अनुराधा जामदार
(२५ जुलै १९३८- ३ ऑक्टोबर २०१७)
१९६१ मध्ये भोपाळ येथे त्या आल्या . पुढे निरनिराळ्या सरकारी शाळांमधून शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले आणि १९९८ साली सेवानिवृत्त झाल्यानंतर पुढे ज्ञानेश्वर विद्या मंदिर ह्या मराठी शाळेत मुख्य अध्यापिका म्हणून त्यांनी काम पहिले .
अनुराधा जामदार यांना बाल्यावस्थे पासूनच वाचनाची हौस. त्याचं सर्व श्रेय त्या आपल्या मामांना (कै.दादा परचुरे, परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई) देत असत.
पुढे त्यांनी हा नाद छान जोपासला. संत साहित्य, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, व इतर अनेक संतांविषयी त्यांचे वाचन व भरपूर अभ्यास होता.त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या संत वाङ्मयाचे उतारे व्याख्यानांमधून उद्धृत करीतअसत. महाभारत आणि त्यातही श्रीकृष्ण हे त्यांचे आवडतं प्रकरण असे. ह्या विषयांवर त्या कितीही वेळ बोलू शकायच्या . समोरचा अगदी मंत्रमुग्ध होऊन जात असे.नवीन गोष्टी शिकत राहाव्यात असा त्यांचा नेहमी आग्रह असे .वयाच्या ७५व्या वर्षी लॅपटॉप घेऊन त्यांनी त्यावर सराव केला आणि मग आंतरजालाचा सुद्धा वापर करून ऑनलाईन पुस्तकांचं विवेचन, अनुवाद इत्यादी केले आहे . सुप्रसिद्ध अर्थतज्ञ दिवंगत प्रकाश बियाणी यांच्या मूळ इंग्रजी पुस्तक "द *बॉस* " चा त्यांनी मराठीत अनुवाद केला आहे .आपल्या ''मायमावशी'' समूहातही त्या शेवट पर्यंत अत्यन्त सक्रीय होत्या. इतकंच नाही तर वयाच्या अठ्ठयात्तराव्या वर्षी मराठी भाषेच्या व्याकरणाचं ज्ञान देण्याच्या दृष्टीने त्यांनी समूहात ''शाळा'' हा उपक्रमही काही दिवस राबवला होता.
अनुराधा जामदार यांच्या मध्यप्रदेशातील कारकिर्दीत अनेक प्रथितयश साहित्यिकांचे भोपाळला येणे झाले . कवीवर्य मंगेश पाडगांवकर, यशवंत देव , अरुण म्हात्रे , डॉ. श्रीपाल सबनीस , प्रदीप निफाडकर , त्यावेळच्या दैनिक सकाळचे संपादक उत्तम कांबळे , लोकसत्ताचे तत्कालीन संपादक गिरीश कुबेर , सदानंद मोरे , नागनाथ कोतापल्ले , मीना प्रभू आणि असे अनेक उत्तमोत्तम साहित्यिक भोपाळ मध्ये आले होते व सर्वांचे ताईंशी वैयक्तिक पातळीवर अतिशय सलोख्याचे संबंध होते.
जवळपास ऐंशी वर्षे अगदी स्वस्थ आणि निरोगी आयुष्य जगल्यावर शेवटी नियतीने आपला डाव टाकलाच. २० दिवसांच्या अल्प पण कठीण आजाराचे निमित्त झाले आणि ३ ऑक्टोबर २०१७ रोजी अनुराधा जामदार यांनी ह्या जगाचा निरोप घेतला. मध्यप्रदेशातील ज्येष्ठ साहित्यिकांचा एक विश्वस्त दुवा आणि नवोदितांचा एक भक्कम आधारस्तंभ गेला. काहीही अडचण असली तर केंव्हाही त्यांच्याशी प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीवर नि:संकोच संपर्क साधता येत असे. त्या तितक्याच प्रेमळपणे बोलत असत. हा त्यांच्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येकाचा अनुभव आहे.