रोहिणी खरे
(२९ जुलै १९२७-१४ डिसेंबर २०२०)
रोहिणी खरे ह्या अख्ख्या इंदौरात खरेताई म्हणून ओळखल्या जात असत. त्या सव्वा वर्षाच्या असताना त्यांची आईची सावली हरवली , पण आजीकडून मात्र त्यांना आईचं प्रेम आणि शिकवण मिळाली . वडिलांकडून धार्मिक व गृहकृत्याचे संस्कारही मिळाले . लहानपणी पारंपरिक शालेय शिक्षण घेता आलं नाही, परंतु शिक्षणाची अतिशय ओढ असल्यामुळे स्वतःच्या मोठ्या मुलाबरोबर त्यांनी मॅट्रिकची व इंटरची परीक्षा दिली. पुढे हिन्दीत 'साहित्यरत्न' ही उपाधी देखील मिळवली.काबाडकष्ट करताना ताईंना तीन गोष्टींची साथ होती . एक संगीत , दुसरं वाचन आणि तिसरी कविता . संगीत ऐकत परिश्रम केले . वाचनामुळे जाण जागती राहिली व कवितांमुळे मनातली अस्वस्थता बाहेर येऊ शकली . शिवाय निर्मितीचा आनंदही मिळाला .सामान्यत : परिस्थितीचे भरपूर तडाखे खाणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव एकांतिक होतो आणि त्याच्या व्यवहारात कटुता येते , पण पीएचडी करणाऱ्या मुलाचा मृत्यू व स्वत : च्या मात्र ४९ व्या वर्षी यजमानांच्या मृत्युनंतरही रोहिणीताईचे तसे कधीच झाले नाही . आपली अंगभूत सभ्यता , विवेक आणि विनय त्यांनी कधीच सोडला नाही . ताईंची सामाजिक बांधीलकीची जाणीव पण तीव्र होती . त्या कृष्णपुरा महिला मंडळ,इंदूरच्या सक्रिय सभासद होत्या . ६० आणि ७० च्या दशकात समाजाकडून होम नर्सिग व प्राथमिक चिकित्सेचे अभ्यासवर्ग घेऊन त्यांच्या परीक्षाही घेतल्या गेल्या . संततीनियमनाच्या प्रचाराच्या बरोबरच त्याची साधनेही वितरीत केली जायची . शाळेतील मुलांकरता ' ना लाभ ना हानी ' या तत्त्वावर मधल्या सुटीत सकस नाश्ता पुरवणे इत्यादी कामंही त्या करायच्या . इंदूर जनरल लायब्ररीत पण त्या सक्रिय होत्या . रोहिणीताईंचे तीन कवितासंग्रह ' प्रतिबिबें ' ' मातृवंदना ' व 'ताईच्या कविता' प्रसिद्ध झाले आहेत . विशेष म्हणजे मातृवंदना हा काव्य संग्रह ताईंच्या पंचाहत्तरीच्या प्रसंगी त्यांच्या मुला नातवंडांनी प्रसिद्ध केला.
‘’ताईच्या कविता’’ या रोहिणीताई खरे यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत अनिल अवचट म्हणतात की खरे कुटुंब भेटण्यापूर्वी इंदूर हे माझ्या दृष्टीने फक्त नकाशावरचं गाव होतं त्यांच्या घरी गेल्यानंतर ते घर पाहताना मला राहून राहून आश्चर्य वाटते. अजूनही मधे काही काळ लोटल्यावरही ते तसंच आहे. इतकं सुरळीत कसं चालतं ते ? कुठेच खड्डे नाहीत, हिसके नाहीत. न बोलता एकमेकांसाठी करणारे लोक आणि हे वर्षानुवर्षे कसं टिकू शकतं ? ताईची मुलं, सुना एवढेच नाही तर नातवंडही या अबोल, सज्जन यात्रेत सामील ? तरुण पिढी दुरावताना आपण जागोजागी पाहतो. इथे तेही नाही. आता शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या निमित्ताने त्यातले बरेचसे पांगले आहेत पण एकत्र जमतात तेव्हा ? तसाच एक जीवपणा. चेहऱ्यावर तशीच सौहार्द्राची छटा. या संग्रहात ताईनं वेळोवेळी लिहिलेल्या कविता एकत्र केल्यात. त्यात जगण्यातून आलेलं शहाणपण आहे. कधी तुकारामाची आठवण व्हावी तर कधी बहिणाबाई चौधरींची. ज्याच्याकडे आड नसेल त्यांनी रोप लावू नये या अर्थाचं कोणाच वचन वाचलं होतं पण इथे ताई म्हणते ‘ज्यांच्या अंगणी नसे आड, त्यांनीसुद्धा घ्यावे वेड, बांधावे त्या नवे आड, मिळूनिच.’ एका कवितेत ती लिहिते ‘भावनांच्या ओवीमुळे, भरे घराचा गाभारा, स्नेह सदैव सुखवे, परिसरा’ यातला गाभारा शब्द फार मोहवून गेला. मनाला गाभाऱ्याची उपमा दिलेली ऐकली पण साऱ्या घरालाच ? गाभारा कसा शांत असतो. तिथं डोळे दिपवणारा प्रकाश नसतो. जे म्हणाल त्याला प्रतिध्वनीचा प्रतिसाद असतो तसं काही ताईला म्हणायचंय ? धन्य आहे तिची.
तुल्य कोण
**********
वसुधेच्या औदार्याला
अवकाशाच्या विशालतेला
जलराशीच्या अथांगतेला
मोजे कोण
बिजाचिया वृक्षत्वाला
वृक्षाचिया दातृत्वाला
वाहणाऱ्या वाऱ्यालाही
असे कोण
स्वयंप्रकाशी सूर्याला
उष्णता देत्या अग्नीला
निरंतर ऊर्जा देण्या
भेटे कोण.
पैलतीरा
रागा लोभाच्या वेळीच
विवेकाचा घे सहारा
त्याची नाव लागतसे
पैलतीरा
उणे दुणे नाकारीत
सुख पुरवे परिसरा
त्याचा निर्धार नेतसे
पैलतीरा
आनंदाच्या वेळांना
जो उत्साहाचा देई वारा
तो सर्वांना सहज नेई
पैलतीरा
सर्वांचीच काळजी घेई
थंडीवाऱ्यात धीर देई
त्यास भगवंत नेई
पैलतीरा.
विश्व शून्य
*********
भावांचे पाझर सुकता
जिव्हाळ्यात भिंती पडता
रक्ताची नाती उलटता
विश्व शून्य
आदर्शाची बूज संपता
ध्येये धूळीमध्ये मिळता
शाश्वती मोडीत निघता
अनर्थ हो
महत्ता स्वत:च उणी होता
भव्यत्वे क्षुद्रत्व पत्करता
दिप्ती स्वत:च काजळता
शाश्वती संपे
भावे भावत्व विसरता
स्नेहे ममत्व सोडता
देवेच देवत्व हरवता
विश्व शून्य.
महत्वाचं असतं
*************
जीवन किती जगतो या पेक्षा
कसं जगतो हे महत्त्वाचं असतं
काम किती करतो या पेक्षा
कसं करतो हे महत्त्वाचं असतं॥१॥
वेळ किती देतो या पेक्षा
कसा खर्चतो हे महत्त्वाचं असतं
खेळ किती खेळतो या पेक्षा
कसे खेळतो हे महत्त्वाचं असतं॥२॥
सण किती उभवतो या पेक्षा
कसे रंगवतो हे महत्त्वाचं असतं
प्रण किती करतो या पेक्षा
कसे निभवतो हे महत्त्वाचं असतं॥३॥
जीवनांत भेटणारे प्रश्न अन प्रसंग
कसे हाताळतो हे महत्त्वाचं असतं
जीवन किती जगतो यापेक्षा
कसं जगतो हे महत्त्वाचं असतं ॥४॥
सत्तालोभी
*********
आम्ही सत्तालोभी
सत्तेचे गुलाम
सत्तेसाठी प्राण
कासावीस
आम्ही सत्तालोभी
सत्तेचिया पाठी
प्रहरही आठी
घोटाळतो
आम्ही सत्तालोभी
घेऊनिया प्राण
वाढवतो लोण
स्वार्थाचेच
आम्ही सत्तालोभी
होऊनी उन्मन
सत्तेला जीवन
समर्पितो
सत्ता हाती येता
येते उद्दामता
विचार न चित्ता
योग्यसूचे.
अप्पदीप
********
मन व्हावे गुरू
तेच व्हावे शिष्य
अभ्यासी अखंड
रमावे त्या
मन होता गुरू
तेच होता शिष्य
वृत्ति होते दक्ष
बोध घेण्या
गुरू आणि शिष्य
असावेत दक्ष
विचार निष्पक्ष
करावा त्या
आपली चेतना
स्वये उजळता
अंतरीचा दीप
प्रकाशतो
साधनेच्या बळे
लाभते सगळे
ध्यानी हे धरावे
सर्वकाळ
मीच ब्रह्म आहे
मीच शोधी वाट
होणे अप्पदीप
महत्त्वाचे.
वाङ् मयांत
***********
मन केवढं मोठं
ते कसे सांगावे शब्दांत
ब्रह्म सामावे कां कधी
वाङ् मयांत
सांगू पाहिले संतांनी
पंडितेंही यत्न केले
पण गवसेना कुणा
ह्याचे रूप
विश्व साहित्याची ठेव
ह्याच्या पासंगा पुरेना
शब्द भांडार हो थिटे
ह्याच्यापुढे
मन केवढं केवढं
आम्हां खुजांना कळेना
तळाधार सापडेना
कुणालाही.
काही कणिका
**************
रित्या ओंजळीत
रित्या ओंजळीत येवून बसती
जित्या व्यथांचे थवे
सद्गगद्ता मग शिणते काळिज
धाव - धावता तयांसवे..
जहर
कुणा लाभे कल्पवृक्ष
ओसाडीत सरोवर
आणि कुणासाठी होते
गंगा जलाचे जहर .....
अपूर्वाई
खुळा ध्येयवादी इथे
भोगी नित्यांचे मरण
जीवनाची अपूर्वाई
स्वार्थ साधूंना शरण..
नशिबी
कुणाच्या मुखीचा
कुणा मुखी जातो चारा
कुणाकुणाच्या नशिबी
नसतोच शांत वारा .....
अर्घ्य
पाया झालेल्या शिळेसाठी
कोण कुठं खंतावलंते
वठून गेलेल्या वटासाठी
पापणी कुठे अर्घ्य देते !
दुबळे परिसर
बरसून जाती मेघ अचानक
घुसळून जाती चक्री वादळे
जल ओसरता उरती तेथे
व्यथा भोगते परिसर दुबळे .....
किनारे
उसळत्या लाटांनी उभारली तुफानं
शमवता किनारे पिंजून निघतात
पण वादळां नंतरच्या संथ प्रवाहाचे
किनारे मात्र कुणीच नसतात .....
प्रतिभा
कालच्या गडकऱ्यांच्या प्रतिभेसाठी
सम्मेलनं गाजवायची
अन् त्यांच्या नोंदी करण्यासाठी
आजच्या गडकऱ्यांची प्रतिभा राबवायची !
काहुर
अनर्थ घडता उरी कोंडते
शत् प्रश्नांची शीग अनावर
मिळे न उत्तर एकाचे
अन् हृदय ढवळते वेडे काहुर ......
विराणी
सर्वाभावे सदा आळवितो
जो श्रेयाची सुंदर गाणी
नशिबी त्याच्या कशास येते
तुटल्या भावांचीच विराणी.
बेअसर
*******
शिजव शिजव शिजवले तरी
कुच्चर कधी शिजत नाहीत
भिजव भिजव भिजवले तरी
लोहकण कधी भिजत नाहीत ॥१॥
उत्तम जमिनीत पेरली तरी
कुजकी बीजं अंकुरत नाहीत
घनघोर श्रावण बरसले तरी
वठली झाडं पालवत नाहीत ॥२॥
फुलते वसंत मरगळले तरी
पत्थरदिल हळहळत नाहीत
बहरते मोहर कोमेजले तरी
व्यवहार्यांचे डोळे भिजत नाहीत ॥३॥
सुरांवर सुर उमलले तरी
औरंगजेब कधी खुलत नाहीत
अन पुरावर पुर कोसळले तरी
कातळ आंतून भिजत नाहीत ॥४॥
देणे सदा
********
चंदनाच्या महत्त्वाला
विश्वी सारे नावाजती
कारण ते देत राही
देणे सदा
गंगेचीही असे ख्याती
देई पापातून मुक्ती
मालिन्याला स्वीकारून
पुण्य दे ती
ऋण अपार वृक्षांचे
असे भारीच मोलाचे
वठलेल्या वृक्षांचेही
सर्पण होई
मोठे पण सज्जनांचे
वाण पेले साधुत्वाचे
पण क्रिस्तांचा शेवट
सूळावर.
मनाआड
*********
स्वप्ने आगळी पहात
वाट वेगळी चालले
त्यांची स्मृती मनाआड
होऊ नये.
प्राणांचे मोल अर्पून
कठीण मार्गां चालले
त्यांची स्मृती मनाआड
होऊ नये.
नवे मोर्चे उघडले
शस्त्रांशीही ते झुंजले
त्यांची स्मृती मनाआड
होऊ नये.
प्राणांची बाजी लावून
गळफासही साहिले
त्यांची स्मृति मनाआड
होऊ नये
स्वातंत्र्यासाठीचे पराक्रम
उत्थानासाठीचे विक्रम
केलेल्यांचे विस्मरण
होऊ नये.
प्रत्येक शिळेला
*************
प्रभुत्व मिळवणं
त्याला टिकवणं
पेलत चालणं
सोपं नसतं
श्रेयाची जपणूक
करत राहणं
वागणं जगणं
सोपं नसतं
दीप्तीचं तेज
चांगलं वाटतं
पण त्यासाठी जळणं
सोपं नसतं
देवत्व मिळवत्या
प्रत्येक शिळेला
आधी सोलून
घ्यावं लागतं
युगे युगे
********
ईश्वराने दिल्या भाग्ये
झाड उठाउठी सुके
चंदनाचे दुःख मुके
युगे युगे
मृत्यू भेटण्या आधीच
झाड वठत राहते
खोड सुकत राहते
आतूनच
कुणी तोडावे जाळावे
कुणी गंध उगाळावे
चंदनाने जळावे वा
गंध व्हावे
उगाळता वा जाळता
सुगंधाची लयलूट
पण देणारा संपतो
देता देता.
आरशांत
*********
मनाचिया आरशांना
मनश्चक्षूंनी बघावे
निर्मळत्वाला जपावे
आयुष्यभर
अशा आरशांच्या साह्ये
मन होऊ शके स्थिर
होऊ शके ते एकाग्र
त्यांच्यामुळे
अशा स्वच्छ आरशात
स्पष्ट दिसे व्यवहार
योग्य संकेतन लाभे
क्षणोक्षणी
अशा आरशांच्या साह्ये
कर्मबिंबा सुधारावे
सातत्य ते निभवावे
आयुष्यभर.
जीवन
********
ऐलथडी शब्द आणि
पैलथडी अर्थ राहे
भाव प्रवाह दोहोंना
अर्थ पुरवत राहे ॥१॥
ऐलथडी आस आणि
पैलथडी सिद्धि राहे
त्यांना सार्थ ठरविण्या
कर्म प्रवाह तो वाहे ॥२॥
ऐलथडी ध्यास आणि
पैलथडी ध्येय आहे
त्याच्यासाठी साधनेचा
महिमा तो मानलाहे ॥३॥
ऐलथडी जन्म आणि
पैलथडी मृत्यू राहे
मध्ये वाहत्या प्रवाहा
जीवन हे नाव आहे॥४॥
संकलन : अलकनंदा साने
खूपच सुंदर काव्य.....सहज शब्दांमध्ये गहनअर्थ आहे
ReplyDelete..काव्य प्रतिभेस नमन
थोडक्यात सुंदर अभिप्रायासाठी खूप आभार
Deleteउत्कृष्ठ कार्य
ReplyDeleteलेखकांचे स्नेह , करुणा, संवेदना व मर्म जोपासण्याच्या अभिनव कार्यास माझा सलाम !!
http:\\rworld23.blogspot.com
अभिप्रायासाठी खूप आभार.
ReplyDelete