Friday, October 7, 2022

 





अनुराधा जामदार 

(२५ जुलै १९३८- ३ ऑक्टोबर २०१७)

एका अत्यंत लोकप्रिय, हुशार, वरिष्ठ , साहित्यिक व्यक्तिमत्व असलेल्या व मध्य प्रदेश मराठी साहित्य संघाच्या पूर्व अध्यक्ष  कै. अनुराधा जामदार यांचा जन्म २५ जुलै १९३८ ला मुम्बई येथे झाला.  बालपण इंदूर म्हणजे माळव्यातच गेले. नंतर त्यांचे वास्तव्य भोपाळ येथे राहिले , पण माळव्याची ओढ त्यांना कायम होती . त्यांच्या एका लेखांत आपल्याला हे स्पष्ट जाणवते . शालेय शिक्षण  व त्या पुढील शिक्षण क्रिश्चियन कॉलेज, इंदूर येथे झाले . त्यांना इंग्रजी , मराठी, हिंदी, गुजराती , बंगाली, उर्दू या सर्व भाषा अवगत होत्या  व संस्कृतचे आवश्यक तेवढे ज्ञान होते . वयाच्या १६ व्या वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात सक्रिय होत्या .
१९६१ मध्ये भोपाळ येथे त्या आल्या . पुढे निरनिराळ्या सरकारी शाळांमधून शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले आणि १९९८ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर  पुढे ज्ञानेश्वर विद्या मंदिर ह्या मराठी शाळेत  मुख्य अध्यापिका म्हणून त्यांनी काम पहिले .  
अनुराधा जामदार यांना बाल्यावस्थे पासूनच वाचनाची हौस. त्याचं सर्व श्रेय त्या आपल्या मामांना (कै.दादा परचुरे, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई) देत असत.
पुढे त्यांनी हा नाद छान जोपासला. संत साहित्य, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, व इतर अनेक संतांविषयी त्यांचे वाचन व भरपूर अभ्यास होता.त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या संत वाङ्मयाचे उतारे व्याख्यानांमधून उद्धृत करीतअसत. महाभारत आणि त्यातही श्रीकृष्ण हे त्यांचे आवडतं प्रकरण असे. ह्या विषयांवर त्या कितीही वेळ बोलू शकायच्या .  समोरचा अगदी मंत्रमुग्ध होऊन जात असे.नवीन गोष्टी शिकत राहाव्यात असा त्यांचा  नेहमी आग्रह असे .वयाच्या ७५व्या वर्षी लॅपटॉप घेऊन त्यांनी त्यावर सराव केला आणि मग आंतरजालाचा सुद्धा वापर करून ऑनलाईन पुस्तकांचं विवेचन, अनुवाद इत्यादी केले आहे . सुप्रसिद्ध अर्थतज्ञ दिवंगत प्रकाश बियाणी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तक "द *बॉस* " चा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे .आपल्या ''मायमावशी'' समूहातही त्या शेवट पर्यंत अत्यन्त सक्रीय होत्या. इतकंच नाही  तर वयाच्या अठ्ठयात्तराव्या वर्षी  मराठी भाषेच्या व्याकरणाचं ज्ञान देण्याच्या दृष्टीने त्यांनी समूहात ''शाळा'' हा उपक्रमही काही दिवस  राबवला होता. 
अनुराधा जामदार यांच्या मध्यप्रदेशातील  कारकिर्दीत अनेक प्रथितयश  साहित्यिकांचे भोपाळला येणे झाले . कवीवर्य  मंगेश पाडगांवकर, यशवंत देव , अरुण म्हात्रे , डॉ. श्रीपाल सबनीस , प्रदीप निफाडकर ,  त्यावेळच्या दैनिक सकाळचे संपादक उत्तम कांबळे , लोकसत्ताचे तत्कालीन संपादक गिरीश कुबेर  , सदानंद मोरे , नागनाथ कोतापल्ले , मीना प्रभू आणि असे अनेक उत्तमोत्तम साहित्यिक भोपाळ मध्ये आले होते व सर्वांचे ताईंशी वैयक्तिक पातळीवर  अतिशय सलोख्याचे संबंध होते.
जवळपास ऐंशी वर्षे अगदी स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगल्यावर  शेवटी नियतीने आपला डाव टाकलाच. २० दिवसांच्या अल्प पण कठीण आजाराचे निमित्त  झाले आणि ३ ऑक्टोबर २०१७ रोजी अनुराधा जामदार यांनी  ह्या जगाचा निरोप घेतला. मध्यप्रदेशातील ज्येष्ठ साहित्यिकांचा एक विश्वस्त दुवा आणि नवोदितांचा एक भक्कम आधारस्तंभ गेला. काहीही अडचण असली तर केंव्हाही त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर नि:संकोच संपर्क साधता येत असे. त्या तितक्याच प्रेमळपणे बोलत असत. हा  त्यांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव आहे.

अनुराधा जामदार यांनी वेगवेगळ्या विषयांवर विपुल लेखन केले पण ते सर्व इथे देणं शक्य नाही. त्यांचे काही निवडक लेख देत आहे. 

आमचं माळवा

खूप लहान असताना १९४२ च्या सुमारास  मुंबई सोडून इंदूरला नोकरीनिमित्त वडील  आले आणि आम्ही माळव्याचे झालो . त्या काळात इंदौरला खूप सुबत्ता होती .  आज कोणाला कदाचित विश्वासच वाटणार नाही  एक रुपयाला आठ शेर  दूध , सहा आणे पक्का शेकडा ( म्हणजे २४० नग ) रायवळ आंबे.  हे सगळं आम्हा लहान मुलांना आकर्षित करण्यासारख निश्चितच होतं. कोण्या  एका ठिकाणचा भूगोल किंवा इतिहास समृद्धी किंवा विपन्नतेचे  कारण समजण्याइतकं वय ही  नव्हतं.  एकूण काय हा प्रदेश आम्हाला आवडला .  
जसं जसं  वय वाढू लागलं  तसं तसं  हा मालवा प्रदेश, त्यांची भौगोलिक रचना व त्या प्रदेशाचा इतिहास हळू हळू मनात घर करू लागला.  अमूक एक गोष्ट इथे अशी , इतर ठिकाणी ती अशी का नाही याची कारणेही तपासली जाऊ लागली.  परिणाम मात्र एकच माळव्यासारखं  काही नाही . माळवा किंवा माळव्याचे  पठार हयाची रचना , नर्मदे सारख्या नदीचा वाहता जलौध ह्याच प्रांताला समृद्ध  व सुबत्तापूर्ण बनवतो आणि स्वाभाविकच माणसाची मनं  सुद्धा तृप्त असल्याकारणे थोडी विशाल सहनशील बनवतो . आजच्या या बदललेल्या काळातही  माळव्याचा  माणूस, त्याची वागणूक  सगळं  न सांगता सहज ओळखता येते. ऐस - पैस वागणं ,मनाचा दिलदारपणा , आतिथ्यशीलता , सढळ खर्च , हे सगळे इथले विशेष , या प्रांताचा इतिहास ही फार संपन्न आहे . अगदी महाभारत काळात भगवान श्रीकृष्ण विद्याध्ययनाकरता उत्तरेतून उज्जैनला सांदिपनींच्या आश्रमात होता हे सर्व विदित आहे.  कारण वसुदेवाच्या वडिलांचे अर्थात् राजा शूरसेनाचा भाऊ राजा कुंतीभोज , याचं  राज्य माळव्यातचं  होते  . तत्पूर्वी शूरसेनाची कन्या कुंती ही कुंतीभोजाची मानस कन्या म्हणून इथेच राहिलेली आहे . राजा विक्रमादित्य जो आजही त्याच्या न्यायप्रियतेबद्दल आदर्श मानला जातो त्याचही साम्राज्य माळव्यात उज्जैनीचेच . त्याच्या पश्चात त्याचा बंधू राजा भर्तृहरी म्हणजे एकाच आयुष्यात मनुष्य वय व परिस्थितिअनुसार कसा बदलू शकतो याच उत्तम उदाहरण आहे . सुरवातीला अत्यंत विलासी असलेला हा राजा पुढे सुनीतीवान व प्रगल्भ बनला.  त्याने लिहिलेली शृंगारशतक , वैराग्यशतक व नीतीशतक ही काव्ये आजही प्रसिद्ध आहेत . विक्रमादित्याचा राजदरबाराचा कवी महाकवि कालिदास याला कोण विसरू शकेल !! त्याचं काव्य, त्याने लिहिलेली नाटके आजही रसिक मनाला भुरळ घालत असतात , ढगाला आपला संदेशवाहक करून प्रेयसीला आपली विरह व्यथा कळविणारा - मेघदूताचा नायक एकमेवच  म्हणावा लागेल . आज कालिदासाच्या गौरवात मध्यप्रदेश  शासनाने स्थापित केलेली कालिदास अकादमी विख्यात आहे . इतिहास काळातही माळव्याचे महत्व कमी झालेले दिसत नाही. दक्षिणेकडून उत्तरेत येणाऱ्यांना व उत्तरेकडून दक्षिणेत आक्रमण करणाऱ्यांना   बऱ्हाणपुर  म्हणजे घरच होते . औरंगजेबाने तर हे शहर नगर वेशीसकट आपली सुसज्ज  छावणीच बनविले  होते  . शाहजहानची लाडकी मुमताज... तिच्या मृत्युनंतर अदमासे सहा महिने ह्या बऱ्हाणपुरातच तर विसावली होती . यमुना काठी  ताजमहाल हे नंतर . शिवाजी आग्र्याला जाताना याच माळवा प्रांतातून गेलेला आहे . व इंदूरला एक मुक्काम राहिल्याचा उल्लेख आहे . पुण्यश्लोक  अहिल्याबाई होळकर यांनी राजधानी महेश्वर येथे नर्मदेला  बांधलेला घाट बघत रहावा असा आहे . आज महेश्वर येथील साड्यांकरता मराठे  आपल्या उत्तर स्वाऱ्यांच्या  वेळी ह्याच मेळाव्यातून  पुढे जात असत व त्या काळात अनेक समृद्ध मराठी कुटुंबे स्थायिक होत गेली व या काळात फार मोठ्या प्रमाणात मराठी माणूस माळव्यात शिरायला स्थिरावला.  थोरले बाजीराव पेशवे यांची समाधि माळव्यातच  रावेरखेडी येथे आहे . थोरल्या बाजीरावांनी मांडवगड येथे बांधलेले शिवमंदिर आजही  तेथे आहे. मुगली जुलमाच्या कचाट्यातून अनेक देवस्थानाप्रमाणे  हेही देऊळ  सुटलेले नाही . या देवळात उलटीकडून लावलेली गणेश प्रतिमा आजही त्याची साक्षी आहे . मांडवचा सुलतान बाजबहादूरशाह व त्याची हिंदू पत्नी रूपमती ह्यांच्या अपूर्व असीम प्रेमाची कहाणी सांगणारा मांडवचा परिसर आज देश व विदेशातील पर्यटकाचा आकर्षणाचे केंद्र बनलेला आहे . इतिहासात माळव्या संबंधीचे दाखले अनेक आहेत . पेशव्यांबरोबर उत्तरेत आलेले त्यांचे मोठे सरदार होळकर आपला जेजूरीचा खंडोबा तिथे ठेऊन इंदूरचे कधी झाले कळलेच नाही . इतरही अनेक सरदार अशातऱ्हेनेच   इकडे स्थायिक झाले .जगतगुरु आदि शंकराचार्य आपल्या उत्तर यात्रेच्या निमित्याने निघाले असता ओंकारेश्वर जवळ नर्मदाकाठी मंडनमिश्र व गार्गी यांच्याशी त्यांच्या व्याकरणावरील संवादासाठी  जीवनदायिनी नर्मदेच्या स्तुतीप्रीत्यर्थ रचलेले नर्मदाष्टक विलोभनीय संस्कृत काव्य आहे . नर्मदेबद्दल एक आख्यायिका अशी की प्रलयांती जेव्हा संपूर्ण विश्व जलमय होतं , तेव्हा देखील जीवनदायिनी नर्मदा आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवते . हिंदूधर्मीयांचे  श्रद्धास्थान असलेले क्षिप्राकाठचे उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर व ओंकारेश्वर मंदिर ह्या  बारा ज्योतिर्लिंगांपैकी दोन ज्योतिर्लिंग माळव्यातच. आधुनिक काळात ख्यात गायक पंडित कुमार गंधर्व यांनी देवासला आपले मानले तेही माळव्यातच .  आपल्या स्वर्गीय मधाळ आवाजाने गेली तब्बल ६० वर्षे केवळ भारतीयाचांच नव्हे तर विश्वपातळीवर सर्वांच्या मनावर आपल्या गायनाने अधिराज्य  गाजविणाऱ्या लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरचा असे आम्ही माळव्यातील मंडळी अभिमानाने सर्वांना सांगत असतो . महाराष्ट्र भूषण पु.ल.देशपांडे यांना तर या मालवभूमीचं फारच  कौतुक.  त्यांचे  सदाबहार अजरामर नाटक ' तुझे आहे तुजपाशी ‘ चे चिरतरुण काकाजी ' हयाच माळव्याच्या भूमीतले, इंदूरचे .  नाटकातील या पात्राला आधारभूत असलेले श्रद्धेय  रामू भैया दाते यांच्या औदार्याच्या अनेक कथा इंदूरकर आजही सांगतात . भावगीतातील  शुक्र तारा ठरलेले सुविख्यात गायक अरुण दाते हे रामूभैयाचे चिरंजीव .  “श्याम- ए- अवध “  इतकेच “शब - ए –मालवा” देखील कवि मनाला भुरळ घालणारे, गोड गूढच.  हया माळव्यावद्दल किती आणि काय - काय लिहावे विषय खूप मोठा , त्याचा आवाकाही तितकाच प्रशस्त . हया निसर्गरम्य प्रदेशाची ही नुसती एक झलक.  

बयो

बयो गेली त्याला आता जवळपास ५० वर्षे झाली. खरंतर इतक्या वर्षानंतर बयो किंवा इतर कोणीही विस्मरणात जाण्याची पूर्ण शक्यता असताना बयो मात्र माझ्या मनात एकदा जे घर करून बसली ते कायमचेच.
बयोशी पहिली भेट, पुढच्या अनेक आठवणी अनेक प्रसंग अगदी काल-परवा घडल्यासारखं वाटतं. बयो काही अशी खूप शिकलेली किंवा साधनसंपन्न, धनसंपन्न नव्हती. खरंतर बिचारी एक आश्रित जीवन आयुष्यभर जगली. ज्यांची ती कुणीतरी जवळची होती ते तर तिला खूप आधीच विसरले होते. मी मात्र तिला मनाच्या कप्प्यात अगदी जपून ठेवली आहे. ती जायला तयार नाही, मी तिला जाऊ द्यायला तयार नाही. बयो ही माझ्या  वडिलांच्या नात्यातली मावशी. नेमकं नातं कोणी विचारलं नाही, कुणी सांगितलं नाही बयो म्हणजे बयोच. लहान ,मोठे, नोकर चाकर, सगळ्यांना एकच नाव माहिती बयो. तिचं खरं नाव देखील आम्हाला कुणाला माहीत नाही. कुणी तिला बयो ताई बयो बाई म्हणायचे, पण बहुतांशी ती बयोच . वयाच्या आठव्या वर्षी लग्न झालं, सहा महिन्यानंतर नवरा गेला. सासरच्यांनी अपशकुनी म्हणून अनन्वित छळ, यातना दिल्या आणि शेवटी अण्णा या आपल्या दूरच्या बहिणीला घरी घेऊन आले. इथे मात्र भावजयीकडून मान , आदर आणि  एक स्थैर्य बयोला मिळालं . त्या काळच्या, रिवाजाप्रमाणे बयो मागे आलेली. केशवपन, आलवण सगळं ओघानं आलं. बयो भावाकडे येण्याआधीच हे सर्व घडून गेलं होतं अण्णांना हे पसंत नसून सुद्धा बयोने मात्र ते चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. कदाचित तिची दूरदृष्टी असावी . बयो फारच देखणी होती. केतकी, गोरा रंग, धारदार नाक सडसडीत बांधा. या सौंदर्य खुलविणाऱ्या सगळ्याच गोष्टी एक प्रकारे तिच्या त्या अवस्थेत शापच ठरणाऱ्या होत्या. बयो वाढत होती, वयाने ,शरीराने आणि अनुभवाने सुद्धा. कल्पनेने सुद्धा शहारे येतात ना! आठ- नऊ वर्षाची कोवळी पोर, नवरा, संसार ,नातीगोती काही कळायच्या आतच नवरा गेला आणि वैधव्याचे जीवन जन्मभराकरता पदरात बांधलं गेलं . अर्थात बयो काही अशी एकटीच नाही. त्या काळात अशा हजारो मुली हेच प्राक्तन घेऊन जन्माला आल्या असतील. महिन्याच्या महिन्याला येणारा न्हावी, त्या बंद खोलीच्या दाराआड काय काय घडलं असेल त्या मुलींच्या बाबतीत. सगळं कठीणच आहे. सुदैवाने बयोच्या बाबत असे काही घडले नाही. आमचे अण्णा हायकोर्टात वकील होते .आमचे अण्णा असले तरी गावाच्या दृष्टीने मात्र अण्णासाहेब  होते. गोपाल कृष्ण गोखले त्यांचे वर्ग बंधू होते. मॅट्रिक झाले तर पंचक्रोशीची सभा झाली. मॅट्रिक झालेली मुले कशी दिसतात ... अशा खूप गमती अण्णा सांगायचे बयोच्या नापीत कर्माकरिता हा एवढा मोठा माणूस न्हाव्यासमोर बसून राहत असे . बयो त्यांच्या हाती सुरक्षितच होती बयो कितीही चांगली असली ,अण्णा कितीही मोठे असले तरी अनेकांच्या दृष्टीने ती  आश्रीतच होती. त्या काळातल्या तिच्यासारख्या स्त्रियांच्या भाग्याला आलेले काही भोग ती ही भोगत होती. पण तिचे वेगळेपण म्हणजे त्यात अगतिकता ,लाचारी असे काहीच नाही. खणखणीतपणे आपला आब राखून बयो जगली. भाऊ भावजयीमुळे तिला तसे जगता आले तरी पण जे घडत होते ते सुखावणारे नक्कीच नव्हते . स्त्रीत्व, मातृत्व, संसार कसला, कसला म्हणून संबंध न आलेली बयो, नात्यागोत्यातल्या सुनामुली त्यांचे बाळंतपण, सणवार करत होती किंबहुना तिला करावच लागत होतं. कुणाकडेही गरज असो लगेच पत्र असायचं, बयोला पाठवून द्या. बयो जायची.  दोन-चार महिने किंवा आवश्यकतेनुसार, बोलावणाऱ्याच्या गरजेनुसार बयो त्या घरातली व्हायची. गरज संपल्यानंतर मात्र बयो परत डहाणूला भावाकडे . शेवटी ते तिचे हक्काचे घर होते ना !  भाऊ तो हक्क देतही होता आणि बयो कृतज्ञ भावनेने तो हक्क जगत होती, वागवत होती.  कधी उतली नाही कधी मातली नाही, कर्तृत्ववान मुलुखाची.  कडवटपणा कुठेच नव्हता तिच्यात पण अनुभवजन्य आलेला फटकळपणा मात्र भरपूर.  पुढे पुढे तर अण्णांनी तिला कुठे पाठवण्यास बंद करून टाकलं . शेवटी नातेवाईक झाले तरी त्यांच्या संधीसाधूपणाची चीड तर येतेच ना ! अशी बयो, अनेकांच्या गोष्टींमधून त्यांनी सांगितलेल्या अनुभवांवरून कळत गेली ,मला उकलत गेली आणि शेवटी मनात अगदी ठाण मांडून बसली . ती इंदूरला आमच्याकडे दोन तीनदा आली . बराच काळ राहिली. इंदूरला आनंदात असायची. इतर ठिकाणचे अनुभव आणि इंदूरच्या घरातले वागण्यातले वेगळेपण तिला कळायचं. माझ्या आईला म्हणायची,' तुझं वागणं कसं ,माणूसकीला धरून आहे.  लहान वयात मला बयोच दिसणं, चालणं, बोलणं सगळ्यातला वेगळेपण जाणवायचं . पण तीच स्त्री मन, त्याची व्यथा कळण्याचे माझ वय नव्हतं. पुढे मात्र मला बयोच्या आठवणीने खूप रडावसं वाटायचं . एक मुलगी ,आपलं कोणीच नसलेल्यांची सुखदुःख न बोलता जगते आतली व्यथा डोळ्यातही येऊ देत नाही ,असं ती जगली या कल्पनेनेच मला घाबरायला व्हायचं बयोनी इंदूरलाच राहावं हा आम्हा भावंडांचा आग्रह पण बयो थकत चालली अण्णा आणि आजी तिचे भाऊ-भावजय तेही थकत चालले . मग मात्र कायमची डहाणूला भावाकडे होती. आणि असंच संक्रांतीच्या आगे मागे अण्णांचा पत्र आलं,"गं.भा.  बयोला देवाज्ञा झाली .बयो गेली म्हणून वाईट वाटलं .पण आता मात्र रडायला येत नव्हतं तर एक समाधान वाटत होतं , तिला विश्रांती मिळाल्याचं . त्या शापित आत्म्याला मुक्ती मिळाल्याचं,  माझ्या आठवणीतील बयो मात्र माझ्याबरोबर शेवटपर्यंत राहणार आहे. तिचं तसं राहणं मात्र मला कुठेतरी आधार देत असतं .


नाचू कीर्तनाचे रंगी 

भारतीय संस्कृतीत कीर्तन परंपरा फार प्राचीन काळापासून आहे . वेद काळापर्यंत याची परंपरा ते पुढे उपनिषदे व पुराणांमध्येही ही परंपरा सापडते. असे विद्वानांचे मत आहे . या विषयावर पूर्ण एकमत नसले तरी कीर्तन हा आमच्या सांस्कृतिक जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे . ज्ञान व भक्ती यांचा सुंदर मिलाफ कीर्तनात दिसतो .कीर्तन परंपरेत नारदीय कीर्तन , वारकरी , रामदासी , भराडी , हरिकथा , कैकाडी , सांप्रदायिक कीर्तन ,गाडगेबाबा संप्रदाय इ . वेगवेगळ्या परंपरा दिसतात . नारदीय कीर्तनाचा उगम थेट देवर्षी नारदापर्यंत सांगितला जातो . पहिला कीर्तनकार हा मान नारदमुनींचा . देवलोक व भूलोकावर सतत संचार करणारा हा ऋषी ,भू लोकी नाम संकीर्तनाद्वारे भगवान विष्णूचे गुणगान करत अशीही मान्यता आहे.कीर्तन ही वैष्णवांनी समाजाला दिलेली अमूल्य देणगी आहे . महाराष्ट्राचे संत पंचक नामदेव,ज्ञानदेव, एकनाथ , रामदास व तुकाराम . संत ज्ञानेश्वरांनी
भागवत धर्माचे , रोपटे लावले व सर्व संतांनी हा वेलू गगनावरी नेला  ''ज्ञानदेवे रचिला पाया कळस झळके वरि तुकाचा ।'' हे खरंच आहे . ज्ञानेश्वर हे ज्ञानमार्गाचे परमोच्च तर नामदेव ही भक्ती मार्गाची परिसीमा . ज्ञानदेव मराठीचे आद्य कवी व प्राकृतात श्रीमद् भगवदगीतेवर  भावार्थ दीपिका अर्थात ''ज्ञानेश्वरी'' या नावे भाष्य करणारे म्हणून प्रख्यात आहेत . मराठी भाषेत आद्य चरित्रकार व प्राकृतातले आद्य कीर्तनकार म्हणून सर्वमान्यता प्राप्त झालेल्या नामदेवांकडे "अभंग" या मराठी भाषेतील काव्यवृत्ताचे जनक हा बहुमान आहेच . एकनाथ हे संत पंचकातले क्रमाने तिसरे . नाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली व ती आजही सर्वमान्य आहे . एकनाथी भागवत , भावार्थ रामायण , एकनाथी भारूडे प्रसिद्ध आहेतच. संत रामदास व संत तुकाराम हे समकालीन इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असे म्हणतात. रामदास हे ज्ञानमार्ग व कर्म मार्गाचा संगम तर तुकारामांत ज्ञानमार्ग व भक्ती याचा मिलाफ . तुकारामांची गाथा ख्यात आहे . दासबोध , मनाचे श्लोक , करुणाष्टके प्रसिद्ध आहेत . ह्या रचना रामदासांच्या . सर्वच संत हे खरे निवृत्ती मार्गाचे उपासक पण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती व वळलेले निर्गुणाचे उपासक , पण सगुण भक्ती स्विकारलेले . कीर्तन म्हणजे कीर्तीमान , ईश्वरी तत्वाचे आमच्या जीवनात महत्व विशद करण्याचा व हे कुठेही  कंटाळवाणे होऊ न देता, लोकरंजन करत भक्तीमार्ग प्रतिपादन करण्याचे प्रभावी माध्यम . संत नामदेव हे प्राकृतातले आद्यकीर्तनकार . मराठी बरोबरच हिन्दीतूनही कीर्तन करणारे . एकनाथ , रामदास व
तुकारामही उत्तम कीर्तन करीत असत . संत पंचकात रामदास हे रामाचे उपासक तर ज्ञानदेव , नामदेव , एकनाथ व तुकाराम हे भागवत धर्माची पताका वाहणारे पंढरपुरच्या विठोबाचे वारकरी . पण पथभेद असला तरी कटुता नाही . 'रामदासी जैसा भाव तैसा झाला पंढरीराव' हे रामदासांचे वचन प्रसिद्ध आहे . जेथे घडे भगवदभक्ति हा काव्याचा उद्देश असे त्यांचे मत आहे . दासबोधात चौदाव्या दशकाचा चौथा समास कीर्तन लक्षण आहे . कलियुगी
कीर्तन करावे व नाना कीर्तीची अर्थात ईश्वर कीर्तीची कीर्तने करावी असे ते सांगतात . या समासात अनुप्रासाचा उत्तम अविष्कार आपणास दिसतो . उत्तम कवित्व , कीर्तन , हरिकथा निरूपण कसे असावे व कसे नसावे ते समजून घेण्या करता चौदाव्या दशकाचे तीन ते पांच या समासांचा अभ्यास अवश्य करावा . रामदास उत्तम कीर्तन करीत असत . त्यांचा कीर्तन संप्रदाय रामदासी संप्रदाय नावाने आहे . संत नामदेवानी मराठी बरोबरच गुरुवाणीतही अभंगरचना केली . त्या शब्दकीर्तन ह्या नावे प्रसिद्ध ग्रंथ साहेब मध्ये समाविष्ट आहेत . उत्तरेत नामदेव संप्रदाय फार मोठा आहे . गुजराथमध्ये संत नरसी मेहता यांनी कीर्तन प्रकाराचा उपयोग केला . बिहार , उत्तरप्रदेश सारख्या हिन्दी भाषिक प्रदेशात पारंपरिक , मराठी कीर्तनापेक्षा वेगळ्या प्रकारे कीर्तन होते . कीर्तन मंडळी , गोलाकारात बसतात व ढोलक , मंजिरा ( झांजा ) , खंजरी ही विशिष्ट वाद्ये व आता हार्मोनियम संगतीला घेवून कीर्तन वा नामजागर करत करत कधी कधी संपूर्ण रात्र जागवतात . हे सर्व चौपालवट अथवा देवळाच्या जवळपास
गावातल्या एखाद्या विशाल वृक्षा खाली . बंगालचे बाऊल संगीत व ओरीसातील भक्ती संगीताचा बाज थोडा वेगळा पण कुठेतरी कीर्तनाशी जवळीक सांगणारा . कारण संगीताच्या माध्यमातून हरिनाम संकीर्तन हा समान दुवा आहे . समाजाला सन्मार्ग प्रवृत्त करून निकोप चारित्र्यसंपन्न समाज निर्मिती हे उद्दीष्ट हे समान सूत्र ह्यात आहे .
पारंपरिक वारकरी संप्रदायाचे कीर्तन रंगते ते त्याच्या सर्व सरंजाम संगतीने . विठोकरी, टाळकरी , मृदंग वादक , झांजा , चिपळ्या हे सर्व हवेच . कीर्तनकार बुआ मधे उभे . इतर संगतकार त्यांच्या मागे अर्धवर्तुळाकार बसलेले , या परंपरेतही आता हार्मोनियमने स्थान मिळवले आहे . 'रामकृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि' च्या गजरात कीर्तन रंगत जाते . 'सुंदर ते ध्यान उभे विटेवरी' हा पंढरपुरच्या विठोबाचे भावचित्र उभे करणारा शब्दांचा कुंचलाच . श्रोते भक्तीभावात चिंब नहातात . हे सर्व होण्याकरता कीर्तनकार कसबी हवा . कीर्तन ही एक कला आहे . भक्तीमार्ग , ज्ञान मार्ग व मुक्तीचा मार्ग दाखवायचा पण हे सर्व करायचे लोकरंजन करत . उत्तम कीर्तनकाराला अभिनय , काव्य , संगीत , कथानकथनाचं कौशल्य , तालसुराची जाण हे सर्वच अवगत हवं . प्रसन्न व्यक्तिमत्व असेल तर मणीकांचन योगच. ही कला अन्य कलाप्रकारांप्रमाणे साधना व एक प्रकारची तपश्चर्या आहे . निष्ठा हवी हे महत्वाचे . हे येरा गबाळाचे काम नाही . कीर्तनाचे पूर्वरंग व उत्तररंग हे दोन भाग . पूर्वरंगात वातावरणनिर्मिती व उत्तररंगात मुख्य
आख्यान अर्थात कथाभाग व कीर्तनाचा विषय . संतांचे अभंग , पदे , ओव्या , श्लोक व पुराणे व इतर भक्ती साहित्याची मदत घेत गेली सातशे वर्षे ही परंपरा टिकून आहे . महाराष्ट्राच्या जनमानसात कीर्तनाला अनन्य महत्वाचं स्थान आहे . संत नामदेवाची उक्ती - 'नाचू कीर्तनाचे रंगी , ज्ञानदीप लावू जगी' हा ज्ञानदीप एका पिढीने वारसा दुसऱ्या पिढीला देत देत आजपर्यंत सातत्याने तेवत ठेवला आहे . काळ बदलतो , परिस्थिती बदलते व त्या
बदलत्या काळाबरोबर प्रत्येक कार्य , साहित्य , संगीत , काव्य , नाटक , चित्रकला , शिल्पकला हळू हळू अलगद नवं वळण घेते व अधिक समृद्ध होत जाते . ती व्हायला हवी . कीर्तन  या प्रभावी जनजागृती माध्यमाचं महत्व लोकमान्य टिळकांनी ओळखलं व स्वातंत्र्यलढ्यात त्याचा पुरेपूर उपयोग करून घेतला . स्वातंत्र्य सैनिकांच्या कथा , समाज सुधारणा इ . विषय कीर्तनात आहे . राष्ट्रीय कीर्तनकारांची परंपरा तयार झाली  व स्वातंत्र्यलढ्या करता जनतेचा , लोकशिक्षण व लढ्यास बलदायी असा जागरूक लोकसंग्रह घडवण्यात व समाजमन तयार करण्यात या नव्या परंपरेने महत्वपूर्ण कार्य केले . स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची परिस्थिती पुन्हा वेगळी , देशप्रेमाने ओतप्रोत जागरूक नागरिक स्वतंत्र देशाला हवे . देशाच्या फाळणीबरोबर समाजमन कुठेतरी दुखावलेलं होतं . कीर्तन परंपरेने परत आपला वाटा उचलला . माझ्या पिढीच्या लोकांना राष्ट्रीय कीर्तनकार दिवंगत गोविंद स्वामी आफळे यांचे नाव चांगले परिचित आहे . आज त्यांचे सुपुत्र श्री चारूदत्त आफळे उत्तम कीर्तनकार म्हणून ओळखले जातात . संत नामदेव , संत एकनाथ , संत तुकाराम , रामदास स्वामी या व इतर महान संतांची कीर्तन परंपरा अनेक कीर्तनकारांनी जोपासली . हरिभक्त परायण प्राचार्य सोनोपंत दांडेकर , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज , श्रद्धेय गाडगे महाराज , प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज , बाबा महार सातारकर , आदरणीय कान्हेरे बुवा व इतर अनेकांनी जतन केली , करत आहेत . ही परंपरा पुढे अश चालू राहील . ज्ञानदान , जनजागृती व भक्तीतून मुक्तीचा मार्ग दाखवणारे हे माध्यम आजही शिक्षण व समस्त अभिरुचि संपन्न  मनोरंजनाचे साधन म्हणून मराठी माणसांत व विशेष करून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय आहे . समाज जीवनाच्या अनेक अंगाप्रमाणे याही परंपरेत अपप्रवृत्तीचा प्रवेश झाला होता,आहे. कदाचित पुढेही होईल . पण अशा कुप्रवृत्तीता शासन समज देतोच. अशी नावे क्षणभंगूरच असतात.आपण सदैव तुकाराम महाराजांची उक्ती मनन करावी , आचरावी व ध्यानात ठेवावी. 

खोल ओली पडे ते पीक उत्तम
उथळांचा श्रम वाया जाय
तुका म्हणे कसी आगी जे उतरे
तेचि येथे सरे जाती शुद्ध 


विक्रम संवत आणि आम्ही

काही वर्षापूर्वी एक सदगृहस्थ माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एक कॅलेण्डर दाखवलं त्यावर .... मोठाल्या अक्षरांत लिहिले होते ( हिंदू कॅलेण्डर ) ते विक्रम संवताचे अनुवार्षिक प्रकाशन हिंदू नववर्षाप्रमाणे करीत होते . मी त्यांना सांगितले की इथेच माझा तुमच्याशी मतभेद आहे . हा एका उपनिवेशक सत्तेने अत्यंत धूर्तपणे केलेल्या खेळीचा परिणाम आहे आणि आम्हीदेखील त्याप्रमाणे वागायला किती तत्पर असतो ! या उपनिवेशक सत्तेने ( हिंदू ) शब्दाचे अर्थ - संकुचन केले आणि विक्रम संवताला संकीर्ण सांप्रदायिक वर्तुळात आणून ठेवले . आज विक्रम संवत ह्याचा अर्थ इतका संकुचित झाला आहे की मध्य प्रदेश सरकारने काही वर्षापूर्वी विक्रम संवताच्या पहिल्या दिवशी अर्थात् वर्ष प्रतिपदेला सुट्टीची घोषणा केली तेव्हा समाजाच्या काही घटकांकडून विरोधाचे सूर उठले व ह्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न झाला . शेवटी केरळ सरकार दरवर्षी राज्यभर चिंगम प्रथम ( केरळवासीयांच नववर्ष ) आयोजित करते हे निदर्शनास आणून दिल्यावर प्रकरण थंडावलं . मल्याळी कालगणना कोला वर्षाची सुरवात खरं तर इ . सन ८२५  मध्ये कोल्लम येथे शिव मंदिराच्या स्थापना प्रीत्यर्थ झाली . विक्रम संवताच्या बाबतीत किंचितही धार्मिक दृष्टी व विचार नाही आहे , जेवढा तथाकथित इसवी सन् कॅलेण्डर मध्ये आहे , ज्याला जगाच्या फार मोठ्या भागात ख्रिश्चन कॅलेंडर नावाने ओळखले जाते . ह्याचा प्रारंभ तेरावे पोप ग्रेगरी ह्यांनी इ . सन १५८२  मध्ये केला . पोपची धर्माज्ञा ( Papal Bull ) २४  फेब्रुवारी १५८२  Inter Gravissimas नावाने प्रसारित केली गेली . ह्या मागचा उद्देश मुख्यत्वेकरून ईस्टरच्या दिवसाचं यात समायोजन करणे हाच होता . चर्च ऑफ रोम व चर्च ऑफ अलेग्झांड्रिया ह्यांच्यात या बाबत मतभेद होते . ह्या नव्या कालगणने द्वारे हे मतभेद दूर झाले . यानंतरही सुरवातीला कॅथलिक चर्च आणि पोपच्या आधीन राज्ये अर्थात् रोम , माशें , अम्ब्राया , रोमाग्नाबाहेर ह्याला मान्यता मिळाली नाही व ह्याचा स्वीकार केला गेला नाही . ही राज्ये खरं तर इटली उपद्वीपाचे छोटे भाग होती . प्रोटेस्टंट व ऑर्थोडॉक्स चर्च व इतर काही चर्चनी ह्याचा स्वीकार केला नव्हता . हे कॅलेंडर जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित करण्यात आले तेव्हा त्या खाली ( bottom line ) पोपची अधिकृती ( authorization ) असा उल्लेख असे . ब्रिटन व ब्रिटिश साम्राज्याने सन १७५२ पर्यंत या कॅलेंडर ला मान्यता दिली नव्हती . याचा अर्थ असा की १७० वर्ष ब्रिटिशांचा याला विरोध होता . स्वीडिश विरोध १७१ वर्षे होता . फ्रांसने याचा स्वीकार केला पण पुढे सन १७९३  मध्ये फ्रांसचे रिपब्लिकन कॅलेंडर प्रचारात आणले सन १८०५ मध्ये फ्रान्सने पुन्हा याचा स्वीकार केला (सिविल कॅलेंडरचा)
हे एक ऐतिहासिक सत्य आहे की पोपने आपल्या धर्माज्ञेत असे कॅलेंडर सुरू करणे हा आपला पारंपारिक अधिकार आहे असे नमूद केले होते .पोप म्हणाले," आमच्या या आदेशाद्वारे आम्ही पोपचे परंपरागत सार्वभौम अधिकार स्पष्ट करत आहोत आणि परमेश्वराच्या चर्चवर असलेल्या असीम कृपेने प्रकाशित होणाऱ्या या सुधारित कालदर्शिकेस मान्यता देत आहोत आणि आज्ञा दिली आहे की सर्व चर्च प्रमुख नागरिक आर्च बिशप बिशप व चर्चच्या इतर सर्व मठाधिपतींनी या नवीन कालगणनेचा स्वीकार करावा व आपल्या अधीन असलेल्या चर्च,मठ, कॉन्व्हेटस, अधिपत्याखालील संस्था समूह या सर्वांनी धार्मिक आयोजने प्रार्थनासभा मेजवान्या इत्यादी आयोजना करता याचा उपयोग करावा." अशा प्रकारे आजचे तथाकथित ' धर्मनिरपेक्ष ' कॅलेंडर मूळात एक धार्मिक / सांप्रदायिक कालगणना होती व एका धर्म विशेषाच्या प्रमुखाने ह्याचा प्रारंभ केला आहे . ह्याच्या प्रवर्तन व प्रारंभीची प्रेरणा आणि कारणे देखील धार्मिकच होती , तसेच ह्याचं प्रयोजन व उपयोग मुख्यत : धार्मिक होते .
आज ज्याचा उल्लेख हिंदू कॅलेंडर म्हणून केला जातो त्याचा प्रारंभ एका राष्ट्रीय यशाला अनुष्ठानित करण्याच्या उद्देशाने एका शासकाने / प्रशासकाने केला होता . एका महान राष्ट्रीय पराक्रमाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने राजा विक्रमादित्याने असे केले हे विसरून चालणार नाही . विक्रमादित्य व त्याच्या सैन्याने ९५ शक राजांचा पराभव करून भारताला विदेशी शासकांच्या , गुलामगिरीतून मुक्त केलं व त्या विजयाप्रीत्यर्थ हा संवत् सुरु केल
भारतात संवत् स्थापना सहजच झाली नाही . तत्कालीन मान्यता होती की जो राजा आपला संवत् प्रारंभ करू इच्छितो त्याने असे करण्यापूर्वी आपल्या राज्यातील सर्व कर्जदारांना ऋण मुक्त करावे . राजा विक्रमादित्याने आपल्या राजकोषातून धन देऊन दीन , दुखी प्रजेला सावकारी पाशातून सोडवलं होते . ह्याची तुलना आजच्या कर्जमाफी योजनेशी होऊ शकत नाही कारण तेव्हा फक्त सरकारी कर्जच माफ केली गेली नव्हती तर सावकाराकडून घेतलेली कर्ज देखील फेडली गेली होती . ' विक्रम ' हे फक्त कुणा एका राजाचं नाव न राहता राष्ट्राच्या शक्ती व पराक्रमाचा पर्यायी शब्द झाला होता . संपूर्ण पश्चिम भारत सौराष्ट्र ( काठीयावाड ) , गुजरात , अवंती पर्यंत शकांचे अधिपत्य होते इतकेच नव्हे तर सिंध , तक्षशिला , मथुरा , व महाराष्ट्रापर्यंत त्यांची केंद्रे बनली होती . अशा परकीय आक्रमकांच्या विळख्यातून राष्ट्राला मुक्त करण्याचा पराक्रम या राजाने केला होता , ती आठवण चिरस्थाई करण्याच्या उद्देशाने हा संवत्सर सुरु केला गेला . फ्लीट , फर्ग्युसन व ह्यांच्यासारख्या इतर बऱ्याच उपनिवेशवादी इतिहासकारांनी विक्रम संवताबाबत भ्रामक प्रचाराचे अनेक बालिश प्रयत्न केले आहेत . फ्लीट यांची मजल तर हा शकांनी सुरु केलेला आहे असे म्हणण्यापर्यंत गेली . प्रयत्न हा सिद्ध करण्याचा झाला की विक्रम संवत् हा राष्ट्राच्या विजया प्रीत्यर्थ सुरु झाला नसून तो पराजयाचा द्योतक आहे . हे सर्व प्रयत्न त्यातील अंतर्विरोधाकारणे टिकू शकले नाहीत कल्पना करूया की भारत गुलाम झालाच नसता तर ग्रेगेरियन कॅलेंडर , ही कालगणना आमच्यावर लादली जाऊ शकली असती कां ? आजही राज्यकर्ते व राज्य सत्ता इसवी सन् कालगणना मान्य करत असली तरी भारतीय समाज आपले सण , उत्सव ग्रेगेरियन केलेंडर प्रमाणे साजरे करत नाही . आमचे लग्न समारंभ ह्या अनुसार होत नाहीत . आज आमचा समाज संवत कॅलेंडर प्रमाणे व राज्य ग्रगेरियन कॅलेण्डर प्रमाणे चालते . राज्य समाज यांच्यात असे अनेक भेद आहेत . तरीसुद्धा हे उपनिवेशवादी ओझं आम्ही आमच्या खांद्यावर सहर्ष वाहत आहोत . चर्च द्वारे निर्धारित कालगणना भारतीय राज्य व्यवस्थेने स्वीकारली आहे . ५ जून हा आपण पर्यावरण दिवस म्हणून साजरा करतो.  तेव्हा खरं तर सर्वत्र रखरखाट असतो , निसर्ग अगदी बापुडवाणा दिसत असतो . श्रावणात जेव्हा सृष्टी सौंदर्य अनुपम असते त्यावेळी हे आयोजन होत नाही इथपर्यंत आमच्या कालगणनेच्या पद्धतीची उपेक्षा झाली आहे .
 विक्रम संवत् या मोठ्या प्रशासकीय यशाप्रीत्यर्थ स्थापित कालगणनेचा आम्ही उपयोगच करत नाही . गुलामी पत्करण्यापूर्वी संवत् कालगणणेच्या उपयोगाची आम्हांस लाज वाटत नसे . तेव्हा वसंतपंचमीला शिक्षणाचा प्रारंभ होत असे व विद्यालय प्रवेशाचा हा दिवस असायचा . ' ओनामासी धम म्हणजे ओम नमः सिद्धम त्या काळी बलराम दिवस हा कृषीवलांचा दिवस असे विश्वकर्मा दिवस हा अभियंत्यांचा व धन्वन्तरी दिवस हा चिकित्सकांचा दिवस असे . त्या काळी दसरा ते कार्तिकी एकादशी पर्यंत वृक्ष पूजा , वृक्षारोपण , वृक्ष - संरक्षण असे उपक्रम होत असत , जे ऋतुमानानुसार योग्य वेळी होत . ज्या देशात राष्ट्र हाच धर्म मानला जात होता , त्या देशात आता धर्माच्या आधारावर राष्ट्र हा विचार पडद्याआड केला गेला आहे . लक्षात घेण्याची बाब हीच की सन १५८२ मध्ये ग्रेगेरियन कॅलेंडर सुरु झाल्यानंतर १८ वर्षांनी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्लंड मध्ये झाली , वीस वर्षांनी डच ईस्ट इंडिया कंपनीची सुरवात , ४६ वर्षांनी पोर्तुगिज ई . इंडिया कंपनीचा प्रारंभ आणि सन १६६४ मध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची सुरवात या गोष्टी काय दर्शवितात ? ह्या द्वारे जगाला गुलामीकडे नेण्याची मोहीमच सुरू झालेली आपणास दिसते . भारतीय संवत् दास्यतेतून मुक्त करण्याचं कार्य करत होता आणि ठीक या उलट ग्रेगेरियन कॅलेंडरचा प्रसार लोकांना गुलाम करून झाला आहे . ऋणमोचनाने संवत्सर सुरू होई , किती उदात्त ! भारतातून लुटून नेलेल्या अपार संपत्तिची बोच हे ग्रेगेरियन कॅलेंडर आम्हास सतत जाणवून देतं . ह्याची विस्तृत चर्चा दादाभाई नवरोजी यांनी केली आहे . कॅलेंडर शब्द कालांतर या शब्दाचे कदाचित एक रूप असावे . याचा उपयोग समाज जीवन संगठित करण्यास होतो त्या बरोबरच ते वास्तवातील एक निश्चित धारणेचे माध्यम आहे . विक्रम संवत् जागतिक स्थिरता व लय साधणारी अशी कालगणना आहे जी निसर्गाशी सतत संवाद करते . हा सप्टेम्बर , ऑक्टोबर , नोव्हेंबर , डिसेंबर अशी सात , आठ , नऊ , दहा अशी नुसती मोजणी नाही . इथे जुलियस सीझर किंवा ऑगस्टस प्रमाणे कुणा राजाच्या नावावर जुलै , ऑगस्ट अशी महिन्यांची नावं नाहीत ती नंतर जोडली गेली . ह्या इंग्रजी कॅलेण्डर मध्ये मोजणीच्या चुकाही आहेत . बारा महिन्याच्या केलेंडरचा शेवटचा महिना दहावर कसा संपतो ? जानेवारी , फेकवारी हे खरं तर अकरा व बारावा महिना असायला हवे व मार्च हा पहिला महिना तोच मार्च महिना असेल जेव्हा साधारणपणे आपला चैत्र महिना येतो , ज्याने विक्रम संवत सुरू होतो . ( सरकारी वर्ष ) या स्वरूपातही कमी अधिक प्रमाणात विक्रम संवत जगभर चालतो . अशा तऱ्हेने आपणास दिसते की जागतिकरणाच्या प्रक्रियेत संवताचं अप्रत्यक्ष योगदान आहे . ज्या जागतिकरणाकरिता ग्रेगेरियन कॅलेंडर आवश्यक आहे हा तर्क दिला जातो त्याला आर्थिक वर्ष या स्वरुपात विक्रम संवताने अप्रत्यक्षपणे व्यवहारात पूर्ण केले आहे , ते ही कुठलाही दावा व गाजावाजा न करता . सेचा स्टर्न प्राचीन समाजांच्या एका अध्ययनात असे म्हणतात की त्या काळी एक दुहेरी कालगणना असे , एक नागरी ( civil ) व दुसरी धार्मिक ( calendars in antiquity ) . फार प्राचीन लेटीन लेखक सेंनसोरीनस ( इ . सन पूर्व तिसरे शतक ) ह्याने देखील असा उल्लेख केला आहे . ह्याचे विरोधाभासी चित्रण ही आधुनिक विद्वत्तेची देणगी आहे . प्राचीन मेसोपोटेमियात चंद्र संवत् होता आणि तीस दिवसाचा महिना अशी कालगणनाही अस्तिवात होती जिचा उपयोग लिखाणासारख्या कामात होत असे . अशीच दुहेरी अथवा विविध संवत्सर व्यवस्था असल्याचे दाखले इझाइल , मिस्र , ग्रीस व अरबस्थानात देखील मिळतात . भारतात कालचक्र पूर्णपणे उलट दिशेकडे फिरलं आहे . जे धार्मिक होते ते नागरी व नागरी हे धार्मिक झाले आहे . भारत गुलाम झाला नसता तर असे होणे शक्य नव्हते . आपणास म्हणूनच विनंती आहे की विक्रम संवताच्या नव वर्षाचे स्वागत करतांना इतिहासाच्या ह्या त्रासदायक आठवणी व त्या मागील विडंबनाची पृष्ठभूमी अवश्य लक्षात घ्यावी .

संकलन : सुषमा ठाकूर 


टीप --
आपल्या समूहात इंग्रजी आणि विशेष करून रोमन लिपी निषिद्ध आहे, पण हा लेख अनुराधाताईंचा मूळ लेख आहे आणि त्या आता हयात नाहीत म्हणून त्यात काहीही बदल करणे योग्य वाटले नाही.

    सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव             (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)                   सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...