श्रीकांत आरोंदेकर
(५ ऑगस्ट १९४२– २० फेब्रुवारी २०१४)
श्रीकांत आरोंदेकर यांचा जन्म ५ ऑगस्ट १९४२ रोजी इंदौर येथे झाला. त्यांचे वडील यशवंत त्रिंबक आरोंदेकर हे, कोंकणातील अरोंदा या गावातून इंदौरला आले होते. त्यांच्या मातोश्री वत्सलाबाई आरोंदेकर या ग्वाल्हेर जवळ असलेल्या सबलगड ह्या गावाच्या होत्या. आपल्या आईवडिलांबद्दल आणि कुटुंबाबद्दल श्रीकांतजी सांगायचे की आई वडील दोघेही कमी शिकलेले आणि लहान गावातून आले असले तरी दोघांनी मुलांचे आयुष्य घडविण्यात काहीही उणे भासू दिले नाही. श्रीकांतजींचे वडील अत्यंत व्यवस्थित आणि स्वाभिमानी पुरुष होते.इंदौरच्या लाल इमली शोरूम मध्ये नोकरी करून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालन पोषण केले. आपल्या आईबद्दल ते सांगायचे की त्यांची आई म्हणजे अत्यंत हुशार बाई. ती सुगरण, व्यवहार कुशल तर होतीच , त्यासोबत त्याकाळी सुद्धा दांडगं सामान्य ज्ञान असणारी व काळाच्या पुढे चालणारी होती. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आम्हा सर्व भावंडांवर अत्यंत मोठा प्रभाव आहे.
सहा भाऊ बहिणींच्या कुटुंबात श्रीकांतजी दुसऱ्या क्रमांकावर जन्माला आले होते. त्यांचे बालपण एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. स्वतःबद्दल बोलताना ते नेहमी सांगायचे की आमच्या बालपणी जरी भौतिक सुखांच्या अभाव होता तरी आमचं बालपण खाणंपिणं आणि नाते जोपासणं या दृष्टीने अत्यंत आनंदाचं होतं. श्रीकांतजीं चे बालपण खातीपुरा रोड इंदौर येथे गेले. पहिले, मराठी माध्यमिक विद्यालय आणि नंतर महाराजा शिवाजीराव हायर सेकंडरी स्कूल येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर,त्यांनी इंदोर ख्रिश्चन कॉलेज येथून बीकॉमची पदवी घेतली. कौटुम्बिक अडचणींमुळे त्यांना वयाच्या सोळाव्या वर्षी पासून नोकरी करावी लागली त्यामुळे, अभ्यासामध्ये जरी हुशार असले तरी परीक्षांमध्ये ते नेहमी साधारण विद्यार्थी ठरले.
मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांना वडिलांनी इंदौर बँकेमध्ये काम करत असलेले आपले एक मित्र खान चाचा यांच्याकडे पाठवलं. या मुलाखतीचा उद्देश असा होता की खान चाचा जे स्वतः इंदोर बँकेत चपराशी म्हणून नोकरी करत असत, ते श्रीकांतजींना इंदूर बँकेत चपराशी म्हणूनच नोकरीसाठी मदत करू शकतील. जेव्हा श्रीकांतजी खान चाचा यांना भेटले तेव्हा खान चाचांनी जणू भविष्य वर्तले " तू तो मॅट्रिक पास है, चपरासी नही बाबू बनेगा". अशा प्रकारे विविध जागी नोकरी केल्यानंतर सन १९६१ साली त्यांची स्टेट बँक ऑफ इंदौर मध्ये गोडाऊन क्लर्क म्हणून नेमणूक झाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितले नाही.
सन १९६१ पासून २००१ पर्यंत म्हणजे तब्बल ४० वर्ष त्यांनी स्टेट बैंक ऑफ इंदौर आणि त्यानंतर बैंक ऑफ इंडिया या संस्थांना दिले. त्यांची बैंक ऑफ इंडियात निवड होण्याची कहाणी पण खूप गमतीशीर आहे. बीकॉमची परीक्षा तृतीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे बैंक ऑफ इंडिया यांना कारकूनाच्या पदावर घेण्यासाठी तयार नव्हती, परंतु कारकूनाच्या भरतीसाठी जी परीक्षा बैंक ऑफ इंडिया घ्यायची त्या परीक्षेत श्रीकांतजींनी संपूर्ण मध्यप्रदेशात उच्चांक गाठला होता आणि विशेष म्हणजे ह्या परीक्षेत जो परीक्षार्थी त्यांच्यानंतर दुसऱ्या स्थानी आला होता तो त्यांच्या सहपाठी होता आणि त्याने बीकॉम मध्ये स्वर्ण पदक मिळविले होते. बैंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना संधी द्यायचं ठरवलं आणि नंतर श्रीकांतजींचं नाव बैंक ऑफ इंडिया मधील प्राविण्य असलेल्या अधिकाऱ्यांमध्ये सामील झालं.
बालपणापासून ते सेवानिवृत्ती पर्यन्त श्रीकांतजींचं जीवन संघर्षमय राहिलं, तरीही त्यांच्या आतील एक कवी हृदय असलेलं व्यक्त्तीमत्त्व कधीच थकलं नव्हतं. सन १९६० मध्ये वयाच्या १८व्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली पण ती वाचल्यावर ती पहिली आहे असं अजिबात जाणवत नाही. त्या नंतर पन्नास वर्षे काव्य मनातच राहिले आणि २०११ मध्ये पुण्याच्या इस्पितळात असताना कवितेनं पुन्हा त्यांच्या आयुष्यात प्रवेश केला. बैंकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळपास १२ वर्षांनी सन २०१३ मध्ये श्रीकांतजींनी आपला पहिला आणि दुर्दैवाने शेवटला काव्यसंग्रह "श्रावणसरी" या नावाने काढला.संग्रहात ज्या कविता आहेत ती फक्त दोन वर्षाची कमाई आहे, जी श्रीकांतजी आपल्यासाठी सोडून गेले. ह्या दोन वर्षात ते कवितेत किती गुंतले होते ते त्यांच्या कविता वाचताना कळतं .
श्रावणसरीच्या मनोगतात ते कवितेबद्दल सांगतात की मनात येईल त्याला काव्यरूप द्यावे आणि त्यात धुंद व्हावे , असा जगण्याचा श्रावण करणारा हा एक छंद आहे हे मला उमगलं आहे. ह्या सुंदर श्रावणात त्यांनी भिजावं, भिजवावं आणि धुंद व्हावं हे नियतीच्या मनात नव्हतं आणि पुस्तक प्रकाशनानंतर अवघ्या सहा महिन्यात २० फेब्रुवारी २०१४ ला त्यांचे निधन झाले.
श्रीकांतजींच्या कवितांमध्ये त्यांच्या जीवनातला संघर्ष स्पष्टपणे आढळतो. मग ते बैंक युनियन मध्ये आलेले अनुभव असतील, किंवा प्रकृती बरी नसताना रुग्णालयात आलेला अनुभव असो, त्यांच्या कवितेमध्ये हे सगळं दिसून येतं तरी जीवनाने दिलेल्या कटू अनुभवांत सुद्धा त्यांच्या आतील एक अत्यंत सकारात्मक व्यक्ती जिवंत होती . जीवन कसं जगायचं हे त्यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सांगायचा प्रयत्न केला. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग सौंदर्य,नातेसंबंध,मृत्यूची संकल्पना असे अनेक संदर्भ येतात. ओवी, मुक्तछंद व छंदबद्ध रचना, गझल या सर्वांतून त्यांचा काव्य प्रवास दिसून येतो आणि अनेक स्पंदनातून वाचकांशी हितगुज करतो.
१.अधिष्ठान
देह आत्म्याचे घर
मन खिडकी घराची
कुविचारा सुविचारा
पलीकडे पाहण्याची
खिडकीतून येई आत
ज्ञानाचा प्रकाशझोत
पुष्पगंधित हा वारा
भिरभिरे या घरात
ऊन कोवळे पिवळे
जर्द नेसून सोवळे
भक्तिभावाचा सुगंधी
धूप जैसा दरवळे
खिडकीतून बघावे
निळ्या रंगाचे आकाश
चंद्र बसे मोजायला
त्याच्या चांदण्याचा कोष
आत्मारामाचीच पूजा
बांधू मन गाभाऱ्यात
सौख्ये सुख शांती नांदो
सदोदित या विश्वात
माझे मंगल गायन
भक्ती भाव अनुष्ठान
मांगल्याने व्यापले हे
ईश्वराचे अधिष्ठान
२.माझ्या माऊलीचे घर
माझ्या माऊलीचे घर
सर्व सुखाचे आगर
वात्सल्याची खाण जेथे
माया पाखरण वर
दूर माऊलीपासून
राहिलो मी फार काळ
आता माऊली बोलवे
ये s रे ये s रे येरे बाळ
माझ्या आईच्या कुशीत
घेतो मी झोप निवांत
उद्वेगाचे नाव नाही
सारे कसे शांत शांत
ज्ञानाचा प्रकाश येथे
उजळितो माझे घर
मांगल्य नांदते इथे
हरिहराचा वावर
माझी माऊलीची भेट
आता व्हायची लवकर
लागली माझ्या मनासी
गोड गोड हुरहूर
माऊलीच्या घरी जाया
नाही लांबचा प्रवास
डोळे मिटा क्षणभर
चित्ती माऊलीचा वास
३.ते आणि मी
शब्दांचे शर त्यांच्या हाती
समोर माझी उघडी छाती
मी 'वाली' मानून 'राम' ते
झाडा आडून बाण मारिती
माझ्या बाजूस मीच एकटा
त्यांच्या संगे शकुनीमामा
त्यांची चौसर त्यांचे फासे
मिळून चालू द्या हा हंगामा
वृश्चिकदंशी सर्पाचे विष
मी नाही पण 'भोले शंकर'
नको फुकाचे मोठेपण हे
दूरच ठेवा विष भयंकर
उचलायला शक्ती न उरली
दिखावटी प्रेमाची पोती
व्यर्थ सांत्वना देणारी ती
नकोत फसवी नातीगोती
आता माझा मार्ग एकला
आनंदे मज नाचू गाऊ द्या
सिंहासन लखलाभ तुम्हाला
निवांत मजला झोप घेऊ द्या.
४.श्रमिक आणि धनिक
दिवसावर गाजवून सत्ता
अस्तपंथ रवी होई
दमल्यानंतर घरी जायची
तयास असते घाई
उन्हात राबून संध्याकाळी
श्रमिक मोकळा होतो
तो निढळाच्या घाम फुलांची
डाळ भाकरी खातो
दोन घोट मदिरेचे प्राशून
गरीब झोपी जातो
'आज' लढविणे असते त्याला
घोर उद्याचा नसतो
धनी उद्याची चिंता करितो
जागून साऱ्या रात्री
तरी तयाला कधीच नसते
पहा कशाची खात्री
लहान चोरांसाठी शिक्षा
मोठ्यांच्या हाती सत्ता
पाय पकडूनी मते मागती
अंती झाडती लाथा
ह्या मोठ्यांचा लगाम घेऊ
चला आपल्या हाती
गमवायला काही नसता
उगाच कशाची भीती.
५.विस्तार
मी होतोय निळं आकाश
अनंत असीम
हाताला न गवसणारं
कवेत न येणारं
छत्र जगावरचं
मला अभिमान वाटतो
मी आकाशासारखा
अनंत असीम पोकळ शून्य
शून्यातूनच ब्रम्हांड निघालंय म्हणे
माझ्यातूनही निघेल कदाचित
हे विस्तारणं
मोठं विशाल असीम होणं
नांदी असेल का
माझ्या लवकरच विखुरण्याची
देहाच्या पंचतत्वात विलयापूर्वी
अनंताशी हा मानसिक विलय
सर्वांनाच लाभतो का
का ही आध्यात्मिक उन्नती
का कविता प्रसवतेय
शून्यात गुंता वाढतोय
काहीतरी घडतंय
अनाकलनीय.
६.बाग आणि वन…
बाग म्हटलं
की फुलझाडं आलीच
आणि येतात
क्रोटंस शोभेचे
वृक्ष मात्र थोडेच
छाया देणारे
किंवा श्रावण झुले
टाकता येणारे
वृक्ष असतात वनात
मी पाहिलंय वन
आणि मोठे मोठे वृक्ष
उत्तुंग कल्पनांचे
जमीन फाडून
खोल शिरलेल्या
त्यांच्या पारंब्या
कवीच्या दाढीसारख्या
हे वन आहे
कल्पद्रुमांच
मी विणतो
गोफ शब्दांचे
आणि शब्द वेचायला येतोच
कल्पद्रुमांच्या वनात
शब्द प्राजक्ताचा सडा
नेहमीच असतो तेथे.
७. निराशा (वयाच्या १८व्या वर्षी लिहिलेली पहिली कविता)
दुःखाचे डोंगर जीवनी या
अश्रूंच्या वाहतात नद्या
काल निघाली अंधारातून
अंधारातच आज उद्या
दिवस कालचा दारिद्र्याचा
आज अजूनही दरिद्रीच मी
नव्या काळचा नवा सुदामा
दरिद्री असूनही मित्रविहीन मी
काल उपाशी आज उपाशी
आणि उद्याची चिंता प्रभूशी
दैव धावते पुढे योजने
मैत्री माझी दुर्दैवाशी
क्षितिजावरही प्रकाश नाही
दीप नसे या दुर्गम मार्गी
मृत्यूलोकी या फक्त निराशा
आणि सुखाची आस न स्वर्गी.
८ .उर्मी
मेंदूच्या मज्जातंतूच्या
अस्ताव्यस्त वर्दळीतून
सलामत बाहेर पडणं
केवढा मोठा ताप
दार बंद असताना
भिंत तोडण्यासारखं
पण वेदना मार्ग काढतात
आणि बाहेर पडतात
शब्दांना शोधत
शब्द खेळतात लपाछपी
तगमग वाढते जीवाची
कधी कधी वेदनाच हरवतात
मग लपण्यात अर्थच नसतो
शब्द न्हातात वेदनांच्या पावसात
मग काव्य भाव अंकुरतो
आणि कवितेचा जन्म होतो
बाळाला अलगद ठेवतात
कागदाच्या गादीवर
बाळाला काजळ तीट पावडर
बाळ हळूहळू वाढतं
बारशाला बाळाचं नाव ठेवतात
असं येत शीर्षक कवितेचं.
९ .स्वयंभू
देहाच्या क्षितिजापार
प्राण्यांची आगळी वस्ती
जेथे न मृत्यूची धास्ती
आकाशी चंद्र मिरवितो
तार्यांची कंठी माळ
मग धावत येई सकाळ
या डोंगर माथ्यावरती
घन घोर दाटून आले
नक्षत्र मृगाचे ओले
उद्दिष्ट सारखे नसता
मैत्रीचा सरला योग
आपुल्या कर्माचा भोग
शिरच्छेद सैनिकांचे
शांतीच्या तरीही गप्पा
हा पाकनितीचा टप्पा
ते नृत्य बहरले असता
पायातील तुटली चाळ
कोणावर घ्यावा आळ ?
कवितेच्या ओळीत आल्या
शब्दांनी मोहरून यावे
हे काव्यस्वयंभू व्हावे !
१० . व्याधी
झाडावर नवखे फुल
भाराने तुटली फांदी
ही नश्वरतेची नांदी
वेळूच्या बनातील पाने
ह्या घरात आली कैसी ?
वाऱ्याची ऐसी तैसी
तू प्रथम भेटली मजसी
तव गाली खुलली लाज
कां पिवळा पडला ताज ?
मसणात सुचे वैराग्य
बदले न कुणाचे भाग्य
ही दगडावरची रेघ
मी क्लांत इथे निजलेला
लिहिलेली कविता अर्धी
ही जन्मभराची व्याधी
११ . शोध
"काय शोधताय ?"
"ईश्वर"
"मिळाला ?"
"नाही"
"पोलिसात रिपोर्ट दिली ?"
"पेपरात जाहिरात दिली ?"
"फोटोसकट द्या"
"काय फोटो नाही ?"
"स्केच तरी द्या"
"पण आम्ही कुठे पाहिलंय ?"
"मग कसं शोधताय ?"
"मागायचं आहे त्याच्याकडे"
"तो देतो का ?"
"हो, सर्वांनाच"
"मग तुम्हाला दिलं असेलच ?"
"अजून हवंय"
"कां ?"
"बऱ्याच जणांना दिलंय"
"आणि कमी ?"
"बऱ्याच जास्त लोकांना"
"तुमच्यातलं थोडं द्याल त्यांना ?"
"कशाला ?"
"त्यांना अगदीच कमी मिळालंय"
"भाग्य त्यांचं"
"देव आणखी देईल तुम्हाला"
"काय भरवसा ?"
"कुणाचा ?"
"देवाचा"
संकलन : अलकनंदा साने