भालचंद्र राजाराम लोवलेकर
(२ऑक्टोबर १९११– २४ जून १९४५)
माळव्यातील सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या या रमणीय परिसराची शब्दचित्रे रेखाटणारे कवी भालचंद्र लोवलेकर हे मूळ इंदौरचे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९११ रोजी एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात झाला पदवीधर झाल्यानंतर लोवलेकर संस्थानी नोकरीत लागले. त्यांचे बहुतेक आयुष्य इंदूरातच गेले. तिथेच विवाह, अपत्य लाभ या घटना घडल्या. नोकरीत बदली झाल्यामुळे ते महेश्वर या गावी एकटेच जाऊन राहिले. तिथे असतानाच त्यांना कॉलरा झाला आणि तडकाफडकी काही तासांच्या अवधीतच २४ जून १९४५ रोजी मरण आले.
भालचंद्र लोवलेकर गेल्यानंतर त्यांचे स्नेही हिन्दी - मराठीतील नामवंत लेखक प्रभाकर माचवे यांनी बडोदे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ''अभिरुची'' मासिकाच्या ऑगस्ट अंकात त्यांच्यावर एक हृदयस्पर्शी लेख लिहिला. एकोणीसशे बेचाळीस साली ''अभिरुची'' या लहानशा पण चोखंदळ मासिकात लोवलेकरांच्या कविता प्रसिद्ध होत असत. ह्या मासिकात लिहिणारे अनेक लेखक नंतर नावारूपास आले. त्यापैकी मं. वि. राजाध्यक्ष,पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके वगैरे काही ठळक नावं आहेत. लोवलेकर यांचे निधन अल्पायूत झाले आणि त्यांच्या जीवित अवस्थेत पुस्तकाचे प्रकाशन होऊ शकले नाही. ते गेले त्या नंतर इंदूरमधील त्यांचे चाहते व मित्र यांनी "लोवलेकर स्मारक मंडळ" स्थापन केले. ह्या मंडळाने १९५३ साली त्यांच्या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती प्रकाशित केली होती. ह्या पहिल्या आवृत्तीसाठी ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांची प्रस्तावना लाभली होती.
अंबरवात
अफाट उघड्या मैदानात
या टोकाहुनि त्या टोकास
असा सारखा चोविस तास
फिरे झिंगला अंबर वात
पूर्वेच्या खांद्यावर हात
दुजा पश्चिमाराणि करात
पिंगा घेई गाणे गात
आकाशाला लावी हात
पाय हालवी उन्मादात
मजेदार हसे झोकात
हिरव्या गवतावरती पाय
अल्लद टेकुन चालत जाय
ज्वारीची थरथरते पात
क्षितिज रवी तो कंपे खात
खुळ्या जिवाच्या या मेण्यात
आशेची थरथरते वात
वातावरणी मेघ उदास
श्वासांवरती विरली आस
वारा झुलवी हातोहात
या टोकाहून त्या टोकास
असा सारखा चोवीस तास
फिरे झिंगला अंबरवात.
गगन
चिराश्चर्य ! वर उंच गगन!
चवथीच्या ठसक्याची चंद्रकोर
फेकिले सारखे स्नेहदोर
धवल रम्य ते त्वरित जलद
अवगुंठिति नभ अलगद
स्वप्न रुचिरा धरा
नि स्मृतीचा कंप उरा
एकांतिक आसमंत गहन गहन ।।१।।
गोंगाटी शहर उरे मैल दूर
उन्मादित चुंबनरव ये मधुर
वाळवंटसा सरे दिवस
कवळिती दृढ बाहुपाश
स्वच्छ चंद्रप्रभा
नि विवस्त्र तनुशोभा
उल्लंघिति विप्रलंभ रमणी रमण ।।२।।
मध्यरात्र पडशाळेची किनार
उंच उभ्या लिंबाचा जीर्ण पार
जीवव्याधीने क्रांत पथिक
अर्धशुद्ध नि:श्वास क्षणिक
भंगे से जीवपात्र
नि चांदणी फुलेरात्र
गगनाची आळवी दे मरण मरण ।।३।।
डोहावर नर्मदा प्रवाह संथ
नि चांदरात ही शोभिवंत
ये दूर दूर देवालयीन
गंभीर घोष अत्यंत क्षीण
मुक्त चिंता जरा
तंद्रिलता ये शरीरा
व्यर्थच उच्छृंखल मन करि चिंतन ।।४।।
सरितेकाठी
किलकिल करुनी डोळे मंजुळ जलनादी मन गुंगविती
वृक्षमुळीवर डोके टेकुनि गोप झोप घे हवी तशी
चंचल नीरा अचळ काळसर शिळा बघे, घेई बांक
तुटल्या झिजल्या कड्यावरुनी किडा करीत 'माती टाक'
अशा बांगड्या दावूनि झाकुनि हळूच चाले नादकली
खोड वडाचे दगडी गोटे पाहुनी बिचके मात्र अती
बाजुबाजुनी जाई त्यांच्या सावरीत लवचिक तनु
मनासारखा प्रियकर मिळता खुशाल उधळी इंद्रधनु
काठावरून तरणाताठा आम्रतरू कलवी फांदी
जलभालासी हळू नजराणा करी बिजोरा अन बिंदी
'पुढेच जा तू कपटी राणी' म्हणून फिरवी मग हात
तळमळणारा किरण रवीचा पाण्यामाजी घेइ बुडी
ताप जाहला शीतल, चम् चम् झाक मात्र पडली उघडी
लिंबावरुनी झर्रकन् उतरे गदर बावळी लिंबोळी
निवांत लहरीवरी नदीच्या किरणासंगे नाच करी
दोन ओंजळी पिउनि पाणी गवळ्याचा तरणा पोर
मुंडासे करि नीट, सावरी काठी, मिशांची पिळे कोर
शिरावली घेऊनी गाठळी विळा घेऊनी हातात
पुढती टाकी पाय प्रिया, तो तिच्या सवे आनंदात
खिल्लारांना मधेच चक् चक् करुनी वळतो आणि मग
फिरूनी उरते तिशी बोलता तिचे आणि त्याचेच जग.
नीर संथगति
नीर संथगति, खाली दिसते तळ भिंगावाणी
वरी लांबशी फांदी आली डोलत मृदुपर्णी
दो बोटांमधि लांब धरुनिया रुमाल की हिरवा
कुणी नवती अप्सरा पातली नाच करी बरवा
वायु वाहवी मंदमंदशा लहरी तरल अशा
की स्वर्गीचा देवदूत करि गाऊनी साथ जसा
गगना मधूनी हेमकरी हा करी वादनाला
छेडूनि तारा सारंगीच्या सारंगीवाला
अहा! हालली पाने नव ती कोमल शाखेची
करांगुल्या नाचल्या नर्तकी हावभावनाची
हावभाव की अदा करूनिया छुमछुमली
पाने चिवचिव हसली कलकल
खिदळत हलली मोदाने.
ताज्या सारवलेल्या भूमीवर
ताज्या सारवल्या भूमीवर जशा अक्षदा लाख हजार
तशी पसरली नभांगणावर ही नक्षत्रे अपरंपार
गडद तमाच्या भेसुरतेचा भर्पूर भरलेला बाजार
काय दाखवायाला केला लख् पक् रत्नदिव्यांचा हार
सुपीक काळी मध्ये पेरली ज्वारबिजे ही रुचिराकार
वाट न्याहळित हंगामाची अंधाराचा हा कृषिकार
चिमुरडी
लावुनि जिभेला घडी घडी शिसपेन
का कपाळ अपुले दाविसि पत्र लिहून
पहाल का करते कसे लुकलुके डोळे
हज्जार मेलीला हवे कराया चाळे
नकलात जाहली अशी एक तरबेज
या चिमुर्डीस हो कशास लिहिण्या मेज
पहा कशा भोवया केल्या या वाकड्या
अन् थेट नाकिच्या मोठाल्या करी पुड्या
जरी अजून चारही पुरते नाही वय
खपणार नाही हजेरीत जर हयगय.
मी अदेववादी
मी अदेववादी माणूस, कसली पूजा करविता ?
देवळात कुठला देव ?
विश्वास मनुष्यस्वभाव
सब देवबीव थोतांड
कोठला कर्ता करविता ?
चौगर्दी भाविक लोक
गातात सुरावर एक
पण ह्रदयामधला सूर न मिळता
सर्व कपटपटु बाता !
संशयात जीवन झाले
भिरकवी तबक भरलेले
अन तडक निघून
उतरुनि पायऱ्या गाठावी सरिता.
बस्स! नको अता देऊळ
धर्माचे तसले खूळ
चुळबूळ मनाची निरवि
कुठे ती समाधान-वनिता !
पटांगणामधि रंग बिरंगी
पटांगणामधि रंग बिरंगी मेहताबा
उरी धरीशी का मशाल जळकी तू बाबा
काबा, विष्णू विठ्ठल सारे कृष्णतम
तेज: स्मृतीची कबर, तोच झाला धर्म
चिंचराईतिल चिंचोळी माझी वाट
मळलेली, मलमल सदरा मुंडे छाट
गोखरूमय पंथावरचा वाटसरू
वहाण नाही वाहन कुठले ! काय करू?
ओढ्या माजी पाऊस धारा पडणार
ढवळून वरती माती माती येणार
नयनांमधूनि ओघळणाऱ्या अश्रू सरी
ह्रदांदोलनी आशा रक्षा मातकरी
घरभर भिरभिर उडालाच हा पाचोळा
निरर्थ आशा फडफडते चिंधीचोळा
असतील भोळ्या दुनियेचे सारे देव
खरे निराशा मंदिर, तेथे मद्भाव !