Sunday, January 1, 2023







पराग देशपांडे

(९/९/१९४६ - - २/२/२००१)


  पराग देशपांडे यांच्या आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही आणि बरेच प्रयत्न करून देखील ती मिळवता आली नाही. त्यांच्या कवितांचं वैशिष्ट्य असं की बहुतेक कविता त्यांनी पोपट ह्या पक्ष्यावर लिहिल्या आहेत. पराग देशपांडे यांच्याबद्दल जेव्हा ज्येष्ठ कवी अरूण म्हात्रे  यांना कळलं तेव्हा त्यांनी त्यांचं पुस्तक "शुकसंवाद" प्रसिद्ध करण्याचा मानस व्यक्त केला आणि त्या दृष्टीने हालचाल सुरू केली. अरूण म्हात्रे यांनी पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की


"त्याचा शुकसंवाद....’’


 मुंबईतून मध्यप्रांतात गेलेला आणि नंतर तिथेच स्थायिक झालेला पराग देशपांडे, हा केवळ भौगोलिक अंतरामुळेच महाराष्ट्राला नि मराठीला अपरिचित राहिला.
 तसा त्याचा स्वभाव अबोल, गर्दीत न मिसळण्याचा वागणं खानोलकरी आत्ममग्न आणि लीन. कवितेत तो बालकवींसारखा निरागस निराश. वातावरण सुटलं नि कदाचित, त्यानं इंदूरमधलं सुप्रसिद्ध नेहरु उद्यान आपल्या विरंगुळ्याचं ठिकाण बनविलं. पहाट, त्या उद्यानात पोपटांच्या कलरवांनी उजळते नि संध्याकाळही, त्यांच्याच चित्कारात विरते. त्या बागेने, त्या राव्यांनी, परागला जिवंत ठेवलं. धगधगत ठेवलं.  त्याच पक्ष्यांच्या थव्यांशी पराग देशपांडेने केलेला संवाद तोच हा  शुकसंवाद."

दुर्दैवाने हे पुस्तक प्रकाशित होण्या आधीच पराग देशपांडे यांचे अकाली निधन झाले. 

पराग देशपांडे यांच्या बद्दल जी अल्प माहिती आहे त्याप्रमाणे त्यांचा जन्म  मुंबई येथे झाला. ते मुंबईतच लहानाचे मोठे झाले. सत्तरच्या दशकात  सुप्रसिद्ध हिन्दी नाटककार मोहन राकेश यांचे गाजलेले  नाटक "आधे अधूरे" इंदौरला खेळले जाणार होते तेव्हा जेष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांच्यासोबत प्रथमच ते इंदौरला आले.  पराग यांनी नाटकात काम केलं होतं का किंवा त्यांची काही भूमिका त्या नाटकात होती का याबद्दलही काही माहित नाही. त्यावेळेसच बहुधा त्यांना इंदौर आवडलं आणि ते १९७९ मध्ये इंदौरलाच स्थायिक होण्याच्या दृष्टीने परत आले.  इंदौरला त्यांनी स्क्रीन पेंटिंगचा व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स, मुंबई येथील पदवी होती. त्यांच्या ह्या कलेचा सकारात्मक उपयोग इंदौर येथील शंभर वर्षांहून जुनी संस्था महाराष्ट्र साहित्य सभेत झाला. म. सा. सभेचा  सुरेख लोगो पराग देशपांडे यांनी बनवला. त्यासाठी महाराष्ट्राचे त्या वेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते पराग यांना सन्मानित करण्यात आले होते . 

 त्यांना प्रकृती बद्दल विशेष प्रेम होतं, निसर्गासोबत राहणं त्यांना आवडत असे. फाईन आर्टच्या पदवीचा स्क्रीन पेंटिंग मध्ये त्यांना भरपूर उपयोग झाला आणि त्याच दरम्यान नव्वदच्या  दशकात ते कविता लिहायला लागले. त्यांचा मुलगा आल्हाद  त्यावेळेस अगदी लहान साधारण चार-पाच होता. ते त्याला घेऊन इंदौर येथील नेहरू पार्क मध्ये जात असत आणि तिथेच त्यांना शुकसंवाद सुचला. ते ओंकारेश्वरला जाऊन नर्मदा किनारी बसून पाण्याचा आवाज मनसोक्त ऐकायचे. उडणाऱ्या पक्षांना पाहून नि त्यांचे आवाज ऐकून ते  सुंदर कविता लिहीत असत. पराग देशपांडे यांचं अक्षर देखील अत्यंत सुंदर होतं. कवीवर्य अरूण म्हात्रे यांनी त्यांच्या ''शुकसंवाद'' पुस्तकात ह्या सुंदर अक्षरांचा सुरेख उपयोग केला आहे. पहिल्या आणि शेवटच्या मलपृष्ठावर त्या कवितांचे काही अंश जसेच्या तसे छापले आहेत.एक आजाराचं निमित्त होऊन २ फेब्रुवारी २००१ला  त्यांचे अवेळी निधन झाले आणि मराठी भाषा एका अप्रतिम साहित्यिकाला मुकली. 

१.
नेते कविताच दूर 
आणते कविताच जवळ 
आपल्यापासून आपल्याला 
कवितेच्या लागवडीत असलेली 
मनातली भूमी 
तेवढ्यानेच तृप्त चिंब होते 
आणि तेवढ्यानेच तडकते 
मरूभूमीतल्या संतप्त
वाळवंटा सारखी 

डोळ्यात तहान नसते 
पायात भान नसते 
तेव्हाच कविता फिरवत असते.

२.
हा तळ्याचा काठ आणि 
ही लहर बंदिस्त त्याची 
सांगते अवघी कहाणी 
संपलेल्या पावसाची 

आटला आहे जिव्हाळा 
माणसातील माणसाचा 
सांगण्याचे टाळले तू 
कोण माझा मी कुणाचा 

गच्च भरला माळ हिरवा 
हा तरुंनी वेढलेला 
दाट चिंचाचा पसारा 
हा फुलोरा वाढलेला  

आमराई किर्र आहे 
निलगिरीचे रान भवती 
जांभळ्या रंगातूनि ये 
पूर्णतेला आज भरती 

वाकली झाडे मुळाशी 
पायथ्याशी प्रीत आहे 
पाखरांच्या धुंद ओठी 
या तळ्याचे गीत आहे 

हा तळ्याचा काठ आणि 
ही लहर बंदिस्त त्याची 
सांगते आहे कहाणी  
भोवतीच्या वैभवाची.



३.
थांबून थांबून ओरडत राहतात 
ओरडून ओरडून थांबत राहतात
स्वतःभोवती गदारोळ करीत राहतात
गदारोळातून पुन्हा उभी राहतात

गदारोळ विस्कटला की विस्कटून जातात 
विस्कटलेल्या छिन्नभिन्न स्वरात 
कसले गीत गात असतात 
त्यांचे सुस्पष्ट आवाजभोवती उमटत असतात
लकेरींवर लकेरी उठतात आणि थांबतात
यातच ती कुठेतरी असतात. 
एखाद्या उण्यादुण्या स्वरानेच 
ती आपले व्यक्तिमत्त्व उभे करीत असतात.

पाखरे स्वतः गात असतात 
पाखरे स्वतःभोवती गात असतात.

४.
तूच ओरडत होतास का 
पाखराच्या रूपात 
बागेतल्या झाडा आडून 
राहून राहून 
तुझा उत्साही चित्कार 
फांद्यांमागून 

किती उत्साहाने 
चित्कारतात ही पाखरे 
घोळक्या घोळक्याने पानांमागून 
कसा थकवा जाणवत नाही 
शीण वाटत नाही 
अव्याहत चित्कारणाऱ्या 
या पाखरांना 

आणतात तरी कुठून 
ही पाखरे 
इतका दुर्दम्य उल्हास 
गोठवून टाकणाऱ्या भर हिवाळ्यात 
कार्तिका-शिशिरातल्या 
उद्दाम काकुळतीच्या काळात 
अजीजीने करुणा धरावी 
जिजीविषा टिकविण्यासाठी 
असल्या कठोर हंगामात 
पावसा-वसंताच्या 
हर हंगामी फुलत्या ऋतूत 
चढत्या उतरत्या मोसमात 
किती सातत्याने चित्कारत असतात 
ही पाखरे 
भोवती आनंदाचे अनाहत 
कवच ठेवून 

कधी कधी वाटतं 
असलासच तू तर 
यातच असशील.

५.
कसं जगावं उदासवाणं 
हे फांदीवरल्या 
एकट्या पाखराला कळतं 
रंगांचं उदासवाणं इंद्रधनुष घेऊन 
पाखरांनी यावे बंड करून 
जसा वादळी वारा येतो उधळून 

मनातले खोल पाखरू 
उदासवाणे बसलेले असते 
कधीचे शीळ घालीत पाखरांना 
भोवती पाखरांच्या घोळ बराच असतो 
पण कोणी धजत नाही 
जवळ यायला 
फांदी फांदीवर 
बसतात पाखरे निमूटपणे 

त्यांचा वाऱ्यावरही आवाज नसतो 
तसा त्यांचा पत्ताच नसतो कुणालाही 
गाणे बंद करून 
बसलेले असतात निरागसपणे 
ही अद्वैती पाखरे 
यांचे कुणाशीच वैर नसते 
फांदीवर झुलताना 
ऐसपैस बागडत असतात 
तेव्हा यांचे रूप डोळ्यात भरावे 
असे असते 
कुठल्यातरी दूरच्या 
राखीव चित्रात पाहिल्यासारखे 

पंखातून इंद्रधनु छटा 
उलगडत जाणाऱ्या वायूचे 
हिरव्या वर हिरवे तळ 
वर पुसट काळ्या रेघांचे वाहते जळ…

६.
आज पक्षी दूर येथून जाऊ दे 
फक्त हे आभाळ सोबत राहू दे

माघ भरले जर्द हळवे उन हे 
गर्द पसरून भोवताली राहू दे

लाल पाचोळा फुलांचा रांगता 
पाय त्याचे या इथे रे वाजू दे

तळमळीने वाहू दे वाहता प्रहर 
बिंब त्याचे या इथे रेंगाळू दे 

आणि या शेजेवरी हिरव्यातृणी 
जांभळा भवबंध ऐसा राहू दे

आज पक्षी दूर कोठे जाऊ दे 
आभाळ हे नुसतेच वरती राहू दे

७.
पहिल्या पहिल्या वाऱ्यावर 
गळून पडणाऱ्या 
या बागेतल्या 
सोनेरी फुलांनाही 
अजून आयुष्य हवे होते 
टपटपून सोडून देतात 
जशी झाडे आपल्या कुशीतून 
तसे गळणे नको होते 

कोकिळेच्या गुंतागुंतीच्या 
त्या तशा त-हेवाईकपणात गुंतून 
अजून  झुलणे हवे होते 
दाही दिशांच्या प्रतिकात्मक केसर रानातून 
अजून अक्षय मूळजड हवे होते 

सुकुमार देहाच्या पंचकोशातून 
अजून फांदीला बिलगणे 
लहरणे हवे होते 

गर्द राईत दडल्या फांदीआडच्या 
कोकिळेचे कुहूकुहूचे 
जीवन गाणे हवे होते 

वाहत्या कंठाच्या 
मदहोश पाखरांच्या 
धुंद अव्याहत मादक 
कुहूकुहूची स्वर कंपने 
देहावर कोरीत 
अजून तसे धुंद बहरणे हवे होते 

वाऱ्यावर घुसळत्या 
मुलायम मोरपिशी 
नक्षीच्या सोबती पानांचे 
आल्हाद स्वप्निल वासंती लयस्पर्शी 
लहरणे हवे होते.

८.
अ.

तू असशीलच यावर 
विश्वास तरी कसा ठेवावा 
तू नसशीलच 
आता तळ्यावर गूढ 
शांतता पसरतेय 
सर्व दृश्य माझ्यासमोर 
विलय पावणार आहे 
मला एकट्याला अंधारात 
गूढ अचल निर्दिष्ट ठेवून 

तू नसशीलच ! 

आ.

न पेक्षा तुला शोधणे 
दिगंतरी 
दिग् भ्रमित होऊन भटकणे 
इतस्ततः इथे तिथे 
ठायी ठायी …

जर तरचे मुलामे लेपून 
तुला शोधणं शक्य नाही 

असलासच तर तू 
इथे कुठेतरी असशीलच !

९. 
ते झाड मुक्याने फुलले ते झाड तोडले कोणी 
जे उभे इथे झोकाने ते झाड तोडले कोणी 

जे बहराने थबथबले जे शाखांनी गजबजले 
जे झाड एकटे जगले ते झाड तोडले कोणी 

पक्ष्यांची गजबज होती चोचींची चिवचिव होती 
आनंद निखळ देणारे हे झाड तोडले कोणी 

पानांना सळसळ होती सुखशीतल हिरवळ होती 
जे हसले आनंदाने ते झाड तोडले कोणी 

हे झाड इथे रुजलेले ते झाड तोडले कोणी 
जे उभे इथे झोकाने ते झाड तोडले कोणी

१०.
पोपटी चित्कार मजला आज उमगू लागले 
या मनाच्या पार पोचून वेध घेऊ लागले 

सांजवेळी शब्द त्यांचे आज उमजू लागले 
एकट्याने काय मजला भान देऊ लागले 

झाड वठले एकटे हे स्तब्धसे शिशिरात 
या सांजवेळी दाटताना पान ढळू लागले 

चार रावे राहिले होते तिथे फांदीवरी 
समजुनी माझ्या मनातील गीत गाऊ लागले.

११.
तळ्यावरी बोबडी उन्हें की 
हळू रांगती कोवळी मुले ही 

पायसम अवघ्या पृष्ठाला 
चमचमता दिपदिप उजाळा 

बोट फिरवुनी अलगद त्याचा 
वर्ख कुणाला टिपता यावा 

तळ्यावरी एकांत अबाधित 
साऊलवसती असते जेव्हा 

बाळबोध शाळेतील हळवी 
स्मृतीत जपली कविता तेव्हा 

पडछायांचा निळा ताजवा 
अंकित होई मनात तेव्हा 

ध्रुपद झाले सरमिसळींचे 
ऊन तळ्यावर अभंग दिसते 

तळ्यावरी बोबडी उन्हे ही 
जणू कोवळी लाल फुले ही....

संकलन : अलकनंदा साने

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...