प्रतिभा धडफळे, प्रसन्ना खडीकर, भावना दामले, मनीष खरगोणकर, माधुरी खर्डेनवीस, माधवी तारे, मिलिंद खटावकर, मीना खोंड, मेघा जोशी, मंदाकिनी गंधे
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिभा धडफळे
मी पावसाला पाहिले
नवल पडत्या पावसात
मी घडताना पाहिले
पावसात पावसाला
मी भिजताना पाहिले
दरीत भिजला, नदीत भिजला
डोंगराच्या मिठीत भिजला
भिजता भिजता इथे तिथे तो
सागराच्या कुशीत शिरला
घराघराशी तरुशिखराशी
बोलताना पाहिले
पावसात पावसाला
मी हसताना पाहिले
तळ्यात बुडला,मळ्यातघुसला,
रस्त्यावर बिनधास्त पसरला
वनात शिरला, रानास भिडला
फुलात सजला,तृणातहसला
चिखला मध्ये उड्या मारुनी
खेळताना पाहिले
पावसात पावसाला
मी पळताना पाहिले
टप टप पडला धिनधिन धाधा
रिमझिम सारेगम गुणगुणतो
वेळी अवेळी कधी अवकाळी
झरझरतो कधी भुरभुरतो
पानोपानी ढोल वाजवून
नाचताना पाहिले
पावसात पावसाला
मी गाताना पाहिले
कधी कडकडतो कधी गडगडतो
कुरकुरतो कधी गुरगुरतो
करतो तांडव कधी, मुसळधार
होऊन कोसळतो
धरणीचा संसार साजरा
मोडताना पाहिले
पावसात पावसाला
मी रडताना पाहिले
भल्या पहाटे
ही रात पावसाळी थेंबात न्हात होती
विसरून या जगाला मल्हार गात होती।
आकाश भाळले हे रजनीस पाहुनीया
होणार काय आता चर्चा वनात होती।
घालून शीळ तेव्हा आला पिसाट वारा
टक्कर घनात होती धडधड उरात होती।
धावून मेघ आले चमकून वीज गेली
ही घाबरून गगना बिलगून जात होती।
घेता मिठीत तिजला आकाश हर्षले हे
लेवून स्पर्श रेशिम लपली धुक्यात होती।
आकाश शांत झाले झोपून रात गेली
गेले घडून काही कुजबुज ढगात होती।
दुसऱ्या दिनी नभी या लेवून रंग केशर
आली भल्या पहाटे अद्भुत प्रभात होती।
नको जगाया
नको जगाया आता कोंदण
जुन्या रुढिंचे पायी पैंजण
कुठे ?कशाला ?केव्हा? अन् कां?
नकोच या प्रश्नांचे दडपण
नकोस वागू प्रेमाने, पण
असो जरा रागाला कुंपण
हसून रोजच जगतो आपण
कधी तरी कर ना रे भांडण
पुन्हा नव्याने बहरायाला
नवा जन्म मजला दे आंदण
पुरे अता हे उठता बसता
सदैव संस्काराचे गोंदण.
घडणे माझे
जगण्यासाठी मरणे माझे
मरण्यासाठी जगणे माझे।
भाषण चर्चा चळवळ नाही
हक्कासाठी लढणे माझे।
जिकडे तिकडे दुनियादारी
क्षण क्षण रंग बदलणे माझे।
पायाचा मी पहिला पत्थर
शिखरावर ही सजणे माझे।
स्वार्थाचा ना हेवा दावा
कर्पूरासम जगणे माझे।
अवघड आहे अशक्य नाही
मोडत असता घडणे माझे।
---------------------- प्रतिभा धडफळे
प्रसन्ना खडीकर
हळव्या तिन्हीसांजेला
हळव्या तिन्हीसांजेला
वाटे उदास मजला
येणार ना साजणा
खळ नाही डोळ्याला
वाटे उदास मजला
येणार ना साजणा
खळ नाही डोळ्याला
तुझ्या वाचून आज
काही गमेना मनाला
हा एक क्षण असा
वाटे युग युग मजला
काही गमेना मनाला
हा एक क्षण असा
वाटे युग युग मजला
का कष्टविसी असा
जीव मुठीत धरला
तुज अर्पण्यासाठी
बघ कासावीस झाला.
जीव मुठीत धरला
तुज अर्पण्यासाठी
बघ कासावीस झाला.
अंतरीच्या कळा
नभी आसवांचे तळे दाटलेले
मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले
मुक्यानेच डोळ्यात पाणावलेले
निघालाच त्या आठवांचा फुलोरा
कधी साठताना मनी टोचलेले
.
असे मीलनाने खुशीच्या महाली
तरी अंतरीच्या कळा सोसलेले
,,
सुखाची करू कामना मी कितीही
नशीबात दुःख असे साचलेले
न चिंता मनी ना जिवाची खुशाली
तुला आज मी प्राण हे वाहलेले.
गुलमोहोर
लाल टपोऱ्या त्या फुलांचा
रंग चटकदार ऐसा शोभतो
वाळक्या त्या जंगलामधे
गुलमोहोर ऐटीत मिरवतो
रंग चटकदार ऐसा शोभतो
वाळक्या त्या जंगलामधे
गुलमोहोर ऐटीत मिरवतो
बहर आला असा फुलांना
लाल दहकत्या रंगाला
वैशाखात ही दिमाखाने
सजत डोलत उभा राहिला
बहरला गुलमोहोर तरी
प्रिया माझी का येईना
वैशाख वणावा अंतरीचा
उरातुनी त्याचा दाह जाईना.
---------------------प्रसन्ना खडीकर
भावना दामले
पहिला पाऊस
मेघ दाटतात जेव्हा अंबरात
उर्मि उठतात धरेच्या मनात
पहिला पाऊस वेड लावतो
मृदगंध मनात भरतो
पहिला पाऊस आठवणींचा
सर्वांनाच हवा हवासा
पहिला पाऊस अवनीचा प्रियकर
हजारो बाहूंनी आलिंगनास तत्पर
पहिला पाऊस जीवनदान देणारा
सर्व लोकांना आपलंसं करणारा
अशा पावसात भिजायलाआवडतं
मखमली शाल पांघरली वाटतं.
रे मना
तुझ्याशी बोलणे राहून गेले
सुखाचाच सदा ध्यास धरला मी
दुःखात ना कधी हितगुज केले
सुख दुःखाच्या या व्यापात
तुझ्याशी बोलणे राहून गेले
रंगीबेरंगी दुनिया पाहिली मी
जगी सर्वत्र भटकलो मी
तरी तुझी आठवण झाली नाही
कधी तुला भेटणे जमलेच नाही
तुझ्याशी बोलणे राहून गेले
माया प्रपंचात सदैव गुंतलो मी
संसार सुखात आकण्ठ बुडालो मी
सुख दुःखाच्या पलिकडल्या
मनाला भेटणे जमलेच नाही
तुझ्याशी बोलणे राहुन गेले
सतत बोललो दुसऱ्यांशी
विचार केला तो इतरांचा
आयुष्याच्या या धकाधकीत
तुझा विचार करणे जमलेच नाही
तुझ्याशी बोलणे राहून गेले
नेहमी माझ्या जवळ
असणाऱ्या माझ्या मना
सारासार विवेक असणार्या मना
तुला भेटणे जमलेच नाही
तुझ्याशी बोलणे राहून गेले.
कणिका
1. ओंजळ
जीवनाच्या ओंजळीतून
सुखाचे क्षण झिरपत असतात
तेव्हा कळत नसते
जेव्हा समजते, तेव्हा
रिक्त ओंजळच
फक्त उरते.
2. आठवण
तुझ्या आठवणींची पाखरे
माझ्या मनाच्या घरट्यात
अजूनही येत असतात
जसा वाट चुकलेला वाटसरू
यावा आश्रयासाठी.
3. पक्षी
अतीताच्या सुन्दर दिवसाचे
पक्षी उडून जातात
आयुष्याचे घरटे तसेच राहाते
पोकळ उदास लोंबकळणारे
मनाची श्रांत चिमणी
आठवणींचा चारा
चिवडत राहाते.
मनीष खरगोणकर
मंदीचा फायदा
आर्थिक मंदीवर मी तावातावाने बोलत होतो
झालेले नुकसान क्रमाक्रमाने तोलत होतो
बँका उद्योगधंदे सारे बंद आहेत पडले
मंदीमुळे प्रगतीचे चक्र पहा अडले
मंदीमुळे प्रगतीचे चक्र पहा अडले
नोकरदार लोकांनाही आता खूूप त्रास होणार
नोकरी जाईल किंवा त्यांचा कमी होइल पगार
नोकरी जाईल किंवा त्यांचा कमी होइल पगार
जगाची अर्थव्यवस्था शेवटी जाणार तरी कुठे
झालेले नुकसान भरून काढावे तरी कसे
झालेले नुकसान भरून काढावे तरी कसे
माझ्यासोबत सारे लोकं होते चिंताक्रांत
एक म्हातारे जोडपे मात्र उभे होते शांत
एक म्हातारे जोडपे मात्र उभे होते शांत
चेहऱ्यांवर स्मित आणि डोळ्यात त्यांच्या अश्रू
म्हटलं सगळंकाही ठीक होइल नका तुम्ही रडू
म्हटलं सगळंकाही ठीक होइल नका तुम्ही रडू
अहो सरकार असताना तुम्हाला कसलं टेन्शन
मंदीच्या काळातही मिळेल बरं पेन्शन
मंदीच्या काळातही मिळेल बरं पेन्शन
पाणावलेले डोळे घेऊन ते पुन्हा एकदा हसले
बेटा तुला खरी गंमत सांगतो ऐक म्हणले
बेटा तुला खरी गंमत सांगतो ऐक म्हणले
या मंदीचा आम्हाला फायदा सरळ झाला
परदेशातला मुलगा आता आमच्या जवळ आला
परदेशातला मुलगा आता आमच्या जवळ आला
अरे मुलाबाळांना दूर नेते अशी तेजी काय कामाची
म्हातारपणी आधार देते ती मंदी मात्र गुणाची.
म्हातारपणी आधार देते ती मंदी मात्र गुणाची.
मेघ कलाकार
नभ एक रंगमंच तिथे मेघ कलाकारवेगवेगळ्या भूमिका रोज करतो साकार
कधी एकपात्री कधी विविध प्रकार
मनातले हे विचार वर घेतात आकार
मनातले हे विचार वर घेतात आकार
वेषभूषा सप्तरंगी तिचा सुंदर वापर
तिला विजेची शिवण आणि पक्षांची झालर
तिला विजेची शिवण आणि पक्षांची झालर
त्याची प्रकाशयोजना सूर्यचंद्र सांभाळती
काळ्या पडद्याची शोभा तारकाही झळाळती
काळ्या पडद्याची शोभा तारकाही झळाळती
रंगमंच हा फिरता खेळ चाले अविरत
नको असती वाहवा नाही टाळ्यांची गरज
नको असती वाहवा नाही टाळ्यांची गरज
पूर्वनियोजित खेळ फक्त तेवढा होणार
वठवुन ही भूमिका क्षितिजाआड जाणार.
वठवुन ही भूमिका क्षितिजाआड जाणार.
---------------------------मनीष खरगोणकर
माधुरी खर्डेनवीस
पारिजात
पहाटे पहाटे मम दाराशी
सुगंधी गालिचा पसरला
लेवूनी अंगी फुले नाजूक
अंगणी पारिजात बहरला।
शुभ्र फुलांचे देठ केशरी
लाविले जणू गंध श्रीहरी
मंद हा सुगंध दरवळला।
अंगणी पारिजात बहरला।
पहाट माझी प्रसन्न झाली
कल्पवृक्ष हा माझ्या दारी
आज स्वर्गातून अवतरला
अंगणी पारिजात बहरला।
फुले वेचिता कळुनी आले
अल्प जीवन घेऊनि आले
आनंदे वाहू दे श्रीरंगला
अंगणी पारिजात बहरला।
तूच रे सखा
तुझ्या परी रे तूच सखा
कृष्णा तू माझा होशील का
फिरुनी होईल मी राधा
कान्हा तू परतून येशील का
सूर छेडिता भान हरपते
प्राणप्रिया मी तीच बासरी
निष्प्राण झाले आज पुन्हा
अधरातुनी श्वास देशील का
रास खेळला पुनवेच तो
का न आठवे आज तुला
मी तीच गोपिका गोकुळची
तू तोच कन्हैया होशील का
येता जाता माठ फोडूनी
ज्या रस्त्यावर मला भिजविले
तृषित उभी मी त्या वळणावर
मन माझे पुन्हा भिजवशील का
मीच राधा मीच मीरा
गोपी ही मीच तुझी मोहना
वृंदेचे भाग्य देऊनी मजला
तू शाळीग्राम तरी होशील का
धबधबा
दगडाचे काळीज फोडून पहा प्रगटला एक झरा
झरझर झरझर धावुनीआल्या दुग्ध धवल धारा।
शुभ्र स्फटिक तुषारबिंदू हिरकण्या जणू उधळल्या
कलकल-कलकल नाद करोनि पर्वत धरी ताला।
सप्तरंगी त्या इंद्रधनूचे तोरण सजले निळ्या नभा
झुळझुळ झुळझुळ झुळूक शितल आला मंद वारा।
रंगी बेरंगी रान फुले उधळीत उभे हे तरुवरा
भुरुभुरु भुरुभुरु दव बिंदू शिंपिती जणू अत्तरा।
हिरवे शालू -पिवळी चोळी लेवून नटली माय धरा
घनघन घनघन घन वाजवी पर्जन्याचा चौघडा।
----------------------- माधुरी खर्डेनवीस
माधवी तारे
मनोगत
उपवनातील दोन पुतळे
येता-जाता बघती सगळे
कधी माळ किंवा फुले वाहिले
दिसती चरण द्वयी।
एक पुतळा राष्ट्रपित्याचा
स्वराज्य स्वप्नी सुराज्याचा
लढा अविरत अहिंसेचा
देऊनी अमर जगी।
दैवत तुझा दलित जनांचे
अंगुली निर्देश करूनी सांगे
समजुनी आपुल्या सामर्थ्याचे
जातीयतेचे बंधन तोडी।
उद्यानी कधी सभा भरावी
निजपक्षा दृढ़ता यावी
सज्जित मंची वकृत्वाची
वीणा झंकारती।
विचार सागरी जनता लोटूनी
दला-दलातूनी वाद माजवूनी
दहशतवादाहूनी भयंकर
क्रूरता दंगातूनी।
एक रात्रि पण अद्भुत घडले
पुतळे दोन्ही समीप आले
हृदगत आपुले सांगू लागले
परस्परा भेटूनी।
बोले एक मनोवेदना
प्रिय देशाची ऐसी विटंबना
मजशी आता जरा बघवेना
स्वार्थापोटी संविधाना
बदलती परस्परी।
देशहिताची जरा न खंती
आत्मघात ही प्रबळ प्रवृत्ति
दुराचारही ध्येय मानिती
कृषिवल आणि लोकही।
नेते सोडूनी अभिनेतांच्या
राजकारणी दिसतो भरणा
नाटक नाही नसे सिनेमा
देश उभारणं तुम्हीच जाणा।
पुन्हा आणूनी शब्दा ओठी
भली म्हणे ही तुमची काठी
आज ही तुमचे नाव चालवी
गांधी कुर्ता गांधी टोपी
गांधीगिरी ची अपूर्व कीर्ति।
क्रोधे किंचित स्मित करोनी
पुतळा दूसरा म्हणे त्रासूनी
काठी न माझा माझ्या कामी
बघा पक्षीविटाच्या शिरी खुणां।
तुमची टोपी हे शिरस्त्राण
चश्मा नेत्री चिलखत कोट
आल्या गेल्या फटकू न देई
तुमचे सुस्थिर बोटं।
देशहिताची आग घेऊनी
जळत राहिलो मी जीवनी
मनमनाला शांतविती मनी
हे जन पाइप पाण्यातूनी।
दोन ऑक्टोबर नी चौदा एप्रिल
आठव आपुला असे दिवसभर
क्षणात श्रद्धा, क्षणात हारं
विटंबण्या हो क्षणी हो तत्पर।
नको ती श्रद्धा नको ती सुमने
नको ते पुतळ्यामधले जगणे
कार्या आमुच्या जाणून घेणे
अंतरंग द्या चिरस्थानी।
शिदोरी
पुत्र माझा आज
जातो जरी फार दूरी
काय देऊ त्याला
बांधुनिया शिदोरी
उत्कर्षाच्या मार्गावरती
स्वकतृत्वाने जातोशी
आत्मविश्वासे हर घडी
उचलावे पाउल पदोपदी
कृत्रिम प्रेमाच्या त्या दुनियेत
प्रलोभनाच्या अपार राशि
आत्मीयतेच्या अभावाने
ग्रासून कधी तू न जाशी
तीर्थरुपांची चिरछाया
आहे तुजशी रक्षणाया
केली सेवा न जाई वाया
सत्यजगाशी दावण्या
स्वधर्म आणि स्वराष्ट्राभिमान
या धाग्याने विणलेल्या अंबरी
आशीर्वचनाची ही अमोल शिदोरी
देते बांधूनी वरती संस्काराची दृढ दोरी
वृद्धापकाळ
जीवनाचा वृद्धापकाळ
जाता जाइना घटिका पळं
भजन पूजनात ही दीर्घ वेळ
रमता रमेना हे चंचल मन
कुणाच्या तरी संगती ने
येती हाती बावन पाने
स्वस्त सुंदर सुलभते ने
रमवी मना हा रंगीत खेळ
पण विसरू नका हो
यात ही लपले
सत्य सुंदर जीवनामधले
कालचक्रे नी ऋतुचक्रे भरले
जीवनी अक्षय नाते आपुले
पाहुन संख्या ही पत्यांची
प्रतीक बावन आठवड्यांची
एकावर्षी येती नी जाती
मोजूनी खात्री होई मनाची.
इक्यापासूनी राजा पावे
बेरीज एक्कावन ही होवे
चारी इक्के काढून गुणावे
ब्रह्म न्यून एक दिन वर्षाचे
चारही इक्के ठेवूनी अलग
उरते संख्या तीन शे साठ
एक बिंदुच्या परिधिमधले
अंशही असती तीन शे साठ
राशि सहित ग्रह नक्षत्र मंडल
सामावले यात ब्रह्मांड सकल
प्रकाशमयी उत्तरायण लाल
दक्षिणायनी कृष्णवर्ण जाल
लाल बादाम, हृदभावा दावी
चौकट चाकोरी जीवना पाही
किलबिल तरुपक्षी किल्वर सुचवी
इस्पिक दंडा संयम जागवा
प्रकृति संगे हे मनोरंजन
जुळवित जाते हृदयस्पंदन
मनामनाचे धागे जुळवुनी
गुंफित जाते हे स्नेह बंधन
------------------- माधवी तारे
मिलिंद खटावकर
धुन्द वारा
हे धुन्द वारे आले ग परतहे पावसाचे थेम्ब आले ग परतहे मातीचे ते हासणे आले ग परतहे मनाचे पाखरु तळमळले परतहे डोळे चिम्ब झाले ग परतहे ह्रदय आठवणीत भिजले परत
वाट
मी तुझी वाट बघत होतोतू आली नाहीसमला तुझा वेळ हवा होतातुझ्या कडे नव्हता मला तुझा संग हवा होतातू दिला नाहीसमी फक्त तुझाच होतोतुला कळले नाही तू फक्त तुझा विचार केलामला जमले नाहीसतुझा हाथ धरून जगणार होतोतू हात दिला नाहीसागरातटी वाट बघत होतोतू आली नाहीस.
------------मिलिंद खटावकर
धुन्द वारा
हे धुन्द वारे आले ग परत
हे पावसाचे थेम्ब आले ग परत
हे मातीचे ते हासणे आले ग परत
हे मनाचे पाखरु तळमळले परत
हे डोळे चिम्ब झाले ग परत
हे ह्रदय आठवणीत भिजले परत
वाट
मी तुझी वाट बघत होतो
तू आली नाहीस
मला तुझा वेळ हवा होता
तुझ्या कडे नव्हता
मला तुझा संग हवा होता
तू दिला नाहीस
मी फक्त तुझाच होतो
तुला कळले नाही
तू फक्त तुझा विचार केला
मला जमले नाहीस
तुझा हाथ धरून जगणार होतो
तू हात दिला नाही
सागरातटी वाट बघत होतो
तू आली नाहीस.
------------मिलिंद खटावकर
मीना खोंड
अंधार
काळोख मिट्ट अंधारात
बघणार तरी कोण
सहज उलगडता येतात
जखमांवरील व्रण...
अंधाराच्या आधारात
नाही छायेची भिती
अंधाराने ऐकाव्या
दुःखाच्या कहाण्या किती ?
अश्रूंनी ओघळावे
अंधारात मात्र
अंधाराचे आयुष्य किती
फक्त एक रात्र..!
मनातला कातर अंधार
जीवनाला जाळणार
अमिट अंधाराला या
कोण गिळणार ?
आस एक मनाला
अनंत अंधाराची
प्रतिक्षा देहाला
कबरीतल्या काळोखाची..!
बरसात
चांदण्याच्या शब्दधारात चिंबसी चिंबून ये
चंदनाचा अर्थ गर्भित एकदा चुंबून घे
अंतरीच्या अंतराची जाण तू जाणून घे
आर्तता अनंताची एकदा स्पर्शून घे...
हृदयाच्या अंतराळी आकाशाला कवेत घे
धुंद मंद झिंगणारा वारा बेभान पिऊन घे
अंगअंगी एकदा संध्यारेखा रेखून घे
काळोखात खुशाल मज अलगद तूं सोडून दे....
प्रेम आणि प्रीती माझ्याच राशी गे
प्रीतीची चाहूल एकदा तूं जाणून घे
नजरेने एकदा प्रीती तूं उधळून दे
जीवनाचे मूल्य माझ्या एकदा चुकवून दे...
----------------------------------मीना खोंड
मेघा जोशी
शिंपले
आयुष्याची वाट चालले
दिसले आठवणींचे शिंपले
होते मोत्यांनी ते भरलेले
पाहतांच भान हरपले
बालसुलभ मोती मनांस भावले
आई - बाबांच्या कुशीत वाढले
लडिवाळपणानी कौतुकही झाले
बालपण कसे भर्रकन संपले
तारुण्य मोती सौंदर्याने नटलेले
यौवन ही त्यातून डोकावले
अर्थार्जनात पार गुंतलेले
होते प्रेमरंगानी ओथंबलेले
प्रौढ मोती दिसले सुखावलेले
जवाबदार्यांचे ओझे पेललेले
धीर गंभीरतेनी वाट चाललेले
कांहीं गमाविले कांहीं गाठीलेले
विसाव्याच्या क्षणी गहिवरले
तत्क्षणी अंतर्मनात शोधिले
दिसले शांत मोत्यांचे शिंपले
जणु भगवंताचे दर्शन घडले
वेदना
कोण जाणती वेदना
जन्म बाळाला देण्यास
किती सोसत असते
सुख आईचे घेण्यास
कोण जाणती वेदना
आई वडील सोसती
जन्म कन्येचा झाल्यास
आप्त इष्टच बोलती
कोण जाणती वेदना
मातृ हृदयी उठती
दान कन्येचे करतां
नेत्र सजल असती
कोण जाणती वेदना
हास्य वदनी आईच्या
सुखी ठेवण्या सर्वांना
इच्छा मोडते मनाच्या
अष्टाक्षरी-- मन
बालपणी मन असे
निरागस निरागस
कधी रडे, कधी हसे
व्याप नसती मनांस
तारुण्यात मन असे
आनंदित आनंदित
प्रेम सरींचा वर्षाव
करी मनाला मुदित
प्रौढ़ अवस्थेचे मन
धैर्यवान धैर्यवान
पेलतसे सारा भार
जणु अससी जवान
वृद्धकाळी मन असे
स्थैर्यवान स्थैर्यवान
देई साऱ्या शिकवणी
होई जरी अपमान
आई मन सदा असे
अनुपम अनुपम
धीर गंभीर, प्रेमळ
छटा असे महत्तम
------------------------ मेघा जोशी
मंदाकिनी गंधे
एक दुपार
उन्हाचे कवडसे
जेह्वा जागा बदलतात
आपल्या सावल्या
येतात आपल्या पायाखाली
मनातल्या आठवणींचे थर
हळूच होतात वरखाली
चोरपावलांनी मनात शिरलेला
एकाकीपणा
साथ देत राहतो
झंकारत राहणाऱ्या
तानपुऱ्यासारखा
बहरलेल्या,लाल-हिरव्या
गुलमोहराच्या निश्चल पहाऱ्यात
आठवणींच्या या उलघालीत
एक टवटवीत आठवण
बालपणातल्या सखीची
टपोऱ्या कळीसारखी
हळूच उमलू लागते
सुगंधित करते
मनाचा गाभारा
उमलून येतात
साऱ्या पाकळ्या
स्मरणकळी हसते
आणि सुस्तपणे पसरलेली
एक आळशी दुपार
लख्खकन उजळून निघते.
जरा जरासे
टपोरलेली कळी
उमलली जराशी
अत्तराची कुपी
लवंडली जराशी
ओथंबलेले ढग
बरसले जरासे
भरलेले डोळे
पाझरले जरासे
सायीसारखा मऊ
मखमली स्पर्श
अंगावरून मोरपीस
फिरले जरासे
काजळ काळे नेत्र
प्रतीक्षेत मिटले
तुझ्या चाहुलीने
उघडले जरासे
तुझे जवळ असणे
जरासे जरासे
नाही वाटत मनाला
पुरेसे पुरेसे.
सांज
होतात किरण कोवळे
होई मन हळवे हळवे
बेचैनी भरुनी येते
ही सांज मनी हुरहुरते
चंद्राची अंधुक कोर
लुकलुकते तारे दूर
आकाश गहन भासे
ही सांज मनी हुरहुरते
संपल्या दिसाची जात
काही हरपल्याचे भान
क्षणकाल अस्वस्थता येते
ही सांज मनी हुरहुरते
पाखरे परतती घरटी
चिमुकल्या चोची चिवचिवती
दिवलीची ज्योत थरथरते
ही सांज मनी हुरहुरते.
तू
तू येतोस तेह्वा
भरतीचा समुद्र
उसळतो मनात
निराशेची वाळू
व्यापून जातो क्षणात
तू येतोस तेह्वा
शरदाचं चांदणं
पसरतं तनूवर
उन्हावलेलं मन
शीतळतं खोलवर
तू येतोस तेह्वा
विश्वासाचा शब्द
निनादतो मनात
आश्वासनांचा स्पर्श
थरारतो देहात
नसताना तू
नसतेच कशात
क्षणांचं सरकणं
बदलतं तासात
अहल्येची प्रतीक्षा
उतरते डोळ्यात.
एक पहाट
दवभिजली पहाट
चिंब तृणपाती
पानापानावर
रांगोळीचे मोती
हलकेच आलेले
किरणांचे कवडसे
सोनेरी करतात
पानांचे झुबके
पक्ष्यांच्या पंखांनी
घरंगळतात मोती
क्षणात विस्कटते
चमकती रांगोळी
चिमुकली पाखरे
चोचीत झेलतात
थेंबातून गळलेला
दवातला गोडवा
उन्हाचं वाढतं वय
दव जातं उडून
पहाट होईस्तवर
कुठे बसतं दडून.
----------------मंदाकिनी गंधे
वाह,खूप छान छान कवितांनी बहरलेलं ब्लॉग संग्रहणी आहे.मंदा ताईंच्या कविता तर अप्रतिम आहेतच व त्या सर्व माझ्या संग्रही आहेत.इतर ही कविता पण खूप सुंदर.मिलिंद,मनीष,मीना खोंड सर्वे खूप छान लिहितात.अभिनंदन
ReplyDeleteसर्व कविता आवर्जून वाचल्या आणि मनापासून अभिप्राय दिला त्यासाठी धन्यवाद.
Deleteमायमावशीचा ब्लॉग आवडला आणि सगळ्या कविताही..सर्वांचे मनापासून अभिनंदन.
Deleteअभिप्रायासाठी धन्यवाद
Deleteसर्व कविता खूप छान आहेत
ReplyDeleteआपला उपक्रम स्तुत्य आहे
अभिप्रायासाठी धन्यवाद
Deleteसर्वच कविता खूपच सुंदर.
ReplyDeleteअभिप्रायासाठी धन्यवाद
Delete