सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव
(२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)
सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव
(२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)
प्रतिभा काळेले
(१० मार्च १९१२ —१० मार्च १९९८)
१. आई कुठे गेली?
“ सांग ना ताई, अशी गेली कुठे तरी आई? ।
काल तिला तर उठवत नव्हते ।
म्हणती ती खिळली शेजेतें ।
आज सकाळी उठुनी पाहते । गेली तो आई ।
सांग ना ताई! ।।१।।
तू नि मीच ना इथली सारी ।
खिडक्या-दारे नीट लावली ।
वाट कशी मग तिला मिळाली ।
जावी कशी बाई ।
सांग ना ताई! ।।२।।
आजकाल मी हट्ट न केला ।
रडले नाही ठाउक तुजला ।
तिने बरोबर मग का मजला ।
घेतले नाही ।
सांग ना ताई ।।३।।
आई कुठे गेली असताना ।
उगी करावी तूच मला ना ।
आईसाठी तूच मग पुन्हा ।
रडसी कां ही?
सांग ना ताई ।।४।।
बाहुली माझी तूच फोडिली ।
चिमणी माझी तूंच हरविली ।
अगे लबाडे तूच लपविली ।
कुठे तरी आई ।
सांग ना ताई ।।५।।
बरें बरें जरी खाऊ न दिला ।
घेइ ताई जरी गोड गोडुला ।
पापा माझ्या दोन्हीकडला ।
दावी परी आई ।
सांग ना ताई ।।६।।
कवटाळुनी छकुलीला पोटीं ।
किती शहाणी ताई मोठी ।
होउनी छकुली वेडी धाकटी
रडली धाई ।। ७।।
२. नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी !
तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला
अगे भक्तिसोपान सोपा भला
दुजा वेद तूं ! धन्य तूं वैखरी !
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें
मराठी स्वराज्या असे स्थापिलें
अशी धन्य तूं वीरधात्री खरी !
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
तुझी माधुरी मोदमात्रावहा
फुलांनी, मुलांनी खुले गे अहा !
कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी !
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा
नमो कृष्ण-रामा नमो भास्करा
तुझे लाडके हे धरावे शिरीं
नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी !
३. अरे अरे कळसा !
अरे अरे कळसा
हसून नको पाहू
पायरीचा मी दगड
तुझाच की भाऊ
मी तर बडा कळस
माझा किरीट झळझळीत
पायरीचा तू दगड
पडलास धूळ गिळीत
अरे अरे कळसा
जरा बघ जरा तरी
पायरीचा मी दगड
तुझा भाऊ गरीब जरी
मी उंच कळस
चढणार आकाशी
पायरीचा तू दगड
पडणार तळाशी
अरे अरे कळसा
नको गाल फुगवून बसू
पायरीचा मी दगड
तरी भाऊ भाऊ असू
डौलदार मी कळस
माझा मुकुट कसा छान
पायरीचा तू दगड
तुझा पैजारांचा मान
अरे अरे कळसा
नको झिडकारू मला
भाऊ ना मी तुझा
माझा दादा तू भला
कुठे मी कळस
मला ठेंगणे आभाळ
पायरीचा तू दगड
आपली पायरी सांभाळ
कळसाचा दगड
गर्वाने चढला
पायरीचा दगड
मान घालून बसला
इतक्यात आला सज्जन
देवदर्शन करीत
पायरीवर बसला
‘राम राम’ करीत
तितक्यात आला कावळा
पंख फडकावीत
जाऊन बसला कळसावर
काव काव करत
४.हे जुने जोडे
हे जुने जोडे !
कैक दिवस यांना घातले
आता मात्र
हे नाही ऐकणार
नाही राहणार
जाणार जाणार
मोकळे होणार
गेलीच ही टाच
बन्दांनी बंधन दिले झुगारून
तोंड उघडून ही शिवण
काही करी गुप्तभेद
खालून खिळ्यांचे
चावती दात
त्यांना आली चीड
या जोड्यांनी आता
पुकारली आहे
असहकारिता
यांच्या मेलेल्या कातड्यालासुद्धा
झाली आहे का
निराळी जाणीव ?
५.थेंब आषाढाचे आले
थेंब आषाढाचे आले
जग जीवनाने न्हाले
उन्मळले सप्तरंग
उचंबळे अंतरंग
आले चैतन्य भरून
शिडशडले वरून
वर्षे जीवन निष्पंद
स्फुरे प्राणपरिस्पंद
जग संजीवन प्याले
थेंब आषाढाचे आले
आले जीवरसायन
झाले बीज रुजवण
कणाकणात सकळा
उताटली जीवकळा
काळा कातळ फोडून
आले फुटोनिया तृण
जीवसत्व भरा आले
थेंब आषाढाचे आले
फुटे फांदीला धुमार
आला वेलीला उभार
पानो पानी रंग आला
आला कळ्यांना उमाळा
आशा तरारली जरा
नवी उमेद ये भरा
जीव जीवनाने धाले
थेंब आषाढाचे आले
६. अमुचे तुमचे
अमुचे नभ कृष्ण, निळे तुमचे
तुमचे मधु, कंटक हे अमुचे
तुमचे रिझणे, निजणे शयनी
झिजणे, भिजणे, थिजणे अमुचे
जगभार शिरीं, वळ पाठीवरी
क्रमणे पथ दूक्रम दूरवरी
तनु रेटित रेटित जात असे
चढणे चढणीवर हे अमुचे
अमुचे श्रमबिंदु, अपेश भले
अमुचे भररक्तहि घाव खुले
भरपोट मुखी नच घास जरी
तरी पोटभरी हसणे अमुचे
नयने निज झाकून अश्रुमुचे
पडले तिमिरात निमुट वचे
नच ज्यास कुणी म्हटले अमुचे
जन ते अमुचे, धन ते अमुचे
७. मोलकरणीचा पोर
मोलकरणीचा पोर हा बिचारा
त्यास बाजूला सापडे निवारा
जिथे भांडी घाशीत बसे माय
तिथे त्याने ताणून दिले पाय
शैशवांतील वाळकी श्यामकांत
हंत, उघडी क्षुत्क्षुण्ण तनू क्लांत
अहो अंमळ आडवा जों न झाला
तोच बाबा! लागला घोरण्याला
गैरसोयीच्या कोपऱ्यांत तेथे
सर्व सोयी आराम त्यास भेटे
क्लेश आणी आयास दिनभराचे
तेच निद्रासुख त्यास देति साचें
नाद भांड्यांचा होई घासतांना
त्यास अंगाई गीत तेंच माना
चिऱ्यावरतीं टेकली असे डोई
तोच त्याला मऊमऊ अशी होई
भुईवर हो पडला खडबडीत
नरम गादी ती होय गुबगुबीत
रातवाऱ्याचा शीतळ जो चाळा
तोच कुरवाळा होय तया बाळा
जिथे मानव पुरवी न दया छाया
तिथे पाखर करि मृदु निसर्गमाया
क्षुद्र चिंता हो क्षुद्र मानवाची
धन्य करुणा महनीय निसर्गाची !
– रा.अ.काळेले
८. हळूच माझ्या खिडकीतून
हळूंच माझ्या खिडकींतुन हे चान्दकिरण ठाकले
उशालगत हे आले केंव्हा आणि कसे, नाकळे
धवलचारुता ही रसरसती सरतीसरती पुढे
बघून हिची चोरटी चातुरी विस्मय चित्तीं पडे
हळूंच शिरली, हळूंच शिवली, हळूंच पडली गळीं,
अभिसाराची कला अशीही कुणी बरे शिकवली ?
प्रथम दूर, नन्तरी निकट, मग चिकटलींच कीं मला
खान्द्यावर, गाली मग ओंठी कले गौरकोमला
किन्चित माझ्या उशीस शिवली या किरणांची खुशी
त्या स्पर्शानें जड शय्याही पहाच हसली कशी !
या खिडकींतुन शुभ्र छबीचा चौकोन असा पडे
कीं नवलाचें प्रेमपत्र हे उघडे माझ्या पुढे
रजतपटावर रजतरसानें लिही रजत कामिनी
रजतलेख तो वाचून झालों दंगच अपुल्या मनी
हळूंच माझ्या खिडकींतुन कां चान्दकिरण ठाकले?
काय चान्दण्याचा कागद हा पोंचविण्या पातले?
– रा.अ.काळेले
९. मला सोडा-मला सोडा
मला सोडा-मला सोडा !
कसा बंधनात राहूं ?
खुल्या वाऱ्याचा पिपासू
कसे कोण्डलेलें खाऊं ?
बन्दिवान राहायला
कसा- कसा होऊं राजी ?
पिन्जऱ्यांत नान्दणारी
जात नव्हे नव्हे माझी !
मला सोडा - मला सोडा
कसा होणार मी वश ?
रुसेल ना नागकन्या ?
फणा हापटील शेष
माझ्या फणेवर आहे
स्वातंत्र्याचा तेजोमणी
त्याला बन्धन पडतां
जाय झिजोनी विझोनी
उच्छृंखळ सुटेपण
माझ्या कण्यांत कण्यांत
वृत्ती नाचरी नाचरी
माझ्या कणांत कणांत
माझ्या नितळ तनूचा
आहे केतकीचा झोक
चन्दनाच्या बनोबनीं
माझा अधीरला रोख
माझी बाकदार चाल
आहे रानाच्या झऱ्याची
माझी स्वच्छन्दी लहर
आहे सैराट वाऱ्याची
माझा गहिरा सुरंग
त्याला संगीताची धुन्द
माझ्या कुरळ्या कुरळ्या
आवडीचा मुक्तच्छंद
माझे झरकन् रिघणे
आहे तुटल्याताऱ्याचें
माझे सर्रकन निघणें
आहे चपळ पाऱ्याचें
माझी सरारी तीराची
तिला पाताळाचीं टोकें
माझी वाट उजळती
लक्ष हीरकमाणकें
माझा वेढता विळखा
घट्ट प्रेमाची पकड
माझ्या जहरी निशेला
गाढ तारुण्याचा चढ
माझा बासरीचा श्वास
माझी गरुडाशीं झुन्ज
माझ्या रागीट फूत्कारीं
उभे ठिणग्यांचें कुन्ज
दर्प हिरव्या चाफ्याचा
माझ्या उभार फणेंत
तिच्या उगारीं राहती
खड्ग गदा समवेत
माझे विजेचें स्फुरण
माझी प्रकाशाची उडी
मला सोडा-मला सोडा
माझी तुफान तातडी
मला सोडा-मला सोडा
जीव कोण्डला अन्तरीं
मला सोडा-मला सोडा
प्राण सोडीन ना तरी !
(म्हैसूरच्या चामराजेंद्र बागेंतील प्राणी संग्रहालयासाठी पकडून ठेवलेल्या एका सर्पाने स्वतःच्या मुक्ततेसाठी अन्नत्याग आरंभल्याचे वर्तमान प्रसिद्ध झालें होतें. इतर कोणत्याही प्राण्यापेक्षां सर्प हा वश होऊन राहण्यास अधिक नाखुषी दाखवितो असें तज्ञांचे मत आहे.)
सन १९५४
या काही ह्या काही छोट्या कविता आहेत त्यांना राजकवी काळेले यांनी मुक्ता हे नाव दिलेले आहे. आता त्यांना बहुतेक कणिका असं म्हणतात तर वाचूया काही मुक्ता
१.
कळिस दिले तूं पूर्तीचे कैवल्य
त्वत् स्पर्शाची वोपुनि तिजला स्फूर्ती
तूंच रविकरा आतां चढल्यावरतीं
त्याच फुलाचें करिसी का निर्माल्य ?
२.
त्या ऐन्यानें तुज समोर क्षण एक
झळकविली तव मधुरमुखप्रतिमा गे
मात्र धुळीनें जपुन ठेवले मागें
तूं गेल्यावर तवचरणांचे अंक!
३.
पिळून चान्दणें घडली तव तनु गोरी
नयन निर्मिले पिळून हिरे नवकोट
माणिक पिळुनी तुझे बनविले ओठ
पिळून मनें गे बने हर्ष तव पोरी
४.
दिनरजनीचा सारीपट नभिं चाले
कीं बसला हो लेखक कोणि निनांव
पसरून आभाळाचा कोरा ताव
करीतसे जो पांढऱ्यावरी काळें ?
५.
हे धरतीचे झरते हृदयउमाळें
कुठुन बरें हे वाहत येथें आले ?
कुठुन तरी हे असेच वाहत आले
वाहत वाहत तीर्थ जगाचे झाले!
६.
जुळविलीच त्यानें कविता काही नवी
ते कवित्व मग तो पत्नीला दाखवी
"समजलिस् काय तूं ? साधा का मी कवी ?"
ती निर्विकार चेहरा करून बोलली
"राहूं द्या कणिका ! कणीक आधी हवी"
७.
रसज्ञ भ्रमर, मम मधुरस तुज ठावा
मम सुरंगनी सुगन्ध तुजला व्हावा
तुज रसिका रे कोठून कीट दिसावा ?
मज पोखरुनी आंत घेई जो चावा!
सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव (२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४) सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या द...