गोविंद झोकरकर
(२१ ऑगस्ट १९१२ - १२ मार्च १९९५)
गोविंद झोकरकर यांच्या लिखाणात आपल्याला जुनी भाषा आणि शैलीचा सुरेख संगम आढळतो. त्यांनी लेखनाचे वेगवेगळे प्रकार जरी हाताळले असले तरी ते मुख्यत्वे कवी म्हणूनच ओळखले जातात. येथे ज्या कविता सादर करणार आहे, त्या त्यांच्या "अजूनी दिसता गुलाब सुंदर" ह्या संग्रहातून घेतल्या आहेत. संग्रहात प्रुफच्या अगणित चुका आहेत. मी माझ्यापरी सुधारणा केल्या आहेत, तरी जर काही आढळल्या तर अवश्य निदर्शनास आणाव्या, म्हणजे ब्लॉगवर शुद्ध भाषेत संकलित करता येतील.
कै. गोविंदराव झोकरकर यांचा जन्म २१ ऑगस्ट १९१२ रोजी देवास येथे झाला. १९३६ साली देवास संस्थानाच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक या पदावरून नोकरीला सुरूवात झाली.त्याच दरम्यान संस्थानाच्या राज परिवाराचे 'रॉयल ट्यूटर' म्हणून नेमणूक करण्यात आली. नंतर देवास संस्थानाचे प्रिंटिंग प्रेस अधीक्षक म्हणून काम केले.
संस्थानांच्या विलीनीकरणानंतर गोविंदराव झोकरकर यांची ग्वाल्हेरला बदली झाली. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे बदलीच्या ठिकाणी जाता न आल्याने नोकरी सोडावी लागली. या काळात त्यांनी विश्वविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी व इंग्रजी विषयांचे अध्यापन आणि मार्गदर्शन केले.
१९४६ मध्ये देवास संस्थानाच्या राजकवी या पदाने गोविंदराव झोकरकर यांना सन्मानित करण्यात आले.मराठी वाङ्मयात त्यांचे नाव आदराने घेतले जात होते. महाराष्ट्रातील प्रमुख मासिकं हंस, वांङ् मय शोभा, मनोहर, यशवंत, सह्याद्री, ज्योत्स्ना, अंजली वगैरेतून त्यांच्या कविता नियमित प्रसिद्ध होत होत्या. लोकसत्ता व इतर वर्तमानपत्रांतून त्यांचे काही लेखही प्रसिद्ध झाले.
झोकरकरांच्या कामाचा आवाका बराच मोठा होता. त्यांनी विख्यात इंग्रज लेखक ई. एम. फॉर्स्टर यांच्या "पॅसेज टू इंडिया" या ग्रंथाचा लेखकाची परवानगी मिळवून मराठी अनुवाद केला. कै. द.वा.हरणे, नागपूर यांच्या चरित्रकाव्याचे संपादन केले आणि ते १९४४ साली ''स्मृतीकुंज'' ह्या नावाने प्रसिद्ध झाले. १९४७ साली ''स्वातंत्र्य'' ह्या मध्यभारतीय मराठी हिंदी मासिकाचे संपादन केले.त्यांच्या काही कवितांचा मॅट्रिक आणि इंटरमिजिएटच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव केला गेला.
महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरच्या विद्यमाने भरणाऱ्या शारदोत्सवाच्या पाचव्या अधिवेशनात १० नोव्हेंबर १९५१ या दिवशी अध्यक्षपदावरून बोलताना झोकरकरांनी सांगितले की अवलोकन, वाचन, मनन, स्पंदन व आविष्करण या पाच पायऱ्या कविता लेखनात फार महत्त्वाच्या आहेत. खूप पहावे, खूप वाचावे. त्यावर खूप विचार करावा. भावनांचे आवाहन, हृदय स्पंदन करू लागले की त्या तंद्रीत तासनतास दिवसेनदिवस घालवावे आणि एक दिवस ही ह्रदयाविष्करणे कागदावर उतरवावी . गाय वगैरे प्राणी जसे रवंथ करतात तसा भावनांचा रवंथ कवीला करावा लागतो आणि त्यातूनच कवितेचं ईप्सित साध्य होतं.
गोविंदराव झोकरकर यांची साहित्यसंपदा
१.काव्य कणिका (१९४२)
२.टेकडीच्या पायथ्याशी (काव्यसंग्रह १९५१)
३.गोविंद झोकरकर यांच्या निवडक कविता (काव्यसंग्रह १९८२)
४.अजून दिसतां गुलाब सुंदर (समग्र झोकरकर २०१२)
गोविंदराव झोकरकर ११-१२ मार्च १९९५ रोजी उज्जैन येथे होणाऱ्या प्रांतिक मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष होते, पण विधीलिखित वेगळं ठरलं होतं. नेमकं १२ मार्च या दिवशीच त्यांचे आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या मृत्यूनंतर लोकसत्ता वृत्तपत्राने ह्या बातमीची दखल घेतली आणि त्यावेळेसचे संपादक माधव गडकरी यांनी एक हृदयस्पर्शी लेख लिहिला. त्या लेखाचा काही अंश ---
गेली पन्नास वर्षे वेगवेगळ्या वृत्तपत्रातून आणि नियतकालिकातून ज्यांच्या कविता आणि लेख प्रसिद्ध होत असे, असे विसर्जित देवास संस्थानचे राजकवी श्री. गोविंद झोकरकर यांचे दिनांक १२ मार्च रोजी इंदूरच्या एका रुग्णालयात निधन झाले. राजकवी चंद्रशेखर, राजकवी भा. रा. तांबे, राजकवी यशवंत, राजकवी काळेले या परंपरेतील शेवटचा राजकवी काळाच्या पडद्याआड गेला. महाराष्ट्रापासून दूर राहणाऱ्या लेखक-कवींना मराठी रसिकांनी आपले कौतुक करावे असे नेहमी वाटत असते. मुंबई-पुण्यातील सामान्य कवींना जितकी प्रसिद्धी आणि मोठेपणा मिळतो तितका उत्तरेतील लेखक-कवींना मिळत नाही. १९४७ मध्ये मी "क्षितिज" हे मासिक ठाण्याहून सुरू केले तेंव्हा पहिल्याच अंकात गोविंद झोकरकर यांची कविता प्रसिद्ध केली होती. माझे चुलत बंधू देवास मध्ये राहत होते त्यांनी ती कविता पाठवली होती. पुढे देवासला जाण्याचा योग आला. खुणावणारी दोन घरे तेथे होती. एक कुमार गंधर्वांचे आणि दुसरे कवी झोकरकर यांचे. त्यांच्या मृत्यूनंतर दिनांक 9 एप्रिल रोजी मी इंदूर मध्ये होतो. उज्जयनी आणि देवासला जाणार होतो परंतु गेलो नाही. उज्जयनीच्या क्षिप्रेत पाणी नाही आणि देवासला गंधर्व आणि कवीही नाही. मग मनात आले जायचे कशाला ?
दूरवरच्या कवी मित्राला निरोप.
माधव गडकरी (लोकसत्ता दिनांक १४ एप्रिल १९९५)
गोविंद झोकरकर यांच्या निधनानंतर त्यांचे सर्व साहित्य गोळा करून त्यांच्या कुटुंबीयांनी ''अजून दिसतां गुलाब सुंदर'' ह्या नावाने २०१२ मध्ये पुस्तक प्रसिद्ध केले. एकूण ७ खंडाच्या ह्या पुस्तकात त्यांच्या काही कविता, निवडक भाषणे, प्रसिद्ध झालेले लेख, साहित्यिक,मित्र,कुटुंबीय यांच्या ह्रद्य आठवणी,त्यांना आलेली निवडक पत्रे, इंदूर नभोवाणी केंद्रावरून प्रसारित झालेली व्याख्यानं आणि विशिष्ट छायाचित्रं आहेत.
तू आणि मी
तू इंदूची विमल प्रभा मध्यान्हीचे मी ऊन गे
गद्यातले नि काव्य तू पद्यातले मी गद्य गे
गद्यातले नि काव्य तू पद्यातले मी गद्य गे
जुईचे सुकोमल फूल तू कोरांटी काटा मी उभा
लाजाळूची मृदु वेल तू मी वृक्ष चिंचेचा उभा
लाजाळूची मृदु वेल तू मी वृक्ष चिंचेचा उभा
तू गायनी सुरमाधुरी मी ताल ठेक्यातील गे
बागेसरी सुरीलीच तू मी भैरवाचा राग गे
चित्रांतली अरुणच्छटा तू मेघ काळा मी वरी
दंवबिंदू तू सुम-शुभ्रसा मी गार बर्फच फत्तरी
विधुचीच सुंदर तू कला मी डाग काळा त्यावरी
हनुजागीची खळी गोड तू मी तीळ गे गालावरी
हनुजागीची खळी गोड तू मी तीळ गे गालावरी
सरिता विशाल नि मुग्ध तू गे बोलका मी धबधबा
तू शुभ्रवर्णी पौर्णिमा अवसेतला मी कालिमा.
तू शुभ्रवर्णी पौर्णिमा अवसेतला मी कालिमा.
गुराखीण
डोईस दुधाची चरवी आणिक लोणी
वादळी सापडे गुराखीण वनराणी
ती गव्हाळ कांती नेत्र सशाचे भोळे
नाचती कपोली केसही काळे काळे
फडफडे ओढणी पिवळी कुमकुम भाळी
ही मौज बघाया जमे ढगांची टोळी
नसनसी साठली तिच्या नवी मधुज्वानी
कोसळे वरोनि धो धो धो धो पाणी
दातात तिच्या हुडहुडी मुखावर लाली
वृक्षावर हलते जास्वंदाची जाळी
मेघातून कोणी तिजला गारा हाणी
तुडवीत चालली पायी ओहळ पाणी
ह्रदयात तिच्या गुंजते प्रीत बासरी
पवनाची भिरभिर साथ तियेला करी.
कोजागिरी
नव पातली मनमोहिनी सुखदायिनी मधुयामिनी
धवलांकिता कोजागिरी ये आजला प्रियदर्शनी
सरी संपल्या त्या श्रावणी शरदातली ये शिरशिरी
उत्कंठिता वनी धावती दुथडी किती जलवाहिनी
वसनी नव्या हिरव्या सजे ही श्यामला सृष्टी सखी
किती मोर दंग ही नर्तनी बकुळी फुले उन्मादिनी
बसुनी मुदे सौधावरी ज्योत्स्नेमध्ये जन नाहती
कुणी सुस्वरे आलापिती मधुरागिणी सुरमोहिनी
हासुनी कथिति किती गुजगोष्टी प्रेमळ भाषणी
किती आग्रहाने प्राशिती दुग्धामृता ते अर्पुनी
श्रम संपले दिवसाचिये अन् दूर होती काळज्या
संतोषवी हदयात शितल चंद्रिका आल्हादिनी
सण हा करू प्रिय साजरा जोस्त्नामहोत्सव रंगुनी
स्मृती हीच देईल चेतना क्रमया, क्रमण्या पुढे जीवनी.
नवा चंद्र
शब्द जुने जरि अर्थ नवा
विश्व जुने जरि चंद्र नवा
नव्या जुनाचा जुनाच गोंधळ
वृद्ध तरुण हा विचार पोकळ
प्रयोग केवळ बौद्धिक वळवळ
वंश जुना जरि देह नवा
अतर्क्य अद्भुत प्रभूची लीला
खेळ करी तो भुलवी सकला
नर नारी बाहुली बाहुला
मंत्र जुना जरि जादू नवा
जुन्या नव्याची व्यर्थच भाषा
कन्या आशा आई निराशा
बापच कारण पुत्र विनाशा
पाणी जुने जरि पूर नवा
काय नवे नि काय पुराणे
प्रेम नवे की प्रेम पुराणे
कोण शहाणे कोण दिवाणे
रोग जुना जरि वैद्य नवा
मर्त्याला अमरत्व कशाला
नवा व्याप संताप कशाला
जुना चंद्र मग नवा कशाला
मरण जुने जरि जन्म नवा.
श्रांत पथिक
एकलेच यायचे
एकलेच जायचे
मागुती न पाह्यचे
पुढे पुढेच जायचे
कितीक दूर मार्ग हा
कधी न संपणार हा
कधी इथे न राह्यचे,
पुढे पुढेच जायचे.
सगे न सोयरे कुणी
आप्तमित्र ना कुणी
कुणी कुणा न ओळखे,
जगात सर्व पारखे.
न प्रेम, उग्र अग्नी हा
करील भस्म जीव हा
कितीक जीव पोळले,
कितीक देह जाळले.
न्याय नीती आंधळी
शक्ती पांगळी लुळी
किरीट चोर घालतो,
सुळीस साधु चुंबितो.
मनातले कधी जनी
कुणी न पाहि ऐकुनी
एकले कुढायचे,
एकले रडायचे.
कुणास वाहू ही फुले
धरू कुणाची पाऊले
दिसे न देव देऊळी,
जळी स्थळी न कातळी.
जग प्रवास हा बुरा
होय जीव घाबरा
थकोनि अंग टेकले,
अपाप नेत्र झाकले.
कारवान सज्ज
शांत शांत सर्वदूर रात्र देत जांभई
जागून मी वाचीतसे खय्यामची रुबाई
दीप मंद ग्रंथ जीर्ण
वाचन करी मन विषण्ण
चंद्रमौळी घर माझे फाटकी रजाई
दूर देश मी फिरलो
गावोगावी मी रमलो
विश्रांतीस वृक्ष कधी नि कधी सराई
जगण्यास्तव धडपडलो
ठायी ठायी अडखळलो
रंक पूर्वी रंक आज शून्य मम कमाई
रमणी भेट क्षण सुवर्ण
तृप्त नयन मन प्रसन्न
जीवन ग्रीष्मात स्मृती गार जल सुराई
पत्नी पुत्र आप्त मित्र
दृष्टीपुढे पुसट चित्र
दंग सर्व रंगी स्वीय मीच खिन्न राहीलो
जीवन भासे लढाई
हारजीत नित्य होई
नीतिधर्म केवी कसे पाळी हा शिपाई
मोही मुळी न ऐलतीर
दृष्टीपुढे पैलतीर
कारवान सज्ज कधी कूच झाली घाई.
पावसाळी रात्र
चांदण्यांनी गच्च भरले
आकाश तू वरती पहा
पारिजाता बहर आला
आज तू खाली पहा
इंद्रधनू हा डोलतो
तू पहा फिरूनी पहा
शुभ्र हा वाहे झरा
प्रतिबिंब तुझे तू पहा
या गुलाबी पाकळ्या
हळुवार तू दुरूनी पहा
ही पहा आकाशगंगा
तू इथे जवळी रहा
हे असे येती कधी
जीवनी क्षण हे महा
वेल ही वाको स्मृतींची
पुस्तीन भरली ही दहा
पावसाची रात्र आहे
आज तू येथे रहा
मीलनाची आस आहे
आज तू येथे रहा .
कै. गोविंदराव झोकरकरांनी वेगवेगळे प्रयोग करत असताना ''सुनीत'' हा प्रकारही हाताळला . त्या अनुषंगे सुनीतबद्दल काही जाणून घेऊ या.
‘सुनीत’ हा इंग्रजीतील ‘सॉनेट‘ ह्या काव्यप्रकाराचा मराठी अवतार आहे. भावकवितेचा हा प्रकार चौदा ओळींचा एक रचनाबंध असतो.इटालियन वा पीत्रार्क रचनापद्धतीत ह्या चौदा ओळी आठ व सहा अशा विभागल्या जातात. अष्टकात दोन चतुष्पद्या व नंतरच्या सहा ओळींत दोन त्रिपद्या असतात. पहिल्या आठ ओळींत एखादी समस्या मांडली जाते, एखादा प्रश्न उपस्थित केला जातो, किंवा कसला तरी भावनिक ताण प्रकट केला जातो. नंतरच्या सहा ओळींत त्या समस्येची सोडवणूक केली जाते, प्रश्नाचे उत्तर दिले जाते वा भावनिक ताण सैल केला जातो. ह्याला कलाटणी म्हणतात.
शेक्सपिअर वा अन्य इंग्रजी पद्घतीच्या सुनीतरचनेत सुनीतामधल्या चौदा ओळींची विभागणी बारा व दोन अशी असते. पहिल्या बारा ओळींत ज्या विचाराचा, भावनेचा वा कल्पनेचा परिपोष करीत आणला असेल, त्याला शेवटच्या दोन ओळींत कलाटणी दिली जाते. सुनीताच्या १४ ओळींची विभागणी कशीही असली, तरी अर्थदृष्ट्या सुनीताचे दोन भाग सघन वा भरीव असतात. सुनीताचे अर्थदृष्टया महत्त्व ह्या घनतेमध्ये वा गांभीर्यामध्ये असते.
मराठी सुनीतरचनेचा पाया केशवसुतांनी घातला. त्यांनी चौदा ओळींच्या ह्या रचनाप्रकाराला ‘ चतुर्दशक ‘ असे नाव दिले. ‘मयूरासन आणि ताजमहाल’ हे त्यांचे पहिले स्वतंत्र सुनीत होय.भा. रा. तांबे यांनीही काही सुनीते लिहिली. गोविंदाग्रज, बालकवी आणि बी ह्या कवींनीही काही सुनीतरचना केल्या. मात्र सुनीताचा विशेष पुरस्कार आणि निर्मिती रविकिरण मंडळातील कवींनी केली. रविकिरण मंडळातील एक प्रमुख कवी माधव जूलियन् यांची १०१ सुनीते ''त्यांचे तुटलेले दुवे'' या संग्रहात एकत्रित केलेली आहेत. १९४० नंतर सुनीतरचनेचे प्रमाण मराठी काव्यात कमी होत गेले.१९६० च्या सुमारास मराठी नवकवितेत विंदा करंदीकर यांनी मुक्त सुनीते लिहून या काव्यप्रकारात प्रयोगशीलता व नावीन्य आणले. त्यांनी तेरा वा पंधरा ओळींची सुनीतरचना केली. दिलीप चित्रे यांनीही काही मुक्त सुनीते लिहिली आहेत.
(माहिती स्रोत : विकासपीडिया)
हे पुण्य की पाप हे
(सुनीत)
लागे भूक मुलास धान्यकणही नाही घराभीतरी
दुःखी बाप मलूल बंद गिरणी बेकार राही घरी
नाही सर्पण ना दिवा गळतसे कौलार डोक्यावरी
पोरे झोंबती आईला अहह, ती वैतागली अंतरी
येईल रात्र दयामयी निजविण्या निर्धन धनिकाप्रती
आई बाप उपाशी आणि मुलगे आक्रंदूनी झोपती
झाली आणि पहाट बाप उठला आई उठे मागुनी
गेले बाहिर काहीसे उभयही चित्तात संकल्पूनी
पोरे ती उठली उसासती किती पोटी भुकेची कळ
दादा त्यास म्हणे चला मजसवे आणून पायी बळ
गेले मागून बंधूच्या नि शिरले बागेत शेजारच्या
भाज्या आणि फळे खुडून अणिली चोरून माळ्याचिया
कापी बाप खिसे नि द्रव्य मिळवी अनिष्ट की इष्ट हे
चोऱ्या आई करी घरास्तव तशा हे पुण्य की पाप हे.
आत्मनिवेदन
(ही कविता खूप मोठी आहे. त्यातील काही वेचक कडवी इथे देत आहे.)
हासत आलो मी जन्मभर हासत राहीन मी
हासत हासत काळा संगे अंती जाईन मी
पैशाचा मोह नसे मज कीर्तीची हाव
एकच इच्छा प्रेमसागरी पोहो मम नाव
खाण्याची भ्रांती मिळे नच अल्पही विश्रांती
परी आनंदी ठेवूनि वृत्ती वावरतो जगती
आप्त मित्र माझे सकलही साह्यर्थी यांचे
धन्यवाद मानतो ढकलितो संस्कृतीचे ओझे
काव्याच्या प्रांती विहरतो स्मृतींच्या सांगाती
सुंदर सत्य नि शिव तत्वांचा पूजक मी जगती
खोट्याची चेष्टा करीत मी ढोंगाचा द्वेष्टा
आत्मवंचना मुळी रूचेना सीधा मम रस्ता
कलेमध्ये रमतो सदैवही काव्यकृती रचतो
मनोराज्यी परि सदा रंगुनी गुंग धुंद असतो
एकच दृढ श्रद्धा असे मम निसर्ग जगी सत्ता
मानव त्याचे असे खेळणे रंक असो शास्ता!
अजून दिसता गुलाब सुंदर
अजून दिसता गुलाब सुंदर
हळूच वाटते खुडून घ्यावा
आणि चेहरा सुरेख दिसता
अजून वाटते वळून पहावा
अजून ताजी बालिश वृत्ती
अजून फुटते ओठी हासू
अवचित बघुनि कारुण्याला
अजून येती नयनी आसू
अजून हिम्मत कष्ट उपसण्या
कमी न झाली फाके मस्ती
लक्ष काळज्या जरि कपाळी
तरीही सुचती गमती जमती
खिशात नाही एक कपर्दिक
आणिक साखर उद्या चहाला
अवीट गोडी हास्य रसाला
अजून लज्जत श्रृंगाराला
आजाराची झोंबाझोंबी
करीत मृत्यूला मुजरे द्यावे
अजून वाटते मूर्ख मनाला
खूप जगावे! खूप जगावे!!
संकलन : अलकनंदा साने
No comments:
Post a Comment