Friday, July 15, 2022

 


भालचंद्र राजाराम लोवलेकर 

(२ऑक्टोबर १९११– २४ जून १९४५)

माळव्यातील सुंदर निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तिथल्या या रमणीय परिसराची शब्दचित्रे रेखाटणारे  कवी भालचंद्र लोवलेकर हे मूळ इंदौरचे. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १९११ रोजी एका मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात झाला पदवीधर झाल्यानंतर लोवलेकर संस्थानी  नोकरीत लागले. त्यांचे बहुतेक आयुष्य इंदूरातच गेले. तिथेच विवाह, अपत्य लाभ  या घटना घडल्या. नोकरीत बदली झाल्यामुळे ते महेश्वर या गावी एकटेच जाऊन राहिले. तिथे असतानाच त्यांना कॉलरा झाला आणि तडकाफडकी काही तासांच्या अवधीतच २४ जून १९४५ रोजी मरण आले.

भालचंद्र लोवलेकर गेल्यानंतर त्यांचे स्नेही हिन्दी - मराठीतील नामवंत लेखक प्रभाकर माचवे यांनी बडोदे येथून प्रसिद्ध होणाऱ्या ''अभिरुची'' मासिकाच्या ऑगस्ट अंकात त्यांच्यावर एक हृदयस्पर्शी लेख लिहिला. एकोणीसशे बेचाळीस साली ''अभिरुची'' या लहानशा पण चोखंदळ मासिकात लोवलेकरांच्या कविता प्रसिद्ध होत असत. ह्या मासिकात लिहिणारे अनेक लेखक नंतर नावारूपास आले. त्यापैकी मं. वि. राजाध्यक्ष,पु. ल. देशपांडे, गंगाधर गाडगीळ,व्यंकटेश माडगूळकर, शांता शेळके वगैरे काही ठळक नावं आहेत. लोवलेकर यांचे निधन अल्पायूत झाले आणि त्यांच्या जीवित अवस्थेत पुस्तकाचे प्रकाशन होऊ शकले नाही. ते गेले त्या नंतर इंदूरमधील त्यांचे चाहते व मित्र यांनी "लोवलेकर स्मारक मंडळ" स्थापन केले. ह्या मंडळाने  १९५३ साली त्यांच्या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती  प्रकाशित केली होती. ह्या पहिल्या आवृत्तीसाठी ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांची प्रस्तावना लाभली होती.

जीवाला खडबडीत हिरा म्हणणारे भालचंद्र लोवलेकर यांच्या चोरलकाठ ह्या काव्यसंग्रहाच्या  पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना  वि.स. खांडेकर यांनी लिहिली होती. प्रस्तावनेत ते म्हणतात की लोवलेकर जातिवंत कवी होते. आयुष्य लाभलं असतं तर तांबे, बालकवी आणि गोविंदाग्रज यांच्या परंपरांचा सांभाळ त्यांनी चांगल्या रीतीने केला असता. त्यांना कल्पकतेचे देणे चांगले मिळाले होते. एखाद्या पाखराची गोड किलबिल ऐकू येते न येते तोच ते भुर्रकन उडून जावे तशी लोवलेकरांच्या बाबतीत मराठी रसिकांची स्थिती झाली. 
२०.११.५३  

प्रथमावृत्ती हातोहाती संपली. त्यानंतर त्यांच्या काहीशा दुर्मिळ झालेल्या या कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती काढण्याचा विचार मध्यप्रदेश मराठी साहित्य संघाच्या कार्यकारिणीने केला. त्यांच्या कवितांची हस्तलिखितं मिळवून आणि त्यातून कवितांची निवड करून या कार्याला साहित्य संघाने मूर्त स्वरूप दिलं, त्यात सर्वश्री माधव साठे, माधव जामदार, डॉ. चंद्रकांत पांढरीपांडे यांचा विशेष सहभाग होता. या संग्रहाची दुसरी आवृत्ती ही केवळ पहिल्या आवृत्तीची पुनरावृत्ती नाही. एवढे मात्र नक्की आहे की पहिल्या आवृत्तीतील साऱ्याच कविता, दुसर्‍या आवृत्तीत समाविष्ट केल्या असून पहिल्या आवृत्तीत नसलेल्या पण काही मासिकातून प्रकाशित झालेल्या आणि अप्रकाशित कवितांचाही यात समावेश केला गेला आहे.      

रविकिरण मंडळाच्या काळात कवी लोवलेकरांची कविता महाराष्ट्रातील अनेक मासिकातून प्रकाशित होत होती. सुप्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांचे तर ते विशेष आवडते कवी होते. दुसऱ्या आवृत्तीसाठी शांताबाईंनी  प्रस्तावना लिहून दिली आणि इतकंच नाही तर परिश्रमपूर्वक जुन्या मासिकातून  लोवलेकरांच्या प्रसिद्ध झालेल्या परंतु प्रथम आवृत्तीत नसलेल्या कविता मिळवून दिल्या. दुसऱ्या आवृत्तीसाठी  लोवलेकरांच्या मुलांनी सर्वश्री अंशुमाली, विश्राम व डॉक्टर किशोर यांनी अतिशय आनंदानं स्वीकृती दिली, एवढेच नव्हे तर यासाठी लागणारा सर्व आर्थिक भारही आनंदाने उचलला.  ह्याच कवितासंग्रहाची दुसरी आवृत्ती 1994 साली प्रसिद्ध झाली. त्याला शांताबाई शेळके यांची तब्बल १५ पानांची प्रस्तावना लाभली. प्रस्तावनेत शांताबाई म्हणतात की लोवलेकर वयाच्या 34 व्या वर्षी जग सोडून गेले. त्यांचे व्यावहारिक आणि कौटुंबिक जीवन चारचौघांसारखेच होते. एक संसारी माणूस म्हणून लोवलेकरांनी तसे सरळ साधे जीवन व्यतीत केले पण आपल्या या अत्यल्प आयुष्यात कवी म्हणून, कलावंत म्हणून त्यांनी जे काही संपादन केले ते फार वैशिष्ट्यपूर्ण आणि लोवलेकरांच्या अंतरंगाचा स्पष्ट परिचय करून देणारे असे आहे. ते अंतर्बाह्य आणि अभिजात कवी होते. वर वर साध्यासुध्या दिसणाऱ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाआड जातिवंत रसिक आणि अस्सल प्रतिभाशाली कलाकार दडलेला होता.
१९९४
 
भालचंद्र लोवलेकरांच्या वृत्तीत कलावंताचा बेछूट कलंदरपणाही होता. इंदौरमधील आपल्या बि-हाडाच्या माळ्यावर संथ  बेफिकीरपणाने हुक्का ओढत बसणाऱ्या लोवलेकरांचे,प्रभाकर माचवे यांनी ह्रद्य वर्णन केले आहे. लोवलेकरांचा दुसरा छंद म्हणजे निरुद्देश फिरणे. मित्रांबरोबर ते इंदौर भोवतालच्या परिसरात मैल न मैल फिरत. दूर दूर भटकत आणि एखाद्या आवडीच्या ठिकाणी बसून सोबत असलेल्या मित्रमंडळींच्या बरोबर तास न तास गप्पा मारण्यात रंगून जात. असेच एकदा इंदौरच्या राहुल बारपुते इत्यादी मित्रांबरोबर फिरत फिरत ते जवळ जवळ २२- २३ किलोमीटर लांब असलेल्या महू पर्यंत गेल्याची त्यांची आख्यायिका सांगितली जाते. आपल्या जीवनातला हा धुंद कलंदरपणा लोवलेकरांनी कवितेतही पुरेपूर उतरवला आहे. 

लोवलेकरांच्या कविता वाचताना त्यांचे पहिले वैशिष्ट्य जाणवते ते म्हणजे त्या कवितेतील एक धुंद उत्फुल्ल मनोअवस्था. 'तरुण मनाची उनाड गाणी गाणारा शाहीर' असे जे एका कवितेत त्यांनी वर्णन केले आहे ते स्वतः त्यांनाच चपखलपणे लागू पडते. लोवलेकर ऐन तारूण्यात कविता लिहू लागलेत आणि तारुण्यातच त्यांचा लेखनप्रपंच आटोपला. त्यामुळे या कवितेत प्रौढ वयातील परिपक्वता आणि चिंतनशीलता जरी उतरलेली नसली तरी तारूण्यातला जीवनोल्लास मात्र भरपूर भरलेला दिसतो.

लोवलेकरांच्या निसर्ग कविता आणि प्रेम कविता जितक्या रम्य उत्कट आहेत त्यामानाने इतर विषयांवरील त्यांच्या कविता परिणामकारकेत काहीशा उण्या पडतात. भोवतालचे समाज जीवन लोवलेकर बघत होते त्या संबंधी त्यांच्या काही प्रतिक्रियाही होत होत्या. धर्मविषयक चिंतनही त्यांच्या काही कवितांत प्रकट झाले आहे. परमेश्वराबद्दलची आपली भावना व्यक्त करताना लोवलेकर म्हणतात "मी अदेववादी"

लोवलेकरांच्या शैलीच्या संदर्भात थोडा विचार करायला हवा. या शैलीची शब्दकळा, तिची प्रतिमासृष्टी यात एक अनोखे वेधक सौंदर्य आढळते. माळव्यातील रहिवासामुळे लोवलेकरांच्या कवितेत हिंदी मराठी मिश्रित शब्द व शब्दसंगती यांचा वापर अनेक ठिकाणी झालेला आहे. मकराण, आरस्पान, आंधी, रंग-बिरंगी, मेहताबा, खुमार,अदा असे खास हिंदी वळणाचे शब्द त्यांच्या कवितेत सापडतात.

लोवलेकरांचे काव्य जवळजवळ पंचाहत्तर वर्षांपूर्वी लिहिले गेले. या मधल्या काळात आशयापासून ते आविष्कारापर्यंत, भाषाशैलीपासून ते प्रतिमासृष्टीपर्यंत मराठी कवितेत अनेक परिवर्तने होऊन गेली. ती अंतर्बाह्य बदलली. हे सारे संस्कार पचवलेल्या मराठी काव्यरसिकाला आता लोवलेकरांचे काव्य कसे वाटते ? आश्चर्याची गोष्ट ही की आजही लोवलेकरांच्या काव्याची जादू अम्लान राहिली आहे असे प्रत्ययास येते. ते अकाली गेले. कवितेची बीजे त्यांच्यात नुकती अंकुरू लागली होती. त्यांचा विकास अद्याप झाला नव्हता. त्यामुळे परिपक्व चिंतनशीलतेचा, जीवनविषयक वास्तविक भूमिकेचा या कवितेत अभाव आहे. काळाच्या ओघात लोवलेकरांची कविता एका विशिष्ट जागी स्थिरावली आहे, हे मात्र नक्की.

ह्या कविता सादर करताना लोवलेकरांची माहिती त्यांच्या काव्य संग्रहातून आणि इतर भाष्य संग्रहाच्या द्वितीय आवृत्तीसाठी शांताबाई शेळके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतून घेतले आहे.


 अंबरवात

अफाट उघड्या मैदानात 

या टोकाहुनि  त्या टोकास

असा सारखा चोविस तास

फिरे झिंगला अंबर वात 


पूर्वेच्या खांद्यावर हात 

दुजा पश्चिमाराणि करात 

 पिंगा घेई गाणे गात 


आकाशाला लावी हात

 पाय हालवी उन्मादात 

मजेदार हसे झोकात 


हिरव्या गवतावरती पाय 

अल्लद टेकुन चालत जाय

 ज्वारीची थरथरते पात 


क्षितिज रवी तो कंपे खात 

खुळ्या जिवाच्या या मेण्यात 

आशेची थरथरते वात 


वातावरणी मेघ उदास 

श्वासांवरती विरली आस

 वारा झुलवी हातोहात 


या टोकाहून त्या टोकास 

असा सारखा चोवीस तास 

फिरे झिंगला अंबरवात.


वेळूवनामाजी

वेळूवनामाजी
उंच वृक्ष झुंडी 
वेडा वायू धुंडी 
काहीतरी.

गंगाराणी नाचे 
भेदरला शशी 
थैमान आकाशी 
घाली वारा. 

एखादा एकाकी 
जळचर धावे 
पिंजुनी हेलावे 
वाऱ्यावरी.

पिंपळाची पाने 
सळसळा वाजती 
फडफडा फाटती 
रानकेळी.

झुडुपाच्या आड 
भागुबाई ससा 
रोखितो उसासा 
बाळदृष्टी. 

चिरीकपारित 
लहानुले मासे 
थोर बळी खासे 
खेळतात. 

लाटांचे लोळण 
वरी ताराकण 
धावे रागावून 
नागसेना.

नावेला खलाशी 
कमालीचा जपे 
त्याची राणी झोपे 
गोड गोड. 

आली एकदाची 
किना-यासी नाव 
भिंतीसी रिघाव 
नाही आता. 

पिळदार बाहू 
दगडाची छाती 
आलिंगी एकांती 
चुंबी डोळे.



चोरलकाठ

चोरलकाठ
पाउलवाट 
हळुहळु जाईल श्यामा राणी 
घाटावर आणाया पाणी 

हरळी दाट 
मऊ सपाट 
झिम्मा झिम परि फुगड्या फेरी
स्वच्छंदाने कधी दुपारी 
जमुनी खेळती बुज-या पोरी 

उंच उजाड 
पिंपळ झाड 
ढौळी फांदी आणुनी बांधी 
नवा नारळी जाडा दोर 
झोके काढिल अल्लड पोर 

कपिला गाय
डौली जाय 
शेपुट चवरी अलगद फेरी 
फिरेल वळवित मालवणात 
खुळ्या प्रितीची गाणी गात 

झुरुमुरु धार 
दूध चिकार 
भरून कटोरा अहीर गोरा 
देता डोळा बोटे चार 
'नको नको' चा नाजुक मार 

सहज मधून 
दिसलि म्हणून 
चंचल पाणी मोहक छाया 
खुपरे डोळे रोखुनी कोणी 
पाहत राहील जंगलराणी.    



मंदिरात

तुझ्या मंदिरात
वाद्यांचा गजर
दीपावली थोर
आरासली.

तुझ्या मंदिरात
तुला ओवाळिती
करीती आरती  
उच्च स्वरे.

तुझ्या मंदिरात
भक्तजन गाती
मंत्रून टाकिती
पुष्पाक्षता.

तुझ्या मंदिरात
तुझेच सोहाळे
तुझ्यारुपी डोळे
स्थिरावती.

माझ्या मंदिरात
देव नाही कोणी
अंधाराची राणी
वेरझारी.

माझ्या मंदिरात
नि:शब्द शांतता
नाही ओवाळीता
कुणा कोणी.

माझ्या मंदिरात
मानवी दुःखांची
अश्रूपुष्पे साची
वर्षतात.

माझ्या मंदिरात
कशाचे सोहाळे
कुणासाठी डोळे
हपापले.     



गगन


 चिराश्चर्य !  वर उंच  गगन! 


चवथीच्या ठसक्याची चंद्रकोर 

फेकिले सारखे स्नेहदोर 

धवल रम्य ते त्वरित जलद 

अवगुंठिति नभ अलगद 

स्वप्न रुचिरा धरा 

नि स्मृतीचा कंप उरा 

एकांतिक आसमंत गहन गहन ।।१।।


गोंगाटी  शहर उरे मैल दूर 

उन्मादित चुंबनरव ये मधुर 

वाळवंटसा सरे दिवस 

कवळिती दृढ बाहुपाश 

स्वच्छ चंद्रप्रभा 

नि विवस्त्र तनुशोभा 

उल्लंघिति  विप्रलंभ रमणी रमण ।।२।।


मध्यरात्र पडशाळेची किनार 

उंच उभ्या लिंबाचा जीर्ण पार 

जीवव्याधीने क्रांत पथिक  

अर्धशुद्ध नि:श्वास क्षणिक 

भंगे से जीवपात्र 

नि चांदणी फुलेरात्र 

गगनाची आळवी दे मरण मरण ।।३।।


डोहावर नर्मदा प्रवाह संथ

नि चांदरात ही शोभिवंत 

ये दूर दूर देवालयीन 

गंभीर घोष अत्यंत क्षीण 

मुक्त चिंता जरा 

तंद्रिलता ये शरीरा 

व्यर्थच उच्छृंखल मन करि चिंतन ।।४।।



मांडवगड

फिरवावे हल्ले प्रबळ शत्रूचे ज्यांनी
त्या जीर्ण भंगल्या दगडी द्वार कमानी 
उभे दुतर्फा उंच तरू
भेटवा वांछिती गगन धरू 
चालून वर ये वाटसरू 
विस्तीर्ण पठारी इतिहासाची छाया 
अन् थंड भुयारी जल निर्मल प्राशाया 
पर्वती वर्तुळे हिरवी कमललतांनी 
मांडूनि जिंकेले जळी नभाला त्यांनी 
मधे एकटी कमळकळी 
कडेस बगळा मीन गिळी
लांब टेकडी रांग निळी 
चौफेर पसरले खांब आणि खिंडारी 
प्रासाद सावली संथ हले कासारी 

सोनेरी पिकल्या भुरक्या गवतवनात 
खिल्लारे चारीत बाळभिल्ल ये गात 
हंबरतो गोवत्सगळा 
आकाशाचा साज निळा 
प्रसन्न मांडवगड सगळा 
हे मध्येच उठती उंच घुमट पाषाणी 
सांगती युगांना अपुली मूक कहाणी 
 
भुईटेक  माजले शिताफळांचे रान 
ह्या उगीर प्रांती माळ खगांचे गान
शिखर बिंदूला रुपमती 
करी दृष्टीला विहगवती 
प्रदेश धूसर लांब किती 
किरणात झिंगला सांजवायू बेभान 
आसमंत घुनवी रहस्यमय हो रान 

माथ्यावर काळा माठ नेसणी लाल 
भिल्लीण मृगाक्षी निर्भय ठुमरी चाल 
निवांत जागी पाणवठा 
बुडुम बुडुम रव स्पष्ट घटा 
प्रतिरवती मग दगड विटा 
ह्या प्रचंड दगडी शाही महालापाठी 

शेवाळे थिल्लर मांडी हिरवी दाटी.


सरितेकाठी 


उन्हात बसून सरितेकाठी शांत रवंथ गुरे करिती
किलकिल करुनी डोळे मंजुळ जलनादी मन गुंगविती

पिसाट वारा शुद्धित येउनी सभ्य चाल धरि संथ अशी 
वृक्षमुळीवर डोके टेकुनि गोप झोप घे हवी तशी 

चंचल नीरा अचळ काळसर शिळा बघे, घेई बांक 

तुटल्या झिजल्या कड्यावरुनी किडा करीत 'माती टाक'


अलगद वरच्यावरी काढुनी दिसतील ना दिसतील जळी 
अशा बांगड्या दावूनि झाकुनि हळूच चाले नादकली 

मऊ मऊ अन हिरवी तुडवी नवी नवी गवती पाती 
खोड वडाचे दगडी गोटे पाहुनी बिचके मात्र अती 

बाजुबाजुनी जाई त्यांच्या सावरीत लवचिक तनु 

मनासारखा प्रियकर मिळता खुशाल उधळी इंद्रधनु 


काठावरून तरणाताठा आम्रतरू कलवी फांदी 

जलभालासी हळू नजराणा करी बिजोरा अन बिंदी 


परंतु बघुनी आपली छाया विस्कळलेली पाण्यात 
'पुढेच जा तू कपटी राणी' म्हणून फिरवी मग हात 

तळमळणारा किरण रवीचा पाण्यामाजी घेइ बुडी 

ताप जाहला शीतल, चम् चम् झाक मात्र पडली उघडी 


लिंबावरुनी झर्रकन् उतरे गदर बावळी लिंबोळी 

निवांत लहरीवरी नदीच्या किरणासंगे नाच करी 


दोन ओंजळी पिउनि पाणी गवळ्याचा तरणा पोर 

मुंडासे करि नीट, सावरी काठी, मिशांची पिळे कोर 


शिरावली घेऊनी गाठळी विळा घेऊनी हातात 

पुढती टाकी पाय प्रिया, तो तिच्या सवे आनंदात 


खिल्लारांना मधेच चक् चक् करुनी वळतो आणि मग 

फिरूनी उरते तिशी बोलता तिचे आणि त्याचेच जग.




नीर संथगति


नीर संथगति, खाली दिसते तळ भिंगावाणी 

वरी लांबशी फांदी आली डोलत मृदुपर्णी 


दो बोटांमधि लांब धरुनिया रुमाल की हिरवा 

कुणी नवती अप्सरा पातली नाच करी बरवा 


वायु वाहवी मंदमंदशा लहरी तरल अशा 

की स्वर्गीचा देवदूत करि गाऊनी साथ जसा 


गगना मधूनी हेमकरी हा करी वादनाला 

छेडूनि तारा सारंगीच्या सारंगीवाला 


अहा! हालली पाने नव ती कोमल शाखेची 

करांगुल्या नाचल्या नर्तकी हावभावनाची 


हावभाव की अदा करूनिया छुमछुमली 

पाने चिवचिव हसली कलकल 

खिदळत हलली मोदाने.




ताज्या सारवलेल्या भूमीवर 


ताज्या सारवल्या भूमीवर जशा अक्षदा लाख हजार 

तशी पसरली नभांगणावर ही नक्षत्रे अपरंपार 


गडद तमाच्या भेसुरतेचा भर्पूर भरलेला बाजार 

काय दाखवायाला केला लख् पक् रत्नदिव्यांचा हार 


सुपीक काळी मध्ये पेरली ज्वारबिजे ही रुचिराकार 

वाट न्याहळित हंगामाची अंधाराचा हा कृषिकार


चिमुरडी 


लावुनि जिभेला घडी घडी शिसपेन 

का कपाळ अपुले दाविसि पत्र लिहून 


पहाल का करते कसे लुकलुके डोळे 

हज्जार मेलीला हवे कराया चाळे 


नकलात जाहली अशी एक तरबेज 

या चिमुर्डीस हो कशास लिहिण्या मेज 


पहा कशा भोवया केल्या या वाकड्या 

अन् थेट नाकिच्या मोठाल्या करी पुड्या 


जरी अजून चारही पुरते नाही वय 

खपणार नाही हजेरीत जर हयगय.




मी अदेववादी 


मी अदेववादी माणूस, कसली पूजा करविता ?


देवळात कुठला देव ? 

विश्वास मनुष्यस्वभाव 

सब देवबीव थोतांड  

कोठला कर्ता करविता ? 


चौगर्दी भाविक लोक 

गातात सुरावर एक 

पण ह्रदयामधला सूर न मिळता 

सर्व कपटपटु  बाता ! 


संशयात जीवन झाले 

भिरकवी तबक भरलेले 

अन तडक निघून 

उतरुनि पायऱ्या गाठावी सरिता. 


बस्स! नको अता देऊळ 

धर्माचे तसले खूळ 

चुळबूळ मनाची निरवि 

कुठे ती समाधान-वनिता !




पटांगणामधि रंग बिरंगी


पटांगणामधि रंग बिरंगी मेहताबा 

उरी धरीशी का मशाल जळकी तू बाबा

काबा, विष्णू विठ्ठल सारे कृष्णतम

 तेज: स्मृतीची कबर, तोच झाला धर्म 


चिंचराईतिल चिंचोळी माझी वाट 

मळलेली, मलमल सदरा मुंडे छाट 

गोखरूमय पंथावरचा वाटसरू 

वहाण नाही वाहन कुठले ! काय करू?


ओढ्या माजी पाऊस धारा पडणार 

ढवळून वरती माती माती येणार 

नयनांमधूनि ओघळणाऱ्या अश्रू सरी 

ह्रदांदोलनी आशा रक्षा मातकरी 


घरभर भिरभिर उडालाच हा पाचोळा 

निरर्थ आशा फडफडते चिंधीचोळा 

असतील भोळ्या दुनियेचे सारे देव 

खरे निराशा मंदिर, तेथे मद्भाव !



जीव जावो, राहो जीव जावो, राहो एक भाव माझा ह्रदयीचा राजा सिंहासनी. सारे दैवफळ किडाळ जहाले तरीही न हाले निश्चयो हा. रोष,तोष-भाषा लोप झाला आता दूरवावी व्यथा याचना ही. उचलली लाथ मस्तकी झेलीन गुणगानी लीन होईन मी. भवितव्य राहू आशा-शशी ग्रासी तरी पायापाशी चित्त राहो. आभाळाचे नीळ कोसळो का शिरी प्रेमाची फकिरी अनुस्यूत. चित्ताचा चंडोल चढे वरी वरी नाकारीत शिरी विंधू नको. कोवळ्या मनाचा त्रिखंडात डंका पटे दाद रंका मिळाल्यास. त्वदंगणी माझे ह्रदय शिंपण स्वार्थाचे तर्पण मनोभावे.

हा असा पुढे जाणार हा असा पुढे जाणार ।
बघू द्या कोण मला धरणार? घन घाट वनश्री ह्रदयी।
सौंदर्य रत्न जे राही।
शोधात तयाच्या जाई।
हुडकुनी तया लुटणार।। हिमगिरी प्रदेशी स्वैर।
भटकण्यास होइ तयार।
उत्तुंग शृंग चढणार।
आनंदरसी न्हाणार।। नभचुंबित दृमराशीचे।
पर्ण पर्ण हिंडुनि साचे। गहन गूढ विश्वांतरिचे।
उकलुनी करणार।। खग समूह उंचच उंच।
उंचाहुनि अतिशय उंच।
उडतात वासुनी चोच।
मी साथीदार होणार।। सरितापति शांत प्रशांत।
शांततेस नाही भ्रांत। बुडि घेत अफाट जलात।
मी शांतिमधे विरणार।। रात्रीच्या रंगमहाली।
माणिके नि मोती ल्याली। नव इंदुकला जी सजली।
मी तीत लीन होणार।। काळोखकळी उमलून।
श्री उषाराणी आतून।
अरुणास बघे हासून।
ते हास्यच मी होणार।। खग पुंज युक्त शाखांना।
किलकिलाट कुहुकुहुताना
ऐकताच मन मानीना।
किलबिलाट मी होणार।। सुप्रभात वायु मंद।
तटतटा तोडी ह्रद् बंध। चहुकडेहि धुंदच धुंद।
धुंदीत धुंद होणार।। वाऱ्यावर होऊनी स्वार।
ब्रम्हांड फोडुनी पार।
हुडकीन शून्य बडिवार।
जे अगम्य ते घेणार।। मेघांची उडती गादी।
त्यावरि मम होय समाधी।
मोहनता मन साधी।
मी प्रसन्न मग होणार।। शून्याहून खाली असलो।
शून्यासी फोडुनी घुसलो।
शून्य गोलि रमलो भ्रमलो।
तिथुनही पुढे जाणार।।

संकलन : अलकनंदा साने

No comments:

Post a Comment

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...