प्रभाकर देव
( १० जून १९२६ – १९/०८/११)
जवळपास एका शतकापूर्वी म्हणजे १० जून १९२६ रोजी एक साहित्यरत्न प्रभाकर देव ह्यांचा जन्म झाला.प्रसिध्द कवी स्व.सी.का.देव ह्यांच्या घरी त्यांचे संगोपन झाले त्या मुळे साहजिकच साहित्य क्षेत्रातील नामांकित साहित्यिकांच्या सहवासात ते मोठे झाले व सन १९४५ पासून अवघ्या १९ वर्षाच्या वयापासून स्वतःचा ठसा उमटविण्यात यशस्वी झाले .प्रभाकर देव विनोदी कविता लिहीत असत तसेच प्रेम कविता पण लिहीत असत. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल फारशी माहीती नाही, तसेच त्यांचा काव्य संग्रहही प्रकाशित झाला नाही, ह्याचे वाईट वाटते.
महाराष्ट्र साहित्य सभा , इंदौरच्या ठिकाणी प्रभाकर देव ह्यांची भेट होत असे त्यावेळी मी व कवयित्री सुषमा अवधूत साहित्य क्षेत्रात नवख्या असल्याने काहीश्या संकोची होतो, तसेच देवकाका पण संकोची होते . बरेचदा देव काकु सोबतीला असत तेव्हा काकांशी बोलणे होत असे.तर त्यांचा हा स्वभाव संकोच ह्याच शीर्षकाने लिहिलेल्या कवितेत डोकावताना दिसून येतो. हा उपक्रम सादर करताना रोज मला असे वाटले की जादुगाराच्या पोतडीत हात घालत आहे आणि खरोखर रोजच विस्मित करणारी कविता हाती लागत होती. कै. प्रभाकर देव ह्यांच्या विविध कवितांचे वाचन करतांना काही अगदी वेगळ्या कविता सापडल्या. त्या पैकी एक बालकविता चेंडू व एक विनोदी कविता साबू अचंबित करतात. कै. प्रभाकर देव यांच्या कवितांत आगळेवेगळे विषय आहेत. असाच एक वेगळा विषय जो आता हळूहळू कालबाह्य होतो आहे तो म्हणजे पोष्टाची लोखंडी पेटी . त्यावर त्यांची एक अप्रतिम कविता आहे खादाड आजी.
कविवर्य प्रभाकर देव ह्यांचे व्यक्तिगत आयुष्य अतिशय कष्टाचे होते.आई वडीलांना लहानपणी गमवावे लागले त्यामुळे आपल्या काकांच्या घरी त्यांचे संगोपन झाले.नंतर धाकट्या भावंडांची जबाबदारी असलेल्या देवांनी उच्च शिक्षण न घेता नगर निगम मधे नोकरी पत्करली व आपली कौटुंबिक जबाबदारी संपूर्णपणे पार पाडली. चेंडू, टपाल पेटी, घड्याळ ह्या वस्तुंना जीवंत करणारे देव काका १९/०८/११ रोजी घड्याळाची टिकटिक मागे ठेवून अनंतात विलिन झाले.
कै. प्रभाकर देव यांच्या काही जुन्या कविता वृत्तात आढळतात आणि त्यात वृत्ताप्रमाणे मात्रा ह्रस्व आढळतात. त्यात सुधारणा न करता त्या तशाच दिल्या आहेत.
१. वेदना
(गझल )
राग भैरवी त्रिताल
माझी तुझी कितीदा, वाटेत गांठ पडते
ना बोलणे मुखाने, जुळतात नेत्र नुसते
नजरेत भावनांना चढतो नशा शराबी
उमले कळी प्रितीची हृदयी नवी गुलाबी
संकेत लोचनांचे कळतील तुलां-मला ते
अडतात शब्द ओठी- वदवे न गूढ कोडे
नाजूक वेदना ही सलते क्षणांक्षणाला
माझ्या तुझ्या विना ती कळणार ना जगाला
२. योग वियोग
सहज बोलता आठवती मज ओळखीचे नित जुने चेहरे
हसरे ,हळवे, तापट त्यांचे भाव गवसती अजूनी कां रे
ओळखीचे सगळे साथी अजुन तरळती डोळ्या पुढती
हसती ,वदती ,जवळ भासती गंध स्मृतीचा सोडित चित्ती
किती बैठकी गप्पागोष्टी, खेळ खेळलो सगळे मिळूनी
दुखता ,खुपता ,कधी कोणाचे झटलो झिजलो रात्र जागुनी
या हातांनी किती जणांशी हात मिळविता नाते जुळले
कधी कुणाचे या खांद्यावरी प्रेत वाहतां अश्रु गळले
ओळखिचे ते जुने चेहरे, दुर्मिळ आता स्नेही जुने ते
रित्या मैफली,उदास वाणी,रुक्ष चहुकडे गमते-सलते
हिरव्या वृक्षावरी खेळले फांदी फांदी वरती पक्षी
पतझड होता दूर पळाले कुणी न आता मजला लक्षी
योग कपाळी होता तेव्हा अवतीभवती सदा सोबती
वियोग आता त्याच कपाळी -मीच माझा एकटा साथी
३. करंजी
सुंदर सुंदर एक करंजी कुणी वाढली आभाळी ?
सुंदर सुंदर दिसे मनोहर शुभ्र पांढरी फुगलेली
कधी गवसते संध्येला
कोणी पाहती रात्रीला
नाजूक नाजूक कोर किनार कोणी कापली भवताली
सुंदर सुंदर एक करंजी कोणी वाढली आभाळी ?
निळ्या निळ्या या ताटाला
एक करंजी शोभेला
भुरकट भुरकट कुणी काढली इथे ढगाळी रांगोळी ?
सुंदर सुंदर एक करंजी कोणी वाढली आभाळी ?
लुकलुकणाऱ्या बारिक मुंग्या
करंजी साठी करिती दंगा
वेचत वेचत सारण खाती खवा घालुनी भरलेली
सुंदर सुंदर एक करंजी कोणी वाढली आभाळी?
युगा युगाची शिळी करंजी
परी गवसते अजूनी ताजी
चटोर माझी जीभ वळवळे करंजी खाण्या नभातली
सुंदर सुंदर एक करंजी कोणी वाढली आभाळी?
४. आई
आई शब्द गमे मनोहर किती ओठावरी खेळता
लाभे अमृत या जिभेस आमुच्या आई मुखे बोलता
आई आळविता कुणी मधुस्वरे आनंद ये दाटुनी
स्नेहाचा मकरंद गोड मिळतो या दोन शब्दातूनी
शब्दाच्या समुदायी शोभूनी उठे आई असे अक्षर
चित्ता भावतरंग दंग करितो आईतला मंतर
ए आई !!जपती मुखाग्र किती रात्रंदिनी बालके
माता ,माऊली हे तदर्थ असुनी आई पुढे ते फिके
दुःखाने मन पोळता सहज ये वाणीमध्ये आई ग
तापाने तन तापताची वदतो वातामध्ये आई ग
अंगाला पडत्वाची घाव कुठला उद्गार ये आई ग
अणायासी मुरे सदैव आमच्या आवाजी हा आई ग
भानु चंद्र नी तारका वसती या अंबरी जोवरी
आई शब्द टिकेल दीर्घ समयी कोटीमुखी तोवरी
५. आणि येथ उमटती
अंतरीच्या उद्यानात
भिरभिरती भावना
अवचित प्रगटली
एक त्यातून कल्पना
गेली कल्पना धावून
भेटण्याची प्रतिभेला
माझ्या निराश जीवनी
क्षणी वसंत फुलला
धरूनिया एक सूर
गाती दोघी गोड गाणी
आणि येत उमटती
काव्यमय प्रतिध्वनी
६. माझी अभिलाषा
(पादाकुलक)
मनांत माझ्या कितीदा येते!||ध्रु.||
सुनील अंबरी
पूर्णेंदूपरि
नित पुरवावे रम्य रजनितें!||१||
मधुप होऊनी
मधुरस चाखुनि
क्षण चुम्बावें कमलक्लातें!||२||
दवबिंदूपरि
सुमशैयेवरि
डुलत,बघावें नव क्षितिजातें!||३||
व्हावें कोकिळ
ठावें मंजुळ
अन् रिझवावें सृष्टिस मोदें!||४||
वीज नाचरी
क्षण मेघोदरिं
होउनी,दिपवावें जगतातें!||५||
७.कल्पनेस
(वृत्त -तूणक)
जाग कल्पने क्षणांत:स्वैर माझिया मनीं!
जीवनी भरून तेज दे स्वयं-प्रकाशनी!!
||धृ||
या सुनील अंबरी
फिरू विहंगमापरी
पाहूं ये वरी शशी चांदण्यांत पोहूनी!
या अथांग सागरी
ये करूं मुशाफिरी
देव झुंज वादळास घेउं रत्न वेचुनी!
गे विशाल हे गिरी
आणि खोल या दरी
टाक पाऊलें जपून जाऊ वाट चालुनी!
या नद्यां नि ओहळ
स्वैर वाहतें जल
तूहि गायनें अशीच गा तरंग पाहुनी!
घोर दाट या वनीं
कृष्ण किर्र यामिनी
तूं प्रकाश पांथ मी विशाल मार्ग- शोधनीं!
वायु मत्त होउनी
वाहतो दिशांतुनी
स्वार होउं त्यावरी वसुंधरेस जिंकुनी!
८. तुझी पाऊले
(जाति:-समुदित मदना)
मेघ मालिका स्त्रवू लागली भूमीवर तापल्या,
तुला पाहता फुलू लागल्या मनात माझ्या कळ्या.१
स्मित चंदेरी उधळीत येसी रम्य चंद्रीके परी,
कळेना माझे मला ,करावे स्वागत कैसें तरी. २
तुझी पाऊलें घरास माझ्या आज लागलीं खरी,
स्वर्गीची चंद्रिका पातली निर्जन भूमीवरी.३
कंटकमय बहु कठीण वाट ही वृक्ष चहूं बाजुनी ,
हिरवळुनी शोभिवंत झाली तूं येतां देखुनी,!४
गुलाब, चंपक ,जाई, मोगरा फुलले या अंगणी,
आनंदाने डुलूं लागले तू येता पाहुनी.५
पर्णकुटी ही साधी रांगडी कवडी मोलापरी,
तुझ्या स्पर्शाने आता जाहली रम्य महालापरी.६
तुझ्या पाऊले शकून आले आज माझी या घरां,
उणीव कसली मुळी न आता लागूं संसारा .७
19/03, 17:08] Kavita Puntambekar तुझी पाऊले मात्रावृत्त सूर्यकांत/समुदित मदना हे वृत्त
८+८+८+3=27
वृत्तबद्ध कवितेचे वाचन किती सुंदर रीतीने करता येते! या कवितेत तर कविवर्य प्रभाकर देव यांनी इतकी सुंदर शब्दरचना आखली आहे की शब्दाबरोबरच आपण कवितेच्या विश्वात रमून जातो. कल्पनेस या कवितेत पण किती सुंदर कल्पनांचा विलास केला आहे की वाचून मन आपल्याआपच आनंदात रमून जातं.
अर्चना ताई, इतक्या सुंदर कवितांची घागर तुम्ही आमच्या समोर सांडत आहात शब्दांच्या सरोवरात आम्हीच पोहायला लागतो.
९.नवी प्रतिपदा
(जाति-पादाकुलक)
नवी प्रतिपदा नववर्षाची
आनंदाची उल्हासाची !||धृ.||
दिशा उजळल्या नवतेजाने
विहंग गाती मोद भराने
प्रभा फांकता बाल रवीची !||१||
नव कुसुमांनी उपवन फुललें
आलि-कलिकांची कुजबुज चाले
कळी उमलली सुप्त मनांची! ||२||
नवीन जीवन पूरित तटिनी
निर्झर गाई सराग गाणी
पुढे खळाळत सागर वीचीं!||३||
पिवळी पिवळी शेते पाहुनि
म्हणे शेतकरि कुणी आनंदुनि
पहा फळें ही निज कष्टांची !||४||
पूर्णतया रणवणवा शमला
पुनश्च लाभे शान्ति जगांला!
गा गा गाणी मुक्तपणाची !||५||
भविष्य उज्वल व्हावे, वाटे
तरी सिद्ध व्हा प्राणाहुतितें!
वाट पाहतां अजूनि कशाची?||६||
घरोघरी ही गुढ्या तोरणे
उभी ,सांगती उच्चरवाने
गागा गाणी आनंदाची!||७||
१०. नवा दिवस
(जाति-कोकिळा)
सरली भीषण रात उगवला दिवस नवा डौलांत!
क्षितिजावरुनी स्वैर चालली किरणांची बरसात!!
अरुण ऊषेचा विवाह झाला
उदय घडीचा मुहूर्त जमला
वनदेवींनी रंग उधळिला
आणि पताका वरति ढगांच्या झळझळती गगनांत!!
काळोखाचा पडदा सरला
नवतेजाचा गोळा दिसला
आनंदी आनंद वितरला
परी पेंगतो अजुन एकटा एक दिवा रस्त्यांत!
रातकिड्यांची सरली किरकिर
विहंग गाती गाणीं सुस्वर
शीळ घालतो वायू भिरभिर
झडूं लागले दूर चौघडे देवांच्या दारांत!
फुलली कापुसबोंडे विजनीं
हसली सुमनें कोष सोडुनी
अनुपम त्यांची कांती बघुनी
झरझर लपल्या लाजुन तारा दिवसाच्या उदरांत!
कुणी वाजवी मंजुळ पावा
कुणी देऊळी घेतिं विसावा
वा करिती देवाचा धावा
आणि बाजुला करकर करिते मोट कुठे शेतांत!
नांगरलेल्या शेतामधुनी
कोम्ब कोवळे शिर ऊंचावुनी
बघती,ओळी ओळीमधुनी
सृष्टीदेविने जणुं लिहिलेलें काव्य इथे साक्षात!
११. संकोच
भेट झाली ती अशी की भेटणे झाले नाही
बोललो इतुकेच दोघे -बोलणे झाले नाही
सर्व कांहीं देवूनी ते-घ्यायचे थोडेच होते
ओंजळी केल्या रित्या पण-मागणे झालेच नाही
अर्थ भोळ्या लोचनांचा घ्यायचा होता टिपूनी
रोखिल्या नजरा अश्या की- पाहणे झालेच नाही
शरबतांचे पेय हाती -ओठही व्याकुळ होते
वाटला संकोच ऐसा -ते पीणेच झाले नाही
मोरपंखी भेट अपुली -वाटते पुन्हा व्हावी ती
भेटणे केंव्हा, कुठे पण सांगणे झालेच नाही
१२. आसवांची तोरणे
जी मला आता चढेना-ती मी पुन्हा घेवू कशाला?
तीच ती नावे नकोशी-मी पुन्हा घ्यावी कशाला?
वेदनेच्या सोबतीने -चाललो आहे पुढे मी
मी जरी संपेन माझी वाट संपवावी कशाला?
जागलो रात्री तरीही -चंद्रमा आलाच नाही
मी उन्हाला चांदण्यांची -गोष्ट सांगू कशाला?
कुंचला मी, चेहरा मी -रंगही माझेच सारे
कां कुणाच्या चेहऱ्याची-भीक मी मागू कशाला?
मोडक्या माझ्या घराला -पाहुणा हासून गेला
मी तरी माझ्या घराची-लाज काढावी कशाला?
कोण तूं होतीस माझी-हे तुला माहीत होते
अन तुझा मी कोण होतो-याद मी देऊ कशाला?
खाक झाले भोवतीचे-रान स्वप्नांच्या मृगांचे
कस्तुरीची आनंदवार्ता -या इथे यावी कशाला?
१३. साबू
साबणाची एक वडी!
अंगी कागदाची घडी!!
दिसे इवलीशी मूर्ति!
तिची जगभर किर्ती!!
घडी घडी ढळे साडी!
राही उघडी वागडी!!
मऊ मऊ तिची कांती!
असे कोमल सुगंधी!!
तिचे जाळीदार घर!
राही सदा ओलसर!!
एका खोलीत संसार!
नाही शेजारपाजार!!
पदोपदी स्नान करी!
पाण्यावरी प्रिती भारी!!
खेळ खेळे अंगावरी!
लोळे सूट साडीवरी!!
कांती,हमाम, स्वस्तिक!
नाना नावाचे कौतिक!!
आई,दादा,बेबी, बाबू!
लाडे वदतात साबू!!
घरीदारी करी काम!
सदामुखी दिसे घाम!!
नाही आळस-हराम!
रात्री आवडे आराम!!
गावोगावी हीचे भक्त!
घरोघरी नांदे आप्त!!
स्वच्छ करीत जगत!
करी जीवन समाप्त!!
१४. चेंडू
गंमत गंमत करि चेंडू
खरा खरा हा खेळाडू ||ध्रु||
कधी भिंतिशी देतो टक्कर
कधी हवेतच खातो चक्कर
अन् कधी आकाशी बघे उडू ||१||
क्षणांत बोले टप् टप् टप् टप्
क्षणांत नाचे थय् थय् थय् थय्
अन् क्षणांत लागे गळा पडू ||२||
धावत सुटतो दड् दड् दड् दड्
लोळण घेतो गड् गड् गड् गड्
अन् कधी न म्हणतो स्वस्थ पडू ||३||
कुठेहि लपतो,कुठेहि चढतो
कधी गटारी झिंगत पडतो
अन् उगा आणतो अम्हां रडू ||४||
असेच खेळू सगळे आपण
नाचु बागडु उडू टणाटण
अन् चेंडू सम या वरि वरि चढू||५||
१५. खादाड आजी
पेटी पोष्टाची लोखंडी|उभी वाटेच्या कडेला|
साडी शेंदरी भडक अंगाला|१|गुंडाळून सर्वांगाला||१||
आजीबाईच्यासारखे|गोल घोटलेले डोके|
ऊन-पाऊस-थंडीचे|सोशी निमूट तडाखे| ||२||
गावातील नर नारी|प्रेमे तिला भेटातात|
देती कागदी चिरोट्या|घास घालुनी मुखांत||३||
गंधे पंचविशीच्या गाथा|शोक आनंदाच्या |
तिच्या घालिती पदरी|लिहूनिया सर्व व्यथा||४||
तिला सारखेच सारे|सुखदुःखाचे न वारे
सर्व साठवी पोटात|परी पोट नच भरे ||५||
कुणी म्हणोत खादाड|तिला नाही त्याची चाड|
दावी वाकुल्या अशांना|तिची जीभली लबाड||६||
आजी सदाच ताठर|कशाची न तीला खंत|
कुणी निंदा कुणी वंदा|नच मोडे तिचे व्रत||७||
नारदाचे तिचे वाण|कळविते गुजगोष्टी|
घडविते पत्राद्वारे|दूरच्यांच्या गुप्त भेटी||८||
दुवा देती निरंतर|दुरावले जन कष्टी|
करी सेवा सगळ्यांची|आजीबाई पोष्टपेटी||९||
१६. तुझ्या घरी तुझ्या कडे
(वृत्त-मधुमती)
जीव ओढ ओढतो निरदा तुझ्याकडे !
येथे मी मनी झुरे तुझी वसुंधरा गडे!!
चालला पुढे कुठे?
भावना मुक्या उरी
उधाणती वरी वरी
ओढ राजसा तुझीच, मन्मनास जाळीते
चालला पुढे कुठे?
मनात तूच बिंबला
तुझ्या परी तू एकला
साजणा निशी दिनी तुझाच ध्यास हा जडे
चालला पुढे कुठे?
पोळल्या जीवास या
शांतवी करी दया
स्पर्श लाभता तुझा उरेल काय साकडे
चालला पुढे कुठे?
या निळ्या नभांतरी
उंच त्या तुझ्या घरी
प्रीती अमृतें तुवा भरून ठेवले घडे
चालला पुढे कुठे?
शोध शोधिले तुला
योग आज भेटला
रूप आगळे तुझे नभांत छान शोभते
चालला पुढे कुठे?
वाटते कधी मनी
विशाल पंख लावुनी
येऊ कां तुझ्या घरी ,तुझ्या कुशी तुझ्याकडे
चालला पुढे कुठे?
लोचनांत माझिया
रूप तू तुझे पहा
ये जवळी सत्वरी लाज प्रितीला नडे
चालला पुढे कुठे?
चंद्र सूर्य जोवरी
अटल प्रेम तोवरी
एक तूंच तू मला तुलाही मीच आवडे
चालला पुढे कुठे?
सुदूर उंच अंबरी
हवेमध्ये अधांतरी
वसुंधरा तुझी प्रिया तुझ्याविना मनी कुढे
चालला पुढे कुठे?
घड्याळ बोले टिकटिक, काळाच्या नित घटिका मोजत|
युगे युगे मी राहीन चालत,वर्ष, महिने, दिन आक्रंदित||
पिढ्यान पिढ्या मी मानवतेची निशदिनी पल पल करी किंकरी |
दुष्ट, दयाळू ,रंक,राव ही सकल वर्षती स्नेह मजवरी||
दणकट काया, नितळ मुखडा, गोल फ्रेमचा नयनी चष्मा |
सदाच तळपे शशि बिंबापरी धवल कांतीची माझी सुषमा||
पुत्रवती मी, भाग्यवती मी,अंक प्रसवले मजला बारा|
दीर धाकटे -दोन्ही काटे-लोलक माझा पती बिचारा||
करीत गर्जना प्रभात काळी,मीच उठवते सकल जनांना|
प्रथम उठोनी दर्शन माझे, जो तो घेई चोळीत नयना||
दहा वाजता मीच सांगते 'चला रे चला पान वाढले|
शाळा,धंदा,काम,कचेरी, नित्य कर्म हे कुणा ना चुकले||
घरकुल माझे भिंती वरती,बसे आत मी शांत दुपारी|
सोबत बसती चिमण्या काही खेळ खेळती माझ्या दारी||
शिणती ,थकती,काम करोनी,शिक्षक बाबू अन् चपरासी|
पाचाचे मी बडवीत टोले, जा जा सकला वदे घरासी||
व्रत सेवेचे धारण केले,झिजवीन काया मानव चरणी|
माझ्या सम मी एकच जगती,काळाची मी लेक बहुगुणी||
१८.आठवण ( चंद्रकला )
दूर दूर क्षितिजी पसरली संध्येची माया
ये अजून तरि ये मिलिंदा मजसी भेटाया
शिणले दीसभरी पाहुनी वाट तुझी राया
सूर्यबिंब ढळते प्रतीक्षा जाईल का वाया?
गुंजारव होता जिवलगा कुठे आसपास
भास तुझा होई अचानक फुले हृदयास
तुझ्याच साठी रे ठेवीला जपून मकरंद
रसिका चाख जरा होऊया आपण क्षण धुंद
येई येई ये ये मिलिंदा या हृदयाजवळ
लाभू दे मजला तुझे ते जीवन स्नेहल
फुलली मग कलिका लागली मुदे डुलायास
सागररव श्रवता हर्ष हो अधीर सरितेस
कलता रवी क्षितिजी झाकला धरणीने निमिशी
कलीकेने धरिले मिलिंदा अपुल्या हृदयाशी
संकलन --- अर्चना शेवडे

.jpeg)