कपूर वासनिक
कपूर वासनिक
१.
अख्खे रान हिरवेकंच झाल्यावरही
तुझ्या शेंडयावर वाळकी पाने
म्हणजे तू सरपणाच्याच लायकीचा
मी जाणतो
तुझे सरणव्याकूळ जिवंतपण
२.
चालायचेच म्हटल्यावर
निमूट येतात रस्ते पायाखाली
दगड -धोंडे मात्र हलक्या हाताने दूर सारावेत
त्यांच्या सहानुभूतीच्या स्पर्शाच्याही
पोटजाती असतात
३.
पाचोळ्याने केला
बुंध्यापाशी जाळ
वेदनेचे लोळ
पानोपानी
घरट्यांची सय
पाखरांचा लळा
तुटो येती कळा
मुळांतूनी
मरण आकांत
नको धावाधाव
झेलू वाटे घाव
कुऱ्हाडीचे
४.
ते आले पुसत ख्यालीखुशाली
जाता जाता दाणे टाकून गेले
पाखरांनो
विणून तयार आहे
त्यांचे नवीन जाळे
५.
कालची जखम वेगळीच होती
असे कसे म्हणू मित्रा
वेदनांची आवर्तने सारी एकाच जातीची
कबूल ! आजचा वार निसटता आहे
भळभळून रक्त वाहत नाही कालसारखे
पण , आजच्या ह्या निसटत्या वारानेच
कालची जखम जर्द झाली
त्याचे काय ?
६.
इथवर ऐकू येते
ती सागराची गाज आहे
घाबरू नको
तो आपली सीमा ओलांडणार नाही
काळजी करण्याचे कारण
वेगळेच आहे
वाळवंटे सरकत असल्याच्या वार्ता
आपल्या दारांवर धडका देत आहेत
---------------- --------- कपूर वासनिक
चिंतनगर्भ कविता आहेत सरांच्या. खिळवून ठेवतात
ReplyDeleteचिंतनगर्भ कविता आहेत सरांच्या. खिळवून ठेवतात
ReplyDeleteअगदी. आतपर्यंत पोहचतात.
DeleteThis comment has been removed by the author.
ReplyDelete