वसंत राशिनकर
( १२ जुलै १९३० - ७ जानेवारी २०१५)
कोण होते वसंतराव राशिनकर ? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून एक सर्वसाधारण माहिती अशी सांगता येईल की वसंतराव राशिनकर यांचा जन्म १२ जुलै १९३० रोजी उज्जैन येथे झाला आणि ७ जानेवारी २०१५ला इंदौर येथे निधन झाले, पण वसंतराव राशिनकर साधारण माणूस नव्हते हे त्यांची ८५ वर्षांची कारकीर्द पाहिल्या नंतर सहजच लक्षात येते.खरं तर जो माणूस जन्माला येतो तो त्याला मिळालेलं आयुष्य आपल्या परीने जगतोच, पण महत्वाचं असतं ते हे की तो कसा जगला.
एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा एक मोठा भाग 'रोजी-रोटी' साठी वणवण फिरण्यात खर्ची पडतो.तो काळ त्यांचाही तसाच गेला, पण त्या दरम्यान सुद्धा त्यांची कलेची उपासना, साहित्याची आराधना चालूच राहिली. एकीकडे काबाडकष्ट करून ते आपल्या मुलांना घडवीत होते, तर दुसरीकडे हात रंगवून मातीच्या गोळ्यांना आकार देत होते.जमिनीवर पाय असलेल्या ह्या माणसाची नजर आकाशाकडे असायची पण हात मातीत गुंतलेले असायचे आणि जेंव्हा ते पाण्याने स्वच्छ व्हायचे, तेंव्हा ह्या हातांमध्ये लेखणी असायची. सच्च्या दिलाचा हा माणूस खऱ्या अर्थाने शारदोपासक होता आणि आपल्या परिसरात 'वसंत' फुलवीत होता.
वसंतराव राशिनकर, फक्त माझ्यासारख्या त्यांच्याहून सर्वच बाबतीत लहान असलेल्यांसाठीच ''अप्पा'' नव्हते, तर त्यांचे समवयस्क, समकालीन अशा सर्वच मंडळींचे ते अत्यंत प्रिय आणि लाडके होते. सहसा असे दृश्य दिसत नाही. एखादी व्यक्ती जेंव्हा जनप्रिय असते, तेंव्हा समकालीन व्यक्तींच्या पोटात नेमका शूळ उत्पन्न होतो. अप्पांशी बोलताना कधीही हे जाणवायचं नाही की त्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी अशा एकूण तीन भाषांमध्ये एम.ए.ची डिग्री मिळविली आहे. अत्यंत निगर्वी वृत्ती. म्हणतात न ज्या झाडाला जास्त फळ असतात, ते झाड वाकलेलं असतं.अप्पा त्याचे प्रत्यक्ष उदाहरण होते.
तीन विषयात प्राविण्य मिळविणं कमी वाटलं म्हणून त्यांनी एम.एड केलं, साहित्यालंकार ही उपाधी मिळवली आणि एव्हढ्यावरच ते थांबले नाही तर ज्योतिष शिकले,वायरलेस इंजिनियरचा कोर्स केला,रेडिओ टेक्निशिअनचा डिप्लोमा घेतला. ज्ञानार्जनाची एक अदम्य लालसा त्यांच्यात होती. नंतर ते खेळांकडे वळले.पोहायला शिकले, बैडमिंटन शिकले,टेबल टेनिस मध्ये प्राविण्य मिळविले आणि बुद्धिबळात चेम्पियनशिप पटकावली.इतकंच नाही तर ट्रक आणि बस चालविणं सुद्धा ते शिकले होते.हे सर्व करत असतानाच स्वकष्टाने साधारण शिक्षक ते व्याख्याता एव्हढा मोठा पल्ला गाठला, पण एकदाही कधी त्याचा उच्चार केल्याचे आठवत नाही. अप्पांचे वडील, ज्यांना आम्ही भैयासाहेब म्हणत असू, पोलिस अधिकारी होते, तरी घरात कडक शिस्तीचे नव्हे तर प्रेमाचे वातावरण होते. आजीच्या प्रेमळ सहवासात वसंतरावांचे रोप फुलले आणि नकळत कविता फुटली,उमलली, बहरली.
सन १९४८ मध्ये इंदौरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवात अध्यक्ष म्हणून लब्ध प्रतिष्ठित साहित्यिक वि.स. खांडेकर होते. त्यांना मांडव बघायला जायचे होते.त्याच दरम्यान धारच्या आनंद कॉलेज मध्ये त्यांचे व्याख्यान आणि सोबत स्थानिक साहित्यिकांचे कवी संमेलन करायचे ठरले. अप्पांचे वडील,भैयासाहेब तेंव्हा धारलाच पोलिस अधिकारी होते. उत्सव समितीचे सचिव, ज्येष्ठ कवी अनंत पोतदार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा अप्पांनी पोतदारांना आपल्या कविता दाखविल्या.त्यांना त्या खूप आवडल्या व ते कवितांची वही खांडेकरांना दाखवायला घेऊन गेले.कविता वाचून खांडेकर म्हणाले-- ह्या मुलालाही कवी संमेलनात कविता सादर करायला बोलवा. अठरा वर्षाच्या एका कोवळ्या वयाच्या तरुणाला खांडेकरासारख्या दिग्गज साहित्यिकाची जी थाप पाठीवर मिळाली,ती एक प्रकारे वरदानच ठरली आणि हळू हळू अप्पांच्या कवितेचा वेलू गगनावरी पोहचला. ह्या वेलीवर नंतर तीन कविता संग्रह आणि एक सीडी अशी फुलं बहरली.अप्पा आपल्या हास्य आणि विनोदी कवितांमुळे लोकप्रिय होते.त्यांच्या या कवितांमध्ये उपरोध सुद्धा जाणवायचा,पण त्यांचे काव्य संग्रह वाचताना हे सहजच लक्षात येतं की अशा हल्क्या-फुल्क्या कवितांपेक्षा जास्त कविता त्यांनी वैचारिक आणि भावनिक ताकदीच्या लिहिल्या आहेत.
राजेंद्रनगर, इंदौर येथील राशिनकरांच्या घरात प्रवेश करावा तर गेल्या गेल्या समोरच भव्य अशी साईबाबाची मूर्ती दिसते आणि मग जागोजागी,खाली वर सगळीकडे अप्पांच्या हातांची करामात पाह्यला मिळते .सुरवातीला ते मातीच्या मूर्ती बनवत असत ,नंतर त्यांनी प्लास्टर ऑफ पेरिस आणि लाकडाच्या मूर्ती देखील बनविल्या.शिवाजी महाराज,देवी अहल्या, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी,इंदिरा गांधी, गजानन महाराज यांच्या एका पेक्षा एक सुरेख प्रतिमा त्यांनी घडविल्या.खरं तर कविता आणि मूर्तीकला ह्यांच्या आधारानं त्यांना नोकरी नंतरच आयुष्य सहज काढता आलं असतं. ह्या भरभक्कम संपत्तीच्या बळावर अप्पांना निर्वेध जगता आलं असतं पण असं शांत जगले असते तर ते 'जगत अप्पा' झाले नसते.
सन १९८९ मध्ये सेवानिवृत्ती नंतर ते इंदौरला आले आणि राजेंद्रनगर ही त्यांनी आपली कर्मभूमी निश्चित करून ''आपले वाचनालय'' सारखी एक अप्रतिम संस्था स्थापित केली.४ मार्च १९८९ रोजी कुटुंबियांच्या मदतीने सुरु झालेलं ''आपले वाचनालय'' हळू हळू ३०० सदस्यांच्या आकड्या पर्यंत पोहचलं आणि पाहता पाहता पुस्तकांची संख्या ५०००च्या वर गेली.ह्या पुस्तक खरेदीसाठी त्यांनी स्वत:ची पदरमोड करून हजारो रुपये खर्च केले, पण वाचनालयातून होणारी प्राप्ती मात्र निराश्रित वृद्धांसाठी खर्च केली.संस्थेच्या नावात जरी वाचनालय असलं तरी, ही संस्था नुसते वाचनालय कधीच राहिली नाही.''आपले वाचनालय'' म्हणजे जणू अप्पांच्या व्यक्तिमत्वाची प्रती:छाया. अप्पांच्या व्यक्तिमत्वाचे जसे अनेक पैलू होते तसेच ह्या संस्थेचे देखील त्यांनी अनेक पैलू पाडले.बाल नाट्य शिबीर, एकांकिका स्पर्धा, कवी सम्मेलन,व्याख्यानं, इतकंच नाही तर बृहन महाराष्ट्र मंडळाचे परीक्षा केंद्र सुद्धा इथे स्थापित झाले. ''आपले वाचनालय'' काय आणि किती अंगांनी बहरलं होतं.आपले वाचनालयाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळायला लागला तेंव्हा अप्पांनी त्याचे स्वरूप अजून वाढीस नेले.''आपले वाचनालय साहित्य एवं संस्कृती केंद्र'' असे नाव देऊन त्याचा परीघ वाढवला.१९९३ साली तेथे संगीत साधना केंद्राची स्थापना केली आणि पुढे दरवर्षी अनेक विषय घेऊन ग्रीष्मकालीन शिबिरं भरविली.या शिबिरांमध्ये संगीत,चित्रकला,योगासनं, कराटे बरोबरच संस्कार शिबीर पण भरवले जायचे.
गाठीशी गडगंज पैसा असला तरी दात कोरणारे अनेक लोक आपण आपल्या आजू बाजूला बघतो, पण अप्पांनी आपल्या आयुष्यभराची कमाई म्हणजे भविष्य निर्वाह निधी खर्च करून घराच्या गच्चीवर सर्व सोयींनी युक्त असा एक हॉल बांधला आणि इतकंच नाही तर तेथेच एक खोली पण बांधली, जेणे करून बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना तेथेच थांबता यावे.घराच्या गच्चीवर बांधलेला हॉल असा कितीसा मोठा असणार ? पण १९९६ मध्ये जेंव्हा अप्पांनी याच हॉल मध्ये एकांकिका स्पर्धा करायचे ठरवले तेंव्हा तब्बल ८० एकांकिका तेथे सादर झाल्या.अप्पांची हाक ही अशीच असायची.अगदी मनापासून,तळमळीने दिलेली हाक.हा सर्व खटाटोप करण्या मागे त्यांची एकच भावना होती की ज्या समाजाकडून आपण अनेक गोष्टी शिकतो, त्या समाजाच्या उत्कर्ष आणि उन्मेषासाठी आपण झटायला पाहिजे.समाजाचे ऋण फेडायला पाहिजे.त्यांनी आयुष्यभर मराठी भाषा,संस्कृती आणि बाणा जपण्यासाठी अविरत श्रम घेतले.
एकूण साहित्यिक प्रवास :
वसंत ,अमृत, श्रीयुत,गावकरी, वाङ्ग्मयशोभा , बहुश्रुत, स्त्री,श्री सर्वोत्तम इत्यादि वर्तमान नियतकालिकातून , पत्र व काव्य , स्फूटलेख ह्यांची नियमित प्रसिद्धि . अनेक हिन्दी कवितांचे अ . भा . हिन्दी काव्य संग्रहात प्रकाशन .
काव्य संग्रह : वेदना ( 1975 ) , परिध ( 1990 ) आणि तेंव्हा सूर्य पण लाल होता ( 2005 )
पुरस्कार / सम्मान :
बृ . म . मंडळ नवी दिल्ली तर्फे दिल्ली येथे विशिष्ठ गुणीजन सन्मान
मुंबई मराठी संग्रहालया द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठित गाडगीळ पुरस्कार
मुंबई येथिल सिरॉक इंडिया नेशनल अवार्ड चे मानकरी
आपले वाचनालय ( साहित्य , कला , संस्कृति केन्द्र ) ह्या संस्थेला जयपुर येथे बृहन्महाराष्ट्रातिल सर्वोत्कृष्ठ संस्थेचा मान व पुरस्कार
पूर्व केन्द्रिय मंत्री आणि सांसद मा . सुमित्रा महाजन यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार ' संस्कृति सेवा अमृत सम्मान ' प्रदत्त
ह्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर संस्थांद्वारे वेळोवेळी कला , साहित्य , संस्कृति आणि मराठी संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला गेला.