Saturday, October 9, 2021

 





माधव गोपाळ जामदार

( २ जानेवारी १९३० - २५ ऑगस्ट २००६)

 

 

मा. गो. जामदार मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्म २ जानेवारी १९३० रोजी नागपूर येथे झाला. नागपूर विद्यापीठातून एम्. ए. पर्यंतचे शिक्षण झाले. नोकरीनिमित्त १९६२ मध्ये भोपाळला आल्यानंतर तेथूनच ते सेवानिवृत्त झाले. शालेय जीवनापासून असलेला कवितेचा छंद त्यांनी अखेरपर्यंत जोपासला. महाराष्ट्राबाहेर राहूनही त्यांचे मराठीपण अखेरपर्यंत कायम राहिले. नाटकांचीही त्यांना आवड होती. १९५९ मध्ये त्यांना मुंबई राज्य नाट्य स्पर्धेत श्रेष्ठ अभिनेत्याचे रौप्यपदक मिळाले होते. म.प्र.मराठी साहित्य संघाशी ते अखेरपर्यंत संबंद्ध होते.सेवानिवृत्तीनंतरच्या काळात  त्यांची साहित्य वाटिका जोमाने फुललेली दिसते. या काळात त्यांची एकूण दहा पुस्तके प्रसिद्ध झालीत. १९९३साली श्री जामदार यांचा, 'आषाढाच्या प्रथम दिवसे' हा मेघदूत काव्याचा समश्लोकी अनुवाद प्रसिद्ध झाला. स्रग्धरा वृत्तात केलेला हा अनुवाद म. प्र. मराठी साहित्य संघाने प्रकाशित केला. त्याच वर्षी त्यांचा, 'क्षण सुगंधी सोन्याचे' या नावाचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित  झाला  या संग्रहाला म. प्र. साहित्य परिषदेचा भा. रा. तांबे पुरस्कार मिळाला आहे. 

ऐलतटावर पैलतीरावर हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह १९९६मध्ये प्रसिद्ध झाला. सर्वसाधारण प्रापंचिकाचे जीवन जगलेल्या या कवीला सतत कवितेची साथ मिळाली आहे. त्यांची वृत्ती आत्ममग्न आहे. त्यांची कविता कसलीही घोषणा करीत नाही, तिला कसलीही क्रांती करायची नाही, तिला कसलाही हव्यास नाही. साधेपणातले सौंदर्य, संयमातले मार्दव व रचनेतले सौष्ठव यांचे एकत्रित दर्शन घडविणारी ही कविता आहे, असे उद्गार या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये श्री गं. ना. जोगळेकर यांनी काढले आहेत. श्री जामदार यांची कविता वेगळेपणाने उठून दिसते. छंदावर त्यांचे प्रभुत्व आहे. प्रासादिकता त्यात आहे, ती वाचकांशी जणू संवाद साधते. ऐलतट व पैलतट या दोन्ही स्वाभाविक व अटळ अवस्था आहेत, या वृत्तीने प्रवाहाच्या मध्यातून दोन्ही तटांबद्दल समजूतदारपणाचा भाव प्रगट झाला आहे.कवीला गतस्मृतीही प्रिय आहेत. सामान्य माणसाचे संसार चित्रही ते रेखाटतात.

 १९९९ मध्ये त्यांचा गुलमोहर हा तिसरा कवितासंग्रह प्रकाशात आला. या संग्रहाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात--समाजातील सुखदु:खांचे अनुभव घेतच कवीची कविता सगुण साकार होते. कल्पनेने अनुभव घेऊन कविता रूप देण्यापेक्षा स्वानुभवाशी इमान  राखून त्याचे सहजसुंदर आविष्करण करणे माझ्या आत्ममग्न वृत्ती ला अधिक मानवते. त्यातून मिळणाऱ्या आनंदासाठी मी कविता लिहितो. कर्म योगिनी पत्नी ही माझ्या कवितेचे आद्य स्फूर्तिस्थान आहे. या संग्रहातील कविता वाचताना श्री जामदार यांच्या मन:प्रांगणात वयस्कतेचे वास्तव व रंगाच्या रसिकतेचे चाललेले द्वंद्व सहज लक्षात येते. 

सतत कविता सर्जन हे त्यांचे वैशिष्ट्य होते. स्नेहार्चना हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह २००१ मध्ये प्रकाशित झाला. स्नेहा व अर्चना या आपल्या मुलींच्या नावाचा हा संग्रह त्यांना समर्पित आहे. स्नेहभाव अनेक कवितेतून व्यक्त झाला असल्याने संग्रहाचे नाव सार्थक वाटते. त्यांचे व्यक्तिमत्व व काव्य यात अद्वैत वाटावं अशी एकरूपता आहे. काव्यात जुन्या-नव्या शैलीचा सुरेख संगम आढळतो. यातील कवितांची मांडणी पारंपरिक अभंग, ओवी, वृत्तबद्ध कविता, गौळण, मुक्तछंद, गज़ल आदि शैलीत केलेली आहे. प्राचीन- अर्वाचीन कवितेचा त्यांचा व्यासंग मोठा होता.

त्यांचा पाचवा स्फुट कवितासंग्रह-पंख उडाया बघती. हा पाचवा संग्रह २००३ मध्ये वाचकांपुढे आला.या संग्रहाचे नाव समर्पक आहे. कारण पंख पसरून आकाशात झेप घेण्याचा मुक्त आशावाद या संग्रहातील कवितांमध्ये आहे. परिपक्व होत चाललेल्या, बऱ्याचशा निघून गेलेल्या आणि हाती राहिलेल्या आयुष्याची प्रकर्षाने जाणीव  हा या कवितांचा विशेष आहे. गेलेल्या जीवनाचे सोनेरी क्षण आणि येणाऱ्या वार्धक्याचे संध्या रंग या दोन प्रमुख रंगांनी या कविता रंगलेल्या आहेत.

 श्री जामदारांचे स्वतंत्र कविता सर्जन तर सतत चालू होतेच. पण त्याशिवाय त्यांनी, 'आषाढस्य प्रथम दिवसे'हा मेघदूताचा समश्लोकी अनुवाद केला आहे. न्या. प्र. के. तारे यांच्या, ऑन द घाट्स् ऑफ यमुना, चे मराठी रूपांतर केले आहे. त्याच प्रमाणे श्री कृष्णालहरी- या श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या काव्याचा अनुवाद केला आहे. द गार्डनर- या श्री रवींद्रनाथ टागोर यांच्या काव्याचा ही मराठी अनुवाद केला आहे. त्या एकूण ८५ कविता आहेत. तो 'फुलारी'  नावाने प्रकाशित झाला. आयुष्याच्या प्रवासात अनुभवांचे वाण जसे बदलत गेले, तशी त्यांची कवितेची जाणही बदलत गेली. या अनुभूतीत एक तत्व आहे--सौंदर्यमग्नतेचे आणि त्यात फुलणाऱ्या प्रेम भावनेचे! 

त्यांच्या निधनानंतरही त्यांच्या अनेक अप्रकाशित कविता बघून, पारखून, " रंग मावळतीचे" या नावाने एक कविता संग्रह, त्यांच्या वहिनी, अनुराधा जामदार यांनी रसिकांसमोर आणला. अविरत सृजनाचे कवीला वरदान होते, असे वाटते.


ऐलतटावर पैलतटावर     

ऐलतटावर रमलेला मी           
दिसलो तरीही       
आता आहे थकलेला मी       
हवा विसावा आता मजला         
कुठे मिळावा पण तो येथे                       
ऐलतटावर?            
पैलतटावर             
खिळती डोळे             
जिथे दूरवर               
सरकत आहे               
क्षितिजाखाली                 
बिंब रवीचे.                 
लाल तांबडे                   
रंग जयाचा           
साकळलेला माझ्या नयनी         
मला भासवी           
तिथे विसावा मिळेल मजला         
मिळे दिलासा  असा जिवाला           
म्हणून पडती अलगद नकळत           
श्रांत पावले             
पैलतटावर             
त्याच दिशेने           
आहे जेथे               
विश्रांती स्थळ.


अरे वेड्या उनाड वाऱ्या 

अरे वेड्या उनाड वाऱ्या 
असा उन्हात भटकू नकोस 
थांब जरा झावा लागतील 
असे काही करू नकोस 

पिसाट वाऱ्या रस्त्यावरची 
झाडे अशी उपट् नकोस 
गरीब झोपडयावरची छपरे 
अशी भिरकावून देऊ नकोस 

लंपट वाऱ्या उफाडयाचा 
पदर असा उडवू नकोस 
नावाडीचा तोल जाईल 
असे काही करु नकोस 

टारगट वाऱ्या म्हातारीचे 
देवदर्शन बुडवू नकोस 
काठी टेकत चाले तिच्या 
डोळयात धूळ उडवू नकोस 

अवखळ वाऱ्या सांज झाली 
घरात धुडगुस घालू नकोस 
समयीची ज्योत विझेल 
असा वात्रट होवू नकोस 

वेड्या वाऱ्या आता शहाणा 
झाल्याशिवाय वाहू नकोस 
सुगंधाचे नजराणे तू 
आणल्याशिवाय राहू नकोस.


मावळाया आला दिन

मावळाया आला दिन, झाली सरायची वेळ
तरी चाललाच आहे, भर आनंदात खेळ

ओझे सुखाचे दु:खाचे, उतरवून टाकले
कसे मोकळे मोकळे, माझ्या जीवाला वाटले
   
व्यवहारी जीवनाचे, पाहिलेत रंग ढंग
त्यांच्यामधून घेतले, आता काढून मी अंग

निरामय आनंदाची, सांज शांतवी मनाला
छाया छंदोमयी होई, छंद येई आकाराला
   
सांजतटावर माझा, मुक्त चालला विहार
तेथे शब्द, स्पर्श, रूप, रस गंधाचा वावर
     
सांजतटावर मला, माझ्या कवितेची साथ
तिच्या निर्भर संगात,, माझा रंगतो एकांत
   
पैलतीराहून येई, भासे अकस्मात साद
मला कळतच नाही, कसा द्यावा प्रतिसाद.  


पंख उडाया बघती

मी खिळलो, पण हे पंख उडाया बघती
स्थिर राहवे ना, गतिरोधाने तगमगती
जे स्वभावज अनावरा आवरू कैसे
हे सदयहृदय! कर दया पाखरावरती 

तव नीलसघन सावळे रूप गगनात
लोचनीभरे, भरोत बळ पंखात
मग झेप घेउनी विस्तारुन ते पुरते
भेटायला आतुर मन झाले भगवंत  

हे कसे घडावे गड्या! तूच ठरवावे 
ठरविशिल ते पाखरास मान्य असावे 
तोवर ही फडफड,तडफड सहन करावी 
जो दुर्बल त्याने दुसरे काय करावे !


हृदयाच्या स्वच्छंद विहंगा          

हृदयाच्या स्वच्छंद विहंगा             
तव नयनी आकाश गवसले           

रम्य उषासमयाचा हलता             
पाळणाच वरखाली  झुलता               
दिव्य अलौकिक नक्षत्रांचे       
वा झगमगते राज्य पसरले         

सखोल या डोहात हरवली         
स्वर सुंदर मम गाणी सगळी       
उदास एकाकी आकाशी     
हृदय तरंगाया आसुसले           

नयनाच्या आकाशावरूनी            
औदास्याचे मेघ हरवुनी         
प्रकाशात त्या हृदयविहंगा                 
विस्तारू दे पंख आपुले.


गौळण        

मी संसाराला विटले ग             
त्या श्रीहरिशी मी रतले ग         

असले कुलवंताची कन्या         
धनवंताची नार धन्या             
लंपट माझ्या मनास बाई             
निलाजरेपण रुचले ग

म्हणोत जन मजला कुलनाशी         
आवडला मज तो अविनाशी       
चिन्मयरूपावरी भाळता             
माझी मी नच उरले ग         

कशास हा संसार पसारा         
वरपांगी हा मोर पिसारा          
यमुनेच्या गहिऱ्या पाण्याशी           
पोत जिवाचे जुळले ग.              


हिरवी पाने इवलेपक्षी       

हिरव्या हिरव्या पानामधुनी             
ये कानावर गाणे       
त्या गाण्याला शब्द न तरिही               
गाणे राजसवाणे        

हिरव्या हिरव्या पानामधले             
हिरवे इवले पक्षी                
खगबाळे ती आनंदे मी                 
आतुरतेने लक्षी         

हिरवी हिरवी पाने हलती             
वाऱ्यावरची डुलती           
हलता पाने इकडुन  तिकडे                
इवले पक्षी उडती           

हेमंतीकोवळ्या उनाची                 
शाल पांघरुन घ्यावी                   
बाल मनोहर ही सृष्टीची           
किमया आस्वादावी     

हिरवी पाने इवले पक्षी           
मंद सुगंधित वारा                 
अंतरात हळुवार झराव्या             
गोड सुरांच्या धारा.


द्वैती अद्वैत केवळ
        
जांभळाच्या फांदीवर             
निळा उतरला पक्षी             
इंद्रधनूच्या रंगांची               
त्याच्या पंखावर नक्षी         

मेघाआडील वीजेची             
तशी कोर कंठावर           
कंठातून स्रवणारे               
आर्त विरहाचे स्वर           

सभोवार भिरभिरे               
दृष्टी तयाची व्याकुळ             
चोच लावीना जवळ               
पक्व असून जांभूळ             

तोच ओळखीचा स्वर                 
गोड पडला श्रवणी                   
फांदीवरती मिथुन                   
दिसे दुसऱ्याच क्षणी                 

दोन चोची आस्वादती               
एक जांभळाचे फळ           
आनंदलो पाहूनिया                  
द्वैती अद्वैत केवळ.


वाट होती गद्य ती 

चाललो मी वाट होती गद्य ती 
त्याच वेळी वाट होती पद्य ती 

रुक्षता वाटेवरी आता नसे 
वाट माझी जाहलेली ह्रद्य ती 

साथ काव्याची मिळे वाटेवरी 
भावगंधे आज हो समृद्ध ती 

छंद काव्याचा असे जोपासला 
गंधवाहे वाट झाली शुद्ध ती 

चिन्ह नाही रुक्षतेचे राहिले 
चालली आनंदयात्रा मुक्त ती 

संगती तू चालशी प्राणप्रिये 
चालता लाभावयाची सद्गती.


मावळतीच्या रंगात 

मावळतीचे रंगही 
कसे अंधारुन गेले 
मंद निश्वासाचे गंध 
त्यांनी बरोबर नेले 

भीमसेनी दिव्यस्वर 
परि मना उबारती 
सर्वात्मकाला प्रसन्न 
मन ओवाळी आरती 

किशोरीच्या अभंगाचा 
मना मोठाच दिलासा 
'माझे माहेर पंढरी' 
भिवरेचा भरवसा 

डोळे मिटू मी कशाला 
आपोआप मिटतील 
मिटलेल्या डोळयापुढे 
विठू राणे दिसतील 

कवितेच्या वाटेवर आहे 
आनंदाचा गाव 
तिथे लाभायाचा आहे 
मला चिरंतन ठाव 

मावळतीच्या रंगात 
माझे गंधाळले मन 
गीत गाता क्षितिजाचे 
तुझे दिसती चरण.


तुका 

निजनिष्ठा नाम गासी 
आळवीसी विठ्ठलासी 

एक विठू तुझा देव 
तेथे देवत्वाची ठेव 

त्याचा प्रसंगी धिक्कार 
ऐसा तुझा अधिकार 

तूही संसारी विरक्त 
साधा रोखठोक भक्त  

'माझ्या लेखी देव मेला ' 
हवा जसा तसा त्याला 

खडसाविलेस तुवां 
असा निडर तू बुवा 

विठू राखी तुझा मान 
धाडी देहूला विमान 

विमानाचे काय मोठे 
खरे असेल वा खोटे 

मात्र अणूसा थोकडा 
तुका ब्रह्मांडा येवढा ।



गुलमोहर 

आज माझ्या खिडकीशी गुलमोहर आला 
जरा दूर होता तो अधिक जवळ आला 

डहाळीचा हात त्याने केला माझ्यापुढे 
एकटेपण उघड केले माझे त्याच्यापुढे 

गुलमोहराशी केला स्नेहाचा करार 
पक्षीमुखे दिला त्याने प्रेमाला रुकार 

हातात घेऊन हात आम्ही सुखावुन गेलो फार 
मनं केली मोकळी तरी बंधनांचा भार 

जमीनीवर उभा घेऊन माथ्यावर आकाश 
थोर मनाचा तो जाणे माझे मन हताश 

त्याच्या सहवासात माझे मन येई फुलून 
चार घटका आधिव्याधी जाती साऱ्या पळून 

त्याच्या माझ्यामधे एक खिडकी येते आड 
एरवी आम्ही दोघेही पण आहोत एक झाड 

झाडासारखे मीही जाणार आहे उन्मळून 
आज मात्र आम्ही दोघे आलेलो फुलून 

या वयात लागत असतो स्नेहाचा आधार 
एकटे असले म्हणजे कसे वाटते निराधार 

कोणत्याही रूपाने स्नेह यावा जवळ 
एक दिवस काळ येईल स्नेहे म्हणेल कवळ.

संकलन : मंदाकिनी गंधे 

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...