प्रतिभा काळेले
(१० मार्च १९१२ —१० मार्च १९९८)
प्रतिभा काळेले ह्या मागील शतकातील एक दर्जेदार कवयित्री होत्या. मूळ ग्वाल्हेरच्या प्रतिभाताई लग्नानंतर इंदौरला आल्या. त्या मराठी साहित्य विशारद होत्या आणि औपचारिक शिक्षण इंटरमीडिएट म्हणजे वर्तमानकाळातील बारावी पर्यन्त झाले होते. राजकवी रा. अ. काळेले हे त्यांचे पती होते, त्यामुळे त्यांना घरातच साहित्यिक वातावरण मिळाले आणि त्यांची ‘’प्रतिभा’’ फुलून आली. त्या पूर्ण वेळ गृहिणी होत्या पण साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अतिशय सक्रीय होत्या.
पती राजकवी रा. अ. काळेले यांच्या फिरतीच्या नोकरीमुळे प्रतिभाताई मध्यप्रदेशातील वेगवेगळ्या ठिकाणी होत्या. त्यांच्या लिखाणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा जेव्हा जिथे जिथे होत्या, त्यांनी त्या त्या गावाचे नाव आणि सन कवितेखाली लिहिला आहे. त्याने कवितेचा संदर्भ कळायला सोपे जाते. उदाहरणार्थ ''लाल जांभळे निळे निळे ढग'' ह्या कवितेखाली त्यांनी बडवानी लिहिले आहे . ज्यांना बडवानी कुठे आहे आणि त्याच्या अवती भवती काय काय आहे ते माहित असल्यास कविता वाचली की संदर्भ चटकन डोळ्यापुढे येतात आणि कवितेचा आस्वाद द्विगुणित होतो.
प्रतिभाताईंने जवळ जवळ चार दशक महाराष्ट्र साहित्य सभा इंदौरच्या कार्यकारी मंडळामध्ये उपाध्यक्षा, सहचिटणीस,साहित्य परीक्षा केंद्राधिकारी, संयोजिका, वर्ग अध्यापन, बालवाचनालय प्रमुख अशा अनेक भूमिका यशस्वी रीत्या सांभाळल्या. महाराष्ट्र साहित्य सभेच्या दरवर्षी होणाऱ्या शारदोत्सवात अनेकदा चिटणीस ह्या पदावर काम केले आणि सुवर्णमहोत्सवी शारदोत्सवात संचालिका व स्मरणिकेचे संपादनही त्यांच्या हस्ते झाले.
प्रतिभाताईंने साहित्यिक क्षेत्रात भरपूर काम करत असतानाच सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी केली. ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स, इंदूर सचिव , मध्यप्रदेश मराठी साहित्य संमेलन, महिला संमेलनाच्या अध्यक्षा - तसेच इंदूर विविध महिला संस्थात पदाधिकारी - महिला उद्योग मंदीराच्या निदेशकांपैकी एक, सरस्वती शिक्षण सेवा संघ कार्यकारी मंडळ - श्री समर्थ मठ पंतवैद्य कॉलोनी ट्रस्टी असे विविधांगी कार्य संपन्न केलेत.
प्रतिभाताई यांचे साहित्य स्त्री,युगवाणी, महाराष्ट्र साहित्य पत्रिका,मालविका, सुषमा, जीवन विकास, मनोहर, वाङ्ग्मय शोभा,संवादिनी इ. विविध मासिकांत प्रसिद्द झाले होते पण पुस्तक मात्र एकच प्रसिद्ध झाले आहे. "मन पाखरू पाखरू’’ प्रतिभाताईंची कधीच विझले आहे ही कविता अतिशय गाजलेली कविता आहे. त्यांचे सादरीकरण देखील अत्यंत सशक्त असायचे. विशेष म्हणजे ही कविता दुःखाची चरम सीमा असूनही त्यांच्या कडून परत परत ऐकायला आवडत असे आणि कवी संमेलनात फर्माइश होत असे.
प्रतिभाताईंच्या "मन पाखरू पाखरू" या एकमेव पुस्तकात त्यांची नात, कविता अरुण पारनंदीवार लिहिते
''८४ वर्षे उलटलेल्या माईच्या व्यक्तिमत्त्वाच्या सीमारेषा आता धूसर होत चालल्या आहेत परंतु एकेकाळची माई ही फार विलक्षण व्यक्ती होती. तिच्या आयुष्याच्या प्रवासाची गडद छाप प्रस्तुत कवितांवर आढळते. स्वभावातील ममतेमुळे आयुष्यातील भावनिक गुंतवणूक व जीवनातील संकटांना झेलणारा स्वाभाविक कणखरपणा असे अजब रसायन असलेल्या माईच्या कविता या पुष्कळशा आत्मकेंद्रित असल्या तरी अनुभूतींचे शब्दांकन इतक्या सशक्तपणे झाले आहे की त्यातून माईला समजणे फारसे अवघड नाही.कविता अरुण पारनंदीवार पुढे लिहितात की जीवनाचा नकारात्मक प्रतिसाद हा प्रत्येकाला अनुभवावा लागतोच परंतु त्यातूनही स्वतःचा डौल सांभाळल्याने दुःख सोसून येणारी असहायता न जाणवता नैसर्गिक क्रमाने येणारी अपरिहार्यताच माईच्या कवितांमधून जाणवते.तिच्या व्यक्तिमत्त्वाची एक महत्त्वाची छटा मात्र इथे लुप्त आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठी मध्यमवर्गीय ब्राह्मण स्त्रीमध्ये क्वचितच आढळणारे असे तिचे आधुनिक व प्रगतिशील मन मात्र या संग्रहात दिसत नाही.तर्कशास्त्राला सुसंगत अशी वैचारिक बैठक असलेल्या बुद्धिमान स्त्रीच्या केवळ भावनिक उलाढालींनाच शब्द रूप दिलेले दिसते अर्थात माईच्या विचारांची आधुनिकता व्यवहारात आणताना कर्तव्य आणि निष्ठांची मर्यादा पडलेली होतीच त्यामुळे प्राप्त आयुष्यातील जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडतानाच बुद्धीचा कस पणाला लागत असे. तरीही विद्याव्यासंग आणि 'अक्षर' भक्ती या दोन आसक्तींनी भारावल्याने तिचे आयुष्य तेजस्वी झाले आहे.सर्वसामान्य आयुष्यातील उणीवा आणि वेडी वाकडी वळणे तिच्याही वाट्याला आली. तरीही वरकरणी संसार गाडा चालवताना तिच्या मनाचा व बुद्धीचा चाललेला प्रवास तिला एक झळाळी देऊन गेला.कै. बाबूजींची साथ, प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळाल्याने तिच्या व्यक्तिमत्त्वाला आणखी पैलू पडले.
माईचा कवितासंग्रह हा अपूर्ण आहे असं जाणवतं. कदाचित आत्मचरित्र किंवा तत्सम काही लिखाण तिच्या जीवन प्रवासाला अधिक न्याय देऊ शकेल. ''
१. पिंगट भुरक्या माळमनावर
पिंगट भुरक्या माळमनावर
आकाशाचे तरुण मनोरथ
वाऱ्याच्या भरकटल्या इच्छा
घुटमळती गुलमोहराभवती
वळणावळणाच्या वाटेची
नागीण पडली कुरळी काळी
इथे फरारी पडता पाऊल
इश्काचा रुतवाया कांटा
स्थितप्रज्ञ ही उभी टेकडी
पोखरती जरी दुःखे आतून
गवताचा वा हर्ष फुटेवर
हिची न भंगे निळी समाधी
सरोवराचा कांच बिलोरी
त्यांत बिंबले मुख कमळाचे
परंतु त्यांतच डोकवतांना
तडा पडे या चित्तालागी
— देवास १२/११/५५
२. लाल जांभळे निळे निळे ढग
लाल जांभळे निळे निळे ढग
हळूं हळूं वाहे वारा
डोळे मिचकाऊन पाहतो
मिष्किलसा सायंतारा
कसा उसासे ऊसमळा हा
मधें गव्हाचे शेत खुलें
बाजुस कुंपण बोर बाभळी
कडूनिंबाचा पिच्छु डुले
या दरडेहून त्या दरडेवर
मुरूममाळ हा फैलावे
तीरकामटा घेऊनि त्यावर
भिल्ल उभा भोळ्याभावे
करवंदीची झुडपें कोठें
पळसही कोठें हे उघडे
आकाशावर लावुन दृष्टी
मध्येच अंजनखोड खडे
खान्देशाशी खांदा जुळवुन
खुषित ठाकला नेमाड
मालवराणी म्हणूनि लाजुनी
सरली का नजरेआड ?
सातपुडा हा इकडे तिकडे
विंध्य काढतो वर डोई
इकडे खळखळ अवखळ रेवा
तिकडे गदगद करी गोई
हळूच "बावनगजा" उंचुनी
पहातसे हो काय तरी ?
"बडवानीला" कुशीत घेऊनी
लाडाने बसलीच दरी
या दृश्याची प्रसन्न जादू
मन चित्ताचा घे ठाव
काय नवल मग बघतां बघतां
जर नूरले कल्मषभाव ?
-----बडवानी २५/०३/५४
*ऊसमळा /ऊसाचे शेत
दरड/चट्टान
नुरले/संपले
पिच्छू/झुबका, मोठ्या प्रमाणात एकत्रित पानं
गोई/ नर्मदेला मिळणारी एक उपनदी आहे.
३. संध्याकाळी
उगाच किरकिरत्या संध्याकाळी
उदास खिडकी पहात बसते
टेकडीच्या हिरव्या शून्याकडे
धुळकट लाल वाटेच्या तिकडे
जिकडे झेप एका पक्षाची
ढगाळ पंगतीत
पिंगट अबोध संगतीत
आणि देवळाचा
पांढुरका भुरका घंटानाद
येऊन हळूच मिटतो
माझ्या खिडकीत
किरकिरत्या संध्याकाळी
— इंदूर ०७/१२/६८
४. विसरतात दिशा जेव्हा
विसरतात दिशा जेव्हा
आणि हरवतो प्रकाश
आकाश जाते पुसून
वारा बसतो रुसून
आणि घुमुटांत पारवा घुसतो
छातीत चोंच खुपसून
तेव्हां न कळलेल्या खोल
आत ठुसठुसतो दर्द काही
आणि
आठवणींची भटकलेली पाखरं
भिरभिरतात पालथ्या आकाशाखाली
— इंदूर ३१/०३/६९
५. येवढेच उरले हाती
काळजाच्या कोठडीत
कैद केलेली वेदना
अचानक उभी राहते
माझ्यासमोर
डूख धरल्या नागिणीसारखी
फणा काढून फुत्कारत
विचारते मला
सुखदुःखाचा लेखाजोखा
मग मीच होते पुंगी गारुड्याची
झुलवत खुलवत सांगते तिला
बाई ग! जीवन हा एक भोग आहे
स्वप्नांची झुंबरं डोळी बांधून
कठोर काजळी रात्रीच्या कुशीत
झोकून द्यावे स्वतःला
चघळावे दुःख आणि खंती
इथं कोण कोणाचे ?
आपणच आपले साथी
आता ढळत्या सांजवेळी
अंधाराचा धरावा घट्ट हात
मोकाट तोडावे बंध
फक्त येवढेच आतां हाती
येवढेच उरले हाती
— इंदूर ०६/०१/७३
६. कधीच विझले आहे
धगधगून
कधी पेटलेच नाही
रसरसून
कधी अंगारलेच नाही
झडपून देखील
कधी
तडतडलेच नाही
ठिणगी होऊन
कोळपून कोळपून
विझतच राहिले
कोळशासारखी
घातली नव्हती फुंकरच कुणी
चेतावे म्हणून
आता तर
चितेवर सुद्धा
मी फुलणार नाही
कारण?
कारण मी कधीच विझले आहे.
— इंदूर १८/०२/७३
७. वेदनेला हवा शब्द
वेदनेला हवा शब्द
पण ओठांचे कवाड बंद
अनुत्तराचे अत्तर फवारते
निःश्वासातून मंद
असूनही सर्वात
नसतेच मी कुणात
फक्त असते कुरवाळीत
जखम माझीच जी
सांगते आपले नाते
अश्वत्थामाच्या जखमेशी.
— इंदूर ०७/११/७३
८. एकटी
तिच्या दिवस उजाडण्याचे कारण?
सूर्योदय
अन् सूर्यास्तातूनच होते तिची रात्र
खूपच खंगली, दमली अन् झाली
गलित गात्र
ती कधीच जगली नाही
स्वतःसाठी
तिने पैकाही जोडला नाही गाठी
आणि आता?
आता संपत आलाय अध्याय
तिच्या जीवनाचा
फैसला होणारे तिच्या
पापपुण्याचा
अशी हो कशी ?
ही अधांतरी लोंबकळत राहिली
अंधाऱ्या बोगद्यातून गाडी जावी तशी
नी टोकाला ती एकटीच उभी
एकटी एकटी अगदीच एकटी
टोक ?
अहो टोक तरी कसलं ?
अंधार कोंदट अंधार
बद्धता अंधार
अंधार अंधार अंधार
एका अंधार बोगद्यातून
दुसऱ्या अंधार टोकाशी
अजूनही उभी आहे ती तशीच
एकटी एकटी एकटी.
— इंदूर २९/०१/४७
९. तयार आहे मी ही
महाभयंकर आव्हाने
स्वीकारली आजवर
कधीच पाठमोरी फिरले नाही
अशी सोसली तुफाने
अशी प्याले वादळे
पण कधीच भ्याले नाही
अहो! जळता वडवानळ
झेलून अंगावर
त्याचाही वार चुकवलाय मी
कातळ काळज्यांचा
प्रचंड पर्वत
फुलासारखा झेलून सारलाय मी
मग धडधडत्या मेघांचा
लवलवत्या विजांचा
गारठल्या गारांचा
कोसळत्या सरींचा
कशाला रे!
धाक दाखवतोस मला ?
अजून पाय रोवून घट्ट उभी मी
आठवणींचा ठेवा झाकून पदराखाली
थांब, क्षणभर थांब!
आलाच असशील जर
मूळ घेऊन उपटायला मला
तर मग मीही तयार आहे
समर्पणाच्या महायात्रेला.
(ह्या कवितेत तारीख नाही)
१०. वादळ
कुणीतरी गुंफियल्या
चार कवितेच्या ओळी
आणि माझ्या डोळियांना
आले घळघळ पाणी ।।१।।
कुणीतरी आलापिले
गीत सुंदर सुस्वर
आणि माझ्या हृदयी हो
उठे वादळ गंभीर ।।२।।
कुणीतरी हाकारिले मला
वाटे तुझी साद
भलतेच होते कुणी
मनोमनी होई खेद ।।३।।
कुठेतरी मोगऱ्याचा येई
गंध मंद मंद
तुझ्या आठवाने न्हाले
चिंब माझे अंग अंग।।४।।
आता नाही भेट पुन्हा
भेट थेट देवाघरी
ठावे आहे मला परी
वाट पहाते मी दारी।।५।।
कसे धावू मनामागे
मन पांखरू पांखरू
येई धरता न हाती
कसे तयाला आवरू।।६।।
कुठे जाऊ करू काय
वेडेपिसे झाले मन
भेटीसाठी उतावीळ
कसे समजावू पण।।७।।
— इंदूर १५/१२/८२
११. विझू विझू वात मी
विझू विझू वात मी
विझू द्या मला
नका वात सारू आता
सरू द्या मला
विझू विझू माझ्यावर
नका स्नेह ओतू
विझण्याची भीति आता
नका देऊ वाटू
विझू विझू माझ्यावर
काजळीचा थर
थिटे वाटू लागे मला
माझे देवघर
जेवढा शक्य झाला
तेवढा दिला प्रकाश
निळे खुले मुक्त मला
पाहू द्या आकाश
विझू वात म्हणे
आता चांदण्यांशी खेळू
चंद्र सूर्य दोन्ही
हाती पेलुनिया झेलू
विझू वात म्हणे सीमा
समईची सोडू
दिव्य प्रकाशाशी आता
नवे नाते जोडू
— इंदूर २४/०४/८३
संकलन : अलकनंदा साने