दीपक देशपांडे,धनश्री तोड़ेवाले देसाई, नयना आरती कानिटकर, निकिता डोळे, नीला करंबेळकर
----------------------------------------------------------------------------------
दीपक देशपांडे
धूर
तीन दिवसही
नाही का पुरेसे ?
तीन दिवस आधी
पेटलेल्या
ईहा ,भावना,
निश्चेतन कायेला
शांत व्हायला
पेटवले नव्हते
नुसतेच एक पान
पूर्ण एक अध्याय
एक संपूर्ण पुस्तक
धगीच्या कुशीत
होते
निजलेले
राखेचे ढीग
डोळ्या समोर
अन्
राखेच्या काळजात
अपुऱ्या ईहा
विस्तवाच्या रुपात
गार केलेल्या
राखेवर
जड जातं कळायला
की आपले नक्की
शेवटचे ठाव ठिकाण
कोणते ?
मसाणातली भस्म
राखेचे विसर्जन
की
जिथपर्यंत जाऊ शकतो
धूर.
दगड
उसंतात दिसणारा
दगड
कसा तो विसावा
घेईल ?
स्वतःची रया
कशी दर्शवेल ?
ठेच खाऊनही
फक्त वाट
बदलणारा
रस्त्यावरचा दगड
निशब्द तो दगड
बोलू शकत नाही
चालू शकत नाही
पण दिव्यांग ही नाही
कुरूप तो दगड
आकाराचा त्याला
बोज नाही
बेरंग दगड
तरी कुरूप नाही
शरीराने कठोर
असूनही हळवा
दगड
स्वतःहून घायाळ
न करणारा
तो दगड
कोरला जर त्याला
देऊळ तो दगड
रेवात सापडणारा
प्रत्येक शिव तो
दगड
राम चरणी
मुक्त झालेली
श्रापीत अहल्या
होते रुप तिचे
दगड
सेतू बनूनी
दर्यात पोहणारा
राम नामाचा
दगड
तपियासा अदट
कष्ट सोसणारा
निष्कपट निर्मळ
सडकेवरचा तो
दगड.
रूप
सागरा ..
उंच उठणाऱ्या तुझ्या
ह्या लाटां मधे
कोणते हे रूप तुझे
रौद्र तर नाही ?
काळजात तुझ्या
राग तर नाही ?
की
उफाळून आनंद
येतो
अचानक
मन मयूर होत
नृत्यकलेचे हे
प्रदर्शन तर नाहीं ?
कळेना
खरे कोणते
रूप तुझे ?
कोण-कोणत्या
स्वरूपात
आढळणे तुझे ?
असे ही
असू शकते
अदृश्य शक्तीला
इंगित करत
उठतात लाटा
उंच ,उंच अन् उंच
की
अभिषेक करण्या
बहाणे
असावा हा प्रयत्न
स्पर्शाचा
अदृश्य कायेला ?
दिसणे तुझे
निवांत
कोणते हे
रूप तुझे ?
कदाचित
नजरेला नजर
भिडवित
अदृश्याशी
संवाद साधत
असावे हे .
-----------------------दीपक देशपांडे
धनश्री तोड़ेवाले देसाई
स्वार्थी माणसं
कसे कसे माणूस देवा तू जन्माला घालतो,
स्वतःच्या स्वार्थासाठी जो रसातळी जातो.
गोड गोड वदुनी तो जगाला फसवितो,
आपले पूर्व कर्म सर्व तो विसरून जातो.
आपले स्वार्थ साधण्या करीता वाट्टेल ते करतो,
दुसऱ्याच्या खांद्यावर बंदुक तो ठेवतो.
दोन दोन मुखवटे तो वरच्यावरी धरतो,
बिच्चारा ,गरीब म्हणुनी आपले इष्ट पुरे करितो.
नेहमीच सहानुभूतीचे बाजार तो मांडतो,
दुसर्यांचे हक्क देखील स्वतः बळकावून घेतो.
आपल्या सुखापुढे त्याला नाही कुणाची चिंता,
आपलं सगळं नीट आहे ना ?मग दुसऱ्याचा विचार कशाला आता.
आपल्या दुःखाचे क्षण तो सहज विसरून जातो,
कोणी दिला आधार आपणास याचा ही विस्मरण होतो.
पण शेवटी त्याच्या वागणुकीला एकच आहे तोड
तू नको करू चिंता त्याला देवच देइल उत्तर सडेतोड.
शेतकरी
माझ्याच मातीतला मी गरीब शेतकरी,
शेत माझे पंढरपूर आणि शेती हीच माझी वारी.
अन्न उगवतो तरी रिकामी आहे माझी शिदोरी,
मालक असूनही इतरांच्या हातात माझी दोरी.
संभाळतो शेत असे जसे आमचे मूलं पोरी,
आमच्या घामाची करतात हे नेते राख रांगोळी.
तहाने भुकेले आमचे पोरं,तरी तुमच्या साठी अन्न पेरी,
आमची झोळी तरी फाटकीच् आणि यांची जेब "हरीभरी".
एवढीच् आमची कळकळ,तुमच्या हो घरी दारी,
नका होउ देऊ हो ,या नेत्यांची मनमानी.
राजनीती साठी लावतात हे आमचे प्राण पणी,
स्वतः राहतात महली आणि आम्हा रस्त्यावरी आणी.
तुमच्या सहाय्याने आम्ही पण बघू नवीन स्वप्नं जगी,
मग मिळेल पोटभर अन्न आणि जीवन जगण्याची संधी
आज देवाला सुट्टी आहे
आज देवाला सुट्टी आहे कृपया मंदिरात जाऊ नये,
देव आहे खुप बिज़ी त्याला साकड़ घालू नये.
जायचेच असेल तर जा एका अनाथाश्रमात,
तो तिथे लहान पोरांना हासवित आहे
तुम्हीही हसवा एखाद्या कोमेजलेल्या फुलाला
पण मात्र आज मंदिरात जाऊ नका
कारण आज देवाला पण सुट्टी आहे........
तो भेटेल तुम्हाला कुठल्याही हॉस्पिटलात,
प्रेमाने रोग्याला बरा करताना
तुम्ही जा हातभार लावा
मात्र आपली तक्रार सांगू नका .
कारण आज देवाला ही सुट्टी आहे.......
तो दिसेल वृद्धाश्रमात आजी आजोबांचे डोळे पुसताना ,
रुमाल घेवून जा तुम्हीही अश्रू पुसण्यासाठी
मात्र आपले अश्रू दाखवु नका .
कारण आज देवाला सुट्टी आहे......
तो बसला आहे ट्रैफिक सिग्नल वर
खेळणे विकणाऱ्या मुलांच्या सुरक्षेसाठी,
तुम्ही जा हातात वह्या पुस्तके
देऊन त्यांना सुशिक्षित करा
उगीच पाखंड पुराणासाठी मंदिरात जाऊ नका
कारण आज देवाला सुट्टी आहे.......
तो बसला आहे अन्नाच्या कणात
उगीच अन्न वाया घालवू नका,
जमेल तर एखादा घास द्या भुकेल्या माणसाला
तो आज त्यांच्यात रमला आहे.
उगीच मंदिरात जाऊन
देवाचा वेळ घालवु नका
त्याला भरपूर कामं आहेत
जमले तर काही समाजकार्य करा
पण मंदिरात जाऊ नका,
कारण आज देवाला सुट्टी आहे.
-----------------------------धनश्री तोड़ेवाले देसाई
नयना आरती कानिटकर
कळसूत्री बाहुली
आले मी जगात जेव्हा
खूप कोवळे होते तन-मन माझे
निसर्ग सम्मत दोर-नाळ
सहज गती तुझ्या हतात होती
हळू-हळू मी बागडु लागले
नाचले तुझ्या अंगणात
खूप धागे जोडले गेले मग मला
नात्यांचे, नियमांचे,संस्कारांचे
तरी तुझ्या दोरीला घट्ट धरून
आनंदाने हसत-खिदळत
बहरत होते मी वेली सारखी
अचानक अलगद ती दोर
तु नव्याने सोपविली नवीन हतात
मग अजुन धागे जोडले गेले
मी बहरत राहिले अंगणातून मासघरात
आनंदाने हसत-खिदळत
तुझा धागा अता सैल झाला
पण अजुन स्वत:
जोडलेल्या धाग्या संग
माझे नृत्य अविरत चालु राहिल
कधी अंगणात, कधी माजघरात
शेवटी परसदारात सुद्धा
एका कळसूत्री बाहुलीप्रमाणे
कदाचित आनंदाने हसत-खिदळत
नदी किनारी
नदी किनारी काठावरती
स्वच्छंदपणे बसावे
डोह डोलती पाण्या मधले
बघत मन आनंदित व्हावे
मंद हवेच्या झुळूकि संगे
सुगंध फुलांचा घ्यावा
मन प्रफुल्लित गंधा संगे
वेळ मस्त घालवावा
आकाशातुन पक्षी चहू कडे
चिच-चिव करत यावे
तसे उडत-उडत पुन्हा ते
आकाशातच समावे
मित्रां संगे मुक्त होऊनी
चिंता कष्ट सरावे
हातात हात घेऊनी सारे
सस्नेह मस्त जगावे
बाबा
बाबा बाबा निघाले कविता करायला
हातात कागद घेऊन बागेत बसायला
तेवढ्यात बागेत जोरात वारा लागला वहायला,
आईला हाक देऊन म्हणाले पैड आण ग कागद जपायला
एकदाचे खूर्चीवर बसले कविता करायला,
डोक्यावर हाथ मारुन लागले हसायला
अरे!! मी पेन तर आणलच नाही कविता लिहायला
पेन,कागद घेऊन परत बसले लिहायला
हाता वर हात ठेऊन लागले विचार करायला
विचाराच्या चक्रात लागले फ़िरायला
तेवढ्यात
विचारांचे चक्र जमीनी वर आले
कारची किल्ली घेऊन बाहेर निघाले
अरे! अरे! बाबा काय झाले कुठे निघाले
अग ऑफिसमधे जरूरी काम आले
आई स्वयंपाकघरात खुद्कन हसली
बाबाची कविता कागदावर फतकन बसली
शब्द म्हणजे
शब्दांच्या अलिकडे थांबणॆ आता शक्य नाही
पण तडफडून शब्दाजवळ जाता येत नाही,
शब्द कधी खूप ताठर कधी मऊपणाने भरलेले
पुष्कळ यातना शब्दा मधे घर करुन बसलेले
क्षणा मागे दूरात लांबवर शब्दांचा वास असतो
आणि आलेले सगळे क्षण आपण शब्दांत भरतो
स्वतःला आपण अज्ञात तरी आपल्याकडे पहातो
ते मर्मस्पर्शी अनुभव,झगडणे,कोसळणे शब्दांत भरतो
स्वतः मधले अभाव,अधिक पाझरणं ही दुःख असते
सगळ्याची सांगड घालणारे शब्द म्हणजे छळ असते.
-----------------------------------नयना आरती कानिटकर
निकिता डोळे
देव
कृपा तुझी असावी देवा
नसे कोणी उपाशी व निर्वस्त्र
स्वाभीमानाने कमवावे
छत्र अन्न आणि वस्त्र
आयुष्य हे मोठे कोडं
कधी क्षण भासे दुःखाचा
मनःपूर्वक स्मरता देवाला
पुढचाच क्षण वाटे सुखाचा
सकारात्मकतेच समजुनी महत्व
नसावी कसलीही निराशा
देवावर ठेवून विश्वास
जगण्याची बाळगावी आशा
मन निष्पाप आनंदी ठेवावे
देव कृपेने घ्यावे प्रेमाचे घेणे
बाळगावे कर्तुत्व अंगी
नसावे कोणाचे देणे
आभार मानीत परमेश्वराचे
आनंदाने फुलवावी सकाळ
देव्हाऱ्यात लावता दिवा
उजळून येते संध्याकाळ
रंग गहिऱ्या प्रेमाचे
मनी रंग विखुरावे
जसे इंद्रधनुष्याचे
आनंदाने रंगवावे
दिसरात आयुष्याचे
प्रेम रंगतं सुंदर
प्रीत हृदयात रुळता
वाढे गोडवा जीवनी
मनं सुरेख जुळता
प्रेम रंगाची किमया
हृदयी ओढ लावी भारी
नसे चैन क्षणालाही
भासे मधु सृष्टी सारी
खऱ्या प्रीतीच्या ओढीनं
रंग गहिऱ्या प्रेमाचे
मनी प्रगाढ चढते
आयुष्याला सुखावते
असो समृद्ध आयुष्य
साठा प्रेमाचा असावा
अंहकार घालवावा
मनी जिव्हाळा जपावा
प्रेम रंगात मनाला
बुडवून तृप्त व्हावं
उधळीत प्रेम फुले
विलक्षण सौख्य द्यावं
नदी
आडवी तिडवी शोधीत वाट
नदी गाठते सागरा
तिचं कर्तृत्व पाहून
कौतुक वाटे आभाळा
आभाळ हसतमुखाने
नदीशी मैत्री करतो अन्
पावसाळ्यात पाऊस देऊन
आनंदाने तिची ओटी भरतो
नदी ही आनंदाने
चौफेर हिरवळ पसरते
मैत्रीच्या भरात आभाळात ही
इंद्रधनुचे सप्तरंग विखुरते
मिळुनी दोघे निसर्गाला
रंगवीत सुरेख सजवितात
सृष्टीला फुलवीत घट्ट मैत्रीचे
सुंदर ठसे उमटवितात..
-------------------------- निकिता डोळे
नीला करंबेळकर
माझी पिले
सांग तुला शोधू कुठे
पिलांना घेऊन वणवण
फिरते आहे जिथे तिथे
लागली तुझी कुणकुण
हायसे जीवाला वाटले
शोधतांना तुला थकले
आभाळा बरोबर धावले
एका घरट्यांवर विसावले
वेली कुठे दिसेना मला
दाणा वेचिता थकले रे
भरवूं कशी सांग मला
नाही अजून कळले रे
पावसात पिले भिजली
आडोशाला माझ्या आली
दीनवाणी पाहू लागली
पंखा खाली लपून बसली
मी पण झाकले त्याना
स्पर्शाची ऊब मिळाली
बिन्धास्त तिथे ती होऊनी
मस्त पेंगायला लागली.
अस्तित्व
संगतीत तुझ्या रमलो होतो
कधीच तुला विसरलो नव्हतो
माझ्या मनीच्या अंगणी तू आली
अस्तित्व तुझे तू ठेवून गेली
पैंजणांची तुझ्या रुणझुण ऐकली
किणकिण बांगड्यांची ही आली
अचानकच तू निघून गेली
अस्तित्व तुझे तूं ठेवून गेली
कप चहाचा देतांना दिसली
हातांची तुझ्या गोडी लागली
हातीहात न देताच निघून गेली
अस्तित्व तुझे तूं ठेवून गेली
आरशावर टिकली लावून गेली
त्यामागची प्रतिमा दिसली
स्पर्श होताच दिसेनाशी झाली
अस्तित्व तुझे तूं ठेवून गेली
देवा जवळ आरती मी ऐकली
सुमधुर सूर ऐकवून गेली
तेवत्या ज्योतीवर तुला पाहिली
अस्तित्व तुझे तूं ठेवून गेली
होती तू थकलेली शिणलेली
तरी तू येऊन कुशित शिरली
गजऱ्याचा सुगंध सोडून गेली
अस्तित्व तुझे तूं ठेवून गेली
नकळल मजला झोप लागली
हळूच डोळ्यात येऊन बसली
माझ्या स्वप्नांच्या गावी आली
अस्तित्व तुझे तूं ठेवून गेली.
विसाव्याचे क्षण
विसाव्याचा क्षण मिळावा
खाली प्राजक्त सडा असावा
त्यावर बसून मी वाचन करावे
प्राजक्ती सुगंध मिळत रहावे
विसाव्याचा एकच क्षण
पुरे होतो थकल्या जिवाला
तिथे विचारांची शिधोरी पण
हवी हवी वाटते आपल्याला
हवा एक क्षण विसाव्याला
दिवस भराचा क्षीण जाण्यास
पुरेसा उत्साह येतो दिवसाला
पुढची सर्व कामे करण्यास
ह्याच विसाव्याची वाट बघून
गेली साठ वर्षे कर्तव्य पूर्तीत
लहान मोठ्यांना सुखावून
बघू क्षणभर विसावू जाऊन
त्यात शांत पावलांनी जावेऐ
डोळे मिटुनी शांत पडावे
विसाव्याचे क्षण वाया न जावे
झोपेत स्वप्न पहातच रहावे.
-------------------- नीला करंबेळकर
No comments:
Post a Comment