मुकुंद भांडारी
(१०/०३/१९२९----०६/०४/२०२५)
ज्येष्ठ कवी,पत्रकार, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सदैव सक्रीय असलेले कै. मुकुन्द भांडारी यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी नाशिक जिल्ह्याच्या सटाणे तालुक्यातील मुल्हेर या ऐतिहासिक महत्वाच्या गावी झाला. सन १९४२ साली वयाच्या १३व्या वर्षी मुकुंद भंडारी शिक्षणासाठी इंदोरला आले. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. जीवनात त्यांना कल्पनेपलीकडे संघर्ष करावा लागला होता.
पाच भाषांवर प्रभुत्व असलेले दिवंगत मुकुंद भांडारी हे शांत, सौम्य, साधे, अंतर्मुखी आणि संयमी, उच्च शिक्षित व्यक्ती होते. त्यांनी स्नातक उपाधी सोबत, साहित्य सुधाकर (मुंबई), साहित्यरत्न (प्रयाग), काव्य व वेदांत मध्यमा (कोलकाता) हे सर्व शिक्षणाच्या माध्यमातून मिळविले होते. कै. मुकुंद भांडारी एक निस्वार्थी, कर्मयोगी आणि दृढ ज्ञानाचे धनी होते असे म्हणता येईल. ते साहित्यिक वर्तुळात शेवटपर्यंत जोडलेले होते, याशिवाय अनेक सामाजिक कार्यात सुद्धा सक्रिय होते. ते सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका दिवंगत सुधा भांडारी यांचे पती होते.
मुकुंद भांडारी यांनी पुढे इंदोरलाच आपली कर्मभूमी मानून तेथील पत्रकारिता व सांस्कृतिक अन् सामाजिक क्षेत्रात , विशेषत: मराठी भाषिकांत आपले एक स्थान निर्माण केले. त्यांनी सन १९६७ ते २००७ या ४० वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र टाइम्स मुंबईच्या प्रतिनिधीच्या रूपाने सांस्कृतिक व सामाजिक कार्याचा सातत्याने आढावा घेत "बृहन्महाराष्ट्र वृत्त" या सदरासाठी, लेखन केले आणि ह्या रूपे इंदूरस्थ मराठी भाषकांची पण अविरत सेवा केली. ह्या व्यतिरिक्त धर्मभास्कर ( मुंबई ) ,समाज चिंतन, मी मराठी, श्री सर्वोत्तम ( इंदोर) इत्यादि नियत कालिकांतून ते नियमित लेखन करीत असत .
आकाशवाणी इंदोरच्या नाट्यविधेत सन १९५५ ते ५८ च्या कालावधीत व सन १९८२ मध्ये सुरु झालेल्या इंदोर आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी कार्यक्रमाशी मुकुंद भांडारी प्रारंभा पासूनच संबद्ध असून वार्ता , परिसंवाद व मुलाखती इत्यादि प्रसारणात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा .त्यापूर्वी तत्कालीन इंदोरातील प्रमुख दैनिक जागरण मध्ये सन १९५०-५१ ह्या अवधीत पत्रकारितेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण त्यांनी दिले. सन १९८७ मध्ये इंदोरला झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे प्रचार विभाग प्रमुख म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी निभावली .
सन २००१ मध्ये इंदोरला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्मारिका समितीत अन् विषय नियामक मंडळाच्या समितीत मुकुंद भांडारी यांचा प्रामुख्याने सहभाग होता. महाराष्ट्र साहित्य सभेने प्रकाशित केलेल्या ' मिलाफ येथे मळवाटांचा ' या प्रातिनिधिक कविता संग्रहाच्या तसेच आपले वाचनालय,इंदौर व राजकवी तांबे स्मारक समिती तर्फे ' मध्य मेखला ' या काव्य संग्रहाच्या प्रकाशनांत मुकुंद भांडारी यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे . ते इंदूर कामगारआयुक्त कार्यालयातून श्रम अधिकारी ह्या पदावरून निवृत्त झाले आणि नोकरीच्या दरम्यान सन १९५९ ते १९६८ पर्यंत मध्य प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सन १९९८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या साहित्य व सांस्कृतिक विभागातर्फे अंतरराष्ट्रीय ख्यातीचे दार्शनिक व साहित्यिक प्राचार्य ग.वा. कवीश्वर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका समारोहात पुणे येथील प्रतिथयश साहित्यिक प्रा .आनंद यादव यांच्या हस्ते भंडारी यांच्या ' काडीचा आधार ' या पहिल्या काव्य संग्रहाचे प्रकाशन झाले . या पहिल्याच काव्य संग्रहाचे इंदोरआकाशवाणी केंद्रा (मराठी कार्यक्रम ) शिवाय महाराष्ट्र टाईम्स , लोकसत्ता व सामना सारख्या अग्रणी मराठी नियत कालिकांनी चांगले स्वागत केले . अ.भा. मराठी साहित्य संमलेनाचे माजी अध्यक्ष श्री नारायण सुर्वे व सौ . विजया राजाध्यक्ष यांनी ही या कविता संग्रहातील कवितांबद्दल समाधान व्यक्त केले होते. सन २००७ मध्ये त्यांचा एक आणखी काव्यसंग्रह ‘अंतःप्रवाह’ साहित्य प्रेमी मित्रांच्या प्रेरणेने इंदोरच्या श्री सर्वोत्तम प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध झाला होता. तसेच सन २०१२ मध्ये ‘सांगू कशी कोणाला’ ही कादंबरी आणि ‘अनाकलनीय ऋणानुबंध’ हा कथासंग्रह सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. स्वलेखना सोबत त्यांनी अनेक पुस्तकांच्या समीक्षा देखील लिहिल्या आहेत .
कोमल भावनांनी भरलेल्या मुकुंद भांडारी यांच्या ह्रदयात सामाजिक जागरूकता आणि देशप्रेमही जागृत होते. त्या अनुषंगानेच आयकर वेळेवर भरण्याकडे त्यांचा कल असायचा आणि तो ते शेवटपर्यंत जमा करत राहिले.यासाठी दोन वेळा त्यांना ‘’सर्वोत्तम ज्येष्ठ नागरिक’’ म्हणून सरकारतर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते .
कै. मुकुंद भांडारी काका अतिशय शांत स्वभावाचे आणि पडद्याच्या मागे राहणाऱ्या वृत्तीचे होते. इंदोरला आल्यावर ऐंशीच्या दशकात त्यांच्याशी ओळख झाली, पण मी कोणाची लेक आणि कोणाची बहिण आहे ते त्यांना सन २००१ मध्ये इंदूरला झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या दरम्यान कळले. संमेलनात त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता आणि मी त्यात जनसंपर्क अधिकारी होते. त्यामुळे वारंवार भेट होत असे . त्या दरम्यान त्यांना माझ्या माहेराबद्द्ल कळले. तेंव्हा ते मला म्हणाले – ‘’अगं, हे इतक्या वर्षांनी मला कळते आहे .पहिलेच सांगायचे होते. असे नको करत जाऊ. हा काळ मागे मागे राहण्याचा नाही.’’ कधी नव्हे ते सलग इतके बोलले. तो त्यांचा स्वानुभव असावा आणि त्याचा अर्थ मला बऱ्याच वर्षांनी समजला.
ज्येष्ठ कन्या अनुराधा कुलकर्णी यांनी त्यांच्या स्मृती सांगताना कळवले की शेवटपर्यंत कै. मुकुंद भांडारी यांची स्मृती अतिशय तल्लख होती. जुन्या नव्या सर्व गोष्टी त्यांना आठवायच्या. त्यांचे क्रिकेटवर खूप प्रेम होते. शेवटपर्यंत दूरदर्शनवर त्यांनी सामने बघितले. १० मार्च २०२५ ला त्यांचा ९६वा वाढदिवस झाला व ५ एप्रिल २०२५ रोजी अल्पशा आजारानंतर ते सर्वांना सोडून निघून गेले.
सहवास हा सुखाचा
भाग्यामुळे कुणाचा
दुःखात जन्म गेला
गाफील कोणी झाले
गाफील त्या क्षणांना
मैफिल ते म्हणाले
संसार ध्वस्त झाला
फसला तुझ्या मुळे रे
हा डाव जीवनाचा
अभिमान जीवनाचा
हाती तुझ्या न उरला
तो रंग जीवनाचा .
पृथ्वीवर आग ओकणाऱ्या सूर्यास
अन् पृथ्वीला भुरळ घालणाऱ्या चंद्रास
ढगांच्या गर्द पडद्या आड दडवून
पृथ्वीला चिंब भिजवण्यात
मला सात्विक आनंद होत होता
फुल्ल कुसुमित द्रुमदल शोभिनी
सुजलाम् सुफलाम्
अशा भारत भूमीवर माझं प्रेम होतं
तिचं मला आकर्षण होतं
पण आजकाल भारतावर
किती ही बरसलो
तरी धनधान्या ऐवजी
माणसांचंच वाढत चाललेलं
पीक पाहून
आमच्या वारुण्य विभागात
एस.आय.एस.आय.चा हात तर नाही ना ?
की चित्रगुप्त पाकिस्तानला
फितुर तर झाला नाहीना ?
या शंकेनं व्याकूळ झालेल्या
माझ्या मनांत आकर्षणा ऐवजी
अनावर्षणाचीच प्रवृत्ती
फोफावत चालली आहे
माझ्यातील द्रवता आटत चालली आहे
वाढती जनसंख्या अन् वाढत्या प्रदूषणानं
भारतावर प्रेम वर्षा करण्याची
माझी क्षमताच कमी कमी
होत चालली आहे
मी काही ठिकाणी
बरा बरा बरसतो
काही ठिकाणी भरा भरा बरसतो
तर कुठे कुठे नुसताच गरजतो
तर काही ठिकाणी
होरपळणाऱ्या सूर्य किरणास
सरळ वाट करून देतो
मी असं का करतो ?
असं का वागतो ?
माझ्या या प्रश्नांचे उत्तर
तुमच्या कडे आहे का ?
असल्यास मला जरूर सांगा.
अन् त्रेता युगातील सूर्य
फार ज्वलंत होता
अमरपद प्राप्त करणाऱ्या
बलभीमलाही त्यानं
आपला हिसका दाखविला होता
म्हणतात द्वापर युगातील
सूर्यही तेजस्वी होता
द्रोपदी वस्त्र हरणाने
संतप्त झालेल्या
सूर्याने आपल्या मुलाचा वध
उघड्या डोळ्याने पाहिला होता
थिजला आहे गारठला आहे
शे - सव्वाशे मानवी मेंढरांसमोर
पंधरावीस वर्षांच्या
अबोध मुक्या
मुलीवर झालेल्या बलात्काराचे
गीतेवर हात ठेऊन शपथ घेणारे
साक्षीदार मूक झाले
तेंव्हा किरण पाझरणाऱ्या
सूर्यास पाहून
त्या अबोध बालिकेस
त्या अवस्थेतही वाटून गेलं
निदान सूर्य तरी माझ्यावर झालेल्या
अत्याचाराने नक्कीच दुःखाश्रू ढाळेल
पण त्या बिचारीला काय माहीत ?
की प्रत्यक्षात आईस्क्रीम झालेला
कलियुगातील सूर्य ठिबकत राहील
फक्त ठिबकत राहील.
स्वर, लय, ताला बरोबर
डोलणाऱ्या मानेस
सांगा नको कसे म्हणू मी ?
खेळात भारताच्या विजयानं
गदगदून आलेल्या मनास
मनोहर स्मृतींनी
उंचबळून आलेल्या हृदयास
सांगा नको कसे म्हणू मी ?
कथा कादंबरीतल्या प्रसंगांनी
दूरदर्शनच्या मालिकेतील
किंवा रूपेरी पडद्यावरील
हृदयद्रावक दृष्यांनी
डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रूंना
सांगा नको कसे म्हणू मी ?
अपमाना विरुद्धच्या त्वेषास
झालेल्या चुकां बद्दलच्या रोषास
सांगा नको कसे म्हणू मी ?
भ्रष्टाचारा विरुद्धच्या क्रोधास
अगतिकतेमुळे आलेल्या नैराश्यास
एखाद्या अनामिक हुरहुरीस
अपयशाने आलेल्या वैतागास
सांगा नको कसे म्हणू मी ?
कोणाच्या मृत्यूने बसलेत्या धक्क्यास
आणि ताटी उचलतांना
अचानक आलेल्या हुंदक्यास
तुम्हीच सांगा नको कसे म्हणू मी ?
पश्चिमेला गुडमॉर्निंग गुड इव्हिनींग
काही क्षणाच्याच शुभेच्छा
पूर्वेस मात्र नमस्कार
चिरंजीव होण्याचा कायम आशीर्वाद
पश्चिमेला वाढदिवसाला
तेवत्या मेणबत्त्या
विझविल्या जातात
अंध:कारमय भविष्याचे चिन्ह म्हणून
पूर्वेस मात्र लावलेले दीपक
उज्वल भविष्याचे द्योतक
आरती ओवाळून आयुष्यवंत हो
हा आशीर्वाद देत
दैदीप्यमान मार्गाचे
दिशा दर्शन करतात
पश्चिमेला मेल्यावरसुद्धा
मिट्ट काळोख्या खड्ड्यात पुरणं
पूर्वेस धगधगल्या चितेच्या तेजात
जीवन कार्य तेजाळून जातं
म्हणूनच सूर्य पूर्वेस उगवतो
अन् पश्चिमेस मावळतो
पूर्वेस उगवणारी मानवी संस्कृती
पश्चिमेस मावळत जाते .
माझा कविता संग्रह
अवश्य विकत घ्या
प्रत्येक घरा घरांत
तो असलाच पाहिजे
त्यांत माझ्या वात्रटिके पासून
चारोळ्या पर्यंत
कवितांचा समावेश आहे
काव्याच्या गुलाबी बासुंदीतील
चिंब झालेल्या चारोळ्यांची लज्जत
तुम्हास का सांगावयास हवी ?
आजच्या महागाईच्या काळांतही
माझ्या कविता सवंग नाहीत
पण स्वस्त आहेत
वीस रुपयात चाळीस
एक रुपयांत दोन
पन्नास पैशात एक
म्हणून त्वरा करा,त्वरा करा
माझा कविता संग्रह
अवश्य विकत घ्या.
सदरा होता का तो ?
कुठून आणला होता ?
कसा मिळाला होता ?
कितीत घेतला होता ?
घेतला ? घेतला नव्हता
तो मला मिळाला होता
कसा ते सांगतो
मी तख्त , तिजोरी , तलवार
यांना कधीच शरण गेलो नाही
जीवनाचं गणित
रुपया पैशांच्या
बेरीज वजाबाकीत
किंवा गुणाकार भागाकारांत
कधीच सोडवलं नाही
नशिबाच्या घाल्यांपुढे
कधीच हतबल झालो नाहीं
उलट आव्हान मानून
मी त्यांना
प्रत्येकाला निधड्या छातीनें
सामोरा गेलो होतो
लखलखाट, झगमगाट
हार तुरे, सलाम, मुजरे
गादी किंवा गाडी
मान मरातब, मान सन्मान
या साऱ्यांकडे पाठ फिरवून
कर्तव्याच्या खडकाळ
अन् काटाळलेल्या
चढ उताराच्या रस्त्या वरून
अर्जुनाच्या एकाग्रतेने
अन् एकलव्याच्या तन्मयतेने
मार्गक्रमण करीत
जात असतांना
एकदिवस अचानक
देव प्रगट झाले
म्हणाले वत्स
मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे
माझ्या जवळ
या क्षणी दोनच वस्तु
शिल्लक आहेत
एक स्पर्श मात्राने
लोखंडाचे सोने करणारा परीस
आणि हा सुखी माणसाचा सदरा
दोघां पैकी कुठलीही एक वस्तु माग
मी तुला आशिर्वाद म्हणून
ती देण्यास तयार आहे
मी म्हणालो देवाधिदेवा
मला कुठलीच अभिलाषा नाही
कुठलाच मोह नाही
तरी पण प्रसाद म्हणून
हा सुखी माणसाचा सदरा देऊन
आशीर्वाद द्यावा
अन् काय आश्चर्य
तो सदरा घालताच
मी ज्या गोष्टींना हात लावत होतो
त्यांचं सोनं होत होतं
ते पाहून
कोणी मला अनाहूत सल्ला दिला
सरकार कडून झेड सिक्युरिटी मागून घे
नाहीतर या सदऱ्या करिता
कोणी ही तुझा जीव घेण्यास
मागे पुढे पहाणार नाही
अन् तत्क्षणी
तो सुखी माणसाचा सदरा
लुप्त झाला .
माझी कविता प्रौढ झाली
तेंव्हा माझ्या जुन्या रचनांना
हसू लागली
तेंव्हा मला
तिला समज द्यावी लागली
हसू नकोस
कशीही झालीत
तरी ती तुझी मोठी भावंड आहेत !!!
प्लीज ऐकता का
दयाळा करुणाकरा यम देवा
माझा नाममात्र संबंध असलेला
माझ्या नावानं ओळखल्या जाणाऱ्या
गडकरी चौकातील माझा पुतळा
वर घेऊन या ना एकदाचा
तिथं त्याचं बसणं नव्हे
असणं सुद्धा नुसता शुद्ध वैताग
अहो दारूच्या पक्षात अन् विपक्षांत
लिहिलेल्या माझ्या संवादावर
मी एवढा खुश होतो
की त्या पुण्याच्या जोरावर
मला अमृताचं परमिट मिळावं
असा मी अर्जही दिला होता
परंतु सध्या माझ्या या पुतळ्या समोर
मद्यपि शूरांचं आणि वीरांच
मद्यपानातील कौशल्य
त्यांचं मद्यपानातील सामर्थ्य
मद्यपाना नंतर त्यांच्या जीभेवर
होणारं सरस्वतीचं नर्तन
त्यांचं अस्खलीत वाक चातुर्य ऐकून
माझी मलाच लाज वाटू लागली आहे
की मद्याच्या त्या एकच प्याल्यात
मी खरा खुरा बुडलोच नव्हतो
कारण वास्तवापेक्षा
मी एक शतांशही लिहू शकलो नव्हतो
हे नग्न सत्य नंतर मला कळून आलं
अहो यमदेवा
ते तर जाऊच द्या माझ्या समोर
माझ्या नावाच्या चौकांत
दिवस रात्र होणाऱ्या उलाढाल्यांनी
होणाऱ्या सभा निर्दशनांनी
मी राज संन्यासा पेक्षा
राज हव्यास हे नाटक
कां लिहिलं नाही ?
हे शल्य आतां मला बोचू लागलं आहे
भाव बंधन तोडून
प्रेम संन्यास घ्यावा
असं मला वाटू लागलं आहे
खरं सांगतो देवा
अगदी शपथ घालून सांगतो देवा
माझ्या साऱ्या साहित्याची
या सारखी विल्हेवाट लागण्यापूर्वी
नाममात्र संबंध असलेला
माझा पुतळा वर घेऊन या देवा
लागल्यास त्या बदल्यात
मी पुनः मर्त्यलोकांत
जाण्यास तयार आहे
पण माझ्यावर कृपा करा देवा
कृपा करा हीच प्रार्थना .
अनेक वर्षांच्या
वाटचालीनंतर
वाटलं इथंच थांबावं
पण दिसून आलं
इथूनच तर अनेक वाटा
फुटल्या आहेत
काही साध्या सरळ
धोपट वर्दळीच्या
काही गर्दीच्या
काही तिरकस तिरपट
काही नुसत्याच
पावलांच्या खुणांनी नटलेल्या
अनोळखी तर
काही पुसट होत जाणाऱ्या
भुरळीच्या
ह्या साऱ्याच खुणावत आहेत
की आज पर्यंतची माझी वाटचाल
केवळ तंगडतोड पायपीट
खऱ्या वाटा तर
इथूनच सुरू होत आहेत
या वाटांच्या दर्शनाने
माझ्यातील थकवा
दूर झाला आहे
एक नवं चैतन्य
प्रस्फुटित झालं आहे
कारण या वाटांना झाकोळणाऱ्या
वृक्षराजीतून येणारा
सुमधुर चंदनी वारा
आणीत आहे माझ्या करता
अनामिक अदृष्टाचे
पथ प्रदर्शन करणारा
भ्रमर गुंजारवाच्या सुरावर
नाद घालणारा एक मधूर मंजुळ
गूढ असा मुरलीचा नाद
ऊँकारांत विलीन होण्याची प्रेरणा देणारा .
संकलन : अलकनंदा साने


No comments:
Post a Comment