Friday, July 15, 2022

 


अनंत पोतदार 

(८ नोव्हेंबर १९२४- ८ ऑगस्ट २००८)


मागील पिढीतील साहित्याच्या जाणकारांसाठी अनंत पोतदार हे नाव अनोळखी नाही. अनंत पोतदार यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९२४ रोजी पेटलावद (जिल्हा झाबुआ) येथे झाला.ते  इंग्रजीत एम. ए. होते आणि पुढे प्राचार्य पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतर ते इंदुरास स्थायिक झाले. त्यांचा  काळ फारसं आगळं वेगळं लिहिण्याचा काळ नव्हता, पण अनंत पोतदार यांच्या कवितेत नव्या जुन्याचा  मिलाफ प्रकर्षाने जाणवतो. आज पासून आपण त्यांच्या कविता वाचू या. 

अनंत पोतदार अनेकार्थी भाग्यवान होते. ह्या संदर्भात त्यांच्याबद्दल एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटते की महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे अनंत पोतदार ह्यांचे चुलते होते. बडोद्याचे व्यासंगी विद्वान आणि कवी ना. बा. पुराणिक, इंदूरचे राजकवी रा. अ. काळेले हे त्यांचे आप्त होते. पेटलावद या आंबराईच्या निसर्गरम्य गावी नदीकाठी त्यांचे बालपण गेले आणि ते पुढे त्यांच्या काव्यातील निसर्ग वर्णनात दिसून येतो. 

अनंत पोतदार इंदूर येथील महाराष्ट्र साहित्य सभेत खूप सक्रीय होते. ते संस्थेच्या अध्यक्षपदी असताना अनेक दर्जेदार कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य सभेत झाले. नव्याने धडपडत असलेल्या कवी मंडळींसाठी ते एक आशेचे स्थान होते. नवोदितांना पुढे आणण्यासाठी  त्यांचा नेहमीच आग्रह असायचा. म. प्र. मराठी साहित्य संघाच्या स्थापनेत त्यांचा फार मोठा वाटा होता. त्यांच्या कवितेत देशाभिमान, संस्कृतीप्रेम, निस्पृहता, स्पष्टोक्ती, निर्भिकता वगैरे त्यांच्या स्वभावातील गुणधर्म दिसून येतात. 

प्रकाशित साहित्य : 

(१) अहिल्या गीत -१९७७ 
(२) इन्द्रधनुष्य ( काव्य संग्रह ) -१९८३ 
(३) आहुति ( खण्ड काव्य ) १९९५  
     १८५७ च्या प्रथम स्वातंत्र्यसंग्रामावर आधारित काव्य. इन्दूर विश्वविद्यालयाच्या बी.ए.(मराठी) पाठ्यक्रमात  
     समाविष्ट  
(४) माळव्यातील मराठी कविता (उन्मेष आणि विकास सन् १८७३-२०००) 
    महाराष्ट्र राज्य स्तरीय ' तुका म्हणे ' पुरस्कार प्राप्त . 
(५) उत्तरा ( काव्यसंग्रह ) 

वैचारिक प्रबोधन : 
पन्नासहून अधिक लेख निबंध प्रसिद्द / आकाशवाणीच्या  वार्ता कार्यक्रमात समाविष्ट  
ज्येष्ठ साहित्यिक  विंदा करन्दीकर व शरदचन्द्र मुक्तिबोध  यांच्या साहित्यिक योगदानावर मध्यप्रदेश राज्य अकादमीतर्फे शोध पत्र वाचन

सन्मान/पुरस्कार : 
७४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात विशिष्ट साहित्यिक सत्कार 
बृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली द्वारा सत्कार 
 पं. भारत सरकार द्वारा फिज़िकल एफिशियंसी ड्राइव व जनगणना प्रशस्ती सन्मान 
अखिल भारतीय मराठी साहित्य  संमेलनात अनेकवेळा  आमंत्रित कवि - परिसंवाद चर्चेत सहभाग ,आकाशवाणीवर वार्ता - काव्यपाठ ,

अनंत पोतदार यांच्या पहिल्या काव्य संग्रहाच्या प्रकाशनानंतर कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज म्हणाले होते --अनंत पोतदार यांचा या प्रांतातील अनुभव मोठा आहे .कवितेचे स्वरूप प्रगल्भ ,अभिजाताची बैठक असलेले आणि सुबोध आहे . विविध भावनांचा,विचारांचा आविष्कार हृद्य आहे . 
राजकवी यशवंत यांनी अभिप्राय व्यक्त करतांना म्हटले होते की  या काव्य संग्रहाला इन्द्रधनुष्याचे शिरस्त्राणच जणू चढविले आहे . 
मध्यप्रदेशीय ज्येष्ठ समीक्षक के . ना . डांगे म्हणाले होते- ' या कविता पाहून कवी बी , ना . वा . टिळक , बालकवी , चन्द्रशेखर यांची आठवण होते . 
राजकवी रा अ . काळेले यांनी लिहिले - 'अनुभूति, अभिव्यक्ती, सौंदर्यासक्ती व विलोभनीयता यामुळे अनंत पोतदार लक्षात  राहतात . 
राजकवी गोविन्द झोकरकर म्हणतात -- पोतदारांच्या कवितेचे क्षितिज व्यापक,भावना उद्दीपीत व सौंदर्यासक्त असून निसर्ग,समाज,स्वातंत्र्य यांना त्यांची लेखणी नव्या दृष्टिकोणातून विशद करते .

अनंत पोतदारांचा कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोणच महत्वपूर्ण वाटतो . त्यांनी स्वत: आपल्या कवितेबद्दल लिहिले होते - जीवनात जे जे सुन्दर , उदात्त , उन्नत अनुभवाला आले , कडवट आणि गोड अनुभव , त्यांना मी प्रांजळपणे व्यक्त करीत आलो आहे . यथार्थ दिसतो व व्यक्त होतो , पण गलिच्छपणा किंवा ओंगळपणा मात्र मला शिवलेला नाही . परिस्थिति अनुकूल प्रतिकूल खूप पाहिली तरी आनन्दमात्र वाढतच गेला . तो अद्याप पूर्ववत् रम्य आहे . ' ही त्यांची काव्यदृष्टि त्यांच्या कवितांना न्याय देते . जसा माळव्याच्या मातीचा सुगंध अनेक कवींना बेभान करतो तसा माळव्यात जन्मलेल्या पोतदारांनाही माळवी मातीच्या अंतरंगातील लेण्यांची कलात्मकता शब्दांकित करण्याचा मोह आवरता येत नाही . ते म्हणतात

माझ्या माळवी मातीचा 
लावू कपाळास टिळा 
स्वस्तिवाचन करिती 
इथे रानातल्या शिळा 

मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. अनिल गजभिये यांनी पोतदारांच्या ''उत्तरा'' काव्यसंग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे की कवितेतील जुन्या आणि नव्या वळणांचे स्वागतकर्ते म्हणून अनन्त पोतदारांचे स्थान निश्चितच मानाचे आहे . त्यांची कविता भावगीतात्मकता , कथात्मकता , सौंदर्ययुक्तता , सामाजिकता , मुक्तछन्दातील नवीनता , जीवनोपासकता या गुणांनी युक्त आहेत.कवितेच्या आधुनिक प्रकाराचे नावीन्य आणि छंदोबद्ध काव्यातील कला सौंदर्य यांचा सुरेख संगम त्यांच्या कवितांमध्ये दिसून येतो. अनंत पोतदार केवळ मध्यप्रदेशीय मराठी कवी आहेत म्हणून कुठे उणे आहेत असे समजण्याचे धाडस समीक्षकांनी करू . महाराष्ट्राच्या कवी परंपरेत अनंत पोतदार यांचे स्थान अटळ राहील अशी शाश्वती वाटते. 

माझे गीत समर्पित त्यांना !

दुःखाचे आगीचे गोळे 
झेलून ज्यांचे चित्त पोळले 
परि प्रसन्नमुख अंतर ओले 
अनुताप न कधी शिवला ज्यांना 
माझे गीत समर्पित त्यांना !

सप्तसुरांची लाउनि संगत 
दीपराग जे आर्त आळवित 
घनांधकारी प्रकाश उजळित 
देती गती अगतिक पथिकांना
माझे गीत समर्पित त्यांना !

सदा साधिले ज्यांनी जनहित 
केले मानवतेस विभूषित 
परी बहिष्कृत सदा तिरस्कृत 
लाभली न ज्यांना मानवंदना
माझे गीत समर्पित त्यांना !

निराश्रितांना उपेक्षितांना 
देतो स्वर दुबळ्या दलितांना 
जीर्ण जाळिती आणि स्थापिति 
नवीन मूल्ये नव प्रतिभांना
माझे गीत समर्पित त्यांना !

 रूप,रंग रस, गंध निर्मिती 
निळ्या नभावर अक्षर लिहिती 
सूर्य, चंद्र ज्या नित्य वाचती 
अर्थ नवा देती शब्दांना
माझे गीत समर्पित त्यांना !

मागणे (जाति रसना)

सोने न मागतो मी नाणे न मागतो मी 
देशात आज माझ्या ईमान मागतो मी 

शस्त्रें न मागतो मी शास्त्रे न मागतो मी 
उंचावल्या   मनाचा माणूस मागतो मी 

या कागदी जगाच्या कल्याण कल्पनांना 
दृष्टीत   योजकांच्या  अंदाज मागतो मी 

हे फोल बोल सारे आकाश चुंबनाचे 
शब्दासवें कृतींचे सामर्थ्य मागतो मी 

गर्दीत  डुंबलेले  हे   राजमार्ग सारे 
देईल वाट त्याची ही वाट पाहतो मी

फुलली कळी

फुलली कोमल कळी सखे गs फुलली कोमल कळी ! 
नयनमनोहर 
कुणी क्षितिजावर 
काढी रंगावली 
सखे गs फुलली कोमल कळी ! 

गंध दरवळे 
लगबग आले 
गुंग्ङत गाणी आली 
सखे गs फुलली कोमल कळी ! 

थांबू कुठवर 
होत अनावर 
हुरहुर ह्रदयातली 
सखे गs फुलली कोमल कळी ! 

उमलणार परि 
तुझी कधीतरी 
मीलित मानसकळी
सखे गs फुलली कोमल कळी ! 
 
बघुनी एकला 
हसती या मला 
शेवंती कर्दळी 
सखे गs फुलली कोमल कळी ! 

विसरुनी 'मीपण' 
मिळूनी आपण 
सेवूं परागांजली 
सखे गs फुलली कोमल कळी ! 

दिशा दिशा नित 
करू सुगंधित 
जीवन कुंजातली
सखे गs फुलली कोमल कळी ! 
१९४९

 जीवनयात्रा (जीवनलहरी)

सरला मधु मंदानिल भृंगाचा गुंजारव 
लोपलाच अन् सरले संध्येचे क्षणवैभव 

मेघांनी व्यापियले सारे हे गगनांगण 
पुनवेची रम्य रात परि न दिसे चंद्रकिरण 

शुक्राच्या चांदणीस बघुनी मनी फुलली आस 
निमिषार्धे  परि विरली अन् उरला दिव्य भास 

अन असाच झाला तो मम सुधांशु दृष्टीआड
ढासळुनी धैर्य ध्येय कोसळले काड काड 

रात्र दीर्घ अंधारी संपेना हो लांबण 
चालणार कुठवर ही कंटकमय पथि वण वण

आशेची अमरज्योत परि सतेज ह्रदि तेवत
सांगे मज पाहण्यास स्मितवदना सुप्रभात 

क्षण गमले लोपुनिया अंधारी दीर्घ निशा 
उजळिल मम जीवनपथ लगबगुनी रम्य उषा 

मेघांनी व्यापियले सारे हे गगनांगण 
अन् मजला नच कळले हंत! उषा आगमन
१९४६

वध:स्तंभावर (भूपतिवैभव द्राक्षकन्या) 

( ही कविता अनंत पोतदार यांच्या "आहुती" या खंडकाव्यातून घेतलेली आहे. अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्य समरानंतर तात्या टोपे यांना फाशी दिली गेली. त्याआधी न्यायदानाचे जे नाटक घडले त्या वेळेस तात्यांनी जी जबानी दिली आणि त्या नंतरचे हे वर्णन आहे. कविता बरीच मोठी आहे त्यातले काहीच अंश येथे देत आहे.)

स्वर उंचावून अन करून ताठर मान 
सेनानी  तात्या  बोले  धैर्यनिधान 
जे केले मी - ते केले देशासाठी 
केल्याचा मजला अजुनिया अभिमान

नच न्याय मागण्या आलो तुमचे पाशी 
तुम्हीच आणिले घालून घातक पाशीं 
कां अवडंबर हे न्यायाचे माजविता 
सर्वांना ठावे न्याय आपुला फाशी

कां विलंब करिता - प्रश्न टाकिता कसले 
कां बघता क्रोधे करून मुख धसफुसले 
'मालूम नहीं- मालूम नहीं कुछ हमको' 
हे  एकच  उत्तर  तात्याने  त्या दिधले

वीरोचित मरणें  हर्ष फार मज आज 
मातेस्तव केले काज न त्याची लाज 
कधीही न मला हो झाला इतुका हर्ष 
जो आज होतसे करि जीवन आदर्श

टाकला गळ्यामधि स्वयं हासत फन्दा 
तो   देशभक्त    सेनानी   भारत बन्दा 
चालला विजेपरि सोडुनिया इहलोक 
आलोके  दिपवुन  सेवाया  स्वलोक

मृतदेह तयाचा हळूच आला खाली 
उमटली नभाच्या अपूर्व गाली लाली
लाभले रत्न बहुमोल म्हणून नभिं हर्ष 
जन्म भूवर म्हणती - हे जीवन आदर्श

गेला जरि तात्या गेली जरि ती राणी 
ते नाना आणि कुंवर अमर सेनानी 
सम्राट दिल्लीचा आणिक मंगल पांडे 
तरी अजुनी चेतना देती समर कहाणी 

आहुति जयांनी दिधली या यज्ञात 
नित्य प्रात:काळी गावे त्यांचे गीत 
वृत्त मानसात चैतन्य उफाळून यावे 
सहवासी त्यांच्या जीवन उजळून जावे 

राणी -- राणी लक्ष्मीबाई, नाना -- नानासाहेब पेशवा, कुंवर आणि अमर -- बिहारचे कुंवरसिंह व अमरसिंह, सम्राट दिल्लीचा -- बहादुरशाह जफ़र

विज्ञापना (जाती परिलीना)

मेघांनो गडगडाट  मुळि न करा आता 
दुखवा नच बाळाच्या इवल्याच्या चित्ता 

चपले तू बघू नकोस सोनुल्यास माझ्या 
कुणी कुणास सांगावी दृष्टीची माया 

घुबडा घूत्कार पुरे जागवी न बाळा 
काय नशिबी तुझिया अंधारच काळा 

वाऱ्या तू इथूनि  कसे सत्वर कर काळे 
भिरभिरती तुज बघुनी छकुल्याचे डोळे 

खळखळ मुळी करू नकोस गे सरिता माई 
झोप तान्हुल्याची मम भंगूनिया जाई 

निर्झर तू गात रहा गीत असे गोड 
अंगाई गीता मम दे अशीच जोड 

पुष्पांनो  मधु सुगंध दर्वळु द्या आता 
काय लाभ तुमचा मग इष्ट घटी जाता 

काजव्या न पाजळ निज क्षण अंधुक तेजा 
उजळिल गृह कुळदीपक हा सतेज माझा

 माझा बाळ 

माझ्या बाळाचं जावळ उडताहे भुरू भुरू 
कसा चाले तुरूतुरू बाळ माझा 

माझ्या बाळाचं हासणं जसं कळ्यांचा फुलणं 
शुक्लपक्षीचं चांदणं कार्तिकाचं 

माझ्या बाळाचं खेळणं खळखळ ओहळाची  
ह्रदी आंदोळत  वीची आनंदाच्या 

माझ्या बाळाचं बोलणं किलबिल पाखराची 
बाई आरास सुखाची बाळ माझा 

माझ्या बाळाचा ग राग पाण्यावरचा तरंग 
जसे नभी सप्तरंग वर्षाकाळी 

जीव इवलासा पण फार खोडसाळ बाई 
नको आणू शेजीबाई गा-हाणी गं 

माझ्या डोळ्याचा प्रकाश माझा जीवन विकास 
माझा श्वास नि  उच्छवास  बाळ माझा

गर्दी आणि एकान्त 

रानामाळातून दऱ्याखोऱ्यातून फिरताना
जाणीव कधीच झाली नाहीं 
एकलेपणाची 
चढण उतारावर 
उन्हात आणि सावलीत 
साथ मिळाली 
वनचरांची वृक्षवल्लरींची 
वनवासी कलन्दरांची 
सख्ख्या आपुलकीच्या जिवलगांसारखी 
स्निग्धतेत ताप कधीच जाणवला नाही 
पण या प्रचण्ड गर्दीच्या शहरातून फिरताना 
माणसालाही असंख्य माणसात 
एकाकीपण सारखे बोचते - टोचते 
कारण माणूस माणसाकडे 
माणसासारखा बघायला तयार नाही .

प्रकाश पूजा 

वेदना येथे तुझ्या सांगू नको
फत्तराला व्यर्थ तू वन्दू नको  

शेन्दरांनी माखलेले सोंग हे
मार्ग सौख्याचा इथे शोधू नको 

येथ नाही चेतना संवेदना 
फत्तरावर मस्तका ठेवू नको 

सूर्य आकाशातला बान्धून घे 
हे रसायन जागते सोडू नको  

ज्योतिने ज्योतीस तू फुलवीत जा 
अंधकाराची कथा सांगू नको 

बांध पूजा तू प्रकाशाची सदा 
सौख्य येते चालुनी विसरू नको .

ध्येयाची फुलवात

कुठून झंझावात सुटे हा कुठून झंझावात !

सुदूर मागे उषा राहिली 
संध्या दूरच कुणी पाहिली 
मध्येच जीवन चाकी अडली 
कधीतरी सरणार रूक्ष नी अनोळखी ही वाट !

उठले भीषण वादळ भवति 
पाने वाऱ्यावर थरथरती 
स्तंभ धुळीचे गिरक्या घेतो 
अवसेचा अंधार भरे जणू मध्यांन्ही या दाट !

उंच उंच नी विशाल तरुवर 
मुळापासुनी उमळूनि भरभर 
काडकाड कोसळती भूवर 
कुठे दूरवर करी गर्जना दरिया क्षुब्ध अफाट !

जीव तृषेने हो अति व्याकुळ 
क्षणाक्षणाला वाढे तळमळ 
मिळेल कोठुनी ओंजळभर जळ 
सरितेचे अस्पष्ट शब्द जरि घुमती या रानात !

मध्यावर ये जीवन नाटक 
नेत्र बावरे बघती टकमक  
देखावा एखादा  मोहक 
दिसेल का जो रिझविल क्षणभर मनास या अंकात !

वण् वण् फिरुनी धैर्य ढासळुनि 
शिणली गात्रे  जरी ठेचाळुनी 
आशा दीपक मंद जीवनी 
वाट तमोमय माझी उजळिल ध्येयाची फुलवात !

(मंदार)

ज्ञानदेवांच्या समाधीपाशी 

पांग डोळ्याचे फुटले 
आज पाहिली आळंदी 
इंद्रायणीच्या काठी 
ज्ञानदेवांची समाधी 

माय मराठीच्या पुत्रां 
हेच अस्मितेचे स्त्रोत 
योगी भाविक भक्तांना 
वेद वेदांताची ज्योत 

मोरपंखी अक्षरांचा 
छान रेशमी फुलोरा 
विश्व अवघे सामावे 
असा न्यारा हा निवारा 

जसा फुलाचा सुगंध 
वारा दूर दूर नेई 
एका जनार्दनी झाली 
फार मोठी ही पुण्याई 

तत्त्व,ज्ञान भक्ती मुक्ती 
वाहे रसाळ ही वाणी 
प्रतिभेत झळकती 
दिव्य सोनियाच्या खाणी 

अमृतातें जिंकणारी 
रसवंती वाहताहे 
माझ्या मायमराठीचा 
ध्वज सदा उंच राहे 

माथा चरणी टेकिला 
भावे करितो वंदन 
आशीर्वचे उजळावे 
अज्ञानाचे हे जीवन.

भेटता तू (गझल)

भेटता तू सूर माझा भेटला 
मोरपंखाचा जिव्हाळा भेटला 
चंदनाला गंध आला केशरी 
भेटता तू नूर माझा भेटला 

मंद श्वासांना मिळाली चेतना 
मैफिलीला रंग उमदा भेटला 
आसवांची ती कहाणी संपली 
सागरा त्याचा किनारा भेटला 

ये जरी सर्वत्र अंधारून हे 
वादळी वाऱ्यात रस्ता भेटला 
रातराणीला आता कळवून द्या 
चोरलेला गंध माझा भेटला.

माझा माळवा 

जशी दुधामधे साय 
जसे सायी मधे लोणी  
माझ्या मालवी मातीच्या 
तशी अंतरंगी लेणी ॥१ ॥ 

इथे लोभस पहाट  
रात गोंडस जावळी  
रूद्र महांकाळ नान्दे  
ओंकारही घाटाखाली ॥२ ॥ 

विक्रमाचे न्यायासन  
फुलवीतो क्षिप्रातट  
इथे संस्कृता शेजारी  
असे प्राकृताचा थाट ॥३ ॥ 

राजप्रासादी दर्वळे  
श्रृंगाराचा रतिरंग  
भर्तृहरीच्या गुहेत  
आर्त वैराग्य तरंग ॥४ ॥ 

सांदीपनीच्या आश्रमी  
इथे गवळयाच्या पोर  
घेता सयुक्तिक ज्ञान  
झाला योगेश्वर थोर ॥५ ॥ 

नांदे पुण्याई अजून 
आसमंती अहिल्येची 
नसे जाणवली कोणा 
वाण कधीच कशाची ॥६ ॥

ऊस हरभरा गव्हास
शेतामधे आला ऊत
डाळ - बाफळ्यांची चव 
देई पक्वांनाही मात ।। ७ ।।

गर्द आंबराई मधे 
आर्त कोकिळकूजन 
येता आषाढाचे मेघ 
छान मयूर नर्तन ॥८ ॥

शब्द स्वर रस गंध 
इथे भावना उत्कट 
माय मराठीचे येथे 
वोसंडले मधुधट ॥९ ॥

हीच माती देई जगा 
मेघदूत शाकुंतल 
ज्ञान भक्ति मुक्ति यांचे 
पैलतीरी जाया तळ ॥१० ॥ 

माझ्या माळवी मातीचा 
लावू कपाळास टिळा 
स्वस्तिवाचन करिती 
इथे रानातल्या शिळा ॥११ ॥ 

अशा मातीच्या कणाशी 
वाटे एकरूप व्हावे 
जन्म घ्यायचा असेल 
तरी इथेच जन्मावे ॥१२ ॥

पौर्णिमेची रात्र 

पौर्णिमेची रात्र आता संपली 
मैफिलीची बात आता संपली 

काजळी अंधार दाटे या पुढे
जावळी नक्षत्रगाणी आता संपली 

हे दिखाऊ बोलणे अन् वागणे 
रेशमी जवळीक आता संपली 

बन्द दारे, हाक देऊ मी कुणा 
साथ शेजारीपणाची आता संपली 

वेगवेडी वाहने रस्त्यावरी 
वाट पायी चालण्याची आता संपली 

वीज जाते सारखी शहरात या 
रोशनाईची आस आता संपली 

नीतिमत्तेचे कशाला भाष्य हे 
ती इमानी लोकदृष्टि आता संपली 

स्वैरता स्वच्छंदता चोहीकडे 
मानमर्यादा जनातिल आता संपली 

ही गति प्रगती म्हणा की दुर्गती 
सद्गतीची वाट वाटे आता संपली 

दुःख तू वेड्या मना मानू नको 
पाहिलेली तू व्यवस्था आता संपली 

संकलन : अलकनंदा साने 

Tuesday, June 14, 2022

 



वसंत राशिनकर 

( १२ जुलै १९३० - ७ जानेवारी २०१५) 


 कोण होते वसंतराव राशिनकर ? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणून  एक सर्वसाधारण माहिती अशी सांगता येईल की वसंतराव राशिनकर यांचा जन्म १२ जुलै १९३० रोजी उज्जैन येथे झाला आणि ७ जानेवारी २०१५ला  इंदौर येथे निधन झाले, पण वसंतराव राशिनकर  साधारण माणूस  नव्हते हे त्यांची ८५ वर्षांची कारकीर्द पाहिल्या नंतर सहजच लक्षात येते.खरं तर जो माणूस जन्माला येतो तो त्याला मिळालेलं  आयुष्य आपल्या परीने जगतोच, पण महत्वाचं असतं ते हे की तो कसा जगला. 


एका सामान्य माणसाच्या आयुष्याचा एक मोठा भाग 'रोजी-रोटी' साठी वणवण फिरण्यात खर्ची पडतो.तो काळ त्यांचाही तसाच गेला, पण त्या दरम्यान सुद्धा त्यांची कलेची उपासना, साहित्याची आराधना चालूच राहिली. एकीकडे काबाडकष्ट करून  ते आपल्या मुलांना घडवीत होते, तर दुसरीकडे हात  रंगवून मातीच्या गोळ्यांना आकार देत होते.जमिनीवर पाय असलेल्या ह्या माणसाची नजर आकाशाकडे असायची पण हात मातीत गुंतलेले असायचे आणि जेंव्हा ते  पाण्याने स्वच्छ व्हायचे, तेंव्हा ह्या  हातांमध्ये लेखणी असायची. सच्च्या दिलाचा हा माणूस खऱ्या अर्थाने शारदोपासक होता आणि आपल्या परिसरात 'वसंत' फुलवीत होता.


 वसंतराव राशिनकर, फक्त माझ्यासारख्या त्यांच्याहून सर्वच बाबतीत  लहान असलेल्यांसाठीच ''अप्पा'' नव्हते, तर त्यांचे समवयस्क, समकालीन अशा सर्वच मंडळींचे ते अत्यंत प्रिय आणि लाडके होते. सहसा असे दृश्य दिसत नाही. एखादी व्यक्ती जेंव्हा जनप्रिय असते, तेंव्हा समकालीन व्यक्तींच्या पोटात नेमका शूळ उत्पन्न होतो. अप्पांशी बोलताना कधीही हे जाणवायचं नाही की त्यांनी मराठी,हिंदी,इंग्रजी अशा एकूण तीन भाषांमध्ये एम.ए.ची डिग्री मिळविली आहे. अत्यंत निगर्वी वृत्ती. म्हणतात न ज्या झाडाला जास्त फळ असतात, ते झाड वाकलेलं असतं.अप्पा त्याचे प्रत्यक्ष उदाहरण होते. 


तीन विषयात प्राविण्य मिळविणं कमी वाटलं म्हणून त्यांनी एम.एड केलं, साहित्यालंकार ही उपाधी मिळवली आणि एव्हढ्यावरच ते थांबले नाही तर ज्योतिष शिकले,वायरलेस इंजिनियरचा कोर्स केला,रेडिओ टेक्निशिअनचा डिप्लोमा घेतला. ज्ञानार्जनाची  एक अदम्य लालसा त्यांच्यात होती. नंतर ते खेळांकडे वळले.पोहायला शिकले, बैडमिंटन  शिकले,टेबल टेनिस मध्ये प्राविण्य मिळविले  आणि बुद्धिबळात चेम्पियनशिप पटकावली.इतकंच नाही तर ट्रक आणि बस चालविणं सुद्धा ते शिकले होते.हे सर्व करत असतानाच स्वकष्टाने साधारण शिक्षक ते व्याख्याता एव्हढा मोठा पल्ला गाठला, पण एकदाही कधी त्याचा उच्चार केल्याचे आठवत नाही. अप्पांचे वडील, ज्यांना आम्ही भैयासाहेब म्हणत असू, पोलिस अधिकारी होते, तरी घरात कडक शिस्तीचे नव्हे तर प्रेमाचे   वातावरण होते. आजीच्या प्रेमळ सहवासात वसंतरावांचे रोप फुलले आणि नकळत कविता फुटली,उमलली, बहरली. 


सन १९४८ मध्ये इंदौरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवात अध्यक्ष म्हणून लब्ध प्रतिष्ठित साहित्यिक वि.स. खांडेकर होते. त्यांना मांडव बघायला जायचे होते.त्याच दरम्यान धारच्या आनंद कॉलेज मध्ये त्यांचे व्याख्यान आणि सोबत स्थानिक साहित्यिकांचे कवी संमेलन करायचे ठरले. अप्पांचे वडील,भैयासाहेब तेंव्हा धारलाच पोलिस अधिकारी होते. उत्सव समितीचे सचिव, ज्येष्ठ कवी अनंत पोतदार त्यांना भेटायला गेले, तेंव्हा अप्पांनी पोतदारांना आपल्या कविता दाखविल्या.त्यांना त्या खूप आवडल्या व ते कवितांची वही खांडेकरांना दाखवायला घेऊन गेले.कविता वाचून खांडेकर म्हणाले-- ह्या मुलालाही कवी संमेलनात कविता सादर करायला बोलवा. अठरा वर्षाच्या एका कोवळ्या वयाच्या तरुणाला खांडेकरासारख्या दिग्गज साहित्यिकाची जी थाप पाठीवर मिळाली,ती एक प्रकारे वरदानच ठरली आणि हळू हळू अप्पांच्या कवितेचा वेलू गगनावरी पोहचला. ह्या वेलीवर नंतर तीन कविता संग्रह आणि एक सीडी अशी फुलं बहरली.अप्पा आपल्या हास्य आणि विनोदी कवितांमुळे लोकप्रिय होते.त्यांच्या या कवितांमध्ये उपरोध सुद्धा जाणवायचा,पण त्यांचे काव्य संग्रह  वाचताना हे सहजच लक्षात येतं की अशा हल्क्या-फुल्क्या कवितांपेक्षा जास्त कविता त्यांनी वैचारिक आणि भावनिक ताकदीच्या लिहिल्या आहेत. 


राजेंद्रनगर, इंदौर येथील राशिनकरांच्या घरात प्रवेश करावा तर गेल्या गेल्या समोरच भव्य अशी साईबाबाची  मूर्ती दिसते आणि मग जागोजागी,खाली वर सगळीकडे अप्पांच्या हातांची करामात पाह्यला मिळते .सुरवातीला ते मातीच्या मूर्ती बनवत असत ,नंतर त्यांनी प्लास्टर ऑफ पेरिस आणि लाकडाच्या मूर्ती देखील बनविल्या.शिवाजी महाराज,देवी अहल्या, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी,इंदिरा गांधी, गजानन महाराज यांच्या एका पेक्षा एक सुरेख प्रतिमा त्यांनी घडविल्या.खरं तर कविता आणि मूर्तीकला ह्यांच्या आधारानं त्यांना  नोकरी  नंतरच  आयुष्य सहज काढता  आलं असतं. ह्या भरभक्कम संपत्तीच्या बळावर अप्पांना निर्वेध जगता आलं असतं पण असं शांत जगले असते तर ते 'जगत अप्पा' झाले नसते.


सन १९८९ मध्ये सेवानिवृत्ती नंतर ते इंदौरला आले आणि राजेंद्रनगर ही त्यांनी आपली कर्मभूमी निश्चित करून ''आपले वाचनालय'' सारखी एक अप्रतिम संस्था स्थापित केली.४ मार्च १९८९ रोजी  कुटुंबियांच्या मदतीने सुरु झालेलं ''आपले वाचनालय'' हळू हळू ३०० सदस्यांच्या आकड्या पर्यंत पोहचलं  आणि पाहता पाहता पुस्तकांची संख्या ५०००च्या वर गेली.ह्या पुस्तक खरेदीसाठी त्यांनी स्वत:ची पदरमोड करून हजारो रुपये खर्च केले, पण वाचनालयातून होणारी प्राप्ती मात्र निराश्रित वृद्धांसाठी खर्च केली.संस्थेच्या नावात जरी वाचनालय असलं तरी, ही संस्था नुसते वाचनालय कधीच राहिली नाही.''आपले वाचनालय''  म्हणजे जणू अप्पांच्या व्यक्तिमत्वाची प्रती:छाया. अप्पांच्या व्यक्तिमत्वाचे  जसे  अनेक पैलू होते तसेच ह्या संस्थेचे देखील त्यांनी अनेक पैलू पाडले.बाल नाट्य शिबीर, एकांकिका स्पर्धा, कवी सम्मेलन,व्याख्यानं, इतकंच नाही तर बृहन महाराष्ट्र मंडळाचे परीक्षा केंद्र सुद्धा इथे स्थापित झाले.  ''आपले वाचनालय'' काय आणि किती अंगांनी बहरलं होतं.आपले वाचनालयाला लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळायला लागला तेंव्हा अप्पांनी त्याचे स्वरूप अजून वाढीस नेले.''आपले वाचनालय साहित्य एवं संस्कृती केंद्र'' असे नाव देऊन त्याचा परीघ वाढवला.१९९३ साली तेथे संगीत साधना केंद्राची स्थापना केली आणि पुढे दरवर्षी अनेक विषय घेऊन ग्रीष्मकालीन शिबिरं भरविली.या शिबिरांमध्ये संगीत,चित्रकला,योगासनं, कराटे बरोबरच संस्कार शिबीर पण भरवले जायचे.


गाठीशी गडगंज पैसा असला तरी दात कोरणारे अनेक लोक आपण आपल्या आजू बाजूला  बघतो, पण अप्पांनी आपल्या आयुष्यभराची कमाई म्हणजे भविष्य निर्वाह निधी खर्च करून घराच्या गच्चीवर सर्व सोयींनी युक्त असा एक हॉल बांधला आणि इतकंच नाही तर  तेथेच एक खोली पण बांधली, जेणे करून बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांना तेथेच थांबता यावे.घराच्या गच्चीवर बांधलेला हॉल असा कितीसा मोठा असणार ? पण १९९६ मध्ये जेंव्हा अप्पांनी याच हॉल मध्ये एकांकिका स्पर्धा करायचे ठरवले तेंव्हा तब्बल ८० एकांकिका तेथे सादर झाल्या.अप्पांची हाक ही अशीच  असायची.अगदी मनापासून,तळमळीने दिलेली हाक.हा सर्व खटाटोप करण्या मागे त्यांची एकच भावना होती की ज्या समाजाकडून आपण अनेक गोष्टी शिकतो, त्या समाजाच्या उत्कर्ष आणि उन्मेषासाठी आपण झटायला पाहिजे.समाजाचे ऋण फेडायला पाहिजे.त्यांनी आयुष्यभर मराठी भाषा,संस्कृती आणि बाणा जपण्यासाठी अविरत श्रम घेतले.


एकूण साहित्यिक प्रवास :  

वसंत ,अमृत, श्रीयुत,गावकरी, वाङ्ग्मयशोभा , बहुश्रुत, स्त्री,श्री सर्वोत्तम इत्यादि वर्तमान नियतकालिकातून , पत्र व काव्य , स्फूटलेख ह्यांची नियमित प्रसिद्धि . अनेक हिन्दी कवितांचे अ . भा . हिन्दी काव्य संग्रहात प्रकाशन . 

 काव्य संग्रह : वेदना ( 1975 ) , परिध ( 1990 ) आणि तेंव्हा सूर्य पण लाल होता ( 2005 )


पुरस्कार / सम्मान :


बृ . म . मंडळ नवी दिल्ली तर्फे दिल्ली येथे विशिष्ठ गुणीजन सन्मान  

मुंबई मराठी संग्रहालया द्वारे देण्यात येणारा प्रतिष्ठित गाडगीळ पुरस्कार 

 मुंबई येथिल सिरॉक इंडिया नेशनल अवार्ड चे मानकरी  

आपले वाचनालय ( साहित्य , कला , संस्कृति केन्द्र ) ह्या संस्थेला जयपुर येथे बृहन्महाराष्ट्रातिल सर्वोत्कृष्ठ संस्थेचा मान व पुरस्कार 

 पूर्व केन्द्रिय मंत्री आणि सांसद मा . सुमित्रा महाजन यांच्या हस्ते  जीवन गौरव पुरस्कार ' संस्कृति सेवा अमृत सम्मान ' प्रदत्त 

ह्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर संस्थांद्वारे वेळोवेळी कला , साहित्य , संस्कृति आणि मराठी संवर्धनासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला गेला.


१. मी चारभिंतींच्या आत दडवून कितीही झाकून ठेवलं लपवून ठेवलं दु:खाला, यातनेला तरी पण एके दिवशी तयार झाला गौतम त्यागून सर्व मायेला - मोहाला देऊन मंत्र जगाला बुद्धं शरणं गच्छामि धम्मम् शरणं गच्छामि आणि हे सर्व असून माहीत मला तुम्हाला , जगाला तरी आहोत बाळगून भ्रम आम्ही की जगाचा भार घेणारा मीच तो शेषाद्री आहे . २ . झोप जगाला झोपविणारी झोप स्वतः मात्र असते जागत स्वप्नाचे दर्शन होऊ नये म्हणून नि स्वप्न असते पहात वाट झोपेची पाहण्याकरितां स्वप्न अन् मनुष्य असतो घेत गोळ्या झोपेच्या सगळंच विसरायला नि गुलाबी स्वप्न गोंजारायला . ३. खोटा पैसा बारा घरच्या बारा चुली तरी अष्टग्रही उतु लागली चारा करीता एकच डब्बा एका साठी चारांचा खांदा भिंतीचे मग कानामधुनी सीत्कारांचे वारे गेले नव आशेच्या तॄणांकुराला गोंडस नवीन कोंब फुटले व्यवहाराच्या ' किलोग्रॉम ' चे जुने तराजू हाती लागले , पिवळी साड़ी हिरवी चोळी आट्या विना बनली पोळी गडी गडे गड्यांची गडबड जगण्याची उगाच बडबड . दारू बंदीची उगाच धडपड हारांनी होई मान बोजड . ४. एक क्षण दोन कणाच्या दाण्यासाठी दोन मणाचे ओझे पाठी दोन जीवाच्या लग्नासाठी दोन हजार जमती वराती एक क्षणाच्या सुखासाठी एक लक्ष दु:खे पाठी एक जगाला नष्ट कराया एक अणुची पुरते माया शुन्य जगाच्या शुन्यापोटी शुन्यामध्ये फीरती तरंगती शुन्यालयांत शुन्य पुजूनी शुन्यच उरले शुन्या हाती . ५. वेड हे पण वेड असते वेडाचे हे असेच असते चंद्रावर ते स्वारी करते अन् हृदयाचे रोप लावते . वेडे नसते तर शहाणे कुठले वेड नसले तर पेडगांव कसचे ? वेडाचे पण प्रकार आहेत तिथि आहेत नक्षत्र आहेत . रंगाला पण वेडच असते रूपाचे वेड जगच बुडवते पितळ सोन्याला किंमत देते वेड शहाण्यांना वेडावते म्हणूनच न्यूटनला जग मान देते . वेडाला पण जन्म असतो कल्पनेच्या अनंत विश्वांत आत्महत्येचे अपयश गुन्हा ठरतो कल्पनेचे अपयश वेडा बनवतो . वाढलेले रोप खुरडता येते वाढलेले वेड सरणातच जळते वेडामुळेच जगाचा विकास आहे वेडे जर नसते तर जगच निराळे झाले असते. ६. भयानक संस्कृतीच्या नावाखाली पंरपरेच्या हातातलं बनून बाहुलं टाकलं जेंव्हा मानवाने आपल्याच पोटच्या गोळ्याला वाळीत विधवा म्हणून तेंव्हापासूनच कुंकवाला आलं पांढरपण पांढऱ्या कोडापेक्षाही भयानक . ७. स्वप्न निर्ढावलेल्या दिवसाची सुरवातच होते मुळी आळसावलेल्या जांभईतून अन् रजनीच्या बाहुपाशांत बर्फाळलेले स्वप्न पाणी पाणी होते दिसाच्या सोनेरी किरणांनी . ८. गरमी वाऱ्याला होऊ लागली गरमी जेंव्हा तेंव्हा त्याने घेतली ओढून चादर चांदण्याची चंद्राला लपवून हृदयाशी . ९. राख चुलीत टाकलेली राख नोकर एकवेळ काढील पण मालकाने डोक्यांत घातलेली राख तो कशी काढणार ? १०. विडंबना रात्रीचा करुन दिवस घामाच्या पाण्याने छिन्नीला भिजवत कोरले दगडाला त्याने छातीवर परमेश्वराच्या ठेवून पाय परमेश्वरालाच केले निर्माण मंदीरात झाले आगमन मूर्तीचे मूर्तिकाराला ठेवून बाहेर अस्पृश्य म्हणून . ११. चांदीचा चमचा चांदीचा चमचा तोंडात ठेऊन जन्माला आलेला जाताना मात्र तोंडात दातही ठेवून जायला तयार नसतो . १२. नेपोलियन अज्ञानाच्या आनंदातंच राहिला आहे मनुष्य जिवंत आजपर्यंत भविष्याच्या सुखद नि गोंडस कल्पनेच्या कुशीत लपवत स्वतःला अन स्वप्नाला ! नाहीतर नश्वरतेच्या या जगात शाश्वत साम्राज्य वाढविण्याचा अट्टाहास नेपोलियनने कधीच केला नसता. १३. गुरू तुम्हाला जर हवं असेल खरं खरं सुख तर कोंडयाचा मांडा करायला , दगडापेक्षा वीट मऊ म्हणायला शिका अन् अन्न , वस्त्र , निवारा नसणाऱ्याला करा गुरु अन् घेत पाठ दुःखाचे मिळवायला शिका सुखाचा साठा . १४. विस्मृती विस्मृतीच्या आवरणात काय नाही मी ठेवले जमवून,आवरून केव्हां तरी एखाद वेळेस येईल कामाला म्हणून आणि आली वेळ जेंव्हा कामाला येणाऱ्या वस्तूची घ्यायची उपयोगाला तेंव्हा तेंव्हा कळले मला की सर्वच अशाश्वत अनिश्चित - असंगत ठेवलं होतं आवरून कारण शेवटी गेलो मीच विस्मृतीत स्मृतीच्या वस्तूंना मागे ठेवून. १५. खरा कवी बायकोकरीता बायकोची फरक फक्त इतकाच की नवऱ्याने केलेली ही कविता त्याच्या बायकोची ' केल्याने होत आहे रे ' लिहा लिहा गडे करून सुचविला विषय स्वतःचा लिहिता नाक नकटे तिचे आणि दात भोपळ्याचे , फणकारून म्हटले तिने ' हे काय वर्णन माझे ' ? कल्पनाच करायची तर खरी काय खोटी काय लिहा मजेदार गडे नाक माझे चाफेकळीचे . बायका असतात सुंदर किती बोटावर मोजण्या एवढया तरी मग कविकल्पना कशाची ? बुद्धिची ती कमाल कशाची ? केलं मी मग असे वर्णन तिचे पद्मीनी पडली चाट त्याने म्हणते कशी ती मग मला आहात बुवा खरे कवी तुम्ही ! १६. तेव्हां सूर्य पण लाल होता ! तेव्हां सूर्य पण लाल होता ! फार पूर्वीचा काळ होता . तेव्हां चंदाचे चांदणे ' गरम ' होते सूर्याचा दाह शीतल होता दुधाचे रक्त बनत होते रक्ताचे पाणी बनत होते आमच्यात पण पाणी होते तेव्हां सूर्य पण लाल होता ! फार पूर्वीचा काळ होता . तेव्हां शरीरात सुस्ती होती , मनात मात्र अति मस्ती होती , बदामाचा शिरा पचत होता तरी अंगातला रग जिरत नव्हता ! जिभेला स्वर हरवत होते शब्दांचे रूप विरत होते आकाशाचा आकार छोटा होता घराचा परीघ मात्र मोठा होता तेव्हां सूर्य पण लाल होता! आकाश पण लाल होते तिचे गाल पण लाल होते माझे जग मात्र गोल होते गोलात जगाचा जन्म होता कानांत माझ्या प्राण होता पायांत मात्र त्राण नव्हता तेव्हां सूर्य पण लाल होता फार पूर्वीचा काळ होता . १७. अमरत्व अमरत्वाच्या वेड्या स्वप्नात कितींनी उपास तापास केले उभे राहिले एका पायावर नि डोके जमिनीत गाडून अमरवेलाचा शोध करीत फिरले दऱ्या खोऱ्यात जंगलात,खाचा खळग्यात. स्वर्गाची वाट शोधण्यात. यंत्रांनी, मंत्रांनी, अनुष्ठानांनी घालीत आहे गोंधळ अजूनपावेतो. केंव्हा कळेल कोणास ठाऊक मरणच तर माणसाला अमर करत असते जीवनभर.

संकलन : अलकनंदा साने


 


Wednesday, April 13, 2022





कल्पना शुद्धवैशाख

                                                           (६ नोव्हेंबर १९३३ - २१ एप्रिल २०२१)



कल्पना पोळ या इंदूरस्थ  ज्येष्ठ लेखिका होत्या. त्या लेखिका म्हणून वावरताना पोळ या आडनावाचा उपयोग करत नसे  आणि आपल्या नावापुढे "शुद्धवैशाख" हे टोपणनाव जोडत असे.  कल्पनाताईंचा जन्म बडोदा गुजरात येथे झाला होता.  शाळा-कॉलेजात त्यांची  खूप छान प्रगती होती. बारावीत  त्यांना शाळेकडून मानाचे सुवर्ण पदक मिळाले होते.  लग्नानंतर त्या इंदोर आल्या आणि मग त्या इथल्याच रहिवासी झाल्यात.  

साहित्याचे जवळजवळ सर्व प्रकार त्यांनी आपल्या लिखाणात हाताळले होते.  कथा, कविता, कादंबरी, नाटक, एकांकिका असे हे प्रकार होते याशिवाय अभिनय, वक्तृत्व, इत्यादी अनेक कलांमध्येही  त्यांचा सहभाग असायचा व त्यातही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते.  त्यांच्या कथांना किस्त्रीम, माहेर, सुखी गृहिणी, साप्ताहिक सकाळ, विशाखा, धनंजय इत्यादी अनेक  नियतकालिकात प्रसिद्धी मिळाली होती.  कथाकथनाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले होते, शिवाय अनेक कवी संमेलनातही त्यांचा सहभाग असायचा.  त्यांचे पाच कथासंग्रह आणि एक कादंबरी प्रसिद्ध झाली होती.  ''रेवा मंडल" या कथासंग्रहाला  महाराष्ट्र साहित्य सभा इंदूरचे  वि.सी.सरवटे पारितोषिकही मिळाले होते.  
त्यांचा एकमेव कवितासंग्रह आहे "कशी मी अशी मी" त्यातूनच या कविता घेतलेल्या आहेत.  खरं तर त्या कथाकार म्हणून अधिक प्रसिद्ध होत्या पण त्यांच्या कविताही तितक्याच दर्जेदार आणि तोलामोलाचा आहेत हे या पुस्तकात जाणवतं. ह्या पुस्तकात  त्या स्वतः म्हणतात “माझ्या कवितेवर माझ्याकडून फारच अन्याय झाला आहे.  पूर्वी कामाच्या धबडग्यात मनातल्या मनात कवितेच्या ओळी तयार झाल्या तरी कागदावर लिहिल्या जात नसत.  आत्ता तर लक्षात आहेत नंतर लिहू सावकाश असं करता करता केव्हा विसरल्या जायच्या हेही लक्षात यायचं नाही नंतर मी कवितेचा कागद ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला लागले पण अशा एकत्र झालेल्या कविता ही मी प्रसिद्धीसाठी सातत्यानं कुठेही पाठवल्या नाहीत.  कथा प्रसिद्धीसाठी पाठवल्या पण कविता पाठवायचं लक्षातच राहायचं नाही.”
कवितासंग्रहाचे हस्तलिखित प्रसिद्ध करावं ही कल्पना त्यांच्या मुलीची म्हणजे भाग्यश्री कामत यांची आहे. अत्यंत सुंदर हस्ताक्षर हे देखील कल्पना ताईंचं एक वैशिष्ट्य होतं आणि ते वैशिष्ट त्यांच्या लेकीनं समोर आणलं ही आम्हा सर्वांसाठी एक विशेष अशी भेट आहे.  त्या पैकी एक कवितेचे छायाचित्र इथे जोडले आहेत. 

साहित्य क्षेत्रात मानाचे स्थान मिळवत असतानाच कल्पनाताई विविध  साहित्यिक व  सामाजिक संस्थांशी निगडीत होत्या. ह्या सोबत त्या जीवन विमा निगम मध्ये नोकरी करत होत्या आणि तेथूनच निवृत्त झाल्या.  जीविनिच्या टेबल टेनिस टूर्नामेंट मध्ये दोनदा ऑल इंडिया चॅम्पियन आणि अनेकदा चॅम्पियन म्हणून त्यांनी स्टेडियम गाजवलं होतं . बडोद्याच्या विजय जिमखान्यात तर्फे झालेल्या बोटिंग रेस मध्येही  त्यांना चॅम्पियनशीप मिळाली होती. 

खेळाडू इतिहास  आणि तसाच स्वभाव असलेल्या कल्पनाताई आपल्या शरीरास्वास्थ्याची योग्य ती जपणूक करणाऱ्या होत्या पण त्यांना  शेवटल्या क्षणी  कोरोनाने ग्रासले आणि त्या आमच्यातून निघून गेल्या. 

१. शब्द

शब्द माझा वेगळा। शब्द माझा आगळा। 
वसतो जेव्हा गळा। आनंदी आनंद ॥ 

शब्द माझा तम्बुरा। शब्द होई हासरा।
स्पर्शे जेव्हा सप्तसुरा। रसगंगा ॥ 

शब्द माझा सुगंध । वाहे जैसा मृद् गंध । 
मुळापासुनि फुलावरी । परिमळे ॥ 

शब्द माझा वावडी। वरिवरि जाई आवडी। 
इकडे तिकडे भिरभिरे। अनिर्बंध॥ 

शब्द माझा कुंचला। रंगरंगी रंगला।
रंगवूनि थकला वो। अंतरंग॥ 

शब्द माझा वेधक। बाणाहुनी भेदक। 
जिथे रुततो तेथे। हाहा:कार ॥ 

शब्द माझा भाबडा।कधी पडे तो थोकडा । 
होई बाई पडापडी । अर्थालागी ॥ 

शब्द माझा किती खुळा। कधी पोकळ खुळखुळा। 
मनामधि खुळखुळे । सदोदीत॥ 

शब्द माझा सावळा। भेटे , होई सोहळा।
कणोकणी नाचे जैसा । वनमाळी ॥ 

शब्द माझा एकतरी । रसिकाच्या कानावरी । 
पोचती का कधीतरी । कुणाठावे ॥ 

२. जीव

जीव पळात जाईना 
जीव कळात माईना 
जीव क्षणात जाईना 
जीव कणात राहीना 

जीव दिठीत राहीना 
जीव मिठीत राहीना 
जीव कुडीत राहीना 
जीव घडीत जाईना 

जीव तनात राहीना 
जीव मनात राहीना 
जीव सुचीत राहीना 
जीव दुःखीत होईना 

जीव वरती जाईना 
जीव खालीही राहीना 
जीव तळात रुतेना 
जीव जळात तरेना 

जीव सोन्यात तोलेना 
जीव धनात रुतेना 
जीव ओठात हसेना 
जीव डोळ्यात दिसेना 

जीव कोणास कळेना 
जीव कधी आकळेना 
जीव भवास भुलेना 
जीव मुक्तही होईना 

जीव जीवात येईना 
जीव संवाद साधेना 
जीव शिवास मिळता 
जीव काहीच राहीना.

३. कधीतरी व्हावे

कधीतरी व्हावे हिरवे पान 
आणि धरावा थेंब दंवाचा 
कधीतरी व्हावे कळीच छान
आणि धरावा किरण रवीचा 

कधीतरी व्हावे केतकीपान 
शोभे कुंतलभार कुणाचा 
कधीतरी व्हावे काजळकाठ 
भरून यावा नेत्र कुणाचा 

कधीतरी व्हावे चमकी सान 
चाफेकळीचा डौल कुणाचा 
कधीतरी व्हावे पदर तलमसा 
तोलून घ्यावा भार कशाचा 

कधीतरी व्हावे शाल सुगंधी 
पांघरून भर तारुण्याचा 
कधीतरी व्हावे अल्लड प्रीत 
आणि भुलावा जीव कुणाचा 

कधीतरी व्हावे पंचम सूर अन् 
शोभिवंत हो गळा कुणाचा 
षड्ज् मिळावा कधी कुणाशी 
आणि दिलरुबा होई दिलाचा.

४. नभात चंद्र

नभात चंद्र हासतो | वनात पवन खेळतो।
जळात मीन नाचतो । मनात रंग रंगतो ।। 

दिशादिशात परिमळे । चमेली गंध धुंद तो । 
रोमरोमी पसरुनि। अंग अंग जाळे तो ॥ 

विरल मेघ येऊनि | चांद गोल झाकितो । 
पवन कसा अचपळ हा । मम वसना उडवितो।।

शांत टिपूर चांदणे । न्हाऊ घालि चराचरा ।
अजुनि न ये सावळा। जीव होई घाबरा ।।

५ . कधीतरी कुठेतरी 

कधीतरी कुठेतरी अजून देई हाक तो 
तृषार्त खिन्न मानसी अजून होई भास तो ॥ धृ ॥ 

सहस्रधार वर्षते तरी विझे न आग जी 
एक एक अस्थि माझी समिधा हवनातली ।।१।।

तनातली मनातली आस घेई रूप ते 
भिरभिरे जडे मनास साद येई भासते ।।२।। 

दिवस कसा सरुनि जाय सांज मला बोचते 
नयनामधि नीज नाही रातरात जागते ॥३॥ 

कठिण वाट चालता विसर तया गायले 
विसरलेच विसराया सर्व भोग आठवले ॥४॥

६. शिल्प 

त्यांच्या नजरा पाहून 
मी घाबरले , बावरले 
पळून जावं म्हटलं 
तर पाय जड झाले 

नजरेमधलं गरळ 
अंगाला चिकटलं 
माझ्या नितळ रंगाला 
खग्रास ग्रहण लागलं 

प्रतिकार करायला 
हातात दगड घेतला 
जरब बसावी म्हणून 
चेहेरा कठीण केला 

ओठ घट्ट मिटून 
नजर स्थिर करुन 
हालता न डुलता 
उभी राह्यले खिळून 

आता मला समजलं 
शिल्प दगडाची कां ? 
सुंदर सुंदर स्त्रियासुद्धा 
झाल्या पाषाण कां ?

७. शब्दासाठी 

मनातील सारे कढ । कसे येती वरवर । 
सांगू कशी कुणाला । नकळे मज।।

शब्दासाठी वणवण। इथे तिथे धावाधाव। 
नुसतीच दमणूक। हाती न ये काही।। 

कुणा कुणा विचारावे। कुठे कुठे पुसत जावे। 
जीव जणू लोंबकळे । अधांतरी।।
 
वारे उठले सोसाटून। कोसळते वर्षा वरुन। 
भुताटकीचे किर्र रान | शब्द शोधताना।। 

तोडोनिया आत्मकोषा। शब्दासाठी दाही दिशा। 
हिंडते मी धुंडते मी। धरुनि नम्रता।। 

अर्थपूर्ण शब्दासाठी | शब्दाचिया अर्थासाठी 
जगत्पती उमाशंकरा | प्रार्थिते मी।।

८. ' तो ' आणि ' तो ' 

पूर्वी 
जिन्यातल्या त्याच्या पायरवानीच 
छातीत धडधडल्यागत व्हायचं 
त्याच्या नुसत्या चाहुलीनंच 
काया रोमांचित व्हायची 
नुसत्या आठवणीनंच 
हातापायात थरथर जाणवायची 

पण 
पण ते दिवस केव्हाच सरले 
आता बरगडीत कळ आली की कळतं की 
तो लवाजम्यासह येऊन धडकलाय 
हातपाय बोटं सुध्दा बोलू लागली 
की समजतं त्याचं साम्राज्य 
सगळीकडे पसरलंय 
शरीरावर आलेली शिरशिरी शमवण्यासाठी 
शाल पांघरावी लागली की समजावं 
आता घनघोर युद्ध सुरु होणार 

तरी 
तरीही त्याचं धाड पडल्यासारखं येणं 
गडगडणं , कोसळणं , बरसणं 
विलक्षण आवडतं 
फार फार भावतं 
हवंहवंसं वाटतं 
अगदी मनापासून !

९. स्वप्न 

निळ्या भोर स्वप्नांना । जांभळी झालर लागून । 
आली डोळ्यांना नीज । जणू अंगाई ऐकून ॥ 

गुलाबी ग स्वप्नांनी । पाह्यलं जरा लाजून । 
सुगंधी सुबक फुलांचा । सडा पडला वरुन ।। 

रंगी बेरंगी स्वप्नांना । पहाता डोळा भरून । 
त्यांनी डोळा मारता । मीच गेले हुरळून ॥ 

स्वप्नात तुझी माझी । संगत रंगते अजून।
जागेपणी ते आठवून । डोळे आले भरून ॥

 स्वप्नांचे सुंदर फुगे । स्वभात गेले फुटून । 
जाग येताच चुटपुटुन । थोडे घेतले रडून।।

स्वप्नांनी नेहेमी यावे । जावे टिकली मारून । 
वाट पहाता पहाता । डोळे गेले थकून ॥ 

चमकदार स्वप्नांनी । जाऊ नये रुसून ।
मलाच त्यांची गरज । किती तरी अजून॥

१०. चाहूल 

आज या हवेत येई कसला हा गंध 
मोहरे वसंत ये चाहूल मंद मंद 

आंब्याला झोंबते अवखळशी ही हवा 
त्रिकोनात फुटतसे शहारा हवाहवा 
हासुनिया बहरतो निश्वास टाकी जेधवा 
आसमंती पसरतो सुगंध हा नवा नवा 

आज या हवेत बाई कुठला हा नाद 
कोवळ्याशा पालवीची मंजुळशी साद 

हिरवाई बावरी हळूहळूच हासते 
वाऱ्याच्या फुंकरीने हरवूनिया डोलते 
कुहुकुहुच्या तालावर सळसळूनि नाचते 
रंगगंधनादाच्या आनंदी नाहते 

आज या हवेत बाई कुठली ही शीळ 
भिल्लण दे साद , हसे ओठावर तीळ

११. सलामी

कुणाची ग कुणाची 
लागलीसे चाहूल 
शिशिराच्या अंगणात 
वसंताचे पाऊल 

वसंताने वाजवली 
सुरेल मस्त बांसरी 
फुलाफुलांच्या अंतरी 
साठे मधाची माधुरी 

रोमांचाने मोहरली 
का आंब्याची काया 
त्याला ग गवसला 
मोहोराचा हंडा 

दिशादिशात कोंदला 
किती सुगंधाचा नाद 
झंकारल्या पानाफूली 
उठे अबोधसा साद 

रोपावृक्षांना कशी 
मदनाची बाधा झाली 
अंगी खांदी ओठी पोटी 
उठले कोंब दाटीवाटी 

तरारून उठली पाने 
डोकावली हिरवे तुरे 
हिरवा रंग ओतुनि 
दोन्ही दोन्ही हातांनी

जणू वाटे आले न्यारे
पोपटांचे थवे सारे 
वसतीला झाडावरी 
चैतन्याची उसाभरी 

नवी पालवी नमन करिते 
सानुल्याशा हातांनी 
सृष्टीला न्याहाळते 
पानाआडच्या डोळ्यांनी 

पाखरांची शीळ ये 
वाटे घुमते सनई 
वारा धावे दडदडा 
आपची वाजे चौघडा 

मोठा चाले गाजावाजा 
आला आला वसंतराजा 
स्वीकारीत सलामीला 
धरणीवर उतरला

१२. चमेली 

कमरेत लचकून 
हिरवापदर सावरून 
उफाड्याची चमेली 
गच्चीवर गेली चढून 

आभाळातला चांद पाहून 
तन मन गेलं फुलून 
आपली फुलं फेकून 
लक्ष घेऊ का वेधून 

पांढरी शुभ्र फुलं 
आकाशात बसली रुतून 
चमचम चमकून 
प्रीतीची गातात धून 

हे काय वेडेचार 
अशोक म्हणे रागावून 
छाटा तिचे पंख  
कोणी म्हणे ओरडून 

इतरांचा कोरस होकार 
धरणी गेली हादरून 
"अल्लड माझी बाळी 
थोडं घ्या ना सावरून "

धरती म्हणाली तिला 
रागावून थोडं समजावून 
"आकाशाशी नातं आपलं 
ठेवावं थोडं दुरुन 
जगाची रहाटी काय 
नंतर येईल कळून 
नाहीतर टाकतील तुझी 
पाळंमुळं खणून

नाजुक साजुक चमेली 
कधीची आहे रुसून 
तेव्हापासून रहातेय 
आपल्यातच गुंतून 

१३. कविता म्हणजे 

कविता म्हणजे बाळाच्या गालावरची खळी 
जिला बोट लावलं की ते हसू 
मनातल्या कणाकणात पसरतं 

कविता म्हणजे तृणांकुरावरचे दंव 
ज्याच्यावर चाललं की ते 
अंगभर रोमांच फुलवतं 

कविता म्हणजे तरुणीच्या 
उंचावलेल्या भुवया
ज्यांचं मोहक नर्तन 
मनाला गुदगुल्या करतं

कविता म्हणजे कोणाच्या नजरेतलं 'काहीतरी' 
जे काय आहे ते कळत नाही 
पण हुरळून जावंसं वाटतं 

कविता म्हणजे वसंत ऋतुचा वारा 
ज्याच्या स्पर्शमात्रानं 
सर्व सृष्टी पुलकित होते 

कविता म्हणजे नाचणाऱ्या जलधारा 
जिच्यात चिंब भिजल्यावर 
मनाला नवे नवे कोंब फुटतात 

कविता म्हणजे अंधारातून उगवणारा तेजोगोल 
ज्याच्या पायरवानं 
प्राणिमात्रांना नवी स्फूर्ती लाभते 
कविता म्हणजे अथांग निळाई 
जिच्याकडे पहाता पहाता 
हरखून अन् हरवून जावं

कविता म्हणजे धरणीमाता 
जिची सहनशीलता पाहून 
शतशः प्रणाम करावेत 
कविता म्हणजे कडेकपारीतलं तृणपातं 
जे बेजान रुक्ष आसमंतावर मात करून 
नव जीवनाचा संदेश देतं 

कविता म्हणजे बर्फावर सांडलेलं रक्त 
जे पाहून सैनिकांच्या डोळ्यात 
रक्त उतरतं अन दहा हत्तींचे बळ संचारतं 
कविता म्हणजे जीवनाच्या लाकडांवरचा धूर 
जो वर वर जाताना दिसतो 
पण हातात पकडता येत नाही 

कविता म्हणजे धरता न येणारी भावना 
जी असली की जीवन कृतार्थ होतं 
अन् नसली की जीवन अर्थहीन होतं .




संकलन : अलकनंदा साने 




Tuesday, January 11, 2022




 

अरूण शिरढोणकर 

(३ सेप्टेंबर १९४१ - १४ नोव्हेंबर २०१७)


छत्रीबाजार, ग्वाल्हेर येथील प्रसिद्ध शिरढोणकर कुटुंबात जन्मलेले अरूण शिरढोणकर कुटुंब वत्सल गृहस्थ म्हणून ओळखले जात होते, पण स्वतःच्या आयुष्यात, आजूबाजूच्या परिसरात आणि एकूणच  समाजात माणसासोबत  घडणाऱ्या कटू घटनांचा प्रतिसाद त्यांच्या कवितेत दिसून येतो. उत्तर भारतात मराठी भाषेत  पत्रकारितेचा पाया रोवणारे रघुनाथ विष्णुपंत शिरढोणकर ह्यांचे पुत्र अरूण यांना साहित्याचा वारसा वडिलांकडून मिळाला आणि त्यांनी तो योग्य प्रकारे जपला. मराठी आणि हिन्दी दोन्हीं भाषेत त्यांनी समान प्रभुत्त्व मिळविले होते.

 अरूण शिरढोणकर आस्तिक होते. सकाळी लवकर स्नान वगैरे आटपून ते साग्रसंगीत पूजा करायचे, पण आयुष्याच्या शेवटल्या टप्प्या पर्यंत त्यांना अनेक भीषण प्रसंगातून जावे लागले आणि मनात दाटलेली कटूता मग कवितेत व्यक्त झाली. वडिलांच्या सरकारी नोकरीमुळे लहानपण मध्यप्रदेशातील गावांमध्ये गेले आणि अरूण शिरढोणकर यांना  सामान्य माणसाचं जगणं जवळून बघण्याची संधी अनायास मिळाली. ह्या संधीचे त्यांनी सोने केले. मोठं कुटुंब असल्याने आर्थिक सुबत्ता नव्हती, पण शिक्षणाची ओढ मात्र आत्यन्तिक होती. लहान गावात ते शक्य नव्हतं म्हणून आई वडिलांकडून  ग्वाल्हेरला जाण्याची परवानगी घेतली. राह्यला घर होतं पण वडिलांवर इतर भार पडू नये म्हणून साडीच्या दुकानात मदतनिसापासून ते खाजगी  शाळेत शिक्षकाच्या नोकरीपर्यंत मिळेल ते काम केले आणि इतिहास व मराठी ह्या दोन विषयात स्नातकोत्तर (एम ए) पदवी मिळवली. साहित्य, इतिहास आणि पत्रकारितेची प्रचंड तळमळ असलेल्या वडिलांचे ते अस्सल चिरंजीव  होते.साहित्याचे संस्कार त्यांच्या मनावर झाले  होते तर पत्रकारिता रक्तातच होती.

अरूण  शिरढोणकर यांनी वडिलांच्या निधनानंतर १९७१ साली त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त दोन महत्त्वाची कामे सुरू केली. त्यातील पहिले म्हणजे वडिलांची आद्याक्षरे घेऊन त्यांनी तुटपुंज्या आर्थिक बळावर  मराठीत ‘रवी’ साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. अल्पावधीतच या साप्ताहिकाची मध्यप्रदेशातच नव्हे तर देशभरात जिथे जिथे मराठी भाषिक होते तिथे तिथे  यशस्वीपणे दखल घेतली गेली.पण दुर्दैवाने तब्बल चार वर्षानंतर आर्थिक अडचणींमुळे ‘रवी’ साप्ताहिकाचे प्रकाशन बंद करावे लागले. वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी आणखी एक अत्यंत महत्त्वाचे काम केले. सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना देखील ,अत्यंत जोमाने,अरूण दादा दरवर्षी जुलै महिन्यात एक कार्यक्रम करत राहिले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून *गो.नि.दांडेकर, पु. ना .ओक* वगैरे  जुन्या पिढीतील वक्त्यांपासून  ते आधुनिक काळातील *अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, मंगला खाडिलकर* सारख्या  मराठी जगतातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांना ऐकण्याची संधी ग्वाल्हेरकरांना मिळाली.

जवळपास ४० वर्षे वडिलांच्या स्मृती स्वतःच्या बळावर जिवंत ठेवणं सोपं नव्हतं, पण अरूण शिरढोणकर यांनी पुत्रधर्माचे पालन ह्या पद्धतीने कसोशीने केले. इतकेच नाही तर २००८ मध्ये वडिलांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक मोठा कार्यक्रम केला आणि  स्मरणिकाही प्रकाशित केली.आता ते स्वत:ही वयोमानानुसार  थकायला लागले होते.  जेंव्हा  त्यांना वाटायला लागले  की ही मशाल आपण यापुढे हाताळू शकणार नाही तेव्हा त्यांनी २००९ साली  ती भोपाळवासी  त्यांचे धाकटे बंधू डॉ.विजय शिरढोणकर यांच्याकडे सुपूर्द केली.

अरूण शिरढोणकर यांनी आपली संस्कृती नवीन पिढीला माहित असावी ह्या दृष्टीने मधल्या काही काळात अनेक वर्ष दिवाळीत किल्ला आणि भातुकली स्पर्धा आयोजित केली. ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही अशा मुलांसाठी "हितचिंतक विद्या मंदीर" सुरु केले आणि तिथे मुलांना निःशुल्क शिकवले. विशेष म्हणजे ह्या सगळ्या उपक्रमांना समाजाकडून भरघोस प्रतिसाद मिळाला व अनेक जणांनी कुठल्याही आर्थिक किंवा इतर काही फायद्याची अपेक्षा न करता आपली सहभागिता नोंदवली. 

अरूण शिरढोणकर यांचे संपूर्ण आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. संघर्ष आणि आर्थिक अडचणींसह ते  जगले, परंतु  त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण  सकारात्मक होता. कोणतेही काम लहान न समजणे आणि नेहमी व्यस्त राहणे हे त्यांचे जीवनमूल्य होते.  लहान-मोठ्या सर्वांमध्ये लोकप्रिय असलेला सदैव हसरा चेहरा ही त्यांची खास ओळख होती.साधी,सरळ आणि नियमित दिनचर्या हे त्यांचे जीवन सूत्र होते .सांसारिक गोंधळातही ते सर्जनशील कार्यात मग्न होते. वयपरत्वे प्रकृती थोडी ढासळली होती पण ते मानसिकदृष्ट्या निरोगी, सजग आणि सक्रिय होते.

अरूण शिरढोणकर यांनी त्यांच्या निधनाच्या १५ दिवस आधी  ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध शरद व्याख्यानमालेत झालेल्या प्रांतिक मराठी कवीसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. ‘पुरुषोत्तम राव’, ‘सोम्या-गोम्या’ इत्यादी त्यांच्या गाजलेल्या कविता होत्या, पण स्वत:ला मांडण्याची  आधुनिक कला त्यांच्याकडे नव्हती आणि त्यामुळे एकूण साहित्यविश्वात ते काहीसे उपेक्षित राहिले. गाठीशी पैसा नाही शिवाय कोणाकडून मदत घ्यायची नाही हा स्वाभिमान असल्याने  त्यांचा एकही संग्रह प्रसिद्ध होऊ शकला नाही.

अरूण शिरढोणकर यांच्या निधनानंतर सन २०२० मध्ये  त्यांच्या मुलाने "अरूणोदय" नावाने एक छोटेखानी ई - संग्रह काढला. त्या संग्रहाची लिंक येथे देत आहे. शक्य झाल्यास त्याही कविता वाचाव्यात.

 https://www.flipsnack.com/arunoday/arunoday.html



माझी माय

मी तळपलो 
मी मावळलो 
मी हुरळलो 
मी पोळलो 
मायबोलीसाठी 

मी जगलो 
मी खचलो 
मी खरचटलो 
माझ्या भाषेसाठी 

तळहातात माझ्या 
माझे दुखरे डोळे 
मी नाकारली चाकरी 
मी बंडखोर ठरलो 
मी माझ्या मुठीत आवळली
एक वात थरथरणारी

मी मलाच बांधून घेतलं 
मायबोलीच्या पोतडीत 
मी मलाच गुरफटून घेतलं 
माझ्या आईच्या गोधडीत 
आता कुठली माझी दिशा 
जिथे तिथे क्षितिजाची रेषा 

मी जाईन तिथेच जाचतील मला 
ठरलेली चौकट वर्तुळं नि खाचे 
कधी घट्ट कधी सैल कंगोऱ्यांचे काचे 

देवदूतांनो ! 
थांबा थोडे 
लवकरच पूर्ण करेन मी 
अर्ध्यावर राहिले ते हिशेब सगळे 
मला भरवसा या तटावर 
पुन्हा उमटतील माझे पाय 
वाट बघत असेल माझी माय.


वंदू तुज गणराया

आम्ही तुलाच वंदू गणराया 
तुलाच आणि तुलाच 
सगळी दारं ठोठावून झाल्यावर 
उरतं कोण ? तूच 
आम्ही तुलाच वंदू गजानना 
शेवटी आम्हाला तुझाच आधार 
तुझाच भरवसा 
तू कसाही वाग 
सुखकर्ता दु:खहर्ता 
आम्ही तुझीच आरती गाऊ 
अथर्वशीर्षाची पारायणं करू 
स्वतःला विघ्नहर्ता म्हणतोस 
आणि तूच विघ्नं आणतो 
तुला दिसत का नाही 
गुंता झालाय आमच्या जगण्याचा 
नको करू उजळणी 
त्याची तुझ्यासमोर ? 
काहीही झालं तरी 
आम्ही तुझ्याच शरणी 
तुझाच भरवसा आम्हाला 
तू कसाही वाग 
आम्ही तुलाच वंदू गणराया
आम्हाला कळू दिलंच नाही 
तू कधी उसवून टाकली 
लक्तरं आमच्या आयुष्याची 
आता आम्ही ढेपाळलो आहोंत 
आम्ही किती ओरडलो तडफडलो 
पण तू समजूनच 
घेत नाहीस आमची घुसमट 
आम्ही करतोय बेरीज 
आमच्या जगण्याची 
कनवाळूपणे पुन्हा पुन्हा करतोय 
वजाबाकी स्वप्नांची 
आणि या वजाबाकीत 
बाकीच उरत राहते 
जगण्याच्या ओशट इच्छांची 
तू आमच्या 
पुढ्यात ठेवलेल्या वास्तवाने 
आम्हाला किती खरखरीत 
करून टाकलेय तू 
तूच तर पायंडा घातला होता 
जन्मदात्यांना सर्वस्व मानण्याचा 
तूच सांगितलं आम्हाला 
आईवडिलांना प्रदक्षिणा घातली 
म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणा होते 
पण प्रत्यक्षात मात्र तू 
भिकेला लावतोस त्यांना
जी मुलं आई-वडिलांना 
देव मानतात 
त्यांची सेवा करतात 
आणि जे असं करत नाही 
त्यांच्या कानात भिकबाळी असते 
आणि गळ्यातही मिरवतात
ते एखादा दागिना
तू आपला लहरीपणा 
नेहमी दाखवतोच नं 
आपल्या मनासारखं वागतोच नं 
बैस आपल्या ढेरपोटेपणाचं 
कौतुक मिरवत 
कोणी कितीही उपाशी असेल 
तुला त्याचं काय 
अर्धपोटी खपाटी उपाशी पोरं 
दिसतच नाही तुला
भक्तांना आमिष दाखवून 
एकवीस मोदकांचा नैवेद्य 
करायला लावतोस तू 
घालून घे सगळेच मोदक 
तुझ्या घशात 
आणि खाऊ घाल 
तुझ्या त्या उंदरालाही 
कधी आपल्या आसनावरून उठ
देवळाबाहेर येऊन बघ 
कशी तुटून पडतात 
उष्ट्या पत्रावळींवर कच्चीबच्ची 
आमच्या जन्मापासूनच 
तू आमच्याशी वैर साधलं आहे 
आता आमची भूकही 
करपून टाकली आहेस तू 
आता रस्त्यावर चालताना 
आमचा भुसाच भुसा 
उडताना दिसतोय 
पण अजूनही 
आम्ही अदमास घेतोय 
एकमेकांच्या पोटाचा 
एकमेकांच्या पोटापाण्याचा 
आणि अदमास घेतोय 
आमच्या सर्वांच्या आंत असलेल्या 
तुझ्यावरील श्रद्धेचा 
तुझ्या भरवशाचा 
तुझ्या हातातलं 
खेळणं करून ठेवलं आहेस 
तू आम्हाला 
तुझं कळसूत्री बाहुलं 
बनून बसलो आहोंत आम्ही
तुझ्या आईच्या पातिव्रत्याच्या 
गाथा सांगताना विसरल्या जातात 
या जगातल्या अनेक गांधारी 
त्यांना  तू गाद्या गिरद्यांवर 
लोळण्याचे भाग्य देतोस 
आणि दुसरीकडे 
त्यांना तरटाची अवदसा आठवते 
ती तुझ्यामुळेच 
आम्हाला माहित आहे 
तुझ्यात सुधारणा होणार नाही 
तुझा  सोंगट्या फिरवण्याचा
हा खेळ असाच 
चालू राहील 
तरीही आम्ही तुलाच वंदू गणराया 
तुलाच आणि तुलाच 
आधी ही तुलाच शेवटीही तुलाच.

पाठीलाही असतो चेहरा

माझ्याकडे तोंड करून 
मारे कौतुकानं माझी कविता 
ऐकताना वाचताना 
किती सुरेख किती सुंदर 
दिसून राहिला आहात 
तुम्ही सर्व लोक 
पण असं अमोरा समोर 
एकमेकांकडे तोंड करून 
बसलेल्यांहूनही 
अतिशय सुंदर वाटतात मला 
माझ्याकडे पाठ करून 
बसलेली माणसं 
माझ्याकडे पाठ फिरवून 
निघून गेलेली माणसं 

मनातलं सगळंच काही 
बोलत नसतात माणसाचे चेहरे 
पण खूप काही सांगून जाते 
माणसाची पाठ 

चेहरे बघा आता कसे 
पोस्टमार्टम केल्यासारखे 
औपचारिक झाले आहेत 
आपली पाठ मात्र 
अनादी काळापासून 
जशी आहे तशीच आहे 
आपल्या चेहऱ्यासारखे 
उंचवटे खाच-खळगे नसतात 
आपल्या पाठीवर
किती सपाट  
किती तुकतुकीत
किती ओकीबोकी 
तरीही किती बोलकी 
असते पाठ 

पाठीने किती उदारपणे 
दिलेली असते 
आपल्या चेहऱ्याच्या नकळत 
तिच्यात खंजीर खुपसण्याची मुभा 
कसा मल्टीपर्पज 
उपयोग करता येतो 
माणसाला आपल्या पाठीचा 
आयुष्य गजबजतं तेंव्हा 
आयुष्य गहिवरतं  तेंव्हा 
आयुष्याला आपण तोरणं 
लावतो तेंव्हा 
असंख्य हात असतात कौतुकाचे 
आपल्या पाठीवर 
आयुष्यावर जप्ती येते 
तेंव्हा तेच हात उगारले जातात पाठीवर

चेहरे पकडण्याचा चांगुलपणा 
पाठीनेच रुजवलेला असतो आपल्यात 
नाटकाचा पडदा वर गेल्यावर 
एखादी नटी आपल्याकडे 
जेंव्हा पाठ करून उभी असते 
तेंव्हा तिचा चेहरा बघण्याची 
कमालीची घाई झालेली 
असते आपल्याला 
ते तिच्या पाठीमुळेच 

रेल्वेच्या डब्यात 
पाठमोरे बसलेले दिसतात 
जख्ख म्हातारे आजी-आजोबा 
कित्येक पावसाळ्यात भिजूनही 
किती कोरडी राहिलेली असते 
त्यांची पाठ 

घोडा घोडा खेळताना 
चौफेर उधळण्याची 
ताकद मिळते मुलाला 
बापाच्या उघडाबंब पाठीवर लदून 
जिच्या छातीत दूध नसतं 
अशा तरुणीच्या पाठीत 
आपल्या कच्च्या बच्च्यांना 
पेलण्याची ताकद असते 

पाठ म्हणजे 
कवच असतो आयुष्याचा 
पाठ नसेल तर 
आपल्याला कळणार नाही 
किती बेमालूमपणे 
जपलेला असतो 
पाठीने आपला कणा 

आयुष्याच्या शेवटाला 
आई अंथरुणाला खिळलेली होती 
तेंव्हा तिची उघडी पाठ 
मी बघितली 
माझ्या पाठीवर बसलेल्या 
चाबकांचे वळ दिसले होते 
मला माझ्या आईच्या पाठीवर 

पाठ निब्बर नसते कधीही  
तिच्याकडे दाखवली जाणारी 
बोटं तिच्यातही खुपतात 
तिला दुखावतात 
पाठीलाही जखमा होतात
आपण समजतो तेवढी 
दगडाची नसते पाठ.

पोळीवाली बाई

काडी काडी जोडून 
काडी काडी गोळा करून 
आईवडिलांनी उभा केलेला संसार 
तेच घर असायचे एकेकाळी 
लहान निमुळत्या घरांना 
आमची आई म्हणायची नाकपुडी 
आम्ही जन्मलो 
वाढलो पोसलो 
खेळलो बागडलो 
लहानाचे मोठे झालो 
त्याच काडी-काडी गोळा करून 
उभ्या केलेल्या खोपट्यात 
आजच्या घसघशीत ऐपतीच्या 
आणि पॅकेजच्या काळात 
आमच्या त्या खोपट्याला 
नवं नाव मिळालं आहे 
भव्य दिव्य वास्तु ! 

अशाच एका 
भव्य दिव्य वास्तूच्या वास्तुशांतीसाठी 
मी गेलो होतो 
त्या तरुण जोडप्यानं 
भरभरून त्यांची नवीन बांधलेली 
वास्तू दाखवली 
सगळे दाखवून झाल्यावर 
आम्ही स्वयंपाकघरात 
नव्हे, किचन मध्ये येतो 
भरपूर उजेड 
एसी चिमणीचे मॉड्यूलर किचन 
मी वा वा म्हणणार 
इतक्यात त्या जोडप्याने 
मला विचारले 
काका तुमच्या ओळखीची 
एखादी पोळीवाली बाई आहे का 

प्रश्न ऐकून मला ठसका लागला 
अंधाऱ्या स्वयंपाकघरात धुराड्यापाशी 
चुलीवर भाकरी भाजणारी 
आठवली आमची आई 
आमच्या खळगीसाठी 
भगभगत्या चुलीसमोर बसलेली 
आठवली आमची आई 
आमच्या खोपट्यात 
अंधारं स्वयंपाकघर होतं 
त्या खोपटात 
एक देवघरही होतं 
सोळं नेसून उघड्या अंगाने 
वडील जेव्हा देवघरात पूजेला बसायचे 
त्याच वेळेस धाबळ नेसून 
अंधाऱ्या स्वयंपाकघरात 
नैवेद्याचं ताट वाढणारी 
आठवली मला आमची आई 
देवघरावर आईची 
जेवढी श्रद्धा होती 
स्वयंपाकघरावरही 
तेवढीच श्रद्धा ठेवणारी 
आठवली आमची आई 

पोळीवालीच्या प्रश्नावर 
मी गप्प होतो 
त्या तरूणीने मला विचारले 
कुठे हरवलात काका 
कुठे नाही 
तुझ्या प्रश्नावर 
मला एक जुनी पोळीवाली बाई आठवली होती.

अभिनंदन पत्र

मला तुमचं अभिनंदन करायचंय 
तुमचं, तुमचं आणि तुमचं सुद्धा 
माझ्या विरुद्धचे 
तुमचे कट कारस्थानं 
यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत 
म्हणून मला तुमचं अभिनंदन करायचंय 
तुमचं, तुमचं आणि तुमचं सुद्धा 

माझ्यासाठी जिच्या डोळ्यांना 
भरून येण्याची घाई असते 
अशी माझी बायको 
मला देव मानणारी माझी मुलं 
माझ्यात वडील बघणारी माझी सून 
आणि साखरही फिकी वाटेल 
असे गोड नातू 
या सर्वांसह 
मी सुखात होतो 
आणि माझं हेच सुख 
तुम्हाला खुपलं 

तुम्ही हुकूम केला 
ठेव आपली राहुटी गहाण 
घरात सोयीच्या वस्तू आण 
मी कंप्यूटर आणला 
लॅपटॉप आणला 
टीव्ही फ्रिज आणला
वॉशिंग मशीन आणली
कार आणली 
मी तुमचं सगळं सगळं ऐकलं 
तुम्ही पुन्हा हुकुम केला 
आता गळा दाबून खल्लास कर 
आपल्या घराचं घरपण 
मी तेही केलं 

मी माऊसच्या आहारी गेलो 
माऊस मला दाखवू लागला 
वारा पाणी 
अंधार उजेड 
गोंगाट शांतता 
खिडकी, चिमणी आणि अंगण 
वेळेचे बुद्धिबळ 
नेहमी तुम्हीच जिंकला आहांत 
मी तुमचं प्यादं आहे 
की  मी तुमचा गुलाम आहे
हे माझ्या ध्यानीमनीही नाही
तुम्ही सांगितलं तेथे 
मी सही केली 
पूर्वी अंगठा लावायचो तशी 
तुम्ही मला गंडवलं 
तरी मी तुम्हाला सलाम केला 

पूर्वी नाही का 
तुम्ही सनसनाटी 
आणि बलात्काराच्या बातम्या 
खपवण्याचा चंग बांधला होता 
मला आता त्या बातम्यांची 
सवय जडली आहे 
माझ्या घशाखाली घास उतरत नाही 
बलात्काराची बातमी 
वाचल्याशिवाय 
आता मला पाणीही पिववत नाही 
साबणाच्या जाहिरातीसाठी 
आंघोळी करणाऱ्या मुली बघितल्या शिवाय 

तुम्हीच तर माझ्या घरी येऊन 
समज देऊन गेला होता 
की आपली भाषा आपली संस्कृती 
आपण जपली पाहिजे 
तुम्हीच तर आयोजित केल्या 
वासना चाळवणाऱ्या स्पर्धा 
आणि तुम्हीच तर तयार केलेत 
असले अंगविक्षेप बघून 
आनंदाने टाळ्या पिटणारे 
रक्षक प्रेक्षक 

तुम्हीच मला शिकवलं 
आपल्या मूळ पुरुषाला विसरून 
मंचावरून कशी गावी 
आपणच आपली थोरवी 
तुम्हीच मला शिकवलं 
कसा लावावा 
रोज नवा चेहरा 
सगळं कसं तुमच्या मनासारखं होतंय 
पुढेही असंच सगळं 
तुमच्या मनासारखं होईल. 

उद्या सकाळी उठल्यावर 
आरशासमोर उभा राहून 
मी माझे केस विंचरेन 
तेव्हा मी मलाच ओळखणार नाही 
मी माझी ओळख विसरावी 
नेमकं हेच तर तुम्हाला हवं होतं 
तुमची कटकारस्थानं यशस्वी झालीत 
म्हणून मला तुमचं, तुमचं आणि तुमचं 
अभिनंदन करायचं आहे.

घाबरट कुठला

सोम्या गोम्या राम्या 
दगडू धोंडू 
तुझं नाव काहीही असो 
तुझ्या घरी नाहीये 
पोटाची खळगी भरायला पोळी 
अन् नाहीये 
तुझ्या कच्च्याबच्च्यांसाठी दूध भात 
तुझी बायको, तुझी मुलं 
आणि तुझ्या अंगावर 
एका लंगोटी शिवाय 
वस्त्राच्या नावाने काहीही नाहीये 
आणि तुला भीती वाटते आहे 
जी आहे जशी आहे 
असून नसलेली अशी ही 
तुझी लंगोटीही 
कोणी पळवून न घेऊन जावो 
तुला भीती वाटतेय 
तुझ्या लंगोटीची 
तुझं नाव काहीही असू दे!

तुझ्याकडे कोणाचेही 
लक्ष नाहीये 
सगळे लागलेत 
आपापली बढाई मारण्यात 
आपले नगारे वाजविण्यात 
आणि मशगूल आहेत 
क्रिकेटचा खेळ बघण्यात 

साहेब गुंतले आहेत 
कॉम्प्युटरच्या गुपितात 
अन्यायाच्या गोष्टी 
कोणीही ऐकत नाहीये 
न्यायाच्या गोंगाटात 
काही बसले आहेत 
गर्दी करून संतांच्या प्रवचनात 
काही निघाले आहेत 
आपल्या ऐश्वर्याला घेऊन 
नॅनो मारुती वाहनात 
आणि उरलेले गरोदर 
असल्यासारखे ढेरपोटे 
मग्न आहेत 
पावभाजी, मसालाचाट खाण्यात 

कोणाला माहित नाही 
तू कुठल्या गल्लीबोळात राहतो 
की तुझ्या घराच्या 
भिंतीवर लिहिलंय 
एका तिळात 
सात जणांनी भूक भागविल्याचं 
लिहिलंय 
पाणी मागितलं 
तर दूध मिळाल्याचं 
आणि लिहिलंय 
संभवामी युगे युगे!! 

सोम्या गोम्या राम्या 
दगडू धोंडू 
मला एक प्रश्न सारखा बोचकारतोय 
की तुझ्या शेजारी तुझ्या वस्तीत 
तू जिथे काम करतो तेथे 
सगळेच नग्न व्यवहार 
करत असताना 
सगळेच नग्न वावरत असताना 
तुझं नाव काहीही असू दे
पण
तुलाच आपल्या लंगोटीची 
एवढी भीती कां ?

खास म्हणून तुम्हाला सांगतो

तुम्हाला 
खूप जगावसं वाटतं पुरुषोत्तमराव 
तुमच्या मुलीनं इंजिनीयर बनावं 
मुलाने डॉक्टर व्हावे 
असं वाटतंय तुम्हाला 
होईल सगळं होईल 
सगळं तुमच्या मनासारखं होईल 
मुलगी इंजिनीयर होऊन परदेशात जाईल 
मुलगा डॉक्टर बनून मोठ्या जागेवर पोचेल 
अन् तुम्हा दोघांना खूप आयुष्य मिळेल 
पण 
तुम्ही आपलेच आहात पुरुषोत्तम राव 
म्हणून खास म्हणून सांगतो 
आता जगला वाचला 
ज्याची सगळी स्वप्नं पुरी झालीत 
असा कोणी असेल तर तोच असेल 
जो रस्त्यांवर जखमी पडलेल्या मुलांना 
इस्पितळात घेऊन जाणार नाही

तुम्हाला 
खूप जगावसं वाटतंय न पुरुषोत्तमराव 
म्हाताऱ्या आईपाशी 
बसायचा कंटाळा करा 
सिग्नलपाशी भीक मागणाऱ्या 
दुःखांचा विचार करू नका 
आपल्या पोळीवर तूप वाढून घेताना 
मुलांचे मार्क वाढवून घेण्यासाठी 
लाच देण्याचा पुरुषार्थ दाखवा 
खरं सांगतो पुरुषोत्तमराव 
तुम्हाला मनसोक्त आयुष्य लाभेल 

तुम्ही कुठल्या गल्लीबोळात राहता 
याला महत्त्व नाहीये 
महत्त्व आहे ते याला
की तुमच्या घरात इतिहासाची एखादी भिंत 
अजून जीवन्त तर नाहीये ?
अशी एखादी भिंत 
तुमच्या घरात असेल पुरुषोत्तमराव 
तर त्या भिंतीकडे पाठ फिरवा 
पाडून टाका त्या भिंतीला 
खरडून खरडून पुसून काढा 
इतिहास त्या भिंतीवरचा 
तुमचे सगळे ताण सैल होतील 
मग बघा 
तुम्हाला नुसतं तुमचं 
तुमचंच आयुष्य दिसेल

तुमच्या टीव्हीवर 
पोहत येतात का पुरुषोत्तमराव 
आफ्रिका खंडातली खपाटी पोटाची पोरं 
किंवा तुमचा टीव्ही 
कधी ओलावला आहे का 
जगात जागोजागी सांडणाऱ्या रक्ताने 
आणि तुम्ही बघितली आहे का 
तुमच्या टीव्हीत 
आपल्या कच्च्या बच्च्यांसाठी 
जिच्या छातीत दूध नसतं 
आणि नसलेलं दूध 
लपवण्यासाठी जिच्यापाशी पदरही नसतो 
अशी एखादी आई 
असं असेल तर 
नसती कटकट कशाला बाळगता 
कां उगीच डोक्याला 
त्रास करुन घेता 
लगेच चॅनल बदला 
आणि 
आंघोळी करणाऱ्या मुलींच्या 
जाहिराती बघा 
तुमचा सगळा शीण निघून जाईल 
तुम्ही हमखास शतायुषी व्हाल 
पुरुषोत्तमराव 

तुमच्या खोलीत 
तुमचे तीर्थरूप 
तुमच्या मातोश्री
तुमचे सासरे 
तुमच्या सासुबाई 
किंवा तुमचे वाडवडील 
किंवा लोकमान्य टिळक 
किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर 
वगैरे वगैरेंची  चित्रं लागली असतील 
तर ती चित्रं काढून 
अडगळीत टाका 
त्याजागी जल्लादाचं 
एक चित्र आणून लावा 
तुमच्या जगण्याला चव येईल 
पुरुषोत्तमराव 

तुम्हाला खूप जगावसं वाटतंय नं 
पुरुषोत्तमराव 
तुम्ही आपलेच आहांत 
म्हणून खास म्हणून 
तुम्हाला हे सांगितलं
हे सुचवलं

तुम्ही नक्कीच खूप सुखी व्हाल
पुरुषोत्तमराव ! 


अपेक्षा 

आमच्या दुखऱ्या अंगाचं दुखणं
कायमचं जेव्हा थांबेल
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !
आम्ही सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव
कुठलीही गफलत खपणार नाही बघ
तू शंभराहून जास्त जग !
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !

तुझे पोरं म्हणतात ,
मुलांमध्ये मूल होऊन वावरलास तू
आणि वाटू लागलं
जगणं म्हणजे
खरोखर सगळं  झटकून
माणसाने पुन्हा मुल बनावं  
कुणाच्या तरी कडेवर बसून
सगळं आयुष्य बघावं  !
मुलांसारखे आपल्यालाही भाबडे डोळे असावे
सगळं  काही समजून - उमजून
आपणही काही काळ भोळे  व्हावे
आयुष्याच्या गुंत्याचं हे टोक आम्हाला ही वळू दे
तुझा खांदा आम्हालाही मिळू दे !!

कुणास ठाऊक , काय उरेल पुढे
काय घडवतील आठवणींचे तुकडे
कोण गेले , कोण राहिले ,
कदाचित शक्य होणार नाही हेही धड मोजणे
प्रत्येकाचा वेगवेगळा खेळ असतो
अद्र्श्याच्या हातात , आपण  नुसते बाहुले असतो
पाणी बदलतं , कावडीही बदलतात
पण धूळ खात पडलेल्या , प्रत्येकाच्या चोपड्या
जशाच्या तशाच राहतात ,
तुझ्या खेळाने , ब्रह्मदेवालाही भुरळू दे
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!

तुम्ही म्हणाल , पुरे झालं आटपा आता  
पण कुणाच्या सांगण्याने
सोपं नसतं असं भराभरा आटोपून घेणं
आपण किती  मैलाचे दगड चाललो
याचे पुस्तक  सुद्धा ,
एखादी खूण ठेवूनच मिटता  येते
आमची अशीच खूण ,
तुला भरभरून फळू दे
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!

आम्ही सत्तर ऐंशी नव्वद नव्याण्णव
कुठलीही गफलत खपणार नाही बघ
तू शंभराहून जास्त जग !
तुझा खांदा आम्हाला मिळू दे !!!!


अरूण शिरढोणकर यांच्या काही कविता हिन्दीतही आहेत. 

शब्दकोश

एक शाम उसने कहा 
मुझे शब्दकोश दोगे क्या ? 

अनगिनत नि:शब्द ज़ख्म है मेरे पास 
तुम्हें चाहिए क्या ? 
मेरे इस जवाब पर 
देखती रही थी तुम 
मुझे देर तक 

फिर उस शाम शब्दकोश 
वापस करने आई 
तो तुमने पूछा था 
कहां छोड़ आते  हो इतने शब्द ? 
तुम्हारे इस शब्दकोश में तो 
सिर्फ अर्थ है  
शब्द कहाँ  गये 

समय ने अपने तरीके से 
सब मिटा दिया था 
मेरे अस्तित्व की सारी निशानियाँ 
मिट चली थी 

फिर भी 
उसकी बातों का जवाब 
देने के लिए मैंने कहा 
चाहे कुछ भी हो  
हमें जीना पड़ता है 
और इसी जीने - मरने के युद्ध में 
हमें शब्द मिल जाते हैं !


दरख्तों की जड़ें

बचपन से लेकर आजतक 
दरख्तों और उनकी जड़ों को 
देखता आया  हूँ मैं 
अब कई सवाल पूछना है 
मुझे जड़ों से 
दरख्त जब आसमाँ 
छू लेते हैं 
उस ऊँचाई पर पहुंच जाते हैं 
कि हमे नाज़ हो  
वहाँ तक दरख्तों को पहुंचाने के लिए 
कितनी गहराई तक 
छिपाए रखती हैं 
जड़ें अपने आपको 
दरख़्त जब लहलहाने  लगते हैं 
हरे भरे पत्तों से 
बूढ़ी होती जड़ों की दुखती रगें 
क्या उन्हें याद आती हैं 
जब फूल और कलियां खिलती है 
तो क्या उनकी खुशबू 
एक मुस्कान लाती है जड़ों पर 

एक सवाल और पूछना है 
मुझे जड़ों से  
कि कब तक बर्दाश्त करना है 
उन्हें ये सिलसिला 
दरख्तों को ऊँचाई देने के लिए।


गुलामी

"बच्चों हम दो सौ साल तक अंग्रेजों  के गुलाम थे' 
बताया था 
सर ने कक्षा में 
पर उसे कुछ समझ नहीं आया 

घर पहुँचकर कांधे से 
बस्ता उतारते हुए 
उसने बहन से पूछा 
दीदी ये गुलामी क्या होती है
गुलामी मतलब क्या ?

उसके हाथ से बस्ता लेते हुए 
बहन बोली
तुम पढ़ पाओ 
इसलिए बाबूजी ने मेरी पढ़ाई छुड़वायी 
मेरा स्कूल छुड़वाया 
इसे ही गुलामी कहते हैं !

बेटी पढ़ाओ -बेटी पढ़ाओ 
सरकार ऐसा कितनी भी बार कह ले 
तब भी 
पैसे की जरूरत तो होती है 
और हमारे पास वही नहीं है 

धीरे-धीरे बहुत कुछ समझ जाओगे
अभी के लिये इतना जान लो
कि धन का अभाव भी गुलामी होती है !

संकलन : अलकनंदा साने 

श्रीरंग गोखले 'रंग शिवार्चक'

*सोनेरी पान* : *श्रीरंग गोखले 'रंग शिवार्चक'*       (२६ जून १९६३- ०९ नवंबर २०२३) वरिष्ठ कवि, लेखक, और गीतकार स्व. श्रीरंग गोखले ...