अनंत पोतदार
(८ नोव्हेंबर १९२४- ८ ऑगस्ट २००८)
मागील पिढीतील साहित्याच्या जाणकारांसाठी अनंत पोतदार हे नाव अनोळखी नाही. अनंत पोतदार यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२४ रोजी पेटलावद (जिल्हा झाबुआ) येथे झाला.ते इंग्रजीत एम. ए. होते आणि पुढे प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते इंदुरास स्थायिक झाले. त्यांचा काळ फारसं आगळं वेगळं लिहिण्याचा काळ नव्हता, पण अनंत पोतदार यांच्या कवितेत नव्या जुन्याचा मिलाफ प्रकर्षाने जाणवतो. आज पासून आपण त्यांच्या कविता वाचू या.
अनंत पोतदार अनेकार्थी भाग्यवान होते. ह्या संदर्भात त्यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे अनंत पोतदार ह्यांचे चुलते होते. बडोद्याचे व्यासंगी विद्वान आणि कवी ना. बा. पुराणिक, इंदूरचे राजकवी रा. अ. काळेले हे त्यांचे आप्त होते. पेटलावद या आंबराईच्या निसर्गरम्य गावी नदीकाठी त्यांचे बालपण गेले आणि ते पुढे त्यांच्या काव्यातील निसर्ग वर्णनात दिसून येतो.
अनंत पोतदार इंदूर येथील महाराष्ट्र साहित्य सभेत खूप सक्रीय होते. ते संस्थेच्या अध्यक्षपदी असताना अनेक दर्जेदार कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य सभेत झाले. नव्याने धडपडत असलेल्या कवी मंडळींसाठी ते एक आशेचे स्थान होते. नवोदितांना पुढे आणण्यासाठी त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. म. प्र. मराठी साहित्य संघाच्या स्थापनेत त्यांचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या कवितेत देशाभिमान, संस्कृतीप्रेम, निस्पृहता, स्पष्टोक्ती, निर्भिकता वगैरे त्यांच्या स्वभावातील गुणधर्म दिसून येतात.
प्रकाशित साहित्य :
(१) अहिल्या गीत -१९७७
(२) इन्द्रधनुष्य ( काव्य संग्रह ) -१९८३
(३) आहुति ( खण्ड काव्य ) १९९५
१८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित काव्य. इन्दूर विश्वविद्यालयाच्या बी.ए.(मराठी) पाठ्यक्रमात
समाविष्ट
(४) माळव्यातील मराठी कविता (उन्मेष आणि विकास सन् १८७३-२०००)
महाराष्ट्र राज्य स्तरीय ' तुका म्हणे ' पुरस्कार प्राप्त .
(५) उत्तरा ( काव्यसंग्रह )
वैचारिक प्रबोधन :
पन्नासहून अधिक लेख निबंध प्रसिद्द / आकाशवाणीच्या वार्ता कार्यक्रमात समाविष्ट
ज्येष्ठ साहित्यिक विंदा करन्दीकर व शरदचन्द्र मुक्तिबोध यांच्या साहित्यिक योगदानावर मध्यप्रदेश राज्य अकादमीतर्फे शोध पत्र वाचन
सन्मान/पुरस्कार :
७४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशिष्ट साहित्यिक सत्कार
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली द्वारा सत्कार
पं. भारत सरकार द्वारा फिज़िकल एफिशियंसी ड्राइव व जनगणना प्रशस्ती सन्मान
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अनेकवेळा आमंत्रित कवि - परिसंवाद चर्चेत सहभाग ,आकाशवाणीवर वार्ता - काव्यपाठ ,
अनंत पोतदार यांच्या पहिल्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनानंतर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणाले होते --अनंत पोतदार यांचा या प्रांतातील अनुभव मोठा आहे .कवितेचे स्वरूप प्रगल्भ ,अभिजाताची बैठक असलेले आणि सुबोध आहे . विविध भावनांचा,विचारांचा आविष्कार हृद्य आहे .
राजकवी यशवंत यांनी अभिप्राय व्यक्त करतांना म्हटले होते की या काव्य संग्रहाला इन्द्रधनुष्याचे शिरस्त्राणच जणू चढविले आहे .
मध्यप्रदेशीय ज्येष्ठ समीक्षक के . ना . डांगे म्हणाले होते- ' या कविता पाहून कवी बी , ना . वा . टिळक , बालकवी , चन्द्रशेखर यांची आठवण होते .
राजकवी रा अ . काळेले यांनी लिहिले - 'अनुभूति, अभिव्यक्ती, सौंदर्यासक्ती व विलोभनीयता यामुळे अनंत पोतदार लक्षात राहतात .
राजकवी गोविन्द झोकरकर म्हणतात -- पोतदारांच्या कवितेचे क्षितिज व्यापक,भावना उद्दीपीत व सौंदर्यासक्त असून निसर्ग,समाज,स्वातंत्र्य यांना त्यांची लेखणी नव्या दृष्टिकोणातून विशद करते .
अनंत पोतदारांचा कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोणच महत्वपूर्ण वाटतो . त्यांनी स्वत: आपल्या कवितेबद्दल लिहिले होते - जीवनात जे जे सुन्दर , उदात्त , उन्नत अनुभवाला आले , कडवट आणि गोड अनुभव , त्यांना मी प्रांजळपणे व्यक्त करीत आलो आहे . यथार्थ दिसतो व व्यक्त होतो , पण गलिच्छपणा किंवा ओंगळपणा मात्र मला शिवलेला नाही . परिस्थिति अनुकूल प्रतिकूल खूप पाहिली तरी आनन्दमात्र वाढतच गेला . तो अद्याप पूर्ववत् रम्य आहे . ' ही त्यांची काव्यदृष्टि त्यांच्या कवितांना न्याय देते . जसा माळव्याच्या मातीचा सुगंध अनेक कवींना बेभान करतो तसा माळव्यात जन्मलेल्या पोतदारांनाही माळवी मातीच्या अंतरंगातील लेण्यांची कलात्मकता शब्दांकित करण्याचा मोह आवरता येत नाही . ते म्हणतात
माझ्या माळवी मातीचा
लावू कपाळास टिळा
स्वस्तिवाचन करिती
इथे रानातल्या शिळा
मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अनिल गजभिये यांनी पोतदारांच्या ''उत्तरा'' काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की कवितेतील जुन्या आणि नव्या वळणांचे स्वागतकर्ते म्हणून अनन्त पोतदारांचे स्थान निश्चितच मानाचे आहे . त्यांची कविता भावगीतात्मकता , कथात्मकता , सौंदर्ययुक्तता , सामाजिकता , मुक्तछन्दातील नवीनता , जीवनोपासकता या गुणांनी युक्त आहेत.कवितेच्या आधुनिक प्रकाराचे नावीन्य आणि छंदोबद्ध काव्यातील कला सौंदर्य यांचा सुरेख संगम त्यांच्या कवितांमध्ये दिसून येतो. अनंत पोतदार केवळ मध्यप्रदेशीय मराठी कवी आहेत म्हणून कुठे उणे आहेत असे समजण्याचे धाडस समीक्षकांनी करू . महाराष्ट्राच्या कवी परंपरेत अनंत पोतदार यांचे स्थान अटळ राहील अशी शाश्वती वाटते.
माझे गीत समर्पित त्यांना !
दुःखाचे आगीचे गोळे
झेलून ज्यांचे चित्त पोळले
परि प्रसन्नमुख अंतर ओले
अनुताप न कधी शिवला ज्यांना
माझे गीत समर्पित त्यांना !
सप्तसुरांची लाउनि संगत
दीपराग जे आर्त आळवित
घनांधकारी प्रकाश उजळित
देती गती अगतिक पथिकांना
माझे गीत समर्पित त्यांना !
सदा साधिले ज्यांनी जनहित
केले मानवतेस विभूषित
परी बहिष्कृत सदा तिरस्कृत
लाभली न ज्यांना मानवंदना
माझे गीत समर्पित त्यांना !
निराश्रितांना उपेक्षितांना
देतो स्वर दुबळ्या दलितांना
जीर्ण जाळिती आणि स्थापिति
नवीन मूल्ये नव प्रतिभांना
माझे गीत समर्पित त्यांना !
रूप,रंग रस, गंध निर्मिती
निळ्या नभावर अक्षर लिहिती
सूर्य, चंद्र ज्या नित्य वाचती
अर्थ नवा देती शब्दांना
माझे गीत समर्पित त्यांना !
मागणे (जाति रसना)
सोने न मागतो मी नाणे न मागतो मी
देशात आज माझ्या ईमान मागतो मी
शस्त्रें न मागतो मी शास्त्रे न मागतो मी
उंचावल्या मनाचा माणूस मागतो मी
या कागदी जगाच्या कल्याण कल्पनांना
दृष्टीत योजकांच्या अंदाज मागतो मी
हे फोल बोल सारे आकाश चुंबनाचे
शब्दासवें कृतींचे सामर्थ्य मागतो मी
गर्दीत डुंबलेले हे राजमार्ग सारे
देईल वाट त्याची ही वाट पाहतो मी
फुलली कळी
फुलली कोमल कळी सखे गs फुलली कोमल कळी !
नयनमनोहर
कुणी क्षितिजावर
काढी रंगावली
सखे गs फुलली कोमल कळी !
गंध दरवळे
लगबग आले
गुंग्ङत गाणी आली
सखे गs फुलली कोमल कळी !
थांबू कुठवर
होत अनावर
हुरहुर ह्रदयातली
सखे गs फुलली कोमल कळी !
उमलणार परि
तुझी कधीतरी
मीलित मानसकळी
सखे गs फुलली कोमल कळी !
बघुनी एकला
हसती या मला
शेवंती कर्दळी
सखे गs फुलली कोमल कळी !
विसरुनी 'मीपण'
मिळूनी आपण
सेवूं परागांजली
सखे गs फुलली कोमल कळी !
दिशा दिशा नित
करू सुगंधित
जीवन कुंजातली
सखे गs फुलली कोमल कळी !
१९४९
जीवनयात्रा (जीवनलहरी)
सरला मधु मंदानिल भृंगाचा गुंजारव
लोपलाच अन् सरले संध्येचे क्षणवैभव
मेघांनी व्यापियले सारे हे गगनांगण
पुनवेची रम्य रात परि न दिसे चंद्रकिरण
शुक्राच्या चांदणीस बघुनी मनी फुलली आस
निमिषार्धे परि विरली अन् उरला दिव्य भास
अन असाच झाला तो मम सुधांशु दृष्टीआड
ढासळुनी धैर्य ध्येय कोसळले काड काड
रात्र दीर्घ अंधारी संपेना हो लांबण
चालणार कुठवर ही कंटकमय पथि वण वण
आशेची अमरज्योत परि सतेज ह्रदि तेवत
सांगे मज पाहण्यास स्मितवदना सुप्रभात
क्षण गमले लोपुनिया अंधारी दीर्घ निशा
उजळिल मम जीवनपथ लगबगुनी रम्य उषा
मेघांनी व्यापियले सारे हे गगनांगण
अन् मजला नच कळले हंत! उषा आगमन
१९४६
वध:स्तंभावर (भूपतिवैभव द्राक्षकन्या)
( ही कविता अनंत पोतदार यांच्या "आहुती" या खंडकाव्यातून घेतलेली आहे. अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समरानंतर तात्या टोपे यांना फाशी दिली गेली. त्याआधी न्यायदानाचे जे नाटक घडले त्या वेळेस तात्यांनी जी जबानी दिली आणि त्या नंतरचे हे वर्णन आहे. कविता बरीच मोठी आहे त्यातले काहीच अंश येथे देत आहे.)
स्वर उंचावून अन करून ताठर मान
सेनानी तात्या बोले धैर्यनिधान
जे केले मी - ते केले देशासाठी
केल्याचा मजला अजुनिया अभिमान
नच न्याय मागण्या आलो तुमचे पाशी
तुम्हीच आणिले घालून घातक पाशीं
कां अवडंबर हे न्यायाचे माजविता
सर्वांना ठावे न्याय आपुला फाशी
कां विलंब करिता - प्रश्न टाकिता कसले
कां बघता क्रोधे करून मुख धसफुसले
'मालूम नहीं- मालूम नहीं कुछ हमको'
हे एकच उत्तर तात्याने त्या दिधले
वीरोचित मरणें हर्ष फार मज आज
मातेस्तव केले काज न त्याची लाज
कधीही न मला हो झाला इतुका हर्ष
जो आज होतसे करि जीवन आदर्श
टाकला गळ्यामधि स्वयं हासत फन्दा
तो देशभक्त सेनानी भारत बन्दा
चालला विजेपरि सोडुनिया इहलोक
आलोके दिपवुन सेवाया स्वलोक
मृतदेह तयाचा हळूच आला खाली
उमटली नभाच्या अपूर्व गाली लाली
लाभले रत्न बहुमोल म्हणून नभिं हर्ष
जन्म भूवर म्हणती - हे जीवन आदर्श
गेला जरि तात्या गेली जरि ती राणी
ते नाना आणि कुंवर अमर सेनानी
सम्राट दिल्लीचा आणिक मंगल पांडे
तरी अजुनी चेतना देती समर कहाणी
आहुति जयांनी दिधली या यज्ञात
नित्य प्रात:काळी गावे त्यांचे गीत
वृत्त मानसात चैतन्य उफाळून यावे
सहवासी त्यांच्या जीवन उजळून जावे
राणी -- राणी लक्ष्मीबाई, नाना -- नानासाहेब पेशवा, कुंवर आणि अमर -- बिहारचे कुंवरसिंह व अमरसिंह, सम्राट दिल्लीचा -- बहादुरशाह जफ़र
विज्ञापना (जाती परिलीना)
मेघांनो गडगडाट मुळि न करा आता
दुखवा नच बाळाच्या इवल्याच्या चित्ता
चपले तू बघू नकोस सोनुल्यास माझ्या
कुणी कुणास सांगावी दृष्टीची माया
घुबडा घूत्कार पुरे जागवी न बाळा
काय नशिबी तुझिया अंधारच काळा
वाऱ्या तू इथूनि कसे सत्वर कर काळे
भिरभिरती तुज बघुनी छकुल्याचे डोळे
खळखळ मुळी करू नकोस गे सरिता माई
झोप तान्हुल्याची मम भंगूनिया जाई
निर्झर तू गात रहा गीत असे गोड
अंगाई गीता मम दे अशीच जोड
पुष्पांनो मधु सुगंध दर्वळु द्या आता
काय लाभ तुमचा मग इष्ट घटी जाता
काजव्या न पाजळ निज क्षण अंधुक तेजा
उजळिल गृह कुळदीपक हा सतेज माझा
माझा बाळ
माझ्या बाळाचं जावळ उडताहे भुरू भुरू
कसा चाले तुरूतुरू बाळ माझा
माझ्या बाळाचं हासणं जसं कळ्यांचा फुलणं
शुक्लपक्षीचं चांदणं कार्तिकाचं
माझ्या बाळाचं खेळणं खळखळ ओहळाची
ह्रदी आंदोळत वीची आनंदाच्या
माझ्या बाळाचं बोलणं किलबिल पाखराची
बाई आरास सुखाची बाळ माझा
माझ्या बाळाचा ग राग पाण्यावरचा तरंग
जसे नभी सप्तरंग वर्षाकाळी
जीव इवलासा पण फार खोडसाळ बाई
नको आणू शेजीबाई गा-हाणी गं
माझ्या डोळ्याचा प्रकाश माझा जीवन विकास
माझा श्वास नि उच्छवास बाळ माझा
गर्दी आणि एकान्त
रानामाळातून दऱ्याखोऱ्यातून फिरताना
जाणीव कधीच झाली नाहीं
एकलेपणाची
चढण उतारावर
उन्हात आणि सावलीत
साथ मिळाली
वनचरांची वृक्षवल्लरींची
वनवासी कलन्दरांची
सख्ख्या आपुलकीच्या जिवलगांसारखी
स्निग्धतेत ताप कधीच जाणवला नाही
पण या प्रचण्ड गर्दीच्या शहरातून फिरताना
माणसालाही असंख्य माणसात
एकाकीपण सारखे बोचते - टोचते
कारण माणूस माणसाकडे
माणसासारखा बघायला तयार नाही .
प्रकाश पूजा
वेदना येथे तुझ्या सांगू नको
फत्तराला व्यर्थ तू वन्दू नको
शेन्दरांनी माखलेले सोंग हे
मार्ग सौख्याचा इथे शोधू नको
येथ नाही चेतना संवेदना
फत्तरावर मस्तका ठेवू नको
सूर्य आकाशातला बान्धून घे
हे रसायन जागते सोडू नको
ज्योतिने ज्योतीस तू फुलवीत जा
अंधकाराची कथा सांगू नको
बांध पूजा तू प्रकाशाची सदा
सौख्य येते चालुनी विसरू नको .
ध्येयाची फुलवात
कुठून झंझावात सुटे हा कुठून झंझावात !
सुदूर मागे उषा राहिली
संध्या दूरच कुणी पाहिली
मध्येच जीवन चाकी अडली
कधीतरी सरणार रूक्ष नी अनोळखी ही वाट !
उठले भीषण वादळ भवति
पाने वाऱ्यावर थरथरती
स्तंभ धुळीचे गिरक्या घेतो
अवसेचा अंधार भरे जणू मध्यांन्ही या दाट !
उंच उंच नी विशाल तरुवर
मुळापासुनी उमळूनि भरभर
काडकाड कोसळती भूवर
कुठे दूरवर करी गर्जना दरिया क्षुब्ध अफाट !
जीव तृषेने हो अति व्याकुळ
क्षणाक्षणाला वाढे तळमळ
मिळेल कोठुनी ओंजळभर जळ
सरितेचे अस्पष्ट शब्द जरि घुमती या रानात !
मध्यावर ये जीवन नाटक
नेत्र बावरे बघती टकमक
देखावा एखादा मोहक
दिसेल का जो रिझविल क्षणभर मनास या अंकात !
वण् वण् फिरुनी धैर्य ढासळुनि
शिणली गात्रे जरी ठेचाळुनी
आशा दीपक मंद जीवनी
वाट तमोमय माझी उजळिल ध्येयाची फुलवात !
(मंदार)
ज्ञानदेवांच्या समाधीपाशी
पांग डोळ्याचे फुटले
आज पाहिली आळंदी
इंद्रायणीच्या काठी
ज्ञानदेवांची समाधी
माय मराठीच्या पुत्रां
हेच अस्मितेचे स्त्रोत
योगी भाविक भक्तांना
वेद वेदांताची ज्योत
मोरपंखी अक्षरांचा
छान रेशमी फुलोरा
विश्व अवघे सामावे
असा न्यारा हा निवारा
जसा फुलाचा सुगंध
वारा दूर दूर नेई
एका जनार्दनी झाली
फार मोठी ही पुण्याई
तत्त्व,ज्ञान भक्ती मुक्ती
वाहे रसाळ ही वाणी
प्रतिभेत झळकती
दिव्य सोनियाच्या खाणी
अमृतातें जिंकणारी
रसवंती वाहताहे
माझ्या मायमराठीचा
ध्वज सदा उंच राहे
माथा चरणी टेकिला
भावे करितो वंदन
आशीर्वचे उजळावे
अज्ञानाचे हे जीवन.
भेटता तू (गझल)
भेटता तू सूर माझा भेटला
मोरपंखाचा जिव्हाळा भेटला
चंदनाला गंध आला केशरी
भेटता तू नूर माझा भेटला
मंद श्वासांना मिळाली चेतना
मैफिलीला रंग उमदा भेटला
आसवांची ती कहाणी संपली
सागरा त्याचा किनारा भेटला
ये जरी सर्वत्र अंधारून हे
वादळी वाऱ्यात रस्ता भेटला
रातराणीला आता कळवून द्या
चोरलेला गंध माझा भेटला.
माझा माळवा
जशी दुधामधे साय
जसे सायी मधे लोणी
माझ्या मालवी मातीच्या
तशी अंतरंगी लेणी ॥१ ॥
इथे लोभस पहाट
रात गोंडस जावळी
रूद्र महांकाळ नान्दे
ओंकारही घाटाखाली ॥२ ॥
विक्रमाचे न्यायासन
फुलवीतो क्षिप्रातट
इथे संस्कृता शेजारी
असे प्राकृताचा थाट ॥३ ॥
राजप्रासादी दर्वळे
श्रृंगाराचा रतिरंग
भर्तृहरीच्या गुहेत
आर्त वैराग्य तरंग ॥४ ॥
सांदीपनीच्या आश्रमी
इथे गवळयाच्या पोर
घेता सयुक्तिक ज्ञान
झाला योगेश्वर थोर ॥५ ॥
नांदे पुण्याई अजून
आसमंती अहिल्येची
नसे जाणवली कोणा
वाण कधीच कशाची ॥६ ॥
ऊस हरभरा गव्हास
शेतामधे आला ऊत
डाळ - बाफळ्यांची चव
देई पक्वांनाही मात ।। ७ ।।
गर्द आंबराई मधे
आर्त कोकिळकूजन
येता आषाढाचे मेघ
छान मयूर नर्तन ॥८ ॥
शब्द स्वर रस गंध
इथे भावना उत्कट
माय मराठीचे येथे
वोसंडले मधुधट ॥९ ॥
हीच माती देई जगा
मेघदूत शाकुंतल
ज्ञान भक्ति मुक्ति यांचे
पैलतीरी जाया तळ ॥१० ॥
माझ्या माळवी मातीचा
लावू कपाळास टिळा
स्वस्तिवाचन करिती
इथे रानातल्या शिळा ॥११ ॥
अशा मातीच्या कणाशी
वाटे एकरूप व्हावे
जन्म घ्यायचा असेल
तरी इथेच जन्मावे ॥१२ ॥
पौर्णिमेची रात्र
पौर्णिमेची रात्र आता संपली
मैफिलीची बात आता संपली
काजळी अंधार दाटे या पुढे
जावळी नक्षत्रगाणी आता संपली
हे दिखाऊ बोलणे अन् वागणे
रेशमी जवळीक आता संपली
बन्द दारे, हाक देऊ मी कुणा
साथ शेजारीपणाची आता संपली
वेगवेडी वाहने रस्त्यावरी
वाट पायी चालण्याची आता संपली
वीज जाते सारखी शहरात या
रोशनाईची आस आता संपली
नीतिमत्तेचे कशाला भाष्य हे
ती इमानी लोकदृष्टि आता संपली
स्वैरता स्वच्छंदता चोहीकडे
मानमर्यादा जनातिल आता संपली
ही गति प्रगती म्हणा की दुर्गती
सद्गतीची वाट वाटे आता संपली
दुःख तू वेड्या मना मानू नको
पाहिलेली तू व्यवस्था आता संपली
संकलन : अलकनंदा साने
No comments:
Post a Comment