वाटी
नवयौवन आहे उत्तंग हिऱ्याची पेटी
उतारपण आहे उतरत्या उन्हाची सावली
प्रकृतीच्या माये पुढे सांगाडेच नाही
आहेत ह्या जीवनाच्या  मोत्याच्या लडी

सौख्य काय आहे ते तर मानण्यात आहे
दु:ख सारे विसरण्यात आहे
मान सम्मान ह्या कडे पाठ वळविण्यात आहे
जीवनाचा खेळ  निराला 
उत्कृष्ट  खेळ  मांडूनी
खेळ जिंकण्यात  आहे.   
------------------------------रश्मी  लोणकर 


रंजना मराठे        


मावळतीचा सूर्य  

एकटीच उभी होते दारात

मावळतीच्या सूर्याकडे पाहात

सहज विचार आला मनात

किती साम्य आहे माणसात आणि सूर्यात


उगवतीच्या सूर्याप्रमाणे

जन्माला यायचं 

कवळ्या कवळ्या किरणांनी

कणखर व्हायचं 


भर दुपारी ऐन तारुण्यात

राहयचे आपुल्याच तोऱ्यात

पण उतरतीच्या काळात

किती बदल होतो माणसात


मात्र बदल नसतो सूर्यात

त्याही काळात

किती सुंदर दिसतो तो

त्या संधी प्रकाशात


काही केल्याचे समाधान दिसते त्याच्यात

आणि प्रवासाचा शेवट 

करीत असतो आनन्दात

शेवटा पर्यन्त तळपायचं


कधी नाही खचायचं 

साऱ्यांसाठी  झटायचं 

जणू हेच त्याला सुचवायचं 


   काही हायकू 

        राम मुखात
        जप माळ हातात
         सुख नामात

        झाली प्रभात
        गुरं गेली रानात
        सारे कामात

      घन नभात 
      वारा वाहे जोरात
      धस्स उरात

     गाणं सूरात
     ठेका धरी तालात
      गा  ग जोरात

       हसू गालात
       राग नको मनात
       यश जगात

 मराठी दोहे

चार चरण असुन ही ओळी असती दोन
ह्या सानुल्या दोह्याला जाणत नाही कोण?

बरच काही सांगतो रुप त्याचे लहान
मर्म त्यात खूप आहे कर्म त्याचे महान

चन्द्र एकटा आकाशी करी तमाचा नाश
दिवा ऐसा वंशाचा कूळ  जोडी खास

देऊ नका अंतर तिज ती असे देव रुप
आई असे नाव तिचे वात्सल्याचे रुप.

शब्द जपून बोलावे नको नुसती वटवट
भान ठेवा वेळेचे होणार नाही फरफट

शब्दात दिसतो खास सर्व काही झकास 
खरच आहे की भास चोही कडे विकास .

--------------------------------रंजना मराठे               


राधिका इंगळे

 सुखाच्या दुकानात 

 एक दुकान सुखाचेही असायला हवे हो
तिथे जाऊन मला बरेच उपहार घ्यायचे होते .
        
सर्व प्रथम मला आईसाठी हसु आणायचे होते
आम्हाला वाढवताना काळजी पोटी हरवले होते ,
मला कडेवर घेतलेल्या फोटोतच ते दडले आहे ,
तेच परत तिच्या ओठांवर परत पसरवायचे होते .

बाबांना पण समाधान आणून द्यावयाचे होते ,
 संसारच्या धावपळीत अविश्रांत कष्ट उपसले होते ,
स्वतःची काळजी त्यांनी कधीही केलीच नाही,
त्यांना विश्रांती सह समाधान भेट ध्यायचे होते .

संघर्ष सहचरीला ही बिनधास्त पणे खुलवायचे होते
लग्ना आधीचे डोळ्यातले स्वप्न पुन्हा फुलवायचे होते, 
ओढाताणीच्या संसारात सारेच पार कोमेजून गेले ,
 तिचे खेळकर आयुष्य तिला परत भेट करायचे होते. 

 वाढत्या वयाच्या लेकरांचे सारे कौतुक करायचे होते ,
 लेकीसाठी आनंद, लेकासाठी उत्साह आणायचे होते ,
 काटकसरीच्या पगारात ते सर्व घ्यायचेच राहून गेले ,
 त्या दोघांनाही खळखळून पुन्हा पुन्हा हसवायचे  होते .

 भटक भटक भटकलो सुखाच्या दुकानाच्या शोधात ,
 काही केल्या एकही बोर्ड किंवा जाहिरात आढळली नाही, 
 थकून भागून निराश होऊन पाय आपसूक घराकडे वळले ,
 ज्या शोधात सर्वत्र भटकलो ते घराच्या दारातच आढळले. 

    उतार वयाचे सोबती

     उतार वयात येताना लांबच लांब प्रवासात ,
     बरेच सहप्रवासी भेटले विविध ठिकाणी, 
     काही आजतागायत सोबतीला आहे ठाण मांडून .

     त्यातलीच एक माझी सोबतीण कसली वैरीण,
     नावात मात्र गोडी पण गोडाशी ज्याचे वाकडे,
     ती माझी वैरीण मधुमेहाची आहे ठाणे मांडून .

     दुसरा सवंगडी सतत सवे असणारा हा, 
     नावातच गाठतो तो उंची, प्रसंगी खाली पाडतो,
     तो सोबती नाव त्याचे उच्च रक्तचाप आहे.

     पुढे वाढता भेटला एक नवा सोबती, 
     त्याचे संगतीत उठणे बसणे चालणे मुश्किल, 
    अर्थराईटिस बसला मानगुटीवर केले जगणे व्यर्थ. 

    हे सारे कमीच होते बहुधा म्हणून भेटला नवा सोबती ,
    आड जागचे दुखणे चार चौघात रमणे केले हराम त्याने ,
    प्रोटेस्ट न करणारा नाव म्हणे प्रोस्टेट छळवादी नुसता .

    वरताण म्हणजे उरावर येऊन बसलाय पारकिंसन ,
    पार पकडीच्या पलीकडचा पकड हरवणारा, कठिण 
    जगणे कठीण करत सारे हातातून सोडवणारा वैरी .

    हे सारे सवंगडी जीणे हराम करणारे , बेचव करणारे,
    ह्या सार्‍या फापटपसा-यात एकच दिलासा देत संभाळत ,
    काळजी घेणारी माझी सप्तपदीची सोबती खरी सहचरी आहे .

   तिच्या सोबत उतार वयात ही तन मन तग धरून आहे
   जगणे सुसह्य होऊन सुखकर होते, छळवादी वाटली तरी ,
   तीच उतार वयाच्या सोबत्यांना हुलकावणी देत जगणे शिकवते.

    एक खटला स्वर्गाच्या दरबारी

    स्वर्गाच्या दारात ओरडा गठबड गलका झाला अचानक,
    काही स्वर स्वागताचे, तर काही उमटले धिक्काराचे .
    गडबड गोंधळ कशाला विचारले, उत्तर फारच विचित्र होते.
    एकाच वेळी एक देश भक्त आणि एक देश द्रोही दारी ठाकले होते. 

    देशभक्त ठाकला होता रांगेत शांत चित्त विनम्र भावाने, 
    पण दुसरा मात्र दमदाटी करीत अरेरावीनेच वागत होता. 
    पहारेकरी रांगेतील इसमांना क्रमवार सोडत असताना, 
    दुसरा मध्येच सवयीनुसार घुसखोरी करीतच होता .

    देशभक्ताने एक युक्ती केली, पहारे-यास विनंती केली, 
    याला चित्रगुप्तास अगोदर भेटायची असेल जर घाई ,
    याला अगोदर आत सोडून द्यावे, लांबलचक आहे यादी,
    याच्या पापांचा पाढा आहे मोठा , सर्वा आधी याला जाऊ देई.

    हे ऐकून चित्त द्रोह्याचे खवळले, धर्म बुडव्या काफिरा तूच आहे पापी,
    मीच पैगंबरा सोबत राहीन, तुला धर्म द्रोही म्हणून फटके पडतील. 
    दरबारी पेश केले दोघे,देशभक्त सवयीनुसार विनम्रपणेच उभा होता, 
    दुसरा मात्र उगाच दंड थोपटून फुशारत अद्वातद्वा बरळत होता .

    देवाच्या दरबारात खटल्याची सुनावणी झाली, एकाच बैठकीत, 
    अविलंब निर्णय झाला, ऐकून देशद्रोही पुन्हा पुन्हा ओरडू लागला, 
    त्याहून वरचे कोर्ट पण नव्हते , त्यामुळे तो तिथेच चेचला गेला ,
    कलाम ला सलाम करायला स्वर्गाचा दरबार देवा सह उभा राहिला.

    देवाजीच्या दरबारी ना देर आहे ना अंधेर आहे तिथे ,दूधात भेसळ नाही
    म्हणूनच हा जुमा खास उजाडला, करावे तसेच भरावे सांगू लागला.

---------------------------------------------------राधिका इंगळे

रेखा मिरजकर 

तुळस मंजिरी

आषाढून येता घन
मन ओथंबून आले
साद घालते पंढरी
वाट चालती पाऊले

राऊळाच्या वाटेवर
टाळमृदुंगाची दाटी
चिपळ्यांचा नाद घुमे
दुमदुमे वाळवंटी

तिच्या डोईवर उभे
तुळशीचे वृंदावन
जपताना विठु विठु
मनी घाली ती रिंगण

झरे आभाळाची माया
तनमन हो विठाई
तुड़विता ती चिखल
मातीचाच विठु होई

चिंबचिंब पावसात
चिंब भिजे तनमन
ताल सरीनी धरता
झालं पावसाचं गाणं

डोले तुळस डोईशी
रंगे सावळ्या रंगात
नभ झुकूनि घालतो
तिला  मंजिऱ्यांची नथं

संमंध

सप्तपदीनंतरच्या प्रवासात,

तुझ्याबरोबर चालताना,

अनामिक उर्मिनं,

माझ्यातून मला वेगळं करुन

टांगून ठेवलं झाडावर !

तुझ्याबरोबरचा प्रवास ,

तसा सुखकरं झाला,

अचानक एक अनामिक वळणावर,

झाडावर टांगलेलं "मी" च संमंध

समोर उभं ठाकतं कधी कधी

विचारतं मला , विसरलीस?


दाटून येतो गळा

स्मरतात चंद्रगाणी

परिकथेत रमणारी "ती"

अनभिषिक्त वेडी राणी

धूसर होतो वर्तमान....

समोर उभे संमंध,

भूतभविष्य त्याच्याडोळ्यात,

मी चेहेरा हरवलेली,

तळ्यात -मळयात- तळ्यात ....मळयात!


गीत काजव्याचे


झुंजमुंजु दिस होता

मुग्ध सपान जागते

दिसामाजी एक ओवी

तिच्या ओठी जन्म घेते।


चुड लाऊन प्राणाची

तिने शोधला प्रकाश

हरवीत गेले सूर

सारे मोकळे आकाश ।


सुखदेव तळपतो

वाटे तिच्या चालताना

फुलताना साहते ती

जन्मवेणा जीवघेण्या ।


चाळ बांधुनी मीरेचे

वीज मुक्ताई पेलते

बाई असणेच तिचे

चूड प्राणास लावते ।


कोमेजते  मन त्याला

कधी सांगे ती कहाणी

सलणाऱ्या काळजाची

रीत जुनी नवी गाणी।


सावळेसे दुःख तिचे

सांजपावलानी येते

झरू लागता काळोख

काजव्याचे गीत होते ।


मौन

आभाळाचे मौन 

मातीत रुजले 

बहरले झाड

पानोपान/

हिरवे स्पंदन

पानात दाटता

किलबिले पक्षी 

फांदीतून/

झाडावरी आता

ऋतुचा बसेरा

गंध परिमळे

फुलातून/

गळे फुलपान

झाड आत्ममग्न

जपे ते ईमान

मातीशीच/..


तुझेच आभाळ

नको सांगूस ग सये

बाईपणाची कहाणी

सूर हळवे टिपून 

पूस डोळयातले पाणी..

जागताना नवा सूर्य

चूड तमास लागेल

उजळून तनमन

दिशादिशा उजळेल...

रंग उडल्या डोळयात

विझु पाहतील स्वप्ने

नको वाढूस ग पोरी

अशी नुसती वयाने...

घट्ट मिटूनीया ओठ

नको थांबूस ग अशी 

भर मनाची असोशी

तूच शलाका तेजसी....

सूर माग तू झ-याचे         

वारा शब्दही देईल

कडेकपारी लंघून 

नदी झळाळ वाहील.....

मग मिटल्या मुठीची 

हळू करून ओंजळ 

सये उतरेल बघ

त्यात तुझेच आभाळ.......                        

----------------------------रेखा मिरजकर 


विनायक भावसार

कवितेचे हे असेच असते

कवितेचे हे असेच असते
माझं मन तुला गवसते
तुझं मन मला समजते

शब्द-आरास तुझी
भाव-विश्व माझे व्यापते
अनुभूती तुझी
रोमरोमी माझ्या शिरते

साद कुणाची कुणासाठीची
का माझ्या मनी गुंजते?

भेटीची आस तिथे
का उगा मन इथे तळमळते?

भाव-संचित खोलवरचं
सार्थ-शब्दांत जेव्हा उमटते

कविता तेव्हा खरंच उमगते
आणि
ते पाखरु माझ्या खांद्यावर अलगद उतरते. 

जुन्या कविता

मला 
माझ्याच जुन्या कविता 
वाचायला आवडतं

आता त्या 
छान मुरलेल्या असतात 

आणि 
मीही
कदाचित

मग कळतं

मुरल्यावरही
मी 
किती उरलो आहे ते. 

जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास

जेव्हा तू पहिल्यांदा भेटलास
दिसले सगळे दोष  एकामागून  एक 
ते तुझं बोलणं,
उगाच दात विचकणं,
बोलतांना बिचकणं,
लपवत होतास काही तरी...

मुखवटा घेऊन फिरतो आहेस 
असं वाटतं होतं

सरकला तो तर आणि 
दिसले काही 
बघू शकेन का मी?

तुझं म्हणून मिरवतो आहेस  
खरंच तुझं का ते?

सगळ्या प्रश्नांतून तुझे दोष 
आणि दोषंच दिसत होते मला

आणि 
एवढं पाहून झाल्यावर
जे उरलं
तो तुझा चांगुलपणा.
उरले ते गुण,
तुझं वैभव,
आणि बरंच काही...

तेच सगळं आपलंसं वाटलं...
आणि मग,
मैत्री जुळली तुझ्याशी
घट्ट अशी...

आरशासमोर होतो का मी?

-------------------- विनायक भावसार


विवेक सावरीकर 'मृदुल'   

१. 

जरी अंगणी जाई  ना कुंद आहे

या घराला माणसाचा गंध आहे


आपलेपणाची असे  मेजवानी 

सोबतीला प्रीती  मकरंद आहे


भेटलोच  नाही कुणा कडकडून

तसे आमचे बरेच संबंध आहे


समजावू नका तुमी वृथा कुणाला

 नवी पीढी भलतीच स्वच्छंद आहे


 जन्मांच्या गाठी या आहे अफवा

  लग्नं आता नुसते अनुबंध आहे


पावसाशी वाकडे कधीच नव्हते

हं! आता भिजवून घेणे बंद आहे


नौकेस माझ्या बांधू नका बंदराला

अफाट सागराचा मला छंद आहे.


लोकंही वागतील तुझ्याच सारखे

मृदुल भाबडा का मतिमंद आहे. 


२. 

तुझी प्रीति मनी धरुनी, लिहितो गझल मायमराठी

आज कळू दे दुनियेला ,बृहनमराठी , काय मराठी


तुला भेटण्यासाठी येतो,माहेराच्या  महानगरीला 

दु:खी मी तव बघुनी दैना,तुझ्याच देशी हाय मराठी


मराठीचे अमृत  वैभव,किमया याची  कुठवरसांगू

हिंदी कामधेनुचे क्षीर,या  क्षीरावरची साय मराठी


प्रामाणिकता अन सच्चेपण,तू दिलीेस हीआभूषणं

ओळखच झाली आता साहत ना अन्याय मराठी


दान मागतो देवापाशी ,चिर-चैतन्य मिळो आईला 

संस्कृतीचा संगम बनू दे ,जगभर जेथे  जाय मराठी. 


३. 

प्रीतीची नकळत झाली बोळवण 

आता तू घे ते वळण मी हे वळण


चषक मद्याचे कशाला पाजता हो 

करू द्या मज आठवांनी आचमन 


ज्या क्षणी ते छत्र डोक्यावरचे गेले  

मला कळले संपले मज  बालपण 


वेदनांचे घाव  किती गोड झाले 

तूच करता सांत्वनांचे सारवण


'मृदुल'खचून जाणा-यांपैकी नाहीं

नव्या स्वप्नांची तो करतो लागवण . 

--------------------------विवेक सावरीकर 'मृदुल'   


वैशाली पिंगळे

क्रांतिकारक


मी एक क्रांतिकारक

धगधगत्या आशेचे निखारे 

उराशी बांधून वणवण फिरतोय 

दाही दिशा

अराजकतेच्या धुमश्चक्रीत 

अन्यायाच्या पिळवणुकीत

माणसातला माणूस विझतोय

त्याला पुन्हा पेटवायचाय 

ही एकच आहे ईर्षा 


माझ्या या अखंड भ्रमंतीत 

अरे देईल का मला कुणी साथ 

नाहीतर

हळू हळू विझून जातील निखारे 

आणि मग उरेल फक्त राख. 


 स्वप्न भंग


हृदयातील जखमांना स्पर्श तुझा होताना 

हळुवार दुःख झाले अन सुगंधी वेदना


चांदणे माझे जळाले रात्र अंधारून आली

पापण्याच्या आड माझ्या आसवांना जाग आली


भावनांचे स्वप्न मोती शब्द मार्गे सांडले

जाणिवांच्या पलीकडे ते भाव सारे पोचले


हरवलेल्या सर्व वाटा शोध सारे संपले

वळणावर येऊनी माझे स्वप्न येथे थांबले.                                                 


माझे रागजीवन


माझ्या आयुष्याचे सातही स्वर मी माझ्या पट्टीत बसवले आहेत 

म्हणूनच जीवनाचा सुरेल सूर मला बरोबर गवसला आहे


आसावरीचे  संथ सूर मला कधीच मानवले नाहीत 

अडाण्याची भरारी मारताना मी कधीच विसावले नाही


प्रेमाचा बसंतबहार आयुष्यात कधी फुललाच नाही

म्हणून नेत्रावाटे मेघमल्हार मी कधीच पाझरला नाही


उदासलेला मारवा घेऊन माझी संध्याकाळ आलीच नाही

अखेरची भैरवी कशी होईल याचा विचार अजून केलाच नाही. 


-------------------------------------------------वैशाली पिंगळे


      

शांता लागू

निळ॓गाणे

झिम्मड पाऊस ठेऊन साक्षी

पुसून टाकू विलापधून

नवतालातून नव्या लयीतून

नविन गाणे येई जुळून ।।


त्या शब्दांच्या ब्रम्हांडातून

एकच व्हावे मिलापगीत

साद नको प्रतिसाद नको

ऐकत राहू आलापगीत।।


ओंजळीत या टपटपते रे

आभाळाचे निळेच गाणे

मेघ सावळे ज्यांच्या हाती

धाडून दिधले निळे तराणे ।। 


चांदण गुपित

   

पौर्णिमेची रात्र ऐशी

आज का वेडीपिशी

चांदण्याची शाल अन्

चंद्रही आला उशाशी ।।


चांदणे लेऊनि आता 

वाटे निजावे छानसे

स्वप्नमेळ्यातून फिरते 

मोरपिस बेभानसे ।।


रातराणी गीत गाते

उरले न मी माझी आता

तारकांचे तेज पिऊनि

सर्वगात्री चंद्रगाथा ।।


चांदण्याचे गुपित जेंव्हा

हळूच मीही वाचते

काळजाच्या कुपीत त्याला

जपून अल्लद झाकते ।।     


पंख


चिमुकल्या पावलांना

फुटू लागतात पंख

अवचित क्षणी डसतो

नियतीचा डंख ।।


डंखाने जेंव्हा ती

घाबरीघुबरी होते

वय नसलेली ती 

म्हणे वयात येते ।।


पाऊल पुढे पडताना

वयच येते पायात

आता पुरी सापडते 

आयुष्याच्या कह्यात ।।


पंखफुटी होताना 

जाळ्यात पाऊल फसलेले

जाळे सैलावताना

अखेर पंख छाटलेले ।।


----------------------शांता लागू                                                                  

    

सुधीर बापट 


आला पाऊस एव्हढा , येता  ढग माहेराला 
धरेवरी डोंगरी ह्या, आला हिरवा सोहळा 

येता श्रावणाची सर, आली बाहेर चाहूल
झाले धरती चे मग,चिंब ओलेते पाऊल

पानोपानी रांगती हे,थेंब दंवाचे सुखात
नाचे हरखून मोर , आणि पाखरे वनात 

गेला ढग बरसून, डोह मग पाणावला
झाले आकाश मोकळे, सोनसळी उत्सवाला.
------------------------------------सुधीर बापट 


सुषमा अवधूत


मन

खरेच मन म्हणजे काय हे कळतच नाही
फक्त हे कळतं  की त्यावर आपला ताबा नाही

मनाचे दार आतून  घट्ट बंद केले ज़री
चोरटे विचार त्यात शिरतात किती तरी

हे तरी  बरे  की मनातले  कऴत नाही कुणाला 
देऊच शकलो नसतो  कोणाच़्या डोळ्याला डोळा 

मन नसते तर झाले असते फ़ार बरे 
सुखदुखाच्या भावनेतुन मुक्त झालो असतो सारे

मग जीवनात काहीच स्वार्थ उरला नसता 
आणि त्या जीवनाला काही अर्थही उरला नसता

मन आहे म्हणूनच  जगण्यात मज़ा आहे
दुसऱ्या च्या मनात शिरणे मात्र त्यातून वजा आहे 

स्पर्श

एक स्पर्श आईचा देउन जातो विश्वास
एक स्पर्श बाळाचा देउन जातो सुवास
एक स्पर्श नवऱ्याचा  देउन जातो विसावा
एका नजरेच्या सुखद स्पर्शाचा आपण़ घेतो मागोवा
एक स्पर्श मित्राचा देउन जातो दिलासा
पण कधी तरी एक स्पर्श मागतो ख़ुलासा
कारण त्या एका स्पर्शाने तोडलेली असतात मने
 उत्पन्न केली असते घृणा आपल्या विकृतीने 
स्पर्श ही केवळ क्रिया नाही होणारी सहजतेने 
मनातील भाव व्यक्त होतात केवळ एका स्पर्शाने

एक क्षण

एक राग क्षणिक किती क्षण दुखाचे करतो
एक मोह क्षणिक जीवनाचा मोहभंग करतो

एक कड़ू बोल किती नात्यांचा नाश करतो
एक क्षण एक वाकडे पाउल जीवनाची  गति हरवून  बसतो

एक क्षण एक तिरपा कटाक्ष ह्रदयाचा चोळामोळा करतो
एक क्षण एक वाकडा विचार मेंदूला थिजवून टाकतो

एक पाऊस क्षणिक चिखल किती दिवसांचा करतो
अवचित कधी एका क्षणी एक ढग सावली देऊन जातो

 न सुचलेली कविता

आताशा मला कविता काही सुचत नाही
अन लिहिल्याशिवाय तर रहावतच नाही

मी झाडाकडे पहात होते हा विचार करत
अन ते वाऱ्याबरोबर होते आनंदाने डुलत
जणु म्हणत होते सर्वांबरोबर आनंदाने रहा
मग कविता कशा सुचतात ते पहा
 
मी  फुलपाखराकडे पहात होते हा विचार करत
अन ते आकाशात उंच उंच जात होते उड़त
जणु म्हणत होते विचारांना उंच भरारी दे
अन मग त्यालाच तू  कवितेचे रूप दे
 
मी शांत त्या नदीकडे पहात होते हा विचार करत
अन पाणी आपल्या संथ लयीत होते वहात
जणु म्हणत होते घाण करून टाक साफ़
अन दुसऱ्यां़च्या अपराधाला करून टाक  माफ़ 
मग  बघ आपल्या सुंदर लिहिल्याचे स्वरूप 
अन लक्षात ठेव त्यालाच म्हणतात कवितेचे रूप

न कळले कोणाला

मला हसताना पाहिले सर्वानी         
पण माझे  मुक अश्रु कोणाला दिसलेच नाही

मला जीवन जगताना पाहिले सर्वानी
पण माझे जीवंत मरण कोणाला दिसलेच नाही

मला खेळताना पाहिले सर्वानी
पण माझे पंगुत्व कोणाला दिसलेच नाही

मला वर चढताना पाहिले सर्वानी
पण मी पडलेली कोणाला दिसलेच नाही

मी उजेड केलेला पाहिला सर्वानी 
पण माझे अंधारलेले मन कोणाला दिसलेच नाही

सर्वानी मला चूक  समजले
न कळले कुणाला माझ्या मनातले.

-------------------------------सुषमा अवधूत


सुषमा ठाकूर


सांजधुके

सांजधुक्यातून धूसरलेल्या .... क्षितिजावरअस्पष्ट सावल्या 
निरखित बसले अदृश्यातून , प्रतिबिंबाच्या गूढ बाहुल्या ... 

अतिताच्या ह्या अंधारातून , पहाट डोकावली 
निशा निरोपे  हळवे स्पंदन , घेत पाणावली.... 

अंधुक दिसल्या पाऊलवाटा , सोनसळी सूर्याच्या लाटा 
दवबिंदूंचे झाले आगमन , हिरवाईचे हरखे ते मन ... 

आनंदाची फुले उमलली , दु:खी हृदया झाकून गेली 
वेदनांची तप्त  सावली , रवीकिरणांत हरवून  गेली ..... 

जाणाऱ्यांचे तीव्र आठव , सौम्य होउनि मनात लपले 
व्योमाकडूनी तीव्र गतीने , बघता बघताविरुन गेले .... 

निळ्या नभी , मारून भरारी , स्मित पक्षांचा थवा उडाला 
रविकिरणांतून उत्साहाच्या सोनकणांचा घडा उधळला ... 

गत क्षणांना मागे सारून , हर्षप्रफुल्लित  वासर आला 
आज  घे तू  जगून हे क्षण ,सांगुनी मज तो हासत गेला ... 


कवडसा 


तू जेव्हा माझ्या मनात असतोस, तेव्हा मी माझ्यात नसतेच...

तुझ्या सहवासाच्या लाटा बेभान होऊन अनुभवत असते...

गुदमरून जाते आणि उल्हासितही होत असते... 

अंगावर फुलणाऱ्या काट्यांची रोमांचित फुले झेलत असते ...

तुझ्या मऊ,उबदार शब्दांना मनात साठवत राहते...

शब्द ही न बोलता सर्व तुला सांगत असते...

हृदयाची भरलेली घागर रिती करत असते...

जाई-जुई च्या हळव्या झुल्यावर झुलत असते...

स्पर्शाच्या इंद्रधनुष्यात भावनांचे रंग भरत असते...

निष्पर्ण सत्याला कल्पनेच्या फुलांनी सजवत असते...

मृगजळी नात्याचे स्वप्न बघत असते..

तुझ्या नसलेल्या अस्तित्वाचा कवडसा हातात  धरू पहात असते..


विरोधाभास 


जेव्हा फुलत असतो आठवणींचा मोगरा मनाच्या गारव्यात
तेव्हाच कृत्रिम फुलांवरील धूळ झटकत असते मी घरात …. 

जेव्हा बेफिकीरीने वागण्याच्या निश्चयात मी कोणाचीच पर्वा करत नसते
तकलादू नात्यांना जपण्याची धडपडही मी तेव्हाच करत असते .….

जेव्हा हळव्या , चंदनी क्षणांची गुंगी चढू लागते अंतर्मनाला
तेव्हाच सर्व चेहऱ्यांवरील मुखवटे जागे करायला लागतात जीवनाला …

जेव्हा विरोधाभासात जगायचे नाही असे मी ठरवत असते 
तेव्हा प्रत्येक परिस्थितीशी तडजोड मीच  स्वीकारत असते …      


दिवाळी 

दरवर्षी येणाऱ्या सुखद गारव्यात ,

सुंदर फुलांच्या सुगंधी दरवळण्यात ,

आकाशदिव्याच्या रंगीत प्रकाशात  ,

रांगोळीच्या रेखीव रेघांत ,

तेल उटण्याच्या धुंद सुगंधात ,

लख्ख बादलीतील वाफाळलेल्या कढत पाण्यात ,

औक्षण दिव्याच्या पवित्र ज्योतीत ,

पहाटे पहाटे कानावर येणाऱ्या भूपाळीच्या लकेरीत ,

चकली,चिवडा, लाडू च्या खमंग चवीत ,

येतेस तू , वाजत गाजत .... सर्व मने उमलवत ,

लक्ष्मीची पावले उमटवत ..... 


आता मात्र तुझ्या आनंदी स्वागतात ,

असणार एक धारदार वेदना मनात ,

उणीव ... अंतरलेल्या माझ्या माणसांची 

राहणार कायम आता जीवनात .... 

जरी चालू असेल फटाक्यांचा जल्लोष ,

मनात माझ्या असेल सततचा आक्रोश ... 


तरीही गुंडाळून भावनांना , मी मनास  आवरणार 

तुला मी आनंदाने माझ्याकडे बोलावणार ,

तुझ्या प्रकाशात न्हाऊन निघणार ,

मनातील विखुरलेल्या रांगोळीला सावरणार ,

आकाशदिव्याच्या चमचम चांदण्या अंगावर झेलणार ,

सुगंधित उटण्याने पाठ रगडणार ,

लख्ख बादलीतील कढत तुषार अंगावर घेतांना मात्र ,

परत त्यांच्या आठवणी पापण्यात दाटणार , 

डोळ्यातून घरंगळणाऱ्या मोत्यांची मी एक नवीन माळ गुंफणार. 

--------------------------------------------------सुषमा ठाकूर


संध्या टिकेकर 

शब्दांपलिकडचं 

जशी,निवांत पहुडलेली नदी,  
रात्रभर बोलत असते 
तारकांशी 

जसा,हितगुज करत असतो चंद्र 
काळसर कुरळ्या केसांच्या 
यामिनीशी 

जसा,सांगत असतो वारा 
आपल्या मनातलं सारंकाही  
झाडांपाशी 

अगदी तसंच ,
खूपकाही बोलायचंय तुझ्याशी 
अगदी तसंच 
निःशब्द 
मौन 
ते शब्दांपलिकडचं . 

अस्तित्व 

जगभरातील नद्या 
कुठलीही अपेक्षा न बाळगता 
सतत जोमानं धावत असतात 
प्रियकराकडं 
त्याला अगदी आहे तसाच स्वीकारण्यासाठी . 

सामावत असतात त्या 
गर्जनाकरीत बोलावणाऱ्या, जिवलगाच्या 
खारट -तुरट, निळ्या -पांढऱ्या ,
अनंत जलदेहात आणि 
आपल्या लहान -सहान उर्मींतून,नाचत -गाजत 
साजरा करीत असतात उत्सव 
त्या मीलनाचा. 

पण देहापलिकडच्या ,
स्वतःच्या अस्तित्वाचा तो ' गोड गंध ' मात्र 
त्या कधीच उधळत नसतात 
मीलनाच्या  त्या उत्सवात. 

तो नेहमीच देऊ करतात त्या
समुद्राकाठाच्या असंख्य नारळी वृक्षांना 
आणि प्रत्येकदा नव्यानं जगत असतात 
 आपलं मधुर अस्तित्व 
प्रत्येक नारळात,इवलीशी नदी होऊन . 

स्वतःतील गोडवा राखून 
खाऱ्या समुद्रावर  प्रेम करणं  
किती सहजपणे जमतं न नद्यांना !!!  

पाऊस 

कळतंय मला 
तुझ्या पाणावलेल्या डोळ्यातील
सागराएवढं दुःख . 

दिसतायेत मला 
आतुरतेने माझी वाट बघणारे 
प्रतीक्षेत दमलेले,तुझे डोळे. 

रागही जाणवतोय गं
मळकट,चुरगळलेल्या,फाटक्या 
तुझ्या पदरावरून. 

अगं,वसुधे ! 
मी वेळीच आलो असतो 
पण ठिकठिकाणी अडवले  मला 
त्या जाड -मोठाल्या विषाक्त वायू थरांनी. 

पाऊस म्हणून, मीही 
आसुसलोच होतो 
तुझ्या पापुद्रेल्या ओठांना 
कोसळत्या धारेत भिजविण्यासाठी  

हे बघ ! हा मी आलोच की !  
आता तुला आपल्या मिठीत घेऊन  
 चिंब चिंब करतो का नाही,तू बघच ! 

-------------------- संध्या टिकेकर 



स्मृति आंबेगावकर


मन थेंबाचे आकाश

पसरला दूरवर
तेजोमय तो प्रकाश
जग व्यापून उरले
मन थेंबाचे आकाश

शांत नभाची निळाई
त्याचा थांग की लागेना
मन आभाळ भरले
तरी तहान भागेना

बरसून जा रे नभा
काही ठेवू नको पोटी
रितेपणातील सुख
जरी विराणीच ओठी

मन थेंबाचे आकाश
वेळोवेळी साद देई
मनी मळभ दाटता 
अंतरंग स्वच्छ होई

खपली

दिसलीस तू पुसटशी रस्त्यावरून जाता
जखमा भळाळल्या त्या खपली निघून जाता

वाटे मला,तुला मी विसरून पार गेलो
त्या धुंदल्या क्षणांची तोडून नाळ आलो

समजूत साफ खोटी, खोटारड्या मनाची
कितीदा पुन्हा नव्याने  घालून फार शिणलो                               

तो काळ आठविता मोहरुन येई श्वास
मी हुंगता अबोली येई  गुलाब वास

त्या शांत सागराच्या तिरावरी बसून
डोळ्यांत खोल माझ्या तू पाहिले हसून

ते स्मित जीवघेणे रुतले ऊरात माझ्या
किती उपटल्या तरीही स्मृति अजुन ताज्या

तव स्पर्श मोरपीस अजुनी मनात फिरते
तुज पाहण्या अजुनी का नजर अशी भिरभिरते

मी जाणून पूर्ण आहे,तुझी  वाट वेगळीच
करते तरी पुन्हा मन भलतीच आगळीक

काहीच आपल्यात उरले न पूर्वीचे ते
मन बंडखोर फार, गतकाळी धाव घेते

चल जाऊ दे प्रिये मी माघार आज घेतो
जन्मेन मी नव्याने तेव्हा तुझाच होतो. 

मृगजळ

काय अन् कोणास सांगू अंतरीच्या वेदना
मी मुकी झालेच आहे अन् मुक्या ह्या भावना 
वाचूनी जगातील घटना, थिजल्या डोळ्यांस प्रश्न हा,
काय मी आता लिहू ही लेखणीस विवंचना 

रात्र काळोखात गेली, सोबतीला हुंदका,
दिवस मग आलाच नाही, कवडस्याची कल्पना 
मारवा आलापला मी, कंठ का हा दाटला,
सूर मग जुळलेच नाही, साज देती सांत्वना 

वाट चालले धुक्याची, मार्ग काट्यांनी वेढला,
रक्ताळल्या पायांस माझ्या, ओळखीच्या यातना 
झाकले मी मज तरीही, कळती वासना डोळ्यातल्या,
निर्वस्त्र करते नजर त्यांची, पाहिली जणू वारांगना 

तप्त मरुभूमित मजला, मृग जळाची आस का ?
जवळ जाऊन पाहते तर, शुष्क ही संवेदना !

----------------------- स्मृति आंबेगावकर

श्रीधर जहागीरदार      


कवितेची एक ओळ

कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रुजते, कुठेही हसते!

बाल्कनीच्या कुंडी मधले
फूल बनुनी कधी उमलते;
खिडकी मधले नभ चौकोनी
चांदवताना, तिथे उमगते;

कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रमते, कुठेही जमते!

कधी बटेच्या हिंदोळ्यावर
झुलता झुलता अलगद पडते,
गालावरती खुलता खुलता
लाजत लाजत खळीत दडते.

कवितेची एक ओळ सावळी,
अशी हरखते, अशी मुरकते !                                                                                                                                                                                                                                                                                                   कूर्म गतीच्या रांगेमध्ये  
वीज गतीने मनी चमकते

रेटारेटीत लोकल मधल्या
गुंजन अल्लड कानी करते,

कवितेची एक ओळ बावरी,
कुठेही रुजते, कुठेही ठसते!

बाजारी ती शृंगाराच्या
केविलवाणी पदी थिरकते;
आजारी वृद्धांच्या नयनी
एकाकी, कातर, थरथरते !

कवितेची एक ओळ कावरी,
कधी सरकते,कधी थबकते!


भीक मागती हात कोवळे
रस्त्यावरती, मन चुटपुटते;
दंगे, हत्या, पेपरातुनी
वाचत असता, मन पुटपुटते;
कवितेची एक ओळ मनस्वी
कुठेही दिसते, कुठेही असते !

भेट अचानक: "किती वर्षांनी?
कोठे असतो ? आहे स्मरते?
कशा चालल्या तुझ्या कविता?
ह्यांना नेहमी सांगत असते"

कवितेची एक ओळ पुराणी
खुदकन हसते, मनात सलते!!

कवितेची एक ओळ पोरकी
अर्था मुकते, वहीत सुकते !!

धुक्याच्या वयात

धुक्याच्या वयात
मनांत खुलतात, बाहेर फुलतात, फक्त गर्द गुलमोहर
तप्त ऊन,बाभुळ काटे, सारे सारे, सारे मनोहर!

धुक्याच्या वयात
दिवस देखील रात्र होतो, मनाकाठी स्वप्नासाठी
किती किती फुलं फुलतात हुरहुरत्या गंधापाठी!

धुक्याच्या वयात
हरपते भान,उरते तान,सूर भारला आणि गळा,
नाते तुटते,जमीन सुटते, आकाश भोर फक्त झुला!

धुक्याच्या वयात
माझे असे काहीच नाही, सारे सारे तुझ्यासाठी,
प्रचंड असा विश्र्वास माझा, माझे आकाश माझ्यापाठी!

धुक्याच्या वयात
नि:शब्द निळे, निर्मळ तळे, सर्वदूर पसरुन असते,
सारे स्वच्छ, पारदर्शक, कुठे कुठे धुके नसते !!

मी मौन पाळले होते                                                                                                                                     
 
तू सत्य गाळले होते                                                                                                       
मी मौन पाळले होते...

रात्रीच येत सामोरे                                                                                                                               
जे प्रश्न  टाळले होते...

संपूर्ण वाचले कोणी? 
संदर्भ चाळले होते...  

प्रारब्ध मांडले जेथे                                                                                                                                            ते पर्ण वाळले होते .   

पुष्पें नकोस तू शोधू                                                                                                                                          मी दु:ख माळले होते...                                                                                                                                                                                                                                                                                            
हा गंध कोठुनी आला ?                                                                                                                     
ते पत्र जाळले होते !     

 झालीस 'झाड' तू जेंव्हा 
 'हे' भूत भाळले होते !   

 नाते 

होडीस ना कळावे डोहास काय छळते
स्थितप्रज्ञ शांत वरुनी अंतस्थ काय सलते                                                                                …

वाऱ्यास का नसावा थारा कुठे जरासा
प्रश्नास ह्या धरुनी हलकेच पान हलते …

"स्पर्शेन आज नक्की " विश्वास ये कुठूनी
आकाश शोधण्याला खग रोज उंच उडते …

लाभे खरा ज्वलंत प्राणातला निखारा
श्वासातले धुमारे जपण्यात वेळ खपते ….

मातीत राख विरता उमलून फूल यावे
डोहास थेंब सांगे "नाते असेच असते"…

 रंगून फूल जाते    

रंगून फूल जाते काट्यास तोलताना,                                                                                 
गाणे फुलून येते आयुष्य सोसताना...                                                                                                                                                                                                   

उद्वेग हा मनाचा, घनघोर शब्द होता                                                                     
जपतेस शब्द ओला, नात्यास बांधताना ...                                                                                                               

होता शिकस्त माझी देतेस तू दिलासा                                                              
आश्वस्त मृदूलतेला केसांत पेरताना...                                                                                                                                                                                                      

हतबल हताशतेचा, होता मनास स्पर्श                                                                  
स्मरतेस प्रार्थनेला, सांज्योत लावताना ..                                                                                                                                                                                                    

पेटून मत्सराने, नाती अबोल होता                                                                      
मातीस साद देशी, तुळशीस पूजताना.                                                                                             

-------------------------------श्रीधर जहागीरदार


श्रीनिवास कुटुंबळे

श्रीनिवास कुटुंबळे ह्यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन चरित्रातील प्रेरक प्रसंगांवर आधारित एक गीती काव्य लिहिलं आहे. ते कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे येथून प्रसिद्ध झाले असून बाबासाहेब पुरंदरे यांची प्रस्तावना त्यास लाभली आहे. त्या पुस्तकातील काही वेचक कविता,संदर्भासकट येथे संग्रहित केल्या आहेत. 

रोहिडेश्वर शपथ १५ एप्रिल १६४५ : रांझे पाटिलाला केलेल्या शासनामुळे, लोकांना शिवाजी राजांची ओळख पटायला लागली होती. शिवबाला ही देशाच्या परिस्थितीचा अंदाज यायला लागला होता. मनात खिन्नता येत होती. असे कसे माझे स्वजन मरणप्राय जीवन जगत आहेत? विधर्मियांच्या या अत्याचाराला काहीच कां प्रतिकार होत नाही? हे सारं असंच चालत राहणार कां ? आपले हे विचार शिवबा- तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मथगल, नारोबा, चिमणाजी, बाळाजी देशपांडे, त्रिंबक डबीर,  बाजी जेधे, बाजी पासलकर आणि अन्य सवंगड्यांना सांगत असत, ह्यावर एकमेकांत चर्चा होत असे  आणि काहीतरी उपाय केला पाहिजे असा एकमताने निर्णय झाला.  या मित्रमंडळात सर्व वयाचे लोक होते. शिवाजी स्वतः पंधरा वर्षांचे तर बाजी पासलकर वय वर्षे पासष्ट. म्हणजे शिवरायांच्या आजोबांच्या वयाचे. साऱ्यांनी एकमताने स्वराज्य हा हिंदवी राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यावर शिक्कामोर्तब करायला रोहिडेश्वराला साक्षी ठेवून साऱ्यांनी शपथ घेतली.रोहिडेश्वर हे सह्याद्रीच्या खोऱ्यातील जंगलातले छोटेसे देऊळ तेथे फक्त शिवलिंग होते म्हणूनच शिवलिंगा समोर शपथ घेतली. या काळात त्या तरुण मनात विचार यायचे :--

राजे आम्ही राजे कुठचे
राजे आम्ही राजे कसचे
जहागीरदार आम्ही नावाचे 
अधिकारी केवळ वसुलीचे

महंमद या खानाने यावे
खुशाल आमुचे घर ही लुटावे 
शिकार सारे बळजबरीचे 
नाहरा पुढे जीव शेळीचे 

भूमि आमुची, किल्ले त्यांचे 
बीज आमुचे, पीक तयांचे 
खंडणी आणि धनही तयांचे 
अनेक आमुचे आप्त तयांचे 

नसे रक्षण माता बहिणींचे 
गलित गात्र जगणे तरुणांचे 
सरले मंत्र पुरोहितांचे 
विरले बोलही संत जनांचे 

मावळातील मावळ्यांचे 
सरले कां हो बळ बाहूंचे ?
मराठमोळ्या बंधूजनांचे 
थकले का मन अस्मितेचे ?

लुटुपुटीचे राज्य नको हे 
मरणासमज जीवन नको हे 
राज्य असावे हे तो श्रींचे 
अधिष्ठान तेथे धर्माचे 

नीती असावी चाणाक्याची 
मतें असावी एकोप्याची 
ध्येय असावे रामराज्याचे 
लक्ष असावे कृष्ण नीतीचे 

मिळून सारे शपथ घेऊया 
रोहिडेश्वरा साक्षी ठेवू या 
स्थापन करू हिंदवी राज्याचे 
हात लागू द्या सकल जनांचे 

बोला ताना अन्  बाळाजी 
नरसप्रभू,  दादाजी, बाजी 
वचन घेऊ या एकोप्याचे 
आजीवन साथही देण्याचे 

सर्व मावळे एकच होता 
पूर्ण यशाची खात्री होता 
कारण नाही अपयशाचे 
प्रयत्न सारे करू शर्थीचे 

बिल्वपत्र घेऊन हाताते
आज प्रार्थू या शंभू शिवाते 
मंत्र मुखाते असो निरंतर 
महादेव हर हर 
हर हर महादेव हर हर
हर हर महादेव हर हर
हर हर महादेव
                       

बाजीप्रभू देशपांडे १३ जुलै १६६० :अफजल खानाचा वध करून व त्याच्या सैन्याला परास्त करून, शिवाजीराजे लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी विजापूरकडे कूच करून गेले. कोकणपट्टीचे क्षेत्र पादाक्रांत करत पुढे गेले. पुढे मिरजेला वेढा देऊन बसलेले असतांना वार्ता आली की सिद्धी जौहर आपली फौज घेऊन स्वराज्यावर आक्रमण करायला निघाला आहे. सिद्दी जौहरला स्वराज्यात शिरकाव करू देण्यापेक्षा सीमेवर थोपविणे उचित होईल या विचाराने शिवाजी राजे पन्हाळगडावर पोचले. सिद्धीला ही बातमी कळताच त्याने पन्हाळगडाला वेढा दिला. चार महिन्यांचा काळ लोटला, पावसाळ्यातही वेढा सैल होण्याची काही चिन्हं दिसत नव्हती. आता या वेढ्यातून कसेही करून निसटायचे असा विचार राजांनी केला.

 शिवाजीराजे तह  करायला येत आहे असा निरोप सिध्दीला पाठविला पन्हाळगडावरुन दोन पालख्या रवाना झाल्या. एक सिद्धीच्या छावणीकडे, त्यात शिवा न्हावी, शिवाजी राजांच्या वेषात होता. दुसरी पालखी विशालगढाकडे. सिद्धी जौहरच्या वेढ्यातून निवडक मावळे घेऊन शिवाजीराजे विशालगढाकडे निसटायचा प्रयत्न करत असतांना खबर आली की गनिमांना ही योजना कळली असून सिद्धी जौहरचे सैनिक राजांचा पाठलाग करत येत आहेत. शिवाजीराजांचे अनुयायी वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी राजांना आग्रह केला की साथीला काही मावळे घेऊन राजांनी विशालगढाकडे जावे व बाजी स्वतः घोडखिंडीवर गनिमांना थोपवतील. विशालगढावर पोहोचल्यावर इशाऱ्याची तोफ दागावी. यावर राजांना विचार करताना पाहून बाजीप्रभू देशपांडे म्हणतात:--

राजा वेळ ही वैऱ्याची
उशीर जरा ना करण्याची
घोडखिंड ही सह्याद्रीची
वाट एकच जाण्याची 
 
गनिमासाठी इथे थांबतो 
बळे भिडूनी तया थोपितो 
तोफ ऐकितो विशालगढची 
वाट रोखतो या खिंडीची 

चिंता तव मनी जराही नको
बाजी जीवित असो वा नसो 
लावीन बाजी मी प्राणाची
राखी लाज हिंदवी राज्याची 

सुरक्षित असता राजे शिवाजी 
असेल शास्वति हिंदू राज्याची 
येतील जातील अनेक बाजी 
युगांत अवतरे एक शिवाजी 

मात्र ३०० मावळे सोबत घेऊन बाजी १२ तास खिंड लढवत होते,  सर्वत्र घाव झालेले रक्तबंबाळ शरीर, थकून पस्त झालेले, अन् 

राजे अजुनी कां न पोचले 
कितीक येथे गनिम कापले 
सरली शक्ती या बाहूंची 
वाट पाहतो तोफ ध्वनीची
 
तेवढ्यात

ध्वनी आली ध्वनी आली
मधुर ध्वनी तोफेची आली
शिवरायांच्या खुशहालीची
बाजीच्या बाजी विजयाची

 प्रणाम माझा शिवरायाला 
तुम्ही सुरक्षित विशालगढला 
वेळ ठाकली निरोपाची 
शीशही अर्पण करण्याची 

राजांना जेंव्हा ही वार्ता कळली तेंव्हा राजांचे उद्गार होते.

बाजी ऐसे कां हे केले 
माझ्यासाठी प्राण खर्चिले
आण राखली स्वराज्याची 
भूमी पावन घोडखिंडीची. 


 शिवाजी महाराजांचा वाढता प्रभाव पाहून औरंगजेबाला फार अस्वस्थता वाटत होती. प्रजेतही शिवाजी राजांबद्दल कुतूहल आणि आदर वाढत होता. प्रत्यक्ष मामा शाहिस्तेखानही पराभव पत्करून परत आलेला होता. जसवंतसिंग सारखा योध्दा महाराष्ट्रात असतांना सुद्धा शिवाजीने १५० मैलांचे अंतर ओलांडून मोगलांची कुबेर नगरी सूरतेवर आक्रमण केलेले होते. शिवाजींच्या या सर्व कार्याला थांबवणे अत्यंत जरूरी वाटले म्हणून औरंगजेबाने शूर, मुत्सद्दी व अनुभवी मिर्झा राजे जयसिंग या हिंदू राजपूत सेनापतीला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याला धाडलं. 

      मिर्झाराजेंनी लक्षचंडी यज्ञ व महादेवाला अभिषेक करून आपली मोहीम सुरु केली. अगोदरच्या लोकांनी जी चूक केली होती ती मिर्झाराजांनी टाळली. शिवाजीराजांच्या किल्ल्याकडे लक्ष न देता त्यांनी संपूर्ण प्रदेश नेस्तनाबूत करण्याचा सपाटा लावला. सारी रयत त्रस्त झाली. शिवाजी राजांच्या लक्षांत आले की हा वेगळाच प्रकार आहे व त्यांनी मिर्झाराजांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. पण मिर्झाराजे संपूर्ण शरणागती शिवाय कोणतीही गोष्ट मानायला तयार नव्हते. शेवटी शिवाजी महाराजांना शरणागती पत्करावी लागली.

एक शिवभक्ताने, शिवाच्या अवताराला एका मुसलमान शासकापुढे शरणागत व्हायला लावलं. मनांत अत्यंत संताप आलेला, पण मिर्झाराजे वयाने मोठे व आपण स्वतः पराजित-शरणागत, यामुळे काही बोलताही येत नव्हतं. अशा स्थितीत शिवाजीराजे मिर्झाराजांना म्हणाले :--

ठेविला असता तव चरणी मी माथा 
हिंदराज बनुनी आला जर असता

असते केले जीवन अवघे अर्पण 
प्रदेश, गड अन् प्राण समर्पण 
राजपुतांचा स्वाभिमान तुम्ही जाणता 
स्वीकारली कां तरी, मुगलांची दासता

विरली कां ध्वनी, प्रतापच्या खड्गांची 
विझली कां ज्वाला पद्मिनीच्या चितेची 
विसरला नाद का, चेतकच्या टापांचा 
गेली कोठे तव मनांतली अस्मिता

बोल शौर्याचे ऐकता , मनास ये जागृती 
मृत मनासी जागे करणे शक्य नसे कधी 
मेला स्वाभिमान ज्यांचा, अर्थ न त्या वदता
वाटली कां न लज्जा, चरणी त्या झुकता


दैव उलटले अपुल्या भारत देशाचे 
विपरीत बघा फिरते चक्र ही कालाचे 
शिवभक्त निघाला, हरण्या प्राण शिवाचा 
शिव यज्ञ करी, घेण्या आशीष शिवाचा

ज्येष्ठ तुम्ही श्रेष्ठ तुम्ही, जाणकार असता 
करावी पुन्हा  जीवित्, तव शक्तीची गाथा 
एक अपुला धर्म, देशही एकच असता 
साथ मिळूनी राखू हिंदू राष्ट्राची प्रभुता

एक होता हिंदू, बिशात ना मुगलांची 
होऊन राजे करा स्थापना हिंदवी राज्याची 
धन्य होईन सेवा, हिंदूराष्ट्राची करता 
शपथ भवानीची घेई, वचना या देता

क्षमा करावी, सान मुखे बोललो अधिक   
परि दाह मनी असता, बसवेना मूक 
विजेता आपण, शरणागत मी असता 
आगऱ्यासी जातो, आज्ञा तव मानता

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक : ६ जून १६७४ जेष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६

हळूहळू स्वराज्याचा कारभार पुन्हां व्यवस्थित व्हायला लागला. अधिकतर गडही शत्रूकडून पुन्हा जिंकून घेतले गेले. सिंधुदुर्ग पण तयार होऊन स्वराज्यात रुजू झाला. आरमाराची शक्ती वाढली. हे सर्व करण्यात प्रचंड धन खर्च झाले. पुन्हा एकदा धनाची कमतरता व्हायला लागली व पुन्हा एकदा सुरतेला जाऊन धनसंग्रह केला.  रयतेमध्येही स्वराज्याबद्दल प्रेम व विश्वास निर्माण झाला. यवनांचा त्रास जवळजवळ संपला. आणि अशा वेळेस काशीचे मुख्य पुरोहित प्रकांड पंडित गागाभट्ट यांचे स्वराज्यात आगमन झाले.

गागाभट्टांनी आग्रह केला की संपूर्ण हिंदुस्थानात मुसलमानांचे वर्चस्व झालेले आहे, हिंदू आपल्या देशातच सुरक्षित नाही, अशा काळात शिवाजीराजे हे सर्व हिंदूंना आशेचे किरण आहेत. चंद्रगुप्त मौर्य नंतर, एकही सिंहासनाधीश हिंदू राजा संपूर्ण हिंदुस्थानात झालेला नाही.  यादव  वंश  पण कधीचाच संपलेला आहे. अशा वेळेस हिंदू धर्माचे रक्षण करायचं असेल तर शिवाजी हे छत्रपती राजे व्हायलाच हवेत. गागाभट्टांच्या या विचाराला सर्व मंत्रिमंडळांनी व जिजाऊ-आऊसाहेबांनी  दुजोरा दिला आणि सर्व संपूर्ण मराठमोळ्यांचे  प्रिय शिवबा भव्य सोहळ्यात विधिवत राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराज झाले.

 छत्रपती शिवाजी 

क्षत्रियकुलावंतस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदुपत S S S पातशहा S S S  श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की ....जय S S S 


क्षण हर्षाचा आज उगवला
छत्रपति शिवराया झाला 

पंचशतक  कालरात्रीचा
सरला काळ दुःस्वप्नांचा 
नवकिरणें क्षितिजावर येता
ध्वज भगवा तो नभी डोलता
छत्रपती शिवराया झाला 


दीप उजळती पुन्हा मंदिरी 
भूमि नेसली हरित चादरी
आनंदी भगिनी घरीदारी 
मंत्र पावन नभी उमटला 
छत्रपति शिवराया झाला 


युग निर्माता पोटी निपजला
धन्य जाहले जिजामाईला 
यत्नें घडवी बालमनाला 
छत्रपती पुत्रासी देखिला 
छत्रपती शिवराया झाला 

हिंदू रक्षक प्रिय शिवराया 
हिंदवी राज्या भरितो पाया 
मायभूमी संपन्न कराया 
समर्थाशिषे सफल जाहला 
छत्रपती शिवराया झाला 

एकजूट मावळ्यांची शक्ती 
शौर्य जैसे साक्षात रणचंडी 
गनिमांची होई रणींं दुर्गती 
हर हर महादेव मंत्र ठरला 
छत्रपती शिवराया झाला 

अन्यायाचा कर्दनकाळ
न्याय युगाचा उषःकाल
शिवबाचे कर्तृत्व विशाल 
स्वराज्य स्थापण्या यशस्वी झाला 
छत्रपती शिवराया झाला 

निर्माता हिंदवी राज्याचा 
स्वयं विधाता स्वराज्याचा 
राज्य हे श्रींचे मुखी बोलला
प्रणाम या शिव अवताराला
छत्रपती शिवराया झाला. 

दक्षिण विजय : ६ ऑक्टोबर १६७६ ते जून १६७८

राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराज "छत्रपती शिवाजी महाराज" झाले. आता राज्याचा आकार वाढविणे जरुरी आहे असे राजांना वाटल्यामुळे राजांनी दक्षिणेच्या मोहिमेचा बेत आखला. व ६ ऑक्टोबर १६७६ ला राजांनी आपली मोहीम प्रारंभ केली. दक्षिणेच्या मोहिमेत राजांचा मुख्य उद्देश दक्षिणेतील राजांनी एकजूट व्हावे हा होता. या मोहिमेत राजे पन्नास हजारांची फौज घेऊन निघाले. त्यामध्ये वीस हजार पथक व तीस हजार पायदळ सैन्य होते. स्वराज्याच्या इतिहासांत प्रथमच एवढ्या प्रचंड संख्येत फौज निघाली होती. 


प्रथम कुतुबशहाची भेट घेऊन कोप्पल, कुर्तुल, श्रीशैला, कोलार वेल्लूर, कांचीपुरम्, तिरुचिरापल्ली, जिंजी होत राजे तंजावूरला आपले बंधू एकोजी उर्फ व्यंकोजीराजे यांना भेटले.  तेथून बेंगळूर, हॉसफेट, बेल्लापूर, गदग क्षेत्र काबीज करत राजे जून १६७८ ला रायगडावर परत पोहोचले.

 दक्षिणेची ही मोहीम राजांची सर्वात अधिक काळाची व सहज विजय मिळत जाणारी ठरली. अशा मोहिमेवर जात असतांना तृप्त मनाने व उचंबळून आलेल्या हृदयाने छत्रपती शिवाजी राजांच्या सैनिकांचे उद्गार येतात :--

चला चला रे शूर मावळे 
दक्षिण विजया जाऊ चला 
हिंद राज्याची आपण सेना 
स्वराज्य सीमा वाढवू चला 
दक्षिण विजया !

छत्रपती हा अपुला राजा 
स्वराज्याची करी स्थापना 
राज्या ठायी अपुली निष्ठा 
शौर्य पराक्रम दावू चला 
दक्षिण विजया !


हिंदवी राज्याची ही महती 
सुरक्षित मां भगिनी असती 
विजनांची ती सरली शक्ती 
स्वजना संगे घेऊ चला 
दक्षिण विजया !

आदिलशाला पुरता मोडा 
निजामास जिता ना सोडा 
कुतुबशहाशी मैत्री जोडा  
शिवशाहीचे गुण गाऊ चला
दक्षिण विजया !

स्वराज्याचा भगवा पटका 
त्याग भावना दावी लोका
समर्थांची हीच कल्पना 
विश्रांतीला त्यागू चला 
दक्षिण विजया !


राजा आपला शूर सैनिक 
बलाढ्य शत्रू येती अनेक
जिंकू ना शकले कोणी एक 
विजयाचे गीत गाऊ चला 
दक्षिण विजया !


राजा अपुला लोकनायक
हिंदू धर्माचा प्रतिपालक 
पुत्रा सम तो मानी रयत
थोरवी त्याची गाऊ चला 
दक्षिण विजया !

------------------------ श्रीनिवास कुटुंबळे



श्रेयस गोखले 'सारंग शिवार्चक'

मी रोज घडवते कविता कहाणी 

माझी आई लग्नाआधी कहाणी लिहायची
कविता लिहायची, 
गाणी तर फारच सुंदर म्हणायची
तिचे मित्रमैत्रिणी म्हणायचे, अगं!
तुझा नवरा तर तुला बसवून
फक्त गाणीच ऐकेल तुझे

पण संसार तो संसारच
एकदा सुरू की चालतच जातो
उसंतीशिवाय
कित्येक कहाण्या लोपतात
गाणी झोपतात
या संसाराच्या पदरात
आणि कविता वाटतात
मुक्या झालेल्याश्या
किंवा केलेल्याश्या

मी विचारले मोठे होऊन
का गं, कां लिहीत नाहीस
गात कां नाहीस
आपली कला अशी सोडायची असते का?

ती म्हणाली, तू ही कवी आहेस
कला कधी सुटते का?
लिहीत नसेन कागदावर
गात नसेन स्वरे
काव्याचे मर्म संसारातूनच कळाले
कित्येक वर्षांपासून 
घडवत आले आहे 
एक कहाणी, एक कविता, एक गाणं
रोज थोडेथोडे
अजून ही घडवते
या जगत्या हसत्या खेळत्या साहित्याला बघून
मी रोज भारावते
आणि आपल्या प्राणांचे स्वर देते
या जिवंत गाण्याच्या
एकेका ओळीला

संसारात राहून ही
मी रोज घडवते
एक कहाणी
एक कविता
एक‌ गाणं

पंचत्व

ऐकोनि नाद ऐसा
चैतन्य अनहदाचा
मुनि मौन तृप्त झाले
ऋषि ऋद्ध‌‌ दीप्त झाले

आनंदप्राण स्पर्शे
खुलली कळी जयांची
सिद्धां तयां निवृत्ती
योगी प्रवृत्त झाले

ते सत्यतेज बघुनी
अस्तित्व जे कळाले
त्यानेच साधु साक्षी
संतां वसंत आले

पर्जन्य अमृताचे
चव लागली मनाला
त्याने मनुष्य जगती
वदनी सुहास्य आले

घ्राणी सुवास ऐसा
जव पोचला‌ मृदेचा
जगतात सर्व प्राणी
त्यांचेच त्यां कळाले

द्या हो पाणी

द्या हो पाणी, द्या हो पाणी।
रोपालागी द्या हो पाणी।।

विन पाण्या वाळुन जाते।
पाणी देतां हिरवे होते।।

स्वच्छ पाणी गार आणा।
विहिरीचे बरवे जाणा।।

फुले येती मोठै होतां।
नको गर्व वाटा वाटा।।

एकदाचि वृक्ष झाले।
नको‌ पाणी बाह्याकडले।।

मुळां भेटे आंत स्रोत।
शिवार्चक तृप्त होत।।

----------- श्रेयस गोखले 'सारंग शिवार्चक'











                      

12 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete


  2. 🙏 खूप खूप धन्यवाद माननीय अलकनंदा ताई, प्रत्येकाच्या साहित्यिक रचना सांभाळून ठेवून त्याचा ब्लॉग बनवून सर्वांना त्या आनंदात सामील करून घेणे अजिबात सोपे नाही. त्यासाठी तुम्ही सतत किती प्रयत्न केलेत त्यातील काही भागांची मी साक्षीदार आहे. व तुमच्या ह्या यशस्वी ब्लॉग निर्मितीसाठी व त्या मागच्या अथक धडपडीसाठी तुमचे खूप अभिनंदन आणि वंदन

    ReplyDelete
  3. खूपच सुंदर काव्य..
    अलकनंदा साने यांचे हे अभिनव उपक्रम खूप स्तुत्य आहे, प्रत्येकाचे काव्य संग्रहित करून ते ब्लॉग वर आणण्याची तुमची धडपड आणि मेहनत खरंच कौतुकास्पद आहे...

    ReplyDelete
  4. मराठी हिंदी साहित्य पूल, प्रशंसनीय संग्रह आहे, मायमावशी शब्द सार्थ केला आहे,हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  5. Replies
    1. अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद .

      Delete
  6. सर्वांच्या कविता खूपच भावपूर्ण. कुटुंबाळे सरांच्या गीत काव्याने मन भरुन आले.

    ReplyDelete
  7. अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद .

    ReplyDelete

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...