Friday, July 17, 2020

''मायमावशी''

''मायमावशी'' महाराष्ट्राबाहेरील मराठी भाषिक साहित्यिकांचा समूह आहे. समूहाची संकल्पना आणि स्थापना मध्यप्रदेश ह्या हिन्दी भाषिक प्रदेशात झाली असल्याने येथील बहुसंख्य साहित्यिकांचा दोन्हीं भाषेत उत्तम वावर असतो. ह्याचाच विचार करून ह्या समूहात अशा साहित्यिकांना सामील करण्यात आले आहे जे मराठीत लिहितात, हिन्दीत लिहितात किंवा मराठी/हिन्दी दोन्हीत लिहितात. हा समूह स्थापन करण्यामागे मूळ उद्देश हा आहे की मराठी भाषिक साहित्यिकांना एका ठिकाणी आणायचे आणि मराठी भाषेचे संवर्धन करायचे. त्या दृष्टीने कामाला सुरूवात करत असताना हे लक्षात आले की फक्त मराठीत लिहिणाऱ्या साहित्यिकांना जोडले तर तरुण वर्ग समूहापासून लांब जाईल, कारण बहुसंख्य तरुण आता हिंदीत लिहितात/वाचतात. त्यांना आपल्या भाषेची माहिती असावी आणि ओढ लागावी म्हणून थोडेसे संशोधन करून समूहात मराठी/हिन्दी दोन्हीं भाषा ग्राह्य केल्या. मराठी माय आणि हिन्दी मावशी म्हणून समूहाला ''मायमावशी'' हे नाव दिले आणि गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०१५ रोजी ह्या व्हाट्सएप्प समूहाची स्थापना झाली. तरूण लेखकांना जोडण्याचा फायदा अवघ्या २/३ वर्षातच दिसून आला आणि अनेक तरुणांचं मराठी सुधारलं, इतकंच नाही तर काही जण मराठीत लिहायला लागले.

समूह स्थापन केल्यानंतर त्यात नव नवीन कल्पना घेऊन अनेक उपक्रम राबविले गेले. ते उपक्रम आणि साहित्यिकांचे लिखाण एका ठिकाणी असावे ह्या दृष्टीने हा ब्लॉग सुरु केला आहे.

नोव्हेंबर २०१५ ते ऑक्टोबर २०१८ समूहात वेगवेगळ्या अवधीसाठी निरनिराळे उपक्रम राबविले गेले.कविता,लघुकथा,गझल ह्या नेहमीच्या साहित्यिक प्रकारांसोबत अनवट संपदा, अनुवाद,अवांतर,गवाक्ष,चर्चा,यायावरी, शब्दनाद,साद,स्वानुवाद, सोनेरी पान वगैरे अनेक उपक्रम समूह सदस्यांच्या सक्रिय सहकार्याने व सहभागितेने अत्यन्त यशस्वीरित्या पार पडले. ह्या उपक्रमांची जवाबदारी समूह संस्थापक अलकनंदा साने सोबत सुषमा अवधूत,अर्चना शेवडे,स्वरांगी साने,वैजयंती दाते,सुषमा ठाकूर, रेखा मिरजकर,वसुधा गाडगीळ, अभय आरोंदेकर यांनी समर्थपणे पेलली.

ऑक्टोबर २०१८ ते डिसेंबर २०१८ ह्या काळात क्षणिक विश्रांती घेण्यासाठी समूहाचे सर्व कार्यक्रम थांबविण्यात आले आणि १ जानेवारी २०१९ पासून समूहाला एक वेगळे स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू झाली. नवीन आखणीप्रमाणे समूह चालविणे ही सदस्यांची सामाईक जवाबदारी आहे, ह्या जाणीवेसोबत ''एक व्यक्ती दहा उपक्रम'' अशी मालिका सुरू केली. ही एक अभिनव कल्पना आहे. दर महिन्यात दहा दहा दिवस दोन सदस्यांनी समूहाची जवाबदारी सांभाळायची आणि स्वतःचे किंवा इतरांचे साहित्य सादर करायचे अशी त्या मागील भूमिका आहे. प्रत्येक दहा दिवसांनंतर पाच दिवस मुक्त दिवस असतात. मुक्त दिवसात सदस्यांनी साहित्यिक भान ठेवून आपली इतर काही कामगिरी, सन्मान, पारितोषिक वगैरेची सूचना, काही दुसरे साहित्य, चर्चा इत्यादी करायच्या असे स्वरूप आहे. ह्या नवीन कल्पनेला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि सर्व सदस्य त्यासाठी अत्यंत जोषाने आपली सहभागिता नोंदवत आहे.
समूहाच्या  साहित्यिकांचे  साहित्य एका ठिकाणी संग्रहित असावे, ह्या दृष्टीने हा ब्लॉग सुरू केला असून काही निवडक कृती इथे प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात वेळोवेळी संशोधनही अभिप्रेत आहे. समूहात नसलेले पण  महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या ज्या साहित्यिकांचे साहित्य उपलब्ध झाले तेही इथे संग्रहित करण्याचा प्रयत्न केला आहे. 

No comments:

Post a Comment

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...