Tuesday, June 27, 2023











 
प्रफुल्लता जाधव

(२१ जानेवारी १९३०----)




देवास म्हणजे जिथे देवांचा वास ! या देवभूमीत असंख्य हिरे विखुरलेले आहे. पद्मविभूषण कुमार गंधर्व, उस्ताद रज्जब अली खाँ, भा. रा. तांबे, राजकवी गोविंद झोकरकर, कवी नईम, चित्रकार अफझल आणि इतर.. या सुवर्ण इतिहासामुळे देवासला "कला नगरी" पण म्हणतात.  याच कला नगरीतील एक माणिक्य डॉ. प्रफुल्लताताई जाधव.  कै. मेजर जनरल अनंतराव सडेकर पवार, बडोदे यांची कन्या. देवासचे प्रसिद्ध वकील कै. शरदचंद्र जाधव यांची पत्नी. राजघराण्यातील जन्म झाल्या मुळे तसेच भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि बडोदे येथे शिक्षण (दहावी पर्यंत) झाल्या मुळे साहित्याचा विराट वारसा. प्रफुल्लताताईंची कविता लिहिण्याची एक विशिष्ट शैली होती. विविध विषयांवर, बोलीभाषा वापरून पण त्यांनी काव्य रचले आहे. प्रफुल्लता ताई जाधव यांचे प्रकाशित साहित्य म्हणजे, चार कविता संग्रह 'गान गुणगुण' , 'मुक्तांगण', 'शब्दरंग' व  'मुक्तरंग', कथासंग्रह 'सत्यम् वदामि' यात सत्यकथांचा समावेश आहे. कादंबरी 'गोकुली'.याशिवाय 'वसंत' 'अनुराधा' या मासिकातून मुंबई येथून कथा प्रकाशित झाल्या आहेत. हिंदी साहित्यात पण 'कोविद्' ही उपाधी प्राप्त. काव्य, वाङ्मय, समीक्षा, संशोधन, इतिहास, चित्रकला इत्यादी त्यांचे छंद आहेत. आकाशवाणी इंदौर वर नियमितपणे काव्य गायन, नाट्यलेखन समीक्षा व व्याख्याने दिली. प्रफुल्लता ताई जाधव यांनी संत एकनाथांच्या एकंदर वाङ्मयांत व विशेषतः त्यांच्या अभंग, गवळणी, भारुडे, रूपके यासारख्या स्फुट रचनांत व्यक्त होणाऱ्या भक्तिभावाचे स्वरूप , यात ना. ग. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली १९७८ मधे पीएच.डी. केली. 

 प्रफुल्लताताईंचा दृष्टिकोन व्यापक आहे, प्रकृती प्रेम, हळुवार पणा, नाजूक शब्दात विचारांची गुंंफण आणि प्राणिमात्रांसाठी  करुणा हे त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्याच शब्दात.. "शब्दांची सीमा उत्तुंग असावी, दिशेच्या पलीकडे, समुद्रापार ती जावी. शब्द केवळ शब्द नसावेत. रंग, रूप, रस, गंध यांनी चैतन्यशील झालेल्या शब्दांना अशी अनुभूती यावी की आकाशाची पुसट निळाई शब्द रंगात तन्मय व्हावी. कधी या शब्दांतून गुलाबाची ऋजुता अनुभवाला यावी व कधी यावी मनाच्या गहन गुहेत समाधिस्त बसणाऱ्या योग्याची गहनता." 
प्रफुल्लता ताईंनी काही व्यंग्य कविता पण केल्या आहेत. 'मुक्तरंग' हा त्यांचा व्यंग्य काव्यसंग्रह. या संग्रहाला देखील कवी फ. मु. शिंदे यांची प्रस्तावना लाभली आहे. या संग्रहात प्रफुल्लता ताईंनी आपला नेहमीचा बाज बाजुला ठेवून, खणखणीत शब्दांत समाजाच्या शोषक वर्गावर शाब्दिक प्रहार केला आहे. 

देवास मधे त्या जाधव दीदी या नावाने प्रसिद्ध होत्या. त्यांच्या एक विद्यार्थी अंजली मोघे ज्या सध्या पुण्यात लेखिका व प्रूफ रीडर आहे, सांगतात, "जाधव दीदी म्हणजे एक शांत, सोज्वळ व्यक्तिमत्त्व. अतिशय हुशार. जाधव दीदींनी ज्ञान संपादनासाठी, समाजकार्यासाठी व साहित्यासाठी स्वतः ला वाहून दिले होते. बरीच वर्षे त्यांनी मल्हार स्मृती मंदिर, देवासच्या वरच्या माळ्यावर एका गॅलरीत स्नातक विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवण्या घेतल्या. तेथे त्यांच्यासोबत राजकवी गोविंद झोकरकर पण आम्हाला शिकवायचे. मी त्यांची लाडकी विद्यार्थीनी होते.त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एकुणच मला खूप फायदा झाला. आतिशय हळूवार बोलून, खूप छान समजावून शिकवायच्या. त्यांचा जन्म राजघराण्यातला. त्यामुळे ते तेज ते अदबीने वागणं ती लकब त्यांना भेटल्यावर सहज लक्षात येते. विद्यार्थ्यांना देखिल 'आपण' म्हणून संबोधित करत होत्या."

प्रफुल्लता ताईंची राधाकृष्ण संबंधावर प्रकाश टाकणारी कादंबरी गोकुली ही २००१-२००२ मध्ये उत्कृष्ट वाङ्मय रचना म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाद्वारे पुरस्कृत केलेली कादंबरी आहे. फक्त काल्पनिक कथा  किंवा ऐकलेल्या कथा नसून अकरा वर्षे संशोधन करून, सखोल अभ्यास करून प्रकाशित होणारी ही कादंबरी आहे. या दरम्यान प्रफुल्लता जींने १४ वेळा बरसानाला  (राधेचे जन्मस्थान) जाऊन ऐतिहासिक पुरावे गोळा केले व या आधारे ही कालजयी कादंबरी लिहिली. कादंबरीच्या शेवटी राधेचे व यदुवंशाचे विस्तृत वंशवृक्ष दिले आहे, सोबत छायाचित्रे पण आहेत. खंत आहे की ही कादंबरी खूप लोकांपर्यंत पोहोचली नाही, पण वाचकांनी ह्या कादंबरीला 'ययाती' च्या समांतर ठेवले आहे. अशा या प्रतिभावंत कादंबरीकार स्वतःच्या  कादंबरीत म्हणजे 'गोकुली'त राधे बद्दल लिहितात की राधेचे कृष्णप्रेम आणि कृष्णाचे राधाप्रेम हे रहस्यच राहिले. पुढे त्या सांगतात, मथुरा, वृंदावन, महावन, नंदग्राम, बरसाना या आसमंतात जेव्हा राधेचा शोध घेत विचरण्याची ओढ लागली, तसे राधा अधिकाधिक स्पष्ट होवू लागली. आत्म्याला काही गोष्टी अचानक पटू लागल्या आणि राधेचे कृष्णाच्या प्रेयसीचे चित्र पार पुसले गेले. त्या सांगतात, "कर्मण्येवाधिकारस्ते" हा चिरंतनाचा शोध कृष्णाने लावला आणि राधेने त्याच तत्त्वाचा त्या आधीच शोध घेतला आणि ती कृष्णाची पूजनीया झाली. 

जाधव दीदींचे सुपुत्र श्री दिलिप जाधव यांच्या कडून जी माहिती मिळाली त्या प्रमाणे,जिथे त्या स्नातक विद्यार्थ्यांसाठी वर्ग चालवत होत्या, त्याच जागेवर नंतर त्यांनी तळागाळातील मुलांच्या शिक्षणासाठी 'ज्ञानकुल' ही शाळा सुरू केली. देवासचे प्रतिष्ठित व्यक्ती उदाहरणार्थ राजकवी झोकरकर, आशा डोंगरे, ढोबळे बाई इतर त्या शाळेत शिकवायचे, मुलांना संस्कारित करायचे. याच संस्थेतून महाविद्यालयीन कन्या संस्थेचे वर्ग संचालित करून स्वउपजीविका करणाऱ्या मुलांमुलींसाठी इंग्रजी व हिन्दी माध्यमाची माध्यमिक शाळा संचालित केली. खरंतर ही शाळा आजच्या शाळांसारखी लाभार्जनाच्या उद्देशाने सुरू केली नव्हती, गरजू, निम्न वर्गीय मुला मुलींना शिक्षित करणे हाच एकमेव उद्देश होता. जाधव ताईंनी चाळीस वर्षे 'ज्ञानकुल' या संस्थेचे संस्थापन व संचालन केले. त्यांच्या जवळ आजही ज्ञानाचा अखंड झरा वाहतो. आता त्या खूप थकल्या आहे, पण अजूनही उत्साह दांडगा आहे. त्र्याणवेच्या वयात आजही प्रफुल्लता ताईंचा भारदस्तपणा, वक्तशीरपणा कायम आहे. मध्यल्या काही काळात प्रफुल्लता ताईंनी त्यांच्या घरातच नि:शुल्क वाचनालय पण सुरू केले होते. 

"शब्दरंग" या काव्यसंग्रहाला फ. मु. शिंदे यांची प्रस्तावना लाभली आहे. ते म्हणतात "डॉ. प्रफुल्लता जाधव यांच्या 'शब्दरंग' उत्सवात स्मृतिजत्रेचीही आरास आहे. ही आरास सागराला धरेशी जोडून घेणारी तर आहेच, इंद्रधनूच्या ईप्सित यासारखी रचनेतील मुकेपणाइतकीच बोलकीही आहे." 


१. कधी तरी अन् कुठे तरी !

कधी तरी अन् कुठे तरी 
स्पर्श एकदा असा घडावा
निशिगंधाचा गंध हवेने
झुळुकेमध्ये कैद करावा 
कधी तरी अन् कुठे तरी ॥ १ ॥

आकाशाने असे बघावे 
की धरणीला कंप सुटावा
मूक मनोहर भावरंग ते
क्षितिजावर क्षणभर उमटावे
कधी तरी अन् कुठे तरी || २ ||

व्यवहाराचे नाट्य नसावे
खोल जिव्हाळा झिरपत जावा 
अन् जीवनाला ओल असावी
शब्द मनातून निथळत यावा 
कधी तरी अन् कुठे तरी ।।३।।

सागरास अशी भरती यावी 
चंद्रानेही असे हसावे 
की भरतीच्या लाटेचीही
गोड गोडशी लटपट व्हावी 
तरंगातही रंग भरावा
एक पौर्णिमा अशी असावी 
कधी तरी अन् कुठे तरी ।।४।।

वारा वाहे रुण झूण रुण झूण 
लाटांच्या पायांतही पैंजण 
चंद्ररसाची मत्त मदिरा 
पिऊनी जळाला शुद्ध नसावी 
कधी तरी अन् कुठे तरी ॥५॥ 

२. अनामिक

कधी कधी हा पहाटवारा,
कुण्या सखीवर का रुसतो?
दूर कुठे तर सौधावरती वरती,
पक्षी जोगीया का गातो?

कधी कधी हा गुलाब हसरा,
उदासवाणा का होतो ?
कुण्या अनामिक स्मृतिदंवाचा,
थेंब पाकळीवर गळतो,

कधी मयूर नाचता धुंद नत
होत अचानक का रडतो ?
कुण्या अनामिक स्मृतिदंवांचा
थेंब मातीला गंधवितो..

कधी पूर्व फलकावरी रंगे
अरुण केशरी चित्रभूमी  
सूर्य ढळावा आणि गळावा
कुशल कुंचला करांतुनी

कुण्या झोपडीत हृदयकणांचा
उद दरवळे एकांती
कधी हृदय होतसे शिळा
मग हृदयफुलांची हो माती,

कधी कधी हा गुलाब हसरा
उदासवाणा का होतो?
कुण्या अनामिक स्मृतिदंवाचा
थेंब अविरत ओघळतो.

पंडित कुमार गंधर्व ह्यांचे कबीरचे निर्गुणी भजन हा ताईंचा जिव्हाळ्याचा विषय.. एक महान व्यक्तिमत्त्व दुसऱ्या महान व्यक्तिमत्त्वाबद्दल कसे व्यक्त होते, याचे उदाहरण म्हणजे, पद्मविभूषण कुमार गंधर्व यांचे अभिनंदन व मानपत्र समारंभात रचलेले हे गंधर्वगान…

३. गंधर्वगान

हा रंग संगीताचा शब्दांत उतरला
अव्यक्त आकृतीचा घनश्याम रंगला
भृंगही मधूचा आस्वाद विसरला
उंच घेत ताना पुष्पांत पहुडला ।। १ ।।

नाजूक लपेट घेत तो एक विरळ मेव  
नाजूक थरांत विलीन ती तानवलय रेव  
अस्मान धरूनी आणतो कधी पृथ्वीचाच ताल  
कधी पृथ्वीचाच कंठा त्याच्या गळी बहाल ||२||

मोठा प्रचंड मेघ घनघोर बरसतो
कधी सूर्यकिरण रेखांची नक्षी सजवितो
कधी 'हळूच कवडश्याच्या तो झोत फेकतो
कधी संगीताची रूपे अनंत रेखितो ।।३।।

चंद्राघरी अतिथी बनुनी ती उंच तान
गिरक्याच घेत जाई होई तिथेच लीन
तृप्ता हळूच येई वाऱ्यावरून खाली
गाफील अशी ही मैफिल ती तर तिच्याच जागी ।।४।।

कधी चंदनी झुल्यात
तो सूर झुकत राही कोषात रेशमांच्या स्वरतंतू विणत राही
ते तंतू अंतरिक्षी गंधर्वगान गाती
आकंठ पान करूनी मदिरा न संपविती
क्षितिजावरूनी दूर गंभीर हाक येई
व्यक्ती उरे न तेथे पण विश्व झुलत राही ।।५।।

पं. कुमार गंधर्व यांच्या बद्दल व्यक्त होताना प्रफुल्लता ताई म्हणतात -- गोपालकृष्ण मथुरेला जन्मले, पण साध्याभोळया गोकुळाला धन्य करून गेले. आमचे महान आनंदयात्री कुमारजी सुळभावीला कर्नाटकात जन्मले, पण राहिले नांदले देवासला. त्यांची कीर्ती साऱ्या लौकिक परिसरात पसरली. लौकिक जग त्या स्वर्गीय अलौकिक संगीताने भारले. 
(ही कविता त्यांनी पं. कुमार गंधर्व यांच्या पुण्यतिथी ला सस्वर सादर केली होती)

४. एके दिवशी प्रातःकाळी....

एके दिवशी प्रातःकाळी 
यमुनेचा घट कोसळला
गोकुळीचा तो विरहमेघ 
अन्ती आनंदा घेऊनी गेला 
नयन कडांवर चामुंडेच्या 
सुन्दर मोती ओघळला 
मंगल दिन म्हणता म्हणता 
तो सूर-सूर्य मावळला
दिव्य देवीच्या चरणापाशी 
दिव्य सुरांच्या स्वरराशी
सूर हरवता सुरतगरीचा 
देववासी रे वनवासी
एके दिवशी प्रातःकाळी ||१||

कधी तरी अन् कुठे तरी 
गंधर्व गेय इथले रचतो
कधी तरी अन् कुठे तरी 
देववास इथला घडतो
कुमार भाग्याचा अमृतघट 
भानू रश्मीच्या शिरी धरितो 
वसुंधरेच्या करी अर्पुनी 
अमर अभिन्ता साधियतो
एके दिवशी प्रातःकाळी ||२||

रूप अलौकिक गहन गंभीरा 
प्रस्तरी चामुंडा रमते 
तिच्याच चरणी पद्मविभूषित 
कुमार आयन विराजते
भानुकुलाच्या वास्तूतून 
ती गुलाबगंधा दरवळते
शारदीय कौमुदी इथे 
गुणगुणत गीत-घट भरते
एके दिवशी प्रातःकाळी ||३||

इथे मीरेचा मुरली मोहन 
मनभुवनी आनंदवनी
एकतारीच्या ताली गाते 
झीणी झीणी चदरिया बीनी
तुलसीचा उत्तराखंडही 
मालव मातीला कचला
रघुवीर की सुध आयी 
रामरस-रंगी रामप्रभू रमला
एके दिवशी प्रातःकाळी.. ||४||

वीजवाऱ्याची अनोखसंगी 
सप्तसुरी गायनी कळा 
मंजुघोष तो चिरंतनाचा 
अमरत्वाचा रत्नाकिळा 
योगचक्रते मनसुंदरीचे 
अनहद ढोल नगारे नभीचे
वणवण फिरतो मस्त कबीरा 
गुण आलापी निगुर्णीचे 
एके दिवशी प्रात:काळी ||५||

कुमारांची विश्रामस्थली ही 
देववास साधक नगरी  
साधी निरलस महान सिद्धी 
आनंदाच्या वनभुवनी  
द्वार उघडता मनसुंदरीचे 
अनहद ढोल नभी घुमला 
सुळेभावीचा साधक कीर्ती 
व्यापून दशांगुळे उरला 
एके दिवशी प्रातःकाळी ||६||

५. राधा

वृषभांच्या कंठी घुंगरमाळा, 
रुण झुण करिती राधा राधा 
भूमीवरती वलयाकृती धावित 
चक्रे कोरली राधा राधा

अपर्ण शाखांतून अडकते
भूतवाऱ्याचे जीर्ण वस्त्र ते
उरले सुरले धागे दिसती 
कवळुनी घेता फुटली छाती 

धुळीत हिरवी पाने शोधीत
दिसली मजला एक भ्रमिष्टा 
कदंब वृक्षातळी कर्दमी 
खेळत होती राधा राधा

निलकंठी मयुराशी बोले
मेघांच्या ओंजळीत झोले
नयन कडांवर कालिंदीचे
जलघट उपडे विरह नदीचे

जळ ते रायाण कामिनीचे
की निष्पाप शैशवाचे
जळते मृदूल बालभावाचे
की कृष्णबालराधेचे

अर्थ यातुनी निघतो साधा
चक्रे बोलती राधा राधा 
जगात सारे शून्य असावे
शून्य वर्तुळी कृष्ण असावे 
विलीन होता वर्तुळरेषा 
कृष्णानेही राधा व्हावे 

वृषभांच्या कंठी घुंगरमाळा
रुणझुण करिती राधा राधा 
भूमीवर वलयाकृती धावीत 
चक्रे कोरली राधा राधा 
अर्थ यातुनी मिळतो साधा
 युगायुगातून एकच राधा ।।

६. गोपींचा कृष्ण

गोपींचा कृष्ण 
जेव्हा गीता सांगतो 
तेव्हा प्राजक्ताच्या 
पाकळ्यांतून गंध बोलतो 
चंदनवनात चांदणेही 
हळूच उतरते 
आणि अंतर्मनातला नाग 
चंदनाचा संग सोडून 
समाधिस्थ  बसतो.

विराट रूपात तो लपेटतो 
नितळ आकाश-वस्त्र 
कधी-कधी वाटते 
ते त्याने मला द्यावे 
पण माझ्याही मनात 
एक आकाश आहे 
अन् त्यात 
जेव्हा चांदणे उतरते 
तेव्हा आकाशाच्या 
नील गंगेत 
मी नावाचे कुणीही नसते 
आणि तेव्हाही 
अंतर्मनातला नाग 
चंदनाचा संग सोडून 
समाधिस्थ बसतो. 

तो जेव्हा अध्यात्माची 
भाषा बोलतो
ती भाषा मला कळत नाही, 
त्याने केलेला विश्वाचा खेळ 
तर मनाला मुळीच पटत नाही 
पण माझी बोबडी भाषा 
त्याला समजते 
माझा पोरखेळही 
त्याला आवडतो 
पण तेव्हा तोही लहान असतो, 
मीही लहान असते 
सूर्याची आग 
तेव्हा स्फुल्लिंगात सामावते 
आणि अंतर्मनातला नाग 
चंदनाचा संग सोडून 
समाधिस्थ  बसतो.

अनेक कल्पांचा हा धावता रथ
सारथी मात्र तोच आहे 
चालला आहे, चालला आहे 
कुठे जातो माहीत नाही, 
मार्ग मात्र संपतो आहे 
अंतर्मनातल्या नागाची, 
जात कशी अस्सल आहे, 
की विषालाही धारण करून 
कृष्णाला पूजतो आहे, 
गीतेलाही डंख मारून
समाधिस्थ  बसतो आहे!

७. शांत व्हा शांत व्हा

ऑफिसर बनून बॉस व्हा 
नक्कल करून पास व्हा 
हा पीरियड तर सैतानाचा 
शांत व्हा शांत व्हा 
अभ्यासाचे दोनच विषय
 (राजकारणाचेही तसेच)
कुणाला चढवा कुणाला बुडवा 
चढत्या आणि उतरत्या भाजणीत
कुणाला घडवा कुणाला सडवा 
कुणी कुणाचा कान कापतो 
हे गणित चुकू नका 

अभ्यास करतो कारखानीस 
पास होतो फरनांडीस 
हसता काय....? 
कष्टाच्या या मूर्तीला 
भंगल्यावाचून उपाय नाही 
लाच द्यायला पैसे नाहीत 
साथ द्यायला कुबुद्धी नाही 
भास्कराचार्य झोपले आहेत 
तोवर सारे समजून घ्या  
आपण आपली जुनी माणसे 
आधुनिक गणित कळायचे कसे ?
दिवस पहा मान पहा 
हा विषय इथेच सोडा 
शांत व्हा शांत व्हा  

काळजाची सिच्युएशन 
सरळ असेल तर उलटी करा 
कारण उलटे काळीज 
भक्तीलाही युक्ती देते 
भोळ्या भावड्या तुमच्यासारख्या कोंबड्याचाही धर्मासाठी बळी देते
दान म्हणून धनधान्याचा 
पर्वतसुद्धा रचला जातो
स्वाभिमानी सज्जन गरिबाघरचा पोर 
नेमका येथेच चिरडला जातो
म्हणूनच म्हणते, 
सिच्युएशन उलटी करून 
स्वामी व्हा बुवा व्हा 
हा पीरियड तर सैतानाचा 
शांत व्हा शांत व्हा।

८. आकार

भावांना आकार येतो 
आणि शब्द बनतात 
शब्दांना आकार येतो 
आणि काव्य होते 
दगडांना आकार येतो 
आणि शिल्प बनते 
पण माणसाला आकार येतो 
तेव्हा काय होते?

कधी-कधी तो शिष्ट बनतो 
कधी-कधी बुद्धही होतो 
आणि कधी तर माणूसच 
माणसाचा आकार बिघडवून टाकतो! 
आणि म्हणत असतो की 
नवा घाट असाच हवा 
नवा आकार असाच हवा 
आणि तेव्हा.....

पशूंना वाटते, 
किती सुंदर आकार ! 
अगदी आपल्याच सारखा
माकडे म्हणतात, 
आता परत आमच्यात आले! 
वाघ, चित्ते समजतात 
की सावज आता टप्प्यात आले
सिंह तर माणसाला 
माणूस म्हणून खातच नाही 
मच्छर म्हणून सोडून देतो

आणि… 
तेव्हा मच्छरालाही वाटते 
किती सुंदर आकार! 
अगदी आपल्याच सारखा
आता हा मच्छराकार माणूस 
माणसालाच चावेल  
माणूस म्हणून जगला तरी 
मच्छरांसारखाच वागेल !

९. एक वाट कंटाळवाणी

एक वाट कंटाळवाणी 
चालायची आहे.. 
पायात गोळे, सांध्यात चमक
वाट ही दुखावलेली
पण तिलाच तुडवीत 
एक-एक पाऊल उचलायचे आहे… 

मधूनच दिसतो एखादा वड
पाखरांची धर्मशाळा 
त्याच्या सावलीलासुद्धा 
मन डोळे प्रणाम करतात 
विचित्र वट, युगायुगांतली विसंगती 
पण तरीही तो असतो 

त्याचे असणेही किती विचित्र 
पानापानांतून सुखाची सळसळ 
पांथस्थांना सुखवीत आहे 
पण त्यालाही एक वाट कंटाळवाणी 
बिन पायाने चालायची आहे.

१०. अनंत

अनंत जन्मी सुगंध भरला 
अनंत पुष्पे जपुनी ठेविला 
गंध खजिना पुष्प रसाचा 
मला मिळाला, मला मिळाला ॥॥१॥ 

प्राजक्ताची फुले बोलती
गंध रूप रस रंग खेळती 
सुवर्ण चंपक गुलाब हसरा 
वैभव रंगी मोर नाचरा ॥२॥ 

पण हे साधे रूप विरागी 
साधी शुभ्रता शुचिता त्यागी
युगा युगाचा अनंत योगी 
सत्यं शिवं सुन्दरम अभोगी ।।३।।


संकलन : ऋचा कर्पे 














    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...