अर्चना शेवडे,अनिल निगुडकर,अपर्णा भागवत, अपर्णा पाटील,अरुणा खरगोणकर, अलकनंदा साने, आशा वडनेरे, ऐश्वर्या डगांवकर, ऋचा कर्पे
**********************************************************************************
अर्चना शेवडे
1.आठवण
आठवण तुझी येते म्हणजे मला काय होतं ?
कसं सांगू अश्या वेळी नेमकं मला काय वाटतं
अधीर अधीर ओठांना शब्दांच मागणं येतं
कुशी कुशी बदलत मग रात्रीचं जागरणं होतं
आठवण तुझी येते म्हणजे मला काय होतं ?
कसं सांगू अश्या वेळी नेमकं मला काय वाटतं
शब्द शब्द साठ्वत भाषेचं येणं होतं
सूर सूर मिसळतं सुरेलस गाण होतं
आठवण तुझी येते म्हणजे मला काय होतं?
कसं सांगू अश्या वेळी नेमकं मला काय वाटतं
कातर कातर वेळी मन माझ हरवतं जातं
भिजत भिजत डोळी रुप तुझं आठ्वतं जातं
आठवण तुझी येते म्हणजे मला काय होतं?
कसं सांगू अश्या वेळी नेमकं मला काय वाटतं
2.तुला वजा केल्यावर
तुला वजा केल्यावर
तरीही उरतोसच ना तू
कांही नाही तरी
माझ्या नावा सोबत
तुला वजा केल्यावर
अजून ही जगते आहे
तुझ्याशिवाय कशी जगेन
माझेच शब्द आठ्वते आहे
तुला वजा केल्यावर
उरलेली मी, नाती गोती
जोपासते आहे.
विस्कट्लेली घडी सारी
परत परत जोड्ते आहे
तुला वजा केल्यावर
आयुष्य पुढे जातेच आहे
आठ्वणीच्या साठ्यातून
कधी तू डोकावतो आहे
तुला वजा केल्यावर
गाळ्ली असंख्य आसवे
आता कोरडे डोळे
कोरडे मन
जगापूढे हसते आहे
तुला वजा केल्यावर
३. पुसता आल्या असत्या तर
पुसता आल्या असत्या तर
पुसल्या ही असत्या कांही बोचर्या आठवणी
पुसता आली असती तर
पुसली असती रेघ वैधव्याची
पुसता आलं असतं तर
पुसलं ही असतं अंतर
तुझ्या माझ्या दुराव्याचं
लिहीता आलं असतं तरं
लिहीलं असतं सौभाग्य
अंतरीच्या सख्याचं.
-----------------------अर्चना शेवडे
अनिल निगुडकर
तुझ्या स्मृती
तुजविण कुणाला दिसल्या अश्रूंच्या धारा माझ्या
तुजविण कुणाला दिसल्या हृदयाच्या जखमा माझ्या
क्षण आनंदाचा तेंव्हा मी अनुभव केला होता
तू प्रवेश हासत केला जीवनात जेंव्हा माझ्या
हातात घेवूनी हात फिरलो ह्या जीवन वाटे
सुख बरसत होते रिमझिम ह्या घरात तेंव्हा माझ्या
किति रसाळ वाटत होते बोलणे तुझे अइकाया
नेहमी तू जवळ असावी हे वाटत होते माझ्या
इतरांच्या मौजे प्रमाणे मजपाशी पैसा नव्हता
परी तरी सुखाने जगली तू जीवन सोबत माझ्या
मज जेंव्हा जेंव्हा वाटे मी जगण्या लायक नव्हतो
खंबीरपणाने तेंव्हा तू सोबत होती माझ्या
यश जेंव्हा जेंव्हा आले मज हात मिळवण्यासाठी
प्रत्येक यशाचे कारण तू ठरली होती माझ्या
परी आज अचानक गेली अंधार जीवनी आला
का उगाच केली घाई तू जाण्या आधी माझ्या
एकटाच नशिबी फिरणे तू सोबत नसता माझ्या
ते सगे सोयरे सारे अश्रुना ढाळून गेले
तुझा आधार
दूर आहे तू तरी पण फक्त तुझा आधार आहे
सांगण्याला सर्व आहे पण एकटा मी फार आहे
नांदतो एकत्र आम्ही मूक बधीरा सारखे
परस्परांचे प्रेम सरले एवढी तक्रार आहे
नित्य करतो सर्व कामे एक हम्माला सारखे
एवढे असून नेहमी बोलणी खाणार आहे
दोषना देतो कुणा मी कष्ट येथे भोगताना
पूर्व जन्मीच्या चुकांचे भोग ना टळणार आहे
झोप अथवा जाग असो फक्त नयनी तूच आहे
अनाम नाते परस्परांचे ते कुणा कळणार आहे ण्
सुरेख होते ते दिवस जे तुज सवे मी भोगले
फक्त आता त्या स्मृती मी ह्या मनी जपणार आहे
तुझा भास
प्रत्येक क्षणाला तुझा होतो भास
येईना मनांत आणि कांही
वाटे राधिका तू होवूनिया यावे
जाणुनी मला कृष्ण एकरूप व्हावे
कधी वाटे मज सरिता तू व्हावे
मनाच्या सागरा येवूनी मिळावे
कितीतरी वेळा वाटे फूल व्हावे
तुझ्या केसा आड हळूच लपावे
बोलके हे डोळे गोड बोलतात
ओठ हे सुरेख मोह पाडतात
तू माझी नाही हे मला आहे ठावे
तरी माझे मन तुझ्या मागे धावे
तरी माझे मन तुझ्या मागे धावे
डोळे भिजले होते
बोलायची गरज ही नव्हती ना बोलून ते कळले होते
दिसली प्रीती सहज मला तू नंतर डोळे मिटले होते
सहज बोलणे सहज वागणे किति सहज तू वागत होती
सहजपनाच्या पडद्या आडून भाव प्रीतीचे दिसले होते
मोहित झालो जसा तुझ्यावर तू पण मोहित झाली होती
परस्परांच्या हृदही तेव्हा वेड प्रीतीचे भरले होते
दोघांनाही कळले नव्हते आपण दोघे गुंतत होतो
प्रीत लपवण्या केली धडपड परी जगाला कळले होते
आणाभाका किति घेतल्या हिशोब कधी ही केला नाही
आज परंतु जाणीव होते हिशोब माझे चुकले होते
विसर मला तू बोल तुझे हे हृदही माझ्या टोचत होते
हताश झालो ह्दही तेंव्हा दुयख वेदना उरले होते
विसरायाचा प्रयत्न करून ही तुला विसरणे अवघड होते
आठवता मज सुरेख क्षण ते माझे डोळे भिजले होते.
----------------------------------------------अनिल निगुडकर
अपर्णा भागवत
वसंतागमन
मौन पांघरोनि हे आकाश झोपी गेले
डोळा निज दाटे चंद्रास सांगून गेले...
शुभ्र तारकांनी हितगुज काही केले
उजळू अता धरेला मंदस्मित केले.....
झाडे मुकाट होती,फांदीत वायू डोले
सळसळ पर्णराशी,पक्षी मिटोनि डोळे
बिलगून जलाशयाशी तारे डुंबून भोळे
बिल्लोरी या रूपाने धरा पुनः झळाळे....
काय जाहले हे चंद्रास खूळ पडले
कुजबुज ही मधुर की गंधर्व गायले
कदंब वृक्षातळी वेणूनाद घुसळे
राधारंगी रंगोनि सृष्टीच रास खेळे....
प्रणयगुज रम्य चंद्रास वेड लावे
विरोनि विराग अनुराग धुंद व्हावे..
यामिनी झोपली,मी कधीचा जागतोहे
सख्यांनो हे तर वसंतागमन आहे .....
बाहुल्या
बाळपणी वाळूत काढलेल्या
काही रेखाचित्रांना
मी आठवण्याचा प्रयत्न केला
तर
वाळूसारखेच तेही निसटून
जाऊ लागले..
स्मृतींच्या नोंदवहीतील
प्रत्येक पान कोरेच दिसू लागले..
रंग भरणारे ते कोमल हात
आणि सोबतीचे ते मंत्रमुग्ध पाश...
आकाशातील तार-यांसारखे
दूरस्थ वाटू लागले...
आज फक्त आठवतेय
त्या वाळूच्या घरांमध्ये आपण बाहुल्या ठेवायचो
त्या खरंच किती मुक्या असतात
एवढे मात्र आज उमजले.....
अमृतकुंभ
माझ्या डोळ्यात समुद्र उतरला
अन् खार-या पाण्याचे
दान देऊन गेला
हळूहळू उतरू लागली
मनात बुध्दाची करुणा..
अंतरीचा सागर हिंदोळू लागला
त्या खपाटी गेलेल्या पोटांचे
अंगावरल्या लक्तरांचे
उघड्या रस्त्यावर
तफडणार-या छत्रहिनांचे
लाचार अश्रू झरू लागले
माझ्याच डोळ्यांतून.....
एरवी चिरगुटांमध्येही
कळाहिन वात्सल्य
आपल्या पिलांना जोजवतांना
स्तनपान करवत नाही का
महालातल्या आईइतक्याच
चिंब हृदयानं....?
पर्णहीन झोपडीच्या
उघड्या माळावरून
सूर्य आग ओकतो तसाच
चंद्र ही पाझरत नाही का
आपल्या मधुर किरणांचं अमृत...?
म्णूनच लक्षात ठेव
आसवं अर्थहीन नसतात!
मनाच्या सुंदर किनार-यावर
भरती -ओहोटीच्या
लाटांसमवेत
डोळ्यांतील समुद्र
हलाहल पचवत असतात
कुठल्यातरी
अमृतकुंभांच्या शोधात.......
--------------------अपर्णा भागवत
अपर्णा पाटील
चांदोबा
चांदोबाला एकदा
आला भलताच तोरा
इवल्या इवल्या चांदण्यांना
म्हणे मी गोरा....
माझ्यामुळे आकाशात
तुमची आहे शोभा
तेंव्हा या आकाशी
माझाच राहील ताबा....
इथे मी राजा
तुम्ही माझी प्रजा
इथे रहायचे असेल
तर करा माझी पूजा...
एक इवलीशी चांदणी
बाई मोठी हुशार
चांदोबाशी भांडण्यास
झाली कशी तयार....
चांदोबाबा चांदोबाबा
तुम्ही आकाशातले रात्रीचे राजा
सूर्यादादा येताक्षणी
वाजतो तुमचा बाजा....
सैरावैरा पळत सुटता
वाटेल त्या जागी
मग तुमची बादशाही
राहते जागच्या जागी.
आई मजला..
आई मजला चिऊसारखे
पंख का नाहीत गं?
असती मजला पंख तर
आकाशात उडलो असतो
आई मजला पोपटासारखी
चव का नाही गं?
असती मजला चव तशी
मिर्च्या खात बसलो असतो
आई मजला घोड्या सारख्या
टापा का नाहीत गं?
असत्या टापा तर रान रान
वेगाने हिंडलो असतो
आई मजला मोरासारखा
पिसारा का नाही गं?
असता मजला पिसारा तर
मोरासारखा नाचलो असतो
आई मजला बाबांसारख्या
मिश्या का नाहीत गं?
असत्या मिश्या मजला तर
त्या मिरवत फिरलो असतो.
भाजी आणि मी
मिर्चीताई मिर्चीताई
तू मोठी तिखट
डोळ्यामध्ये पाणी येणार
खाल्ले तुला सकट
कारलेदादा, कारलेदादा
तू मोठा कडू
तुला घरात बघता क्षणी
येतं मला रडू
भोपळेदादा, भोपळेदादा
तू मोठा लठ्ठ
सर्वांमध्ये मला वाटतं
तू आहेस मट्ठ
वांगेदादा वांगेदादा
दिसतो सावळा काळा
तुला पाहून मी
रडतो घडा घडा
बटाटेदादा, बटाटेदादा
तू मोठा मस्त
तुझे सर्व पराठे
मीच करतो फस्त
भिंडीताई, भिंडीताई
तू मोठी छान
तुज वर ताव मारताना
होतो मी बेभान.
छत्रीताई
छत्रीताई छत्रीताई
सरींसोबत खेळण्याची
आज आहे मला घाई
नको अडवूस मजला
सांगतो तुजला बाई
छत्रीताई छत्रीताई
तू कशी गं बाई?
लहान लहान मुलांना
पावसात भिजू देत नाही
छत्रीताई छत्रीताई
पावसाचा आभास होता
सजग होते आई
तुला मज देण्याची
तिला होते घाई
छत्रीताई छत्रीताई
आज तुला ठेवले लपवून
दिसू नकोस बाई
सरींसोबत खेळण्याची
आज मला घाई
छत्रीताई छत्रीताई
आज तुडूंब भिजलो बाई
माहित आहे मजला
रागावणार आता आई
छत्रीताई छत्रीताई
धन्यवाद तुला बाई
दिसलीस नाही आईला
म्हणून भिजता आले बाई.
------------------अपर्णा पाटील
अरुणा खरगोणकर
काय होते आयुष्या मधे जपून ठेवण्या सारखे
कोणते कड़वे गाण्याचे पुन्हा आळवण्या सारखे
जे मी केले नाही गुन्हे पण शिक्षा त्यांची भोगली
पुष्कळ पाहून केले होते नाही बघण्या सारखे
येते आहे झोप मला अन धूसर झाले डोळे
खूण ठेवुनि मोरपंख मग, पुस्तक मिटण्या सारखे
गंध फुलांचा घेवुनी जातो वारा अपुल्या संगे
निरोप वेळी नसोच काही वळून बघण्या सारखे
साहून सारी तगमग तडफड, प्राण निघावे ऐसे
या खोलीतून दुसऱ्या खोलीत जाऊन बसण्या सारखे.
लोक
विसरु नये कधीही हे चाहतात लोक
विसरून दुःख जावे समजावतात लोक
ह्यांनीच पेटविली सरणे मनात माझ्या
विझवायचे ही सोंग का आणतात लोक
कोंडून वेदनांना मी लाविलीत दारे
डोकावूनि तरीही का पाहतात लोक
प्राशुनि आसवांना पथ शोधिले सुखाचे
त्यांच्यावरी पहारे कां लावतात लोक
अजुनी घरात ह्यांच्या ही जळमटे रूढींची
झुंबरे सुधारणांची पण टांगतात लोक
निर्दोष स्त्री असे हो सांगून ख्रिस्त गेला
मारावयास गोटे पण धावतात लोक
मी स्वामिनी समर्थ साहण्यास जन्म भोग
मग काळजी फुकाची कां वाहतात लोक
सूर्य आहे फक्त तो
उडतात येथे काजवे पण सूर्य आहे फक्त तो
ते सर्व बाकी कावळे अन् हंस आहे फक्त तो
त्याचे दिवे अन् आरती ओवाळणारा तोच तो
तो देवही आहे स्वतः अन् तोच आपला भक्त हो
रे कुंपणे घालू नभा हे मनसुबे त्याचे असे
कां पक्षी हे गाती नवे असतां इतुका सक्त हो
रे मीच माझ्यासारखा कोणी न माझ्या तोडीचा
कोत्या विचाराशी इमानी अन् असे अविभक्त तो
हा चेहरा त्याचाच अन् आरसा त्याचाच हो
पण आपल्या रुपावरी आहे फिदा आसक्त तो.
त्याची भाषा कोणती
मुलगा मला विचारतो
आई माझी भाषा कोणती ?
मी म्हणाले 'मराठी'!
मुलाने विचारले
मग पुण्याचे काका माझ्या बोलण्यावर हसतात कां
मी म्हणाले 'अरे आपण मध्यप्रदेशात राहतो ना
म्हणून तुझी भाषा हिंदी !'
मुलगा म्हणाला 'नाही गं आई
मिश्रा काका म्हणतात
तुम्हारी हिंदी पर मराठी का प्रभाव है!'
मी म्हणाले 'बरं मग तू इंग्रजी शाळेत शिकतो ना
तर तुझी भाषा इंग्रजी'
मुलाने सांगितले 'मुळीच नाही'
आमची इंग्लिश टीचर म्हणते
'तू देसी अंग्रेजी बोलता है'
'सांग ना ग आई माझी भाषा कोणती?'
रावण दहन
दरवर्षीच रावण जळतो
लोक त्याला जाळतात
आणि तो बिचारा निमूटपणे जळतो
जळणार कां नाही
निर्जीव कागद किमड्यांचा पुतळाच तो
त्याने केलेल्या अपराधाची शिक्षा म्हणून
रामाने त्याचा वध केला
ज्या रामाने त्याला मारले
त्याचा जयजयकार करुन
आम्ही काडी लावतो पुतळ्याला
लोक शिक्षा म्हणून त्याला जाळतायेत
शेकडो वर्षांपासून जाळतायेत
तरी त्याची शिक्षा संपत नाहीये
जसे मुक्ती मिळाली
अशी ग्वाही दिल्यानंतरही
श्राद्ध करत असतोच ना आपण
एक रावण जाळून समाधान होत नाही
म्हणून गल्लीबोळातून अनेक छोटे-छोटे रावण
लहान मुले जाळतात
आणि मनात येते
खरंच किती चीड आहे समाजाला
अन्यायाची, अत्याचाराची, पापाची
रावणाने सीतेला जिवंत तरी ठेवले होते
आजकालचे रावण अपह्रत मुलीचा
ठावठिकाणाच कळू देत नाही
परतवण्याचा तर प्रश्नच नाही
ते परतून टाकतात
तिला एखाद्या पोळी पराठा थालीपिठासारखे तंदूरीत
आणि जटायू सारखा
सरकारी साक्षीदार देखील जिवंत ठेवत नाही
रावणाच्या अपराधा पेक्षा यांचे अपराध कमी आहेत काय ?
-------------------------------------------अरुणा खरगोणकर
अलकनंदा साने
१.
मी सकाळी स्वयंपाक करत होते
तेंव्हा माझ्या मुलीने माझ्याकडे
खेळणे मागितले
मी तिला विस्तव दिला
दिले दोन जळजळीत निखारे
तिने खुशाल ते हातात धरले
अन ती खेळत राहिली
त्या निखाऱ्यांशी
त्यांची राख फुंकून फुंकून
तिचे हात पोळले नाही
तिने थयथयाट केला नाही
की तिच्या हातावर
एव्हढासा फोड देखील उठला नाही
तिची नाळ आगीशीच जोडलेली होती
तिथूनच शिकून आली होती
विस्तवाशी खेळणं
अग्निदिव्यातून जाणं !!!
२.
ओंजळीत तोंड लपवून खुदु खुदु हसण्याऱ्या मुली गेल्या कुठे ?
मुली आता खूप मोठ्याने हसतात
मान उंच करून हातावर टाळी देत हसतात
ज्या बाहेर येऊ शकल्या नाहीत
त्या होत्या का खुदु खुदु हसण्याऱ्या मुली ?
की त्यांचे हसू दाबले गेले खूप दिवस
म्हणून हसतात त्या आता
नेहमी जल्लोष असल्यासारख्या
एखाद्याकडे पाहून लाजणाऱ्या ,
पायाने जमीन खुरडणाऱ्या ,
उगाच पदर सावरणाऱ्या मुली गेल्या कुठे ?
की त्यांना सांगितले गेले
पदर नेहमी डोईवर घ्यायला
नेहमी अंगभर लपेटून घ्यायला
म्हणून भिरकावून दिला त्यांनी पदर
सोडून दिले पदर सावरत उगाच लाजणे
आईची साडी अंगावर सावरत
घरभर बागडणाऱ्या मुली गेल्या कुठे ?
आता रस्त्या-रस्त्यात भरधाव धावणाऱ्या मुली दिसतात
चौका-चौकात मेणबत्ती लावत घोषणा करणाऱ्या मुली दिसतात
संध्याकाळी स्वयंपाकघरात लुडबुड करणाऱ्या मुली गेल्या कुठे ?
आई सोबत समईची वात नीट करणाऱ्या मुली गेल्या कुठे ?
मुली सारख्या निरागस दिसणाऱ्या मुली गेल्या कुठे ?
ओंजळीत तोंड लपवून खुदु खुदु हसण्याऱ्या मुली गेल्या कुठे ?
३.
घरभर आरसे लावून घ्यावे
कोणीतरी सोबतीला असल्यासारखे
तरी वाटेल
नंतर सीडी लावून
वावरावं सगळीकडे
रिकाम्या भिंती शोषून घेतील
एकूण एक स्वर
नि आवाजाची तेव्हढीच
सवय राहील कानांना
अगदीच काही नाही सुचलं
तर खिडक्यांचे पडदे दूर सारावे
झाडांच्या सावल्या
बागडतील तावदानांवर
पुस्तकांचे गठ्ठे काढावे आवरायला
कधीतरी आलेलं पत्र सापडेल त्यात
आपल्या लेंडलाईनने
आपलाच मोबाईल जुळवावा
नि नंतर मोबाईलने आपला लेंडलाईन
दोन कॉल आल्याचे मिळेल समाधान
स्वयंपाक थोडा जास्त करावा
अन्नाच्या भांड्यांनीसुद्धा
घर गजबजत कधी-कधी
संध्याकाळी समई मात्र लावावी
सावली सोबत करेल शेवट पर्यंत
पण उगाच गुढघ्यात डोकं
तेव्हढं देऊ नये
गलबलून येईल आरशांना .
-------------------------- अलकनंदा साने
आशा वडनेरे
कवितेचा गोड चिवचिवाट
विचारांचे गुंतले भले मोठे जाळे
जितके सोडवले तितकेच गुंतत गेले
खोलात खोल डुंबतच गेले
बिंबातून बिंब वाढतच गेले
मग मी विचार केला
या जाळ्याला उपटावे
का याला धुवून काढावे
ताकद सगळी लावली पणाला
मग घेतला एक साबण
कर्माचा धर्माचा सदाचाराचा
सत्संगाचा घातला त्यात सुवास
अभ्यासाचे ओतले त्यात पाणी
मनाला मग घसाघसा घासला
धुतला पुसला स्वच्छ केला
साबणात होते तर्काचे रसायन
आईची शिकवण बाबांची शिस्त
भाऊंचा धाक मैत्री चे सत्व
सगळी जळमटं जाळी कोळी धुतली गेली
सुविचारांची उगवली मग नवी पहाट
मग कवितेचा ऐकू आला गोड चिवचिवाट.
चारोळ्या
शब्दांना असते तीक्ष्ण धार
पडतो चांगला तनामनावर मार
तलवारीहून गंभीर घाव
नव्हे त्याला कुठेच ठाव
शब्द फुलांप्रमाणे झेलले जातात
शब्द हाराप्रमाणे गुंफले जातात
शब्दांची तीच किमया आहे
की शब्द न शब्द तोलले जातात.
जीवनात असतात कैक रंग
प्रत्येक रंगात असतात अनेक तरंग
प्रत्येक तरंगात असते संगीत
ते जीवनाला करते आनंदित
एक बालकविता
बाहुली माझी छान छान
आहे कशी गोरी पान
केस तिचे कुरळे काळे
नीटस बांधले बळे बळे
नाक नकटे इवले इतुके
हसता गाल गोबरे फुगले
फ्राॅक घातला फुला फुलांचा
डौल मिरवते सा-या जगाचा
चाल तिची ऐटबाज
नखरे सारे घरंदाज
खोटे कधी बोलत नाही
भांडण कोणाशी करत नाही
बाहुली माझी छान छान
आहे किती गोरी पान
सारे काही निमूट ऐकते
माझ्या मनासारखंच सदा वागते.
--------------------------आशा वडनेरे
ऐश्वर्या डगांवकर
मन
(अष्टाक्षरी कविता)
मन वंगाळ वंगाळ
मोह मायेच जंजाळ
इच्छा आकांक्षाचं जाळं
मना लावी उगा चाळ
मध माशांच ग पोळं
लय जीवास ते जाळ
हरि नामाची ओंजळ
करी मनास निर्मळ
मन भैताड भैताड
लावी बुद्धीला झापड
मुलां सारखे अल्लड
नाही पहात पल्याड
ढोरांवानी उधळतं
येत नाही ताब्यात
प्रभू नामाचे भजन
घाली मनास वेसण
मन कातर कातर
उगा जीवा लावी घोर
देवा माया तुझी थोर
काय वर्णू मी पामर
वसंतऋतू
(पादाकुलक वृत्त )
मात्रा - ८+८
आनंदाचा ऋतू बहरला
वसंत रानावनात फुलला
सृष्टीवर चैतन्य पसरले
आंब्यालाही मोहर आला
शिशिरानंतर वसंत येतो
नववर्षाचे स्वागत करतो
नवपल्लवीत वृक्षवल्लरी
कोकिळही मग तान छेडतो
हिरव्या शेतावरी सानुली
पिवळी फुले हळूच डोलती
पर्णतुरे ही झाडांवरती
अजून सुंदर खुलून दिसती
वनदेवीच्या स्वागतार्ह जणु
पळसही पायघड्या घालतो
गुलमोहराच्या कुशीत पहा
बहावा किती रम्य शोभतो
वसंतऋतूच्या स्वागतास्तव
प्रफुल्ल झाले तनमन सारे
रस रंग गंध सुखवितो जना
वसंत फुलता गंधित वारे
------------------ ऐश्वर्या डगांवकर
ऋचा कर्पे
ह्यालाच कविता म्हणतात का?
मी निरुत्तर होते ह्या प्रश्नावर,
"तू कविता करतेस का?"
मी..
कविता करते का?
मी को-या शुभ्र कागदावर
माझ्या मनातले विचार मांडते.
पाणावलेल्या डोळ्यांनी
साठवलेल्या आठवणी सांगते.
निळ्या शाईने रंगविते,
काही पुरे- अपुरे स्वप्न.
शब्दात गुंफून अलगद ठेवते
माझ्या मुक्या भावना,
कधी अति आनंदाचे क्षण,
कधी मनातल्या असह्य वेदना.
शब्दाला शब्द जुळून येतात
नकळतच तुकांत होतो.
भावनांच्या वाहत्या झ-यात कधी
हर्षातिरेक कधी दुखांत होतो.
मग कधीतरी स्वतः लिहिलेले
स्वतःच बघते वाचून
एखाद्या शब्दाची जागा बदलते
तर कधी तो शब्दच देते बदलून
तुम्ही विचारता, "तू कविता करतेस का? "
कुणी सांगेल?
"ह्यालाच कविता म्हणतात का????
ती माउली
त्या घनदाट वृक्षाला बघून आठवली
मला ती माउली
तोच आपुलकीचा गारवा, मायेची ऊब,
प्रेमाची सावली
तिच्या त्या हिरव्यागार पदरात
निवांत पडून राहाणे
भुकेची जाणीव होताच गोड़,
पिकलेली फळे खाणे
पिकलेले पिवळे पानं ते
तिच्या अनुभवांच्या साठवणी
खोलवर रुतलेली मुळे
तिच्या आयुष्याच्या आठवणी
उंच आभाळा कडे ताठ मानेनं
उभी ती तो-यात
सुखात नांदत असलेली
तिची मुले-बाळे दूर दरी खो-यात
सीमेंट-काँक्रीटच्या जंगलाच्या पलीकडे
ते वृक्ष अरण्यात
प्रेमळ-मायाळू ती माउली
भेटते मला वृद्धाश्रमात.
तुझा भास
पौर्णिमेचा चंद्र,
दूरवर पसरलेली नि:शब्द शांतता
लख्ख चांदण्यांने भरलेले आकाश
आणि तुझा भास
हळुवार दूर गाण्याची ती ओळ
जुन्या अंधुक गोड आठवणी
डोळ्यात अश्रूचा थेंब, एक दीर्घ श्वास
आणि तुझा भास
पेटीत जपून ठेवलेले काही सोनेरी क्षण
काही अपूरे विणलेले सुंदर स्वप्न
कधी न पूरी होणारी एक आस
आणि तुझा भास
तुझे शब्द,तुझे हसणे
तुझे गीत, तुझे बघणे
कल्पनेच्या वेली वर उमलत्या
एका सुंदर फुलाचा सुवास
आणि
तुझा भास......
------------------ऋचा कर्पे
वाह छान प्रयत्न,. ग़झल आणी अनवट शब्द पण वाचले. उत्तम साहित्य.
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद. पण तुमचं नाव दिसत नाहीय.
ReplyDeleteछान उपक्रम.ब्लॉग आवडला. अर्चना जी,अनिल जी आणि अरुणा ताई यांच्या कविता v गझल पण खूप छान. थोड्या टाइपो चुका आहे, त्यात सुधारणा करता येईल.
ReplyDeleteधन्यवाद, चुकांमध्ये नक्की सुधारणा करू.
ReplyDeleteखूप छान। उत्कृष्ट लेखन।
ReplyDeleteधन्यवाद . आपली प्रतिक्रिया मोलाची आहे.
ReplyDeleteसगळ्याच कविता खूप सुंदर!
ReplyDeleteखूप छान कविता!
ReplyDeleteछान संग्रह..
सर्व कविता अतिशय सुंदर एकापेक्षा एक.
ReplyDeleteसर्वच कविता खूप सुंदर आहे.
ReplyDelete