Saturday, September 26, 2026



                                                          (०५ नवंबर १९३३ – १८ सप्टेंबर २०२५)



"सोनेरी पान" हा सोहळा आपण ग्वाल्हेरचे विनम्र व्यक्तिमत्व श्री कमलाकर बुचके ह्यांच्या कवितेच्या अंगणात साजरा करणार आहोत. आम्ही सर्व ग्वाल्हेरकर त्यांना आदराने बुचके काका म्हणत होतो. बुचके काकांनी ४० वर्ष उच्च न्यायालय ग्वाल्हेर येथे प्रशासन विभागात नोकरी केली. मराठी, संस्कृत आणि इंग्रजी तिन्ही भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. नोकरीत असताना, महर्षि रमण सच्चिदानंद, समाज मुंबईच्या इंग्रजी मासिकात त्यांचे लेख प्रकाशित होत असत. १९७० साली  पत्रिकेत काकांचा "द विज़डम ऑफ उपनिषद्स" या विषयावर लेख प्रकाशित झाला होता आणि हाच लेख नंतर त्या संस्थेनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना पाठविला होता आणि त्यांनी ह्या लेखावर आपली रीतसर प्रतिक्रिया देत प्रशंसा ही केली होती.ते आपल्या न्यायालयीन कार्यात इतके माहीर होते की त्यांच्या द्वारे न्यायालयीन नस्तीवर वा स्वतंत्र नोंद केलेली

अधिटिप्पणं, न्यायालय अभिलेखागार ग्वाल्हेर मध्ये संरक्षित आहे.  सेवानिवृत्ती नंतर त्यांनी काव्य लेखन प्रारंभ केले. बुचके काकांना अध्यात्म आणि ज्योतिष विषयाचा चांगलाच अभ्यास होता. "आमच्या घरी सगळ्यांची कुंडली त्यांनीच तयार केली आहे. एवढेच नाही तर त्यावेळेचे पंचाग ही जपून ठेवले आणि ज्या पानावरुन माहिती घेतली होती ते पान ही टोचून ठेवले आहे. त्यांचे काम फारच व्यवस्थित होते"  त्यांचे सुपुत्र श्री धनंजय  बुचके ह्या गोष्टीची "स्मृतिगंध" ह्या लेखात अभिमानाने नोंद घेतात.बुचके काकांच्या अधिकांश कविता गेयच आहेत. ते उत्साहाने आपली कविता कविगोष्टीत गावूनच सादर करीत असत. 


'कविता कशी असावी'  ह्या कवितेत बुचके काका सांगतात


" कविता कशी असावी जाणून घे मनां तूं,

मूर्तीच भावनांची रेखीत जा मनां तूं।।


"संतोष कां? असेना सुख शांति कां? वसेना,

शोकादि दुःख यांचे प्राबल्य कां? सरेना'।।


'हट्टीच प्रश्न सारे यांचा। विचार व्हावा,

सौख्यास वाव नांही कवितेत शोध घ्यावा'।।



भावनांची उत्कट प्रतिमा, 'लागले वेड चंद्राला' ह्या कवितेत बुचके काकांनी चांगलीच उभारली आहे.प्रेमाचे वातावरण भावनांना किती उंच भरारी देत असत, हे "दोघे नुरून गेलो, ना जाण मीपणाची" ह्या काव्यपंक्ती ने स्पष्ट होतं. आकर्षण, जवळीक आणि भावनिक ओढ व्यक्त करणारी सुंदर प्रेम कविता. 'दैवाचा दुर्विलास' कविता धरणीच्या वास्तविकतेशी सामना करून देणारी आहे. अकस्मात पत्नी वियोगाने आलेलं वैराग्य आणि काळजाला भिडणारं ज्ञान ह्या कवितेतून बुचके काकांनी व्यक्त केले आहे. त्यांनी आपल्या  शोध आनंदाचा  काव्य संग्रहात लग्न, मुंज, वाढदिवस 'कौटुंब निमित्त कविता' तसेच दिवाळी, मकरसंक्रात 'सण निमित्त कविता' ही शामिल केल्या आहे. त्यांनी आपल्या काव्य संग्रहाविषयीचे मनोगत खालील ओवी ने परिपूर्ण केले आहे-

"सकळ करणे जगदीशाचे, आणि कवित्व काय मानुशाचे,

ऐशा अप्रमाण बोलण्याचे काये घ्यावे"।।


आपल्या काव्य लेखन छंदाची जोपासना त्यांनी सेवानिवृत्ती नंतरच केली. त्या आधी ते अध्यात्मिक आणि संत साहित्याचे अभ्यासक होते. १९६० साली स्कंदपुराणातील संस्कृत भाषेतील 'गुरुगीता' चे वाचन करीत असताना, त्यांनी 'गुरुगीता' चा मराठी अनुवाद प्रारंभ केला. वर्ष १९९९ मधे गुरुगीतेवर मराठीत ओवीबद्ध 'प्रबोध चंद्रिका' चे प्रकाशन झाले.


बुचके काकांच्या ज्या कवितेच्या अंगणात आपण आहोत, ते अंगण त्यांच्या काव्य संग्रह 'शोध आनंदाचा' कवितांनी बहरलेलं आहे, म्हणून या काव्य संग्रहाची प्रस्तावना लिहिणारे नामवंत समीक्षक डॉ. दत्तात्रय दिनकर पुंडे, पुणे(महाराष्ट्र), ह्यांचे श्रद्धेय कमलाकर बुचके यांच्या एकूण व्यक्तित्वाविषयीचे मत जाणून घेणे गरजेचं आहे. ते कवी कमलाकर बुचके काकांविषयी असे लिहितात की " यांच्या एकूण व्यक्तिमत्वात जी धार्मिकतेची, पावित्र्याची अन् संस्कारमूल्यांची ओढ आहे ती त्यांच्या भाषांतरित कवितेत आणि स्वतंत्र रचनांमध्येही दिसून येते...वृत्तप्रभुत्व, शब्दार्थांचा पक्केपणा आणि रचनेचे सौष्ठव, भावनात्मक वाटता वाटता थेट आध्यात्मिक पातळीवर जाणे, ईश्वर शोध हे सारे गुण श्री कमलाकर बुचके यांच्या कवितेत अगदी नैसर्गिकपणे आढळत राहतात". 


श्रद्धेय बुचके काकांची जिवंत सुंदर मूर्ती डोळ्यासमोरून दूर होतच नाहीये! त्यांचे मुद्देसूद आणि हळुवार बोलणे ऐकणाऱ्याच्या मनाला शांत करीत असतं.



१. शोध आनंदाचा


येताच कैद झालो आलो कसा इथे मी,

पाहून या जगाला रंगात रंगलो मी।।


घेताच जन्म येथे दृष्टीस येत अर्थ,

वाटे मला हवासा जो जो दिसे पदार्थ।।


सारेच बाळहट्ट पुरवीत माय-तात,

ममतेत माखलो मी गुंगीत झोप घेत।।


थोडा वयात येता प्रश्नांत प्रश्न येती,

वैचित्र्य या जगाचे पाहून स्तब्ध होती।।


तारुण्य-पुष्प फुलता जगण्यांत ये जिव्हाळा,

अर्धांगिनीच वाटे मज सर्व सौख्य-मेळा।।


प्रेमांत गुंतलो मी वाटे इथे रमावे,

विनवून ईश्वराला व्हावे शतायु व्हावे।।


चोरून पावलां ते वार्धक्य ये समोर,

'आनंद' ज्या म्हणावे तो राहिलाच दूर।।


'आनंद' ज्यास म्हटले आभास तोच होता,

माझी मला कळाली माझीच चूक आता।।


'आनंद' त्यां म्हणावे ज्याला नसेच अंत,

'आंनद' तो मिळेना शोधून या जगात।।


दुःखास वाव नाही साम्राज्य ते सुखाचे,

हृदयांत शोधिले मी 'स्वानंद' जेथ नाचे।।


२. लागले वेड चंद्राला


खगोल सांगे आकाशीचा विस्मय

जगताला,

लागले वेड चंद्राला।।धु.।।


प्रेमाचे हा दैवत म्हणवी,

मनावरी अधिराज्य गाजवी,

शीतलतेचा, आल्हादाचा,

पुतळा नटलेला।।


सदाशिवाच्या शिरी राहतो,

गजाननाच्या भाळी रमतो,

अर्धचंद्र ही वंद्य म्हणविला,

सकलांनी पूजिला।।


अमृताचा साठा जवळी,

सौंदर्याची मूर्त आगळी,

प्रीत आंधळी पृथ्वीशी हा,

करितो कां? बावळा।।


सभोवती हा घिरट्या घाली,

असंख्य ताराश्रु हा ढाळी,

वणवण करतो झुरत अंतरी,

क्षयरोगी झाला।।


वृथाभिमानी लक्ष न देई,

मन चंद्राचे दु:खित होई,

पृथ्वीसाठी हृदय जाळतो,

रोग असा जडला।।


पृथ्वीचे मन सूर्यावर हे,

सभोवती ती धावत आहे,

प्रियाराधना वृथाच वेडी,

करिते सूर्याला।।


प्रचंड तेजे सूर्य तळपतो,

जवळी जाया कुणी न धजतो,

जवळी जाणे दग्धच होणे,

उमजेना तिजला।।


स्वतःस विसरुन वेडा झाला,

काय म्हणावे या दिवट्याला,

'तुझ्या सारखा तूंच असूनी

खूळ कसे? तुजला'।।


पृथ्वी वेडी सूर्यासाठी,

चंद्र झुरतसे पृथ्वीसाठी,

त्रिकोण प्रेमाचा हा जगती,

नैसर्गे दिधला।।


'आत्म विसर' हा दुःखच देई,

मोहाने मन ग्रासुन घेई,

आनंदाचा समुद्र हृदयीं,

जो तो हे भुलला।।


३. ओझे खांद्यावरचे


वाहुन ओझे खांद्यावरती

थकून जातो मानव जगती।।


जगी येउनी वेडा होतो

हे माझे-ते माझे म्हणतो।।


जीवित अपुले व्यर्थ वेचतो

स्वार्थ-सिद्धिला देव मानतो।।


ओझे जड हे खांद्यावरचे

वेडी माया अन् ममतेचे।।


ममता खोटी, खोटी माया

कधी न कळले मानवास या।।


जीवनभर हा कष्ट सोसतो

कष्ट झेलता थकून जातो।।


परी सुखाचा लेश मिळेना

काय वदावी याची दैना।।


कोठुन आलो? कशास आलो?

हेच कळेना, हेच वळेना।।


'आनंदाचा झरा अंतरी'

समज-उमज ती मुळीच ये ना।।


४. स्मरते मला अजूनी


तो चंद्र पौर्णिमेचा, ती रात्र चांदण्यांची

स्मरते मला अजूनी, ती ओढ भावनांची।।


रानीं रमून गेली बहरून वृक्षवल्ली

बिलगून एकमेका, प्रीतीत गुंग झाली।।


सरिता तशीच प्रेमे, लहरून धुंद होई

सिंधूस भेटण्याला, घेऊन वेग जाई।।


प्रीतीत रंगलेला, मृदु-मंद शीत वारा

रानातल्या फुलांचा, पसरीत गंध सारा।।


जग सर्व झोपलेले, ती रात्र जागलेली

रमणीय ती वनश्री, प्रेमांत गुंतलेली।।


शब्दाविना कळाले, हे गीत प्रेमिकांचे

हृदयांत हासले ते, मधु-पुष्प भावनांचे।।


स्मरते मला अजूनी, ती प्रीत त्या दिसाची

दोघे नुरून गेलो, ना जाण मीपणाची।।


५. जगाच्या पलीकडे

 

एके दिनी पहाटे, मज गाढ झोप येते

झोपेत स्वप्न येते, स्वप्नांत जाग येते।।


मी ची मला पाहता, माझे मला कळाले

माझ्याच दिव्य देही, मज पंख दोन आले।।


वाटे अता उडावे, तो ची उडून गेलो

व्योमात मी भरारी, पाहून थक्क झालो।।


तारांगणा असंख्य, तो चंद्रमा नभात

सारे बुडून गेले, त्या प्रेम सागरात।।


चंद्रा सभोवतीच, लखलखति तारका या

प्रेमार्जवा करीती, जणु काय लाजुनीया।।


तेथूनिया उडालो, अन् उंच-उंच गेलो

स्वर्गात पातलो मी, नंदनवनात आलो।।


इंद्रासनी पहा तो, देवेंद्र हा विराजे

ऐश्वर्य आणि त्याचे अमरत्व जेथ गाजे।।


सौंदर्य जेथ तेथे, खुलुनी नटे इथे हो!

देवांगना अनेक, प्रतिरूप त्या नसे हो!।।


प्रेमासि पार नाही, साम्राज्य प्रीतीचे हो!

नंदनवनात साऱ्या आनंद नांदला हो!।।


वाटे इथे रमावे, प्रीतीत धुंद व्हावे

स्वांतःसुखी नहावे, स्वानुभवी नुरावे।।


६. दैवाचा दुर्विलास


उलथून माप दारी,  येताच तूं घरात

स्वप्नांत रंगलो मी, सापेक्ष जीवनात।।


जुळशील का? इथे तूं, येताच प्रश्न चित्ती

साशंक जीव होई, वाटे मनात भीती।।


भीती क्षणात नुरते, मिटते तशीच चिंता

सिंधूस जेवि सरिता, तूं एकरूप होता।।


मिसळून तूं कुटुंबी, कर्तव्यदक्ष झाली

स्नेहे सदैव सर्वां, जिंकून गोड झाली।।


माझे मला न कळले, प्रेमांत गुंतलो मी

मधुचंद्र सोबतीचा, हृदयांत साठवी मी।।


शब्दांत वर्णवेना, तो गोडवा सुखाचा

प्रीतीत डुंबलेला, तव साथ जीवनाचा।।


या जीवनी उणे ते, काहींच भासलेना

या सौख्य-सागरीचे, पीयूष ते सरेना।।


ही पूर्व दैवयोगे, देवे दयाच केली

या सार्थ जीवनाची, प्रत्यक्ष साक्ष आली।।


सानंद गुंग होतो, केलेस काय हे तूं

टाकून गोड साथ, गेली अशी कशी तूं।।


तत्काळ तोडला तूं, संबंध या जगाचा

नाही विचार केला, क्षणमात्र मन्मनाचा।।


दुर्दैव काय माझे, माझे मला कळेना

मी एकलाच झालो, हे दुःख साहवेना।।


वाटे, इथून जावे, देवा घरी रमावे

येथे पुन्हा न यावे, तेथेच शांत व्हावे।।


७. दीप दिवाळीचे


आली दिपावळी पाजळित, हे नव नीरांजन

दीप शिखांच्या दिव्य प्रकाशी, उजळा हो! जीवन।।


करा तयारी भवितव्याची, विसरुन साऱ्या क्षति

ठेवा पाऊल पुढती, मिळवा उज्ज्वल यश कीर्ति।।


स्वतःस जाळुन जनांस देती, सौख्य प्रकाशाचे

परोपकारा करा सांगती, दीप दिवाळीचे।।


'लोक हितास्तव देह असे हा', मनोभाव हा जागवती

निःस्वार्थाचा, निस्पृहतेचा, मार्ग यशाचा प्रकाशती।।


बंधुत्वाची करा प्रतिज्ञा, सहयोगाची याच क्षणी

नमस्कारुनी दीपज्योतिला, शत्रुत्वाची बोळवणी।।


दीपमालिका ज्ञान-दीपिका, पदोपदी या स्मरण करू

परोपकारी सदा सर्वदा, जीवित अवघे खर्च करू।।


अमृतवाणी ज्ञानेशांची, मनीं भरू या निरंतर

कुठेच नाही कुणीच परके, 'हे विश्वचि माझे घर'।।


आनंदोत्सव मंगल दिन हा, सुरेख नटला दीपाने

अंधाराचा नाश जाहला, दार उघडले ज्ञानाने।।


मिळून सगळे आज करू या, 'मानवतेचा जय'

प्रकाश पर्वी करू प्रार्थना, 'तमसो मा ज्योतिर्गमय'।।


८. माणूस शोधितो मी


माणूस शोधितो मी,

माणूस तो मिळेना

घर-दार जेथे तेथे,

माणूस तो मिळेना।।


अगणीत पाठशाळा,

तो शिक्षकांचा मेळा

शोधूनिया मी आलो,

माणूस तो मिळेना।।


संस्था तशाच नाना,

'सहकार' जेथ बाणा

घुंडूनिया मी आलो,

माणूस तो मिळेना।।


तेवी चि तीर्थ-क्षेत्रे,

मनु-धर्म केंद्र सारे

पाहूनिया मी आलो,

माणूस तो मिळेना।।


माणुसकी जयाला,

'माणूस' तोचि म्हटला

धुंडाळुनी मी शिणलो,

माणूस तो मिळेना।।


एकांति एकदेशी,

शोधीत मी स्वतःसी

अंती निराश झालो,

माणूस तो मिळेना।।


९. वारा वारा वारा


वारा वारा वारा, षड् रिपु वारा

आणि येरझारा, चुकवा हो।।


रिपुंचे व्यापार, जाणा दुराचार,

दुःखांचे संभार, भोगणेचि।।


दुराचारे जाण, दूर नारायण,

जनन-मरण, वारंवार।।


थारा थारा थारा, नाही दुजा बरा,

अहो! त्या ईश्वरा, वाचोनिया।।


थाऱ्याची ही शक्ति, मुक्तिला ही मुक्ति,

ऐसी ही वेदोक्ती, जाणा जाणा।।


खरा खरा खरा, धन्य तोचि खरा,

ज्याने सर्वेश्वरा, ओळखीले।।


म्हणे 'कमलाकर', मुक्त होई नर,

थारा हाचि थोर, पावोनीया।।


१०. ब्रम्हांडीचे गुज


पृथ्वी ही मनुजा! तुला शिकविते, तूं शांत राही सदा,

साहूनी निज-धर्मभार अवघा, सोशीत जा आपदा।।

राही तूं गतिशील शीतल असा, पाणी जसे भूतली,

मार्गाचा अवरोध, झुंज त्यजुनी, तूं वाट शोधी भली।।


अग्नी हा तुजला पहा शिकवितो, तेजस्विता मेळवी,

तेजाने आपुल्या सदैव सकला, तू रे! गड्या! दीपवी।।

अग्नीला मिळताच रे, बघ जरा, तो आपलासा करी,

तेजोहीन असून तेज झळके, त्यां कोळशाचे वरी।।


तेजाने आपुल्या असेच करणे, साऱ्या जनां उन्नत,

हेची ध्येय पदोपदीच असणे, हे जीवनी अमृत।।

वारा हा तुजला तसेच शिकवी, 'सातत्य' या जीवनी,

होऊनी गतिवान चाल पुढती, थांबू नको कुंठुनी।।


आकाशी बघ रे! कसे विलसती, ही चंद्र-तारागण,

सर्वांना वसवी विशाल नभ हे, सांडूनिया मीपण।।

होइ रे! मनुजा! विशाल हृदयी, सोडून संकीर्णता,

ब्रम्हांडीगुज हे असे उमटले जाणून घे तत्त्वता।।


संकलन : विजय नरसिंह जोशी



                                                           (०५ नवंबर १९३३ – १८ सप्टेंबर २०२५) "सोनेरी पान" हा सोहळा आपण ग्वाल्हेरच...