सोनेरी पान : सीताराम काशिनाथ देव
(२१ मे १८९१ - नोव्हेंबर १९७४)
सी. का. देव ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या देव काकांचा जन्म २१ मे १८९१ रोजी धार येथे झाला. त्यांनी विपुल लेखन केले पण दुर्दैवाने ते संग्रहित झाले नाही. ते इंदौर येथील महाराजा शिवाजीराव शाळा आणि मल्हार आश्रम मध्ये शिक्षक होते.
सी. का. देव यांचे मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्लिश भाषेवर प्रभुत्व होते. सी . का. देव ह्यांनी ज्ञानेश्वरीचा ओवीबद्ध हिंदी अनुवाद १९६५ साली केला व चार वर्षांनंतर १९६९ मध्ये बाराव्या आणि अठराव्या अध्यायावर विवेचनात्मक लिखाण केले. त्यांचे शिक्षण इंदौरला झाले. इंदौरला ज्यावेळी महाराष्ट्र साहित्य सभा प्रारंभ झाली त्या वेळेपासून ते सदस्य होते. त्यांनी बरेच वर्ष साहित्य सभेत कार्य केले व सर्व पदांवर राहिले. त्यांचे नातू मिलिंद देव त्यांच्यासोबत पंधरा वर्षे होते. मिलिंद सांगतात की आजोबा खूप छान शिकवत असत. त्यांनी चारी भाषेत मंगलाष्टके लिहिली. अशा बहुगुणी कवीने बऱ्याच आणि छोट्या छोट्या विषयांवर कविता लिहिल्या.
त्यांच्या पहिल्या पत्नी गुणाबाई १९२७ मध्ये वारल्या. त्यानंतर त्यांचे दुसरे लग्न झाले. दुसऱ्या पत्नी शकुंतलाबाईही १९४८ मध्ये वारल्या. या घटनांमुळे दुखावलेल्या सी. का. देव यांनी संशय कल्लोळ ही अतिशय दीर्घ कविता लिहिली. श्री देव यांनी कोजागिरी वर कविता लिहिल्या अभंगही लिहिले बोधामृत दिवाळी अंकासाठी त्यांनी श्लोक लिहिलेत. सी . का. देव हे तीन भाऊ होते. सन १९५७ मध्ये आपल्या कुटुम्बियांसोबत इंदौरला असताना त्यांना विषम ज्वर झाला होता. तेव्हाही त्यांनी बऱ्याच कविता लिहिल्या. झाशीच्या राणीचे वृंदावन त्याच वेळेस ही कविताही त्याच वेळेस लिहिली. सी . का. देव यांनी चंद्र गीते लिहिली त्याचप्रमाणे बालगीते लहान मुलांसाठी लिहिले पूर्वी स्वयंपाक घरात खलबत्त्याचा उपयोग होत असे त्यांनी नवा खलबत्ता आणल्यावर त्यावर कविता केली.
इंदौरला ''अहिल्योत्सव'' दरवर्षी खूप थाटात साजरा केला जातो. इंदूरकरांना महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल अतीव आदर आणि अभिमान आहे. इतका की त्यांना देवी अहिल्या देखील म्हटले जाते. त्यांच्या आयुष्यातील ठळक प्रसंग लहानापासून मोठ्या पर्यंत अगदी सगळ्यांना मुखोद्गत आहे. महाराणी इंदिराबाई होळकर यांच्या मागणीवरून सी. का. देव यांनी ‘अहिल्या पूर्ण प्रताप’ यावर कविता लिहिली आहे.सी . का. देव यांनी विविध विषयांवर कविता लिहिल्या. तिचे गाऱ्हाणे ही कविता लिहिली व जय जय गांधी ही कविता गांधी दिनानिमित्त श्रद्धांजली म्हणून लिहिली.इंदौरला जेव्हा जेव्हा शास्त्री ब्रिज बनला त्यावेळी ही त्यांनी कविता केली. त्यांचे नातू मिलिंद देव ह्यांच्याकडे सी. का. देव यांच्या अनेक आठवणी आहेत. मिलिंद सांगतात की ते जेव्हा दोन वर्षाचे होते तेव्हा आजोबांनी झोपेचे गाणे लिहिले होते. ते गाणे मिलिंद यांना झोपवताना ते रोज म्हणत असत व आश्चर्य म्हणजे मिलिंद लगेच झोपत.
साहित्यात चंद्राला उद्देशून किंवा त्याच्या माध्यमाने अनेक कवींनी कविता लिहिल्या आहेत. जसे प्रेम, आई, पाऊस हे सर्व सामान्य आणि जवळपास प्रत्येक लेखकाच्या गद्य/पद्य लिखाणात येतात तसेच चंद्र देखील त्यांना मोहवितो. कवीवर्य सी. का. देव देखील ह्याला अपवाद नव्हते. भगवद्गीता १०-२१ मध्ये श्रीकृष्ण म्हणतात "आदित्यांमध्ये मी विष्णू आहे, दिव्यांमध्ये मी तेजस्वी सूर्य आहे, मरुतांमध्ये मी मारीसी आहे आणि ताऱ्यांमध्ये मी चंद्र आहे." तर अशा ह्या ''चंद्राच्या'' खोडकर स्वभावाला धरून लोण्याचा लाडू ही कविता लिहिली त्यामध्ये गोपी आणि कृष्णाच्या लीला आहेत.
सी . का. देव धार, देवास, इंदौरलाच जास्त राहिले. सन १९३४ मध्ये ते त्यांचे मित्र महादेव रामशास्त्री फडणीस यांच्या बरोबर साई दर्शनासाठी गेले होते. त्याच वेळेस त्यांनी बऱ्याच रचना केल्या व गीते लिहिली. इंदूरला शिवाजी जयंती पूर्वी पासूनच साजरी केली जाते.त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर कविता लिहिली.
सी . का. देव यांनी पाळणा ही लिहिला होता . महाराणी इंदिराबाई होळकर इंदूर यांच्या मागणी प्रमाणे दत्ताचा पाळणा दत्त जयंती उत्सवात म्हणण्यासाठी रचला. त्याला गाण्यासाठी श्री भास्करराव चोपडकर यांना विनंती केली व ती त्यांनी मान्य केली. दत्त जयंतीचा उत्सव राजवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा होत असे. तोच पाळणा भास्कर राव चोपडकर यांनी गायीला. पाळणा सर्वांना खूप आवडला. सर्वांनी त्यांचे कौतुक केले.
महाराष्ट्र साहित्य सभेच्या सन १९४९च्या वार्षिक शारदोत्सवात विडंबन स्पर्धेसाठी स्व. भा.रा. तांबे यांनी त्यांच्या ‘रुद्रास आवाहन’ कविता निवडली होती. त्याप्रसंगी सी . का. देव यांनी ‘उंदरास आवाहन’ हे विडंबन केले. शारदोत्सवाचे अध्यक्ष ना . सी . फडके यांनी विडंबनाची फार प्रशंसा केली. असे उत्कृष्ट विडंबन महाराष्ट्रातही पहावया मिळाले नाही असे उद्गार त्यांनी काढले. ‘रुद्रास आवाहन’ या कवितेचे विडंबन करणे कठीण होते आणि उंदरास आवाहन एकमेव विडंबन यावर्षीच्या स्पर्धेसाठी योग्य ठरले होते. त्यासाठी महाराष्ट्र साहित्य सभे कडून श्री देव यांना आचार्य प्र . के. अत्रे यांच्या हस्ते पारितोषिक मिळाले.सी . का. देव यांना बरेच पारितोषिक मिळाले, त्या पैकीच एक हे पारितोषिक होते.
सी. का. देव यांची सुप्रसिद्ध कविता ‘कोटी कोटी प्रणति तुझ्या चरण तळपदी /जय जय जय जय विजयी मायमराठी’ सन १९३५ मध्ये इंदौर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाप्रसंगी लिहिली आणि ९ मार्च रोजी उद्घाटन सोहळ्यात सादर केली. तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक महाराष्ट्र साहित्य सभा,इंदौरच्या दरवर्षी होणाऱ्या शारदोत्सवात प्रथम ही कविता गायली जाते. इतकेच नाही तर इंदौरला हिंदू महासभेचे अधिवेशन होते तेव्हा
स्वातंत्र्यवीर सावरकर आले होते. तेव्हा त्यांनी महाराष्ट्र साहित्य सभेला भेट दिली त्यावेळी देखील हीच कविता गायली गेली होती. महाराष्ट्र साहित्य सभेत धार येथील इतिहास संशोधक गुरुवर्य काशिनाथ कृष्ण लेले व निबंध लेखक व टीकाकार बालकृष्ण पंतदेव या उभयतांच्या हस्ते सी. का. देव यांना मानपत्र दिले गेले त्याप्रसंगी हीच कविता म्हटली गेली. हा समारंभ २ ऑक्टोबर १९७२ रोजी झाला होता. विशेष म्हणजे ही कविता आजही तितकीच लोकप्रिय आहे आणि अनेक समारंभात सुरुवातीला गायली जाते. ह्या गीताला ७५ वर्ष पूर्ण झाल्यावर एक सविस्तर लेख स्थानिक बातमीपत्रांत छापून आला.
१. गुडी
(चाल-घनश्याम सुंदरा या भूपाळीसारखी)
गुडी आमची ध्वजा जरीची भगव्या झेंड्या सवे
नवी तळपते, घेऊन येते, वर्ष सुखाचे नवे
कणखर ताठर स्तंभ वंश हा, मानव उभारुन उभा.
उमेदीने बेगुमान बघतो धडक द्यावया नभा,
जरी पितांबर जरीची चोळी गुडीच्या खांद्यावरी,
पती पत्नीचे जणू स्वागत करिती नववर्षांचे घरी
गाठी गोड लेवूनी कंठी गुडी सांगते पहा,
गोड बोलणे, गोड वागणे, मंत्र सुखाचा महा
आणिक कडुलिंबाची पाने गाठीच्या संगती
सांगती संसारात असावे कडवे पण मनगटी.
गोड सुखी अन कडवी दुःखे येतील जेव्हा घरी,
पचवा त्यांना खंबीर खांबापरी.
करा नीट संसार कीर्तीच्या वंशाची वरिबरी
झिजा राष्ट्रसेवेत जिण्याची सार्थकता ही खरी .
भजा ईश्वरा शुद्ध भक्तीने कर्तव्य नित करा,
प्रभू कृपेने सोख्यमंगले चालू नी येतील घरा
विश्वंभर ओतितो अखंडित करुणा भक्तावरी
कलश पालथा पहा सुचवितो झळकून गुडीच्या शिरी
जरी पितांबर जरीची चोळी गर्जती पवना सवे
उंच उंच नेण्यास जीवना वर्ष येतसे नवे
भोपाळ २७-३-७१
२. झोपेचे गाणे
गोड गोड झोप कशी उठून येते?
बागेत बसते, कुंजात खेळते.--गोड गोड झोप--१
वेलीत निजते, कळीत खुलते-गोड गोड झोप---२
फुलात फुलते, भुंग्यांना भिते--गोड गोड झोप गोड गोड झोप---३
तारात नाचते, चंदू शी हसते.--गोड गोड झोप--४
बाळाच्या तोंडात नक्षत्रे उगली
गालात उषेची लाली झळकली,
चंद्राची कोर नखिं नखिं चमकली
बघुनी झोप बाळा पाशी थबकली,
हळूच बाळाच्या डोळ्यात लपते--गोड गोड झोप ---५
गोड गोड झोप कशी कुठून येते--?
३१ बजरंगपुरा देवास
९/४/१९६३
३. तू कोण
तू कोण कुठला रे, आलास रे कशाला ?
उकले न गूढ अजून माझा कशास झाला
दिसते आता तयारी सोडून जावयाची,
का व्यर्थ लाविले रे हूरहूर ही मनाला ?
अवचित भेटला तूं , चिरकाळ राहिला तूं ,
जरि जायचेच होते तरि गुंतला कशाला ?
झालास जीवनाचे सर्वस्व तूंच माझ्या,
बंध रेशमाचे रे तोडिशी कशाला ?
राहिलास काय किंतू,विटलास कां अता तूं
तू न मीही प्रिय का, वैराग्य मग कशाला ?
रे मौन तू असा कां ? जाणार निश्चयें का ?
जाशील? जा सुखाने वाटेल त्या क्षणाला.
पण जा हळूहळू रे, गुपचूप जा असा की,
चाहूल पाउलांची लागोच ना कुणाला ?
आलास तेधवां तू कळूंना दिलेस काही,
जाशील तेधवां रे जाणीव ती कशाला?
पण पेरलीस ममता स्मर तीच प्राणनाथा,
ने संगती मला रे, जेथून तुंही आलास.
त्या नंदनांत राहू, आनंद नित्य लाहू
रे व्यर्थ येरझाऱ्या शून्यांत त्या कशाला ?
इंदूर----८/१२/५३
४. वृंदावन
ज्याला तेतीस कोटी देव स्तविती
हस्तांजली जोडूनी,
तो स्वर्गेन्द्र बघुनी विक्रम जिचा
संतुष्ट झाला मनी,
त्याने वाहिली मंजिरी तुळशीची
जी आदरे तेथून
झाशीच्या रणदेवतेचे विलसते
ते हेच रुंदावन
देवास---२६/४/१९६५
५. बालगीत----लाल सूर्य
लाल सूर्य
पद ---यमन, त्रिताल
हा लाल सूर्य किती गोल गोल!
का झुकला गेला काय तोल?
पतंग हा कुणि अहा! उडविला,
सोन्याची कशी झालर याला.
ऐट, किती किति डाम डौल!-----हा लाल सूर्य----
ओढती दोरे पर्वत सारे
उडती पांखरें नाचती पोरे
पण हा जातो खोल खोल.-----हा लाल सूर्य
६. श्री अहिल्या पुण्यप्रताप
(पद ----मांड--केरवा.
चाल---संशय कल्लोळ नाटकातील तनु विक्रेय पाप महान या पदाची.)
सती पुण्य प्रताप महान, वानाया शिणली वाणी,
संसाराची सतीच्या तेव्हा विधी करी धूळ धाणी
तेव्हा बनूनी विश्व कुटुंबीनी विधीला टोला हाणी ।
स्वर्गीची सूर गंगा भागीरथ जरी हिमालयी आणि,
तुझ्या तपाच्या कावडीविण का ती रामेश्वर न्हाणी!
निर्मि अन्नजल विश्वंभर परी जीव फिरती दिन वाणी,
त्यांना विजयी दाणा घाली तुझ्याच पाणी!
धारातीर्थी असीधारा व्रत केले शिव बाजीनी
तुझ्या वाहती सुकृता धारातीर्था तीर्थामधूनी!
स्वधर्म मंदिर रचिता खपले धीरवीर अभिमानी
तुझी मंदिरे रंभादीकती परमार्थांचा ठाणी
वैराग यांनी पोरुष करणे ऐसे बिद्र लिहूनी
ऐश्वर्याची पुण्य पताका गेली स्वर्गी घेऊन
अशी गुणांची राणी म्हणून विश्व तिला वर वाणी
होळकरांची राणी अहिल्या भारत भूषण शिरोमणी
इंदूर---१९३३
७. दत्त गुरुचा पाळणा
राग--सारंग--ताल-धुमाळी
अभि नंदना हरी
झुलाविते अनुसूया नीज करी,
जो, जो, गाई तरी रे बाळा
पुरे सत्व बघण्याचा चाळा,
अंगाई चा तुझ्या सोहळा
बघू दे डोळे भरी.-----झुलविते----
निज तुरे पण मज जागु दे
तुझ्या स्वरूपी मन लागू दे
दत्त दत्त भजनी रंगू दे,
माझी ही वैखरी---झुलविते
विविध रूप नटला दत्ता तू
परि मज माझा बाळ एक तू,
तुझ्यात मुरले अवघे मी तू,
वेगळीक वरि वरी-----झुलविते
जगद्गुरु जग उद्धरण्याला,
माझा तान्हा बालक झाला,
कृपेस सदया पार न उरला
मी भाग्याची खरी-----झुलविते
सार सुखाच्या सर्वस्वांचे
अंकी खेळे बाळ गुणाचे,
कशास निर्गुण निरंजनांचे
पूजन करू मी तरी-----झुलविते
इंदूर------२०/१२/१९३४/
८. जय छत्रपती शिवराया!
(चाल--भारत भाग्य विधाता--तीन चरणापर्यंत. पुढे बदलून)
जय जय, भारत क्षत्रिय भूषण छत्रपती शिवराया!
प्रताप रवी सम विक्रम धुति तवनाशी दास्य तमाशी,
स्वतंत्रे महाराष्ट्र नटवी, दिपवि हिंद प्रकाशी
लागे जग यश गाथा
जय है, जय हे, जय हे प्रताप रवी शिवराया!
स्वधर्म-संस्कृती-झळक खलांची वाहुनी पदतली मुंडी,
प्रसन्न केली देवी भवानी तोषविली रणचंडी,
सार्थक केली काया,
जय हे, जय हे,जय हे रणधीरा शिवराया!
गो ब्राह्मण प्रतिपालन रक्षण देश धर्म संस्कृतीचे,
असिधारा व्रत हेच दिव्य तू आचारीले शस्त्रांचे
निरसुनी विमोह माया.
जय हे, जय हे ,जय हे धर्मवीर शिवराया
स्वराज्य सिद्धीस पेटविले तू आत्म यज्ञाचे
त्या होमाने पुनीत केले नाम महाराष्ट्राचे
तो नित्य नमितो पाया.
जय हे, जय हे, जय हे त्यागेन्द्रा शिवराया
शक्ती-युक्ती-संच्चरित-भक्ती युक्त असतो भारत नृपती,
आदर्शीचे हा तू निज चरिते ठेवीशी जगता पुढती
लागती रिपू ही स्तवाया.
जय हे , जय हे, जय हे राजेश्वर शिवराया!
आपद्समयी राष्ट्र जनांच्या स्वातंत्र्याच्या समरी,
नाम तुझे भारत तनया नव संजीवन वितरी,
तुझं सम सत्सुत व्हाया.
जय हे, जय है. जय हे स्फूर्ती देव शिवराया!
२०/२/३४
९ . उंदरास आव्हान
(चाल--रुद्रास आवाहन या पद्याची)
दु डु दु डु दौड ये, अन खणित बीऴ ये.
धूळ फुंकीत ये, येई उंदरा
चौरजण गौरवा करीत
कुरु कुरु रवा
कडकडा फोड हा भुई भुंग्यांचा थवा,
बडबडवी गाडगी, उधळ कोंडा रवा
फस्त करी धान्य , फळ, लाडू, मेवा, खवा,
फस्त करी पापड वडे क्षुब्ध उंदरा.
पाड उतरंड ही घालती पालथी,
काढ शिंक्यावरून बरणी ती खालती,
चरे चरुणी दे, नरटी आम्हा मती,
आणि झटपट घरा ह्या दरीद्रा
चाव चौताळणी कोठीच्या रक्षका
बसती त्यांच्या मुखी उडव त्या भक्षिका,
रक्तबंबाळ कर कुतरुनी पद नखा
उंच मळू दे तुझ्या सुख समुद्रा
तव तडाखा पडे, घर बुडे, धनी रडे
शांती ही मालकीण बापुडी चडफडे
भरभरा मांडी मग पिंजरे चहुकडे,
अग्नी मधी उजळण्या तू जरी धडा
पूर्वी फासातुनी सिंह तू काढिले
दृष्ट जनी ज्यांस जाळ्यात अडकविले
वक्रतुंडा तुवा पाठीवरी मिरविले
रे नमावे तुला वीरभद्रा
इंदूर----३१/१०/१९४९
मूळ कविता -- रुद्रास आवाहन
(भा. रा. तांबे)
डमडमत डमरु ये, खण्खणत शूल ये,
शंख फुंकीत ये, येइ रुद्रा ।
प्रलयघनभैरवा, करित कर्कश रवा
क्रूर विक्राळ घे क्रुद्ध मुद्रा ।। ध्रु०।।
कडकडा फोड नभ, उडव उडुमक्षिका,
खडबडवि दिग्गजां, तुडव रविमालिका,
मांड वादळ, उधळ गिरि जशी मृत्तिका
खवळवीं चहुंकडे या समुद्रां ।। १ ।।
पाड सिंहासनें दुष्ट हीं पालथीं,
ओढ हत्तीवरुनि मत्त नृप खालती,
मुकुट रंकास दे करटि भूपाप्रती,
झाड खट्खट् तुझें खड्ग क्षुद्रां ।। २ ।।
जळ तडागी सडे, बुडबुडे, तडतडे
'शांति ही !' बापुडे बडबडति जन-किडे !
धडधडा फोड तट ! रुद्र, ये चहुंकडे,
धगधगित अग्निमंधि उजळ भद्रा ।। ३ ।।
पूर्विं नरसिंह तूं प्रगटुनी फाडिले
दुष्ट जयिं अन्य गृहिं दरवडे पाडिले,
बनुनि नृप, तापुनी चंड, जन नाडिले
दे जयांचें तयां वीरभद्रा ।। ४ ।।
१० . लोण्याचे लाडू
(दिंडी छंद)
सोंगाड्यांशी खेळले बालकृष्ण,
दमुनी पडला सर्वास एक प्रश्न ,
आता उठूनी काय अहो खावे,
कुणा गोपिला जाऊनी लुटावे.
हरी बोले कां जाहलात कष्टी,
सर्व गोपींची मडकी असती उष्टी,
घरी माझ्या मागील अंगणात,
जमा सारे गपचिप रहा शांत.
दूभतू व त्यांची भांडी जिथे होती,
तेथे चोरूनी बाळ सर्व जाती,
माठ लोण्याचे तिथून लांबविले,
आड गोठ्यांच्या दडूनी ठेवियेले.
करुनी लोण्याचे शानदार लाडू
कृष्ण लागे सर्वात खूप वाढू,
माठ सारे झाडूनी रिते केले
मध्ये ठेवियले गोल लाडू
लागता ही चाहूल चोरट्यांची
वळूनी तिकडे पाऊले यशोदेची
चोर सारे ते धूम पळून गेले,
लाडू लोण्याचे नभी झोकियेले
गोल गोळे ते उंच उडून गेले
कृष्णस्पर्शाने तेज त्यास आले
लोणी सारे ते फोडूणी या
अभ्र बने तारे अन शारदीय
११ . माय मराठी
(चाल —- बहु असोत सुंदर…)
कोटी कोटी प्रणती तुझ्या चरण तळवटी
जय, जय, जय विजये! माय मराठी (धृ )
पुत्र तुझे आम्ही, नित सेवणें तुला,
दिग्विजया न च तुझिया साजते तुला;
मान हिंदु राष्ट्राचा तूच राखीला
धर्म हिंदु देशाच्या तूच जगविला;
दास्य -दैन्य-दुर्गतिची तोडिली मिठी … जय जय
वैराग्या पुरुषार्था शिकवि घरिं घरीं
ज्ञानेश्वर निर्मि तुझिच ज्ञान निर्झरी
शक्ति, युक्ति, भुक्ति, मुक्ति बोधुनी खरी
दास ही करी समर्थ बोध बहुपरी
मदन रतिस डुलवी झुलवी लावणी नटी … जय जय
बोल तुझे मोलाचे रोकडे खडे,
मद पंडित वीरांचा ऐकतो झडे
घुमती तुझे पोवाडे जंव चहुकडे
तख्त तुझ्या छडकांचे तोच गडबडे
हर! हर ही गर्जना काळ दळ पिटी … जय जय
सरळ शुद्ध भावांची सुरस मोहिनी
पाप ताप हरति जिला नित्य परिसुनी,
ती अभंग वाणि गोड अमृताहुनी
कां न तिला मोहावा रुक्मिणी -धनी?
ऐकण्यास सतत उभा भीवरे तटी… जय जय
जोंवरि ही धरणि, चंद्रसूर्य जोंवरि
जोंवरि सत्पुत्र तुझे वसती भूवरी,
रक्षितील वैभव शिर घेऊनी करीं
दुमदुमेल दाही दिशीं हीच वैखरी--
धन्य महाराष्ट्र, धन्य धन्य मराठी… जय जय
संकलन : प्रतिमा टोकेकर