Wednesday, April 13, 2022





कल्पना शुद्धवैशाख

                                                           (६ नोव्हेंबर १९३३ - २१ एप्रिल २०२१)



कल्पना पोळ या इंदूरस्थ  ज्येष्ठ लेखिका होत्या. त्या लेखिका म्हणून वावरताना पोळ या आडनावाचा उपयोग करत नसे  आणि आपल्या नावापुढे "शुद्धवैशाख" हे टोपणनाव जोडत असे.  कल्पनाताईंचा जन्म बडोदा गुजरात येथे झाला होता.  शाळा-कॉलेजात त्यांची  खूप छान प्रगती होती. बारावीत  त्यांना शाळेकडून मानाचे सुवर्ण पदक मिळाले होते.  लग्नानंतर त्या इंदोर आल्या आणि मग त्या इथल्याच रहिवासी झाल्यात.  

साहित्याचे जवळजवळ सर्व प्रकार त्यांनी आपल्या लिखाणात हाताळले होते.  कथा, कविता, कादंबरी, नाटक, एकांकिका असे हे प्रकार होते याशिवाय अभिनय, वक्तृत्व, इत्यादी अनेक कलांमध्येही  त्यांचा सहभाग असायचा व त्यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते.  त्यांच्या कथांना किस्त्रीम, माहेर, सुखी गृहिणी, साप्ताहिक सकाळ, विशाखा, धनंजय इत्यादी अनेक  नियतकालिकात प्रसिद्धी मिळाली होती.  कथाकथनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते, शिवाय अनेक कवी संमेलनातही त्यांचा सहभाग असायचा.  त्यांचे पाच कथासंग्रह आणि एक कादंबरी प्रसिद्ध झाली होती.  ''रेवा मंडल" या कथासंग्रहाला  महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरचे  वि.सी.सरवटे पारितोषिकही मिळाले होते.  
त्यांचा एकमेव कवितासंग्रह आहे "कशी मी अशी मी" त्यातूनच या कविता घेतलेल्या आहेत.  खरं तर त्या कथाकार म्हणून अधिक प्रसिद्ध होत्या पण त्यांच्या कविताही तितक्याच दर्जेदार आणि तोलामोलाचा आहेत हे या पुस्तकात जाणवतं. ह्या पुस्तकात  त्या स्वतः म्हणतात “माझ्या कवितेवर माझ्याकडून फारच अन्याय झाला आहे.  पूर्वी कामाच्या धबडग्यात मनातल्या मनात कवितेच्या ओळी तयार झाल्या तरी कागदावर लिहिल्या जात नसत.  आत्ता तर लक्षात आहेत नंतर लिहू सावकाश असं करता करता केव्हा विसरल्या जायच्या हेही लक्षात यायचं नाही नंतर मी कवितेचा कागद ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला लागले पण अशा एकत्र झालेल्या कविता ही मी प्रसिद्धीसाठी सातत्यानं कुठेही पाठवल्या नाहीत.  कथा प्रसिद्धीसाठी पाठवल्या पण कविता पाठवायचं लक्षातच राहायचं नाही.”
कवितासंग्रहाचे हस्तलिखित प्रसिद्ध करावं ही कल्पना त्यांच्या मुलीची म्हणजे भाग्यश्री कामत यांची आहे. अत्यंत सुंदर हस्ताक्षर हे देखील कल्पना ताईंचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट त्यांच्या लेकीनं समोर आणलं ही आम्हा सर्वांसाठी एक विशेष अशी भेट आहे.  त्या पैकी एक कवितेचे छायाचित्र इथे जोडले आहेत. 

साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवत असतानाच कल्पनाताई विविध  साहित्यिक व  सामाजिक संस्थांशी निगडीत होत्या. ह्या सोबत त्या जीवन विमा निगम मध्ये नोकरी करत होत्या आणि तेथूनच निवृत्त झाल्या.  जीविनिच्या टेबल टेनिस टूर्नामेंट मध्ये दोनदा ऑल इंडिया चॅम्पियन आणि अनेकदा चॅम्पियन म्हणून त्यांनी स्टेडियम गाजवलं होतं . बडोद्याच्या विजय जिमखान्यात तर्फे झालेल्या बोटिंग रेस मध्येही  त्यांना चॅम्पियनशीप मिळाली होती. 

खेळाडू इतिहास  आणि तसाच स्वभाव असलेल्या कल्पनाताई आपल्या शरीरास्वास्थ्याची योग्य ती जपणूक करणाऱ्या होत्या पण त्यांना  शेवटल्या क्षणी  कोरोनाने ग्रासले आणि त्या आमच्यातून निघून गेल्या. 

१. शब्द

शब्द माझा वेगळा। शब्द माझा आगळा। 
वसतो जेव्हा गळा। आनंदी आनंद ॥ 

शब्द माझा तम्बुरा। शब्द होई हासरा।
स्पर्शे जेव्हा सप्तसुरा। रसगंगा ॥ 

शब्द माझा सुगंध । वाहे जैसा मृद् गंध । 
मुळापासुनि फुलावरी । परिमळे ॥ 

शब्द माझा वावडी। वरिवरि जाई आवडी। 
इकडे तिकडे भिरभिरे। अनिर्बंध॥ 

शब्द माझा कुंचला। रंगरंगी रंगला।
रंगवूनि थकला वो। अंतरंग॥ 

शब्द माझा वेधक। बाणाहुनी भेदक। 
जिथे रुततो तेथे। हाहा:कार ॥ 

शब्द माझा भाबडा।कधी पडे तो थोकडा । 
होई बाई पडापडी । अर्थालागी ॥ 

शब्द माझा किती खुळा। कधी पोकळ खुळखुळा। 
मनामधि खुळखुळे । सदोदीत॥ 

शब्द माझा सावळा। भेटे , होई सोहळा।
कणोकणी नाचे जैसा । वनमाळी ॥ 

शब्द माझा एकतरी । रसिकाच्या कानावरी । 
पोचती का कधीतरी । कुणाठावे ॥ 

२. जीव

जीव पळात जाईना 
जीव कळात माईना 
जीव क्षणात जाईना 
जीव कणात राहीना 

जीव दिठीत राहीना 
जीव मिठीत राहीना 
जीव कुडीत राहीना 
जीव घडीत जाईना 

जीव तनात राहीना 
जीव मनात राहीना 
जीव सुचीत राहीना 
जीव दुःखीत होईना 

जीव वरती जाईना 
जीव खालीही राहीना 
जीव तळात रुतेना 
जीव जळात तरेना 

जीव सोन्यात तोलेना 
जीव धनात रुतेना 
जीव ओठात हसेना 
जीव डोळ्यात दिसेना 

जीव कोणास कळेना 
जीव कधी आकळेना 
जीव भवास भुलेना 
जीव मुक्तही होईना 

जीव जीवात येईना 
जीव संवाद साधेना 
जीव शिवास मिळता 
जीव काहीच राहीना.

३. कधीतरी व्हावे

कधीतरी व्हावे हिरवे पान 
आणि धरावा थेंब दंवाचा 
कधीतरी व्हावे कळीच छान
आणि धरावा किरण रवीचा 

कधीतरी व्हावे केतकीपान 
शोभे कुंतलभार कुणाचा 
कधीतरी व्हावे काजळकाठ 
भरून यावा नेत्र कुणाचा 

कधीतरी व्हावे चमकी सान 
चाफेकळीचा डौल कुणाचा 
कधीतरी व्हावे पदर तलमसा 
तोलून घ्यावा भार कशाचा 

कधीतरी व्हावे शाल सुगंधी 
पांघरून भर तारुण्याचा 
कधीतरी व्हावे अल्लड प्रीत 
आणि भुलावा जीव कुणाचा 

कधीतरी व्हावे पंचम सूर अन् 
शोभिवंत हो गळा कुणाचा 
षड्ज् मिळावा कधी कुणाशी 
आणि दिलरुबा होई दिलाचा.

४. नभात चंद्र

नभात चंद्र हासतो | वनात पवन खेळतो।
जळात मीन नाचतो । मनात रंग रंगतो ।। 

दिशादिशात परिमळे । चमेली गंध धुंद तो । 
रोमरोमी पसरुनि। अंग अंग जाळे तो ॥ 

विरल मेघ येऊनि | चांद गोल झाकितो । 
पवन कसा अचपळ हा । मम वसना उडवितो।।

शांत टिपूर चांदणे । न्हाऊ घालि चराचरा ।
अजुनि न ये सावळा। जीव होई घाबरा ।।

५ . कधीतरी कुठेतरी 

कधीतरी कुठेतरी अजून देई हाक तो 
तृषार्त खिन्न मानसी अजून होई भास तो ॥ धृ ॥ 

सहस्रधार वर्षते तरी विझे न आग जी 
एक एक अस्थि माझी समिधा हवनातली ।।१।।

तनातली मनातली आस घेई रूप ते 
भिरभिरे जडे मनास साद येई भासते ।।२।। 

दिवस कसा सरुनि जाय सांज मला बोचते 
नयनामधि नीज नाही रातरात जागते ॥३॥ 

कठिण वाट चालता विसर तया गायले 
विसरलेच विसराया सर्व भोग आठवले ॥४॥

६. शिल्प 

त्यांच्या नजरा पाहून 
मी घाबरले , बावरले 
पळून जावं म्हटलं 
तर पाय जड झाले 

नजरेमधलं गरळ 
अंगाला चिकटलं 
माझ्या नितळ रंगाला 
खग्रास ग्रहण लागलं 

प्रतिकार करायला 
हातात दगड घेतला 
जरब बसावी म्हणून 
चेहेरा कठीण केला 

ओठ घट्ट मिटून 
नजर स्थिर करुन 
हालता न डुलता 
उभी राह्यले खिळून 

आता मला समजलं 
शिल्प दगडाची कां ? 
सुंदर सुंदर स्त्रियासुद्धा 
झाल्या पाषाण कां ?

७. शब्दासाठी 

मनातील सारे कढ । कसे येती वरवर । 
सांगू कशी कुणाला । नकळे मज।।

शब्दासाठी वणवण। इथे तिथे धावाधाव। 
नुसतीच दमणूक। हाती न ये काही।। 

कुणा कुणा विचारावे। कुठे कुठे पुसत जावे। 
जीव जणू लोंबकळे । अधांतरी।।
 
वारे उठले सोसाटून। कोसळते वर्षा वरुन। 
भुताटकीचे किर्र रान | शब्द शोधताना।। 

तोडोनिया आत्मकोषा। शब्दासाठी दाही दिशा। 
हिंडते मी धुंडते मी। धरुनि नम्रता।। 

अर्थपूर्ण शब्दासाठी | शब्दाचिया अर्थासाठी 
जगत्पती उमाशंकरा | प्रार्थिते मी।।

८. ' तो ' आणि ' तो ' 

पूर्वी 
जिन्यातल्या त्याच्या पायरवानीच 
छातीत धडधडल्यागत व्हायचं 
त्याच्या नुसत्या चाहुलीनंच 
काया रोमांचित व्हायची 
नुसत्या आठवणीनंच 
हातापायात थरथर जाणवायची 

पण 
पण ते दिवस केव्हाच सरले 
आता बरगडीत कळ आली की कळतं की 
तो लवाजम्यासह येऊन धडकलाय 
हातपाय बोटं सुध्दा बोलू लागली 
की समजतं त्याचं साम्राज्य 
सगळीकडे पसरलंय 
शरीरावर आलेली शिरशिरी शमवण्यासाठी 
शाल पांघरावी लागली की समजावं 
आता घनघोर युद्ध सुरु होणार 

तरी 
तरीही त्याचं धाड पडल्यासारखं येणं 
गडगडणं , कोसळणं , बरसणं 
विलक्षण आवडतं 
फार फार भावतं 
हवंहवंसं वाटतं 
अगदी मनापासून !

९. स्वप्न 

निळ्या भोर स्वप्नांना । जांभळी झालर लागून । 
आली डोळ्यांना नीज । जणू अंगाई ऐकून ॥ 

गुलाबी ग स्वप्नांनी । पाह्यलं जरा लाजून । 
सुगंधी सुबक फुलांचा । सडा पडला वरुन ।। 

रंगी बेरंगी स्वप्नांना । पहाता डोळा भरून । 
त्यांनी डोळा मारता । मीच गेले हुरळून ॥ 

स्वप्नात तुझी माझी । संगत रंगते अजून।
जागेपणी ते आठवून । डोळे आले भरून ॥

 स्वप्नांचे सुंदर फुगे । स्वभात गेले फुटून । 
जाग येताच चुटपुटुन । थोडे घेतले रडून।।

स्वप्नांनी नेहेमी यावे । जावे टिकली मारून । 
वाट पहाता पहाता । डोळे गेले थकून ॥ 

चमकदार स्वप्नांनी । जाऊ नये रुसून ।
मलाच त्यांची गरज । किती तरी अजून॥

१०. चाहूल 

आज या हवेत येई कसला हा गंध 
मोहरे वसंत ये चाहूल मंद मंद 

आंब्याला झोंबते अवखळशी ही हवा 
त्रिकोनात फुटतसे शहारा हवाहवा 
हासुनिया बहरतो निश्वास टाकी जेधवा 
आसमंती पसरतो सुगंध हा नवा नवा 

आज या हवेत बाई कुठला हा नाद 
कोवळ्याशा पालवीची मंजुळशी साद 

हिरवाई बावरी हळूहळूच हासते 
वाऱ्याच्या फुंकरीने हरवूनिया डोलते 
कुहुकुहुच्या तालावर सळसळूनि नाचते 
रंगगंधनादाच्या आनंदी नाहते 

आज या हवेत बाई कुठली ही शीळ 
भिल्लण दे साद , हसे ओठावर तीळ

११. सलामी

कुणाची ग कुणाची 
लागलीसे चाहूल 
शिशिराच्या अंगणात 
वसंताचे पाऊल 

वसंताने वाजवली 
सुरेल मस्त बांसरी 
फुलाफुलांच्या अंतरी 
साठे मधाची माधुरी 

रोमांचाने मोहरली 
का आंब्याची काया 
त्याला ग गवसला 
मोहोराचा हंडा 

दिशादिशात कोंदला 
किती सुगंधाचा नाद 
झंकारल्या पानाफूली 
उठे अबोधसा साद 

रोपावृक्षांना कशी 
मदनाची बाधा झाली 
अंगी खांदी ओठी पोटी 
उठले कोंब दाटीवाटी 

तरारून उठली पाने 
डोकावली हिरवे तुरे 
हिरवा रंग ओतुनि 
दोन्ही दोन्ही हातांनी

जणू वाटे आले न्यारे
पोपटांचे थवे सारे 
वसतीला झाडावरी 
चैतन्याची उसाभरी 

नवी पालवी नमन करिते 
सानुल्याशा हातांनी 
सृष्टीला न्याहाळते 
पानाआडच्या डोळ्यांनी 

पाखरांची शीळ ये 
वाटे घुमते सनई 
वारा धावे दडदडा 
आपची वाजे चौघडा 

मोठा चाले गाजावाजा 
आला आला वसंतराजा 
स्वीकारीत सलामीला 
धरणीवर उतरला

१२. चमेली 

कमरेत लचकून 
हिरवापदर सावरून 
उफाड्याची चमेली 
गच्चीवर गेली चढून 

आभाळातला चांद पाहून 
तन मन गेलं फुलून 
आपली फुलं फेकून 
लक्ष घेऊ का वेधून 

पांढरी शुभ्र फुलं 
आकाशात बसली रुतून 
चमचम चमकून 
प्रीतीची गातात धून 

हे काय वेडेचार 
अशोक म्हणे रागावून 
छाटा तिचे पंख  
कोणी म्हणे ओरडून 

इतरांचा कोरस होकार 
धरणी गेली हादरून 
"अल्लड माझी बाळी 
थोडं घ्या ना सावरून "

धरती म्हणाली तिला 
रागावून थोडं समजावून 
"आकाशाशी नातं आपलं 
ठेवावं थोडं दुरुन 
जगाची रहाटी काय 
नंतर येईल कळून 
नाहीतर टाकतील तुझी 
पाळंमुळं खणून

नाजुक साजुक चमेली 
कधीची आहे रुसून 
तेव्हापासून रहातेय 
आपल्यातच गुंतून 

१३. कविता म्हणजे 

कविता म्हणजे बाळाच्या गालावरची खळी 
जिला बोट लावलं की ते हसू 
मनातल्या कणाकणात पसरतं 

कविता म्हणजे तृणांकुरावरचे दंव 
ज्याच्यावर चाललं की ते 
अंगभर रोमांच फुलवतं 

कविता म्हणजे तरुणीच्या 
उंचावलेल्या भुवया
ज्यांचं मोहक नर्तन 
मनाला गुदगुल्या करतं

कविता म्हणजे कोणाच्या नजरेतलं 'काहीतरी' 
जे काय आहे ते कळत नाही 
पण हुरळून जावंसं वाटतं 

कविता म्हणजे वसंत ऋतुचा वारा 
ज्याच्या स्पर्शमात्रानं 
सर्व सृष्टी पुलकित होते 

कविता म्हणजे नाचणाऱ्या जलधारा 
जिच्यात चिंब भिजल्यावर 
मनाला नवे नवे कोंब फुटतात 

कविता म्हणजे अंधारातून उगवणारा तेजोगोल 
ज्याच्या पायरवानं 
प्राणिमात्रांना नवी स्फूर्ती लाभते 
कविता म्हणजे अथांग निळाई 
जिच्याकडे पहाता पहाता 
हरखून अन् हरवून जावं

कविता म्हणजे धरणीमाता 
जिची सहनशीलता पाहून 
शतशः प्रणाम करावेत 
कविता म्हणजे कडेकपारीतलं तृणपातं 
जे बेजान रुक्ष आसमंतावर मात करून 
नव जीवनाचा संदेश देतं 

कविता म्हणजे बर्फावर सांडलेलं रक्त 
जे पाहून सैनिकांच्या डोळ्यात 
रक्त उतरतं अन दहा हत्तींचे बळ संचारतं 
कविता म्हणजे जीवनाच्या लाकडांवरचा धूर 
जो वर वर जाताना दिसतो 
पण हातात पकडता येत नाही 

कविता म्हणजे धरता न येणारी भावना 
जी असली की जीवन कृतार्थ होतं 
अन् नसली की जीवन अर्थहीन होतं .




संकलन : अलकनंदा साने 




    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...